चीनने सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात बचावाची भूमिका घेतली आहे. गेली काही वर्षे, विशेषत: ऑलिम्पिक यशस्वीरीत्या आयोजित केल्यापासून चीन आक्रमक धोरणे आखीत होता. परंतु, अमेरिकेसह जगातील अनेक प्रमुख देशांनी चीनबाबत घेतलेला सावध पवित्रा आणि जागतिक मंदी यामुळे चीनला आपली धोरणे मवाळ करावी लागत आहेत. चीनचे आव्हान हा अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा विषय झाला. तसेच चीनला व्यापारातील नियम पाळायला लावणार की नाही, असा प्रश्न जगातील सर्व व्यासपीठांवर विचारला जाऊ लागला. चीनचे राज्यकर्ते अत्यंत व्यवहारी असल्याने त्यांनी बदलते वारे ओळखून सध्या जरा नमते घेण्याचे ठरविले. भारत व चीन यांच्यातील युद्धासंदर्भातील चीनची मवाळ भूमिका हे त्याचे अलीकडील उदाहरण. या युद्धाला याच महिन्यांत पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारतातील माध्यमांमध्ये बरेच काही लिहून आले. या युद्धात भारताचा सपशेल पराभव झाला. देशाची जगभर नाचक्की झाली. त्याचे तटस्थ विश्लेषण करून यातून काय बोध घ्यायचा याची चर्चा भारतीय माध्यमांत सुरू आहे. मात्र या युद्धाची पन्नाशी चीनमध्ये विजयोत्सव म्हणून साजरी करण्यात आलेली नाही. उलट तेथील सरकारी मुखपत्रांमध्ये आलेले लेख अतिशय समजूतदार भाषेत लिहिले गेले आहेत. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात तर सीमावादाला अनावश्यक महत्त्व देऊ नये, भारताबरोबरचे संबंध वाढविण्यासाठी अन्य अनेक क्षेत्रे मोकळी आहेत असे म्हटले आहे. सीमावाद सोडविण्यासाठी चीनने कोणती पावले उचलली याची यादीही देण्यात आली आहे. लेखाचा एकूण झोक भारताबरोबरचे संबंध वाढविण्यावर आहे. सीमावादाबाबत चीन इतका मवाळ कधीही नव्हता. सहकार्यापेक्षा स्पर्धा करून आशियात एकछत्री नेतृत्व स्थापन करण्याची आकांक्षा चीन बाळगून होता व अद्यापही आहे. मात्र चीनला नमते घ्यावे लागते ते अमेरिकेच्या बदलत्या धोरणांमुळे. आखाती देशातून पाय काढून घेतल्यानंतर आशियामध्ये, विशेषत: हिंदी व प्रशांत महासागराच्या भागात अमेरिकेने अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली. जपान ते भारत असा अक्ष अमेरिकेच्या समोर असून यातून चीनची घेराबंदी करण्याची योजना आहे. व्हिएटनाम, फिलिपाइन्स, इंडोनेशिया ही राष्ट्रे अमेरिकेच्या जिवावर चीनच्या दादागिरीविरुद्ध आवाज उठवू लागली आहेत. ‘साऊथ चायना सी’मध्ये चीनला हातपाय पसरण्यास आडकाठी आणली जात आहे. या टापूतील लष्करी व्यूहरचनेत भारताला सहभागी करून घेण्याच्या हालचाली जपान, अमेरिका व ऑस्ट्रेलियाने सुरू केल्या. अमेरिकेची आशियाकडे वळलेली नजर, जपान तसेच ऑस्ट्रेलियाची तिला मिळत असलेली साथ व भारताचा वाढता सहभाग याचा एकत्रित परिणाम त्रासदायक होईल याची कल्पना आल्यामुळे चिनी राज्यकर्त्यांनी भारताबाबत मवाळ भाषेत बोलण्यास सुरुवात केली. चीन कम्युनिस्ट पक्षाच्या दोनच दिवसांपूर्वी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत माओऐवजी डेंग यांच्या धोरणानुसार पुढील वाटचाल करण्याचे ठरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय घडामोडीत सौम्य भूमिका घ्यावी असे डेंग यांचे मत होते. शत्रू वाढविण्यापेक्षा व्यापार वाढवावा आणि व्यापारातून अन्य देशांना अंकित करावे, अशी त्यांची व्यूहरचना होती. याउलट माओंचे धोरण आक्रमक असे. सध्याच्या वातावरणात माओपेक्षा डेंग बरे असा शहाणा विचार चिनी राज्यकर्त्यांनी केला व भारताबद्दल चार बरे शब्द काढले. याचा अर्थ चीन बदलला आहे असा नाही. चीन सबुरीने घेत आहे इतकेच.

Story img Loader