बक्षिसी व लाचखोरी यांचा थेट संबंध संशोधनातून दिसून आला. नवस हासुद्धा बक्षिसीचा प्रकार नाही का, यावरही विचार झाला पाहिजे. लाच, भ्रष्टाचार हा विषय भारतापुरता मर्यादित नाही. जागतिक बँकेने केलेल्या पाहणीनुसार जगाच्या एकूण उत्पन्नापैकी तीन टक्के रक्कम भ्रष्टाचारात हडप होते. जगातील प्रमुख २८ अर्थसत्तांमध्ये क्रम लावला असता भ्रष्टाचारात भारताचा क्रम आठवा लागतो. रशिया पहिल्या क्रमांकावर आहे.
परस्पर व्यवहार वेगाने सुरू झाल्यावर लाच देण्या-घेण्यावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक देशांनी कडक कायदे केले. पण मानवी मन विलक्षण सर्जनशील असल्यामुळे या नियमांतून पळवाटा शोधणे कठीण गेले नाही. भ्रष्टाचार सुरू राहिला. अगदी अमेरिकेतही तो चिंता करावा इतका आहे, असे तेथील समाजशास्त्रज्ञांना वाटते.
भ्रष्टाचाराला आळा घालण्याबरोबर भ्रष्टाचारामागची कारणे शोधण्याची धडपड सुरू झाली. प्रमुख विश्वविद्यालयांनी याबाबतचे प्रकल्प हाती घेतले. गेली आठ वर्षे यावर बरेच काम झाले आहे. गेल्याच आठवडय़ात हार्वर्ड विश्वविद्यालयातील मॅग्नस टॉर्फसन व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाच देण्या-घेण्यामागची मानसिकता शोधणारा निबंध ‘सोशल सायकॉलॉजिकल अॅण्ड पर्सनॅलिटी सायन्स’ या जर्नलला सादर केला. मानसशास्त्र, समाजशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र या तिन्ही क्षेत्रांत या निबंधाची बरीच चर्चा सुरू झाली आहे.
टॉर्फसन यांनी नवाच दृष्टिकोन खुला केला. ‘ट्रान्सफरन्सी इंटरनॅशनल’तर्फे प्रत्येक देशाचा भ्रष्टाचारातील क्रम ठरविला जातो. त्या देशातील बक्षिसी देण्याच्या सवयीशी त्याचा संबंध जोडीत टॉर्फसन यांनी काही निष्कर्ष काढले. ते गमतीशीर आहेत व आपल्या मनाची ओळख पटवून देणारे आहेत.
बक्षिसी व लाच यांना समान मानले जात नाही. रेस्टॉरंट वा अन्य ठिकाणी लहान-मोठी सेवा मिळाल्यानंतर खूश होऊन वेटर वा अन्य व्यक्तीच्या हातावर ग्राहक बक्षिसी ठेवतो. याला गैर मानत नाहीत, उलट मनाच्या उदारपणाची ती खूण मानतात.
तथापि, लाच देण्याची ऊर्मी व बक्षिसी देण्याची इच्छा यामध्ये काहीतरी संबंध असावा असे टॉर्फसन यांना वाटत होते. बक्षिसी ही वाटते तितकी सरळ कृती नाही. त्यामागे गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया असते. बक्षिसी देण्याची पद्धत अगदी राजेरजवाडय़ांपासून सुरू असली तरी आधुनिक युगातील त्याचे स्वरूप हे लंडनमध्ये ठरले. लंडनमधील वायदे बाजारात कॉफी हाउसमध्ये चटकन कॉफी पिऊन पुन्हा बाजारात बोली लावण्यासाठी जाण्याची घाई व्यापारांना असे. तेव्हा कॉफी हाउसमध्ये दरवाजातच एक पेटी ठेवण्यात आली. त्या पेटीत आधी पैसे टाकणाऱ्याला प्रथम कॉफी मिळत असे. यातून कॉफी हाउसला फायदा होई व व्यापारांना लवकर कॉफी मिळे.
परस्पर संमतीने केलेला हा व्यवहार साधासुधा वाटला तरी यामध्ये तत्पर सेवा मिळविण्याची खात्री ‘आधी पैसे देऊन’ केलेली असे. बक्षिसी देण्यामागे चांगली सेवा मिळेल याची हमी गृहीत धरलेली होती. व्यापाऱ्यांना क्रमाने कॉफी न देता
थोडे जादा पैसे आधी देणाऱ्यांना त्वरित कॉफी मिळत होती. हा व्यवहार अर्थातच थोडा लाचखोरीकडे झुकलेला होता.
टॉर्फसन यांनी लंडनचा दाखला दिलेला नाही, पण मुद्दा मात्र तोच उचलला आहे. आता सेवा मिळाल्यानंतर आधी किंवा दोन्ही वेळा बक्षिसी दिली जाते. ज्या देशात बक्षिसी देण्याचे प्रमाण जास्त असते तेथे लाचखोरीचे प्रमाणही जास्त असते, असे टॉर्फसन यांना दिसले. यात भारताचाही समावेश आहे.
परंतु काही देशांमध्ये बक्षिसी देण्याचे प्रमाण सारखे असले तरी लाचखोरीचे प्रमाण कमी-जास्त आहे. याचा अर्थ बक्षिसीबरोबरच आणखी काही कारणे लाचखोरीच्या मागे असतात. ती शोधून काढण्यासाठी कॅनडा व भारत यांचा अभ्यास करण्यात आला. बक्षिसी देण्याचे प्रमाण या दोन्ही देशांत सारखे आहे. पण लाचखोरीत कॅनडाला २.९ गुण आहेत तर भारताला ८.१ (१० म्हणजे सर्वाधिक लाचखोर.) या दोन देशांत शोध घेतला असता बक्षिसी देण्यामागची मानसिकता दोन्ही देशांत वेगळी असल्याचे आढळून आले व मानसिकतेमधील या बदलाचा लाचखोरीशी थेट संबंध दिसून आला.
चांगली सेवा मिळाली व काम पूर्ण झाले की कॅनडामध्ये बक्षिसी दिली जाते, तर भविष्यात अधिक चांगली सेवा मिळावी या अपेक्षेने भारतात बक्षिसी दिली जाते. (लंडनमधील कॉफी हाउसप्रमाणे) हा फरक अतिशय महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांत कृती एकच असली तरी कॅनडामध्ये झालेल्या कामाची पोच आहे तर भारतात पुढील व्यवहार चांगला करून घेण्यासाठी वातावरणनिर्मिती केलेली आहे. काम झाल्याबद्दल समाधान मिळाल्यामुळे कॅनडात बक्षीस दिले जाते तर पुढील गुंतवणूक वा पुढील कामाचा विमा म्हणून भारतात बक्षिसीचे वाटप होते.
भविष्यात काम चांगले होईल याची हमी म्हणून बक्षिसीकडे पाहिले की ती लाचखोरीकडे झुकते. मग लाचखोरीकडेही माणूस काणाडोळा करतो.
नीना माझर व पंकज अगरवाल यांनी लाचखोरी व सामाजिक मानसिकता यांच्यातील वेगळ्या संबंधांवर गेल्या वर्षी प्रकाश टाकला होता त्याची येथे आठवण होते. ज्या देशांमध्ये व्यक्तिनिष्ठ मानसिकता अधिक असते तेथे लाचखोरी कमी असते, तर जेथे नातेसंबंधांना अधिक महत्त्व असते तेथे लाचखोरी अधिक असते. युरोप व अमेरिकेतील समाज बराच व्यक्तिनिष्ठ आहे तर आशियात जात, गट, कौटुंबिक नातेसंबंध यांना महत्त्व आहे. काम कसे झाले यापेक्षा व्यक्तिगत संबंध जपणे वा वाढविणे याला आशियात महत्त्व मिळते. बक्षिसी देण्यामागे हे संबंध वाढविणे हा एक उद्देश असतो. भारतातील राजकीय पक्षांचे वर्तन यामध्ये बरोबर बसते. आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे व्यक्तिनिष्ठ समाजात व्यक्ती ही तिच्या प्रत्येक कृतीसाठी जबाबदार धरली जाते तर समूहनिष्ठ समाजात जबाबदारी वाटली जाते. व्यक्तिनिष्ठ समाजातील माणूस व्यवहार करताना बराच सावध असतो. याचे प्रतिबिंब व्यावसायिक जगातही पडते.
आपली कृती ही भूतकाळातील घटनांशी संबंधित ठेवायची की भविष्यातील, याचा निर्णय घेण्याच्या मेंदूच्या क्षमतेला ‘टेम्पोरल फोकस’ असे म्हणतात. कॅनडामध्ये हा फोकस भूतकाळाकडे असतो तर भारतात भविष्याकाळाकडे. हा फोकस बदलला तर लाचखोरीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात फरक पडतो का, हे टॉर्फसन यांनी तपासून पाहिले. हा प्रयोग अमेरिकेत करण्यात आला. प्रयोगात भाग घेणाऱ्यांचे दोन गट करून त्यांना दोन स्वतंत्र लेख वाचण्यासाठी देण्यात आले. चांगली सेवा मिळविण्याची हमी किंवा उत्तेजना म्हणून बक्षिसी द्यावी असा युक्तिवाद एका लेखात केला होता तर चांगली सेवा मिळाल्याचे पारितोषिक म्हणून बक्षिसी द्यावी, असे प्रतिपादन दुसऱ्यात करण्यात आले होते. दोन गटांना दोन स्वतंत्र दृष्टिकोनांनी बांधून टाकण्यात आले. त्यानंतर या दोन्ही गटांची विविध प्रकारे परीक्षा घेऊन लाचखोरी तसेच भ्रष्टाचार याबद्दल त्यांची मते तपासण्यात आली. भविष्याची हमी म्हणून बक्षिसी द्यावी या युक्तिवादाच्या प्रभावाखाली आलेल्यांना लाच देणे वा घेणे फारसे गैर वाटले नाही. भ्रष्टाचार चालवून घ्यावा, तो एक सर्वसाधारण मानवी व्यवहार आहे, असे या गटाचे मत पडले. मनाचे स्वत:वरील नियंत्रण सैल पडले. दुसरा गट मात्र लाचखोरीला त्वरित पायबंद घालावा अशा विचारांचा निघाला.
टॉर्फसनचे संशोधन म्हणजे लाचखोरीवरील शेवटचा शब्द नव्हे. यावर बरेच संशोधन होणे बाकी आहे. पण मेंदूचा फोकस व लाचखोरी यांचा परस्पर संबंध यात स्पष्ट दिसतो. मेंदूचा फोकस रीतीरिवाजातून पक्का होतो व ते देशाप्रमाणे बदलतात.
भारतातील धार्मिक रीतीरिवाज व बक्षिसी देण्याची ऊर्मी यांचा परस्पर संबंध इथे तपासून पाहावासा वाटतो. देवासमोर दानपेटीत पैसे टाकणे वा नवस बोलणे हा प्रकार भारतीयांच्या अंगवळणी पडलेला आहे. नवसापोटी अनेक देवस्थानांना दिलेल्या भरघोस देणग्यांच्या बातम्या सतत झळकत असतात. नवस ही देवाला देऊ केलेली बक्षिसीच नसते का, हा प्रश्न नाजूक व बहुसंख्यांच्या भावनांना हात घालणारा आहे. पण काम झाल्याबद्दल कृतज्ञता म्हणून प्रत्यक्ष देवालाही काही द्यावेसे माणसाला वाटत असेल तर इतरत्रही बक्षिसी देऊन काम करून घेण्यास तो कदाचित बिचकत नसेल. या दिशेने भारतात संशोधन होण्याची गरज टॉर्फसनच्या शोधनिबंधावरून वाटते.
अर्थात भारतानेच शोधलेल्या कर्मयोगशास्त्रात काम केल्यानंतर मिळणारे फळ ‘फक्त मला आणि मलाच मिळेल’ अशी अपेक्षा धरणे हेच दु:खाचे मूळ असल्याचे स्पष्टपणे दाखविले आहे. त्यामुळे काम झाले म्हणून वा पुढे चांगले काम होईल म्हणून बक्षिसी देणे हे कर्मयोगशास्त्रात बसत नाही. भारतीय तत्त्वज्ञानातील ईश्वराच्या व्याख्येतही नवस कुठेच बसत नाही. परंतु काळाच्या ओघात कर्मयोगशास्त्र मागे पडले व काम होण्यासाठी देवाकडे तगादा लावण्याची सवय समाजात रुळली. हजार वर्षांची परकीय राजवट हेही त्याचे आणखी एक कारण असेल. कारण पारतंत्र्यात परकीय अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी बक्षिसी देणे जरुरीचे ठरे. याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात.
हा विषय खूपच गुंतागुंतीचा आहे. तथापि, ऐतिहासिक घटनांतून घडलेली भारताची धार्मिक, सामाजिक मानसिकता आणि लाचखोरी यांचा कुठेतरी संबंध असावा. हजारो वर्षांची ही मानसिकता बदलण्यासाठी कायदे उपयोगी पडतात, पण मुख्यत: नेत्यांच्या वर्तणुकीतून ती बदलत जाते. त्यासाठी कायदे कठोरपणे पाळण्याची सवय नेत्यांना लावावी लागते. नेत्यांना अशी सवय लावणे हे लोकचळवळीचे मुख्य काम. पण त्याच चळवळी राजकारणात उतरल्या की व्यवस्थेला बळी पडतात आणि लाचखोरीचे चक्र तसेच सुरू राहते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा