राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकी झडत असतानाच, गेल्या काही महिन्यांत या दोन्ही पक्षांमधील नेत्यांशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊनही त्याचा राज्यातील जनतेवर फारसा विपरीत परिणाम झालेला दिसत नाही, असे नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होते. एकीकडे सेना-भाजपला राज्यात आपला विस्तार मोठय़ा प्रमाणात करता आला नाही आणि पायाही विस्तारता आला नाही, असे या निकालांवरून दिसते. माध्यमांमध्ये भ्रष्टाचाराबद्दल कितीही उच्चरवात वितंडवाद सुरू असले, तरी जनतेने त्याकडे काणाडोळाच करायचा ठरवले आहे की काय, असे वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे. राज्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत राष्ट्रवादीला भरघोस यश मिळाल्याचा दावा करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनता आपल्याच पाठीशी असल्याचा दावा नुकताच केला होता. त्या दाव्यापाठोपाठ राज्यातील या निवडणुकांचे चित्र पाहता या दोन्ही पक्षांमधील स्थिती तुल्यबळ म्हणता येईल, अशी असल्याचे दिसते आहे. राज्यातील दहा नगरपालिकांचे जे निकाल लागले आहेत, त्यावरून तरी या दोन्ही पक्षांतील स्पर्धा अटीतटीची असल्याचे चित्र पुढे आले आहे. ठाणे, नाशिक आणि विदर्भातील निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांची कामगिरी भाजप, शिवसेना या विरोधकांना लाजवणारी आहे. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमधील अनेक मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येताहेत, त्यातील काहीजण गजांआड आहेत. राज्यातही सिंचन घोटाळ्यासारखी प्रकरणे बाहेर येत असताना, त्याचा काहीही परिणाम प्रत्यक्ष मतदानात झालेला दिसत नाही. दहा नगरपालिकांमधील चार ठिकाणी दोन्ही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. सेना-भाजपचे या निवडणुकांमधील यश नगण्य म्हणावे असे आहे. आकडेवारीतच बोलायचे झाले, तर काँग्रेसचे ९० आणि राष्ट्रवादीचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत; तर सेनेचे २२ आणि भाजपचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचा ‘आपलेच नाक वर’ असे सांगण्याचा प्रयत्न या आकडेवारीवरून तरी फोल ठरणारा आहे. गेल्या काही वर्षांत भाजप आणि सेना यांच्यातील नेतृत्वामध्ये फारशी चमक दिसलेली नाही, याचेच हे द्योतक आहे, असे म्हटले पाहिजे. राष्ट्रवादीचे आमदार राम पंडागळे यांनी शरद पवार आणि अजित पवारांपासून राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री भ्रष्टाचारी असल्याचे जाहीर करून जी खळबळ उडवून दिली आहे, त्याने या पक्षाची प्रतिमा कितपत मलिन होईल, याबद्दल शंका असली, तरीही उघडपणे आता अशी चर्चा सुरू झाली आहे, एवढे मात्र नक्की. पंडागळे यांना पक्षाच्या मागासवर्गीय सेलच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय झाल्याने ते कदाचित त्राग्यापोटी असे बोलले असणे शक्य आहे. राज्यातील कोणत्याच राजकीय पक्षाकडे सध्या उजळ माथ्याने फिरू शकेल, असे कर्तृत्ववान नेतृत्व नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा स्वच्छ असली, तरी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल शंका आहेत, तर अजित पवारांमुळे राष्ट्रवादीची कोंडी झालेली दिसते. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे आणि नितीन गडकरी यांचे संबंध ताणल्यासारखे आहेत, तर सेनेला मनसेची वेसण बसते आहे. राज्यातील राजकीय ताणाताणी पुढील काळात अधिक तीव्र होणार, याचे सूतोवाच आता झाले आहे.
जनतेचा काणाडोळा?
राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकी झडत असतानाच, गेल्या काही महिन्यांत या दोन्ही पक्षांमधील नेत्यांशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊनही त्याचा राज्यातील जनतेवर फारसा विपरीत परिणाम झालेला दिसत नाही, अ
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 08-11-2012 at 12:05 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anwayartha