काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे खरे तर सख्खे भाऊ. भावाभावांची भांडणे निवडणूक जसजशी जवळ येते, तशी वाढत जातात. मग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात आणि समस्त महाराष्ट्राची करमणूक करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, अशा थाटात हा कलगीतुरा रंगतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ‘राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे,’ असे विधान करून नाटकाच्या नव्या अंकाला सुरुवात केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी त्यात रंग भरला. ‘राज्याचे मुख्यमंत्री पुळचट’ असल्याचे वक्तव्य करून त्यांनी ठाकरे यांना उत्तर देऊन टाकले. शरद पवार यांनी माणिकराव ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना ‘मग इतकी वर्षे गुंडांसोबत राहिलात कशाला?’ असे विचारून आगीत तेलच ओतले आहे. ही आग कोणत्याही स्थितीत २०१४ च्या निवडणुकीपर्यंत विझता कामा नये, याची योग्य ती खबरदारी दोन्ही पक्ष घेतील, यात शंकाच नाही. कारण ती आग धगधगत ठेवणे ही त्या दोन्ही पक्षांचीच गरज आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून येथील सत्तेची माळ नेहमी काँग्रेसच्याच गळ्यात पडली. कितीही ऊतमात झाले, तरी येथील जनतेने सत्ता देण्याबाबत बहुतेक वेळा काँग्रेसी संस्कृतीला साथ दिली. १९९५ च्या निवडणुकीत मऱ्हाटी जनतेने पहिल्यांदाच काँग्रेसला पाणी चाखले आणि शिवसेना-भाजप यांची युती सत्तेत आली. त्यापूर्वी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांच्याच मंत्रिमंडळात राहून शरद पवार यांनी वेगळा विचार मांडला. काँग्रेसमधून बाहेर पडून आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दलाचे सर्वपक्षीय मंत्रिमंडळ सत्तेत आले. त्या वेळच्या जनता पक्षातील जनसंघापासून ते समाजवादी पक्षापर्यंत सगळ्यांनी तेव्हा सत्तेची चव चाखली. तरीही राज्यात काँग्रेस संस्कृतीचीच सत्ता असल्याचे चित्र निर्माण केले जात होते. युतीच्या काळात पहिल्यांदा राज्यात विरोधकांचे राज्य आले. त्यानंतर मात्र सतत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी सत्तेपुरती अबाधित राहिली आणि त्यांच्यातील वादही प्रत्येकवेळी वाढत राहिले. राज्यात काँग्रेसचे आमदार जास्त असूनही राष्ट्रवादीचा सत्तेतला वरचष्मा हा काँग्रेसला सतत खुपत असतो, तर काँग्रेसकडून काढल्या जाणाऱ्या कुरापतींमुळे राष्ट्रवादीला अनेकदा बेजार व्हावे लागते. ‘राज्यातील ग्राम पंचायती, जिल्हा परिषदा, नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीच क्रमांक एकवर आहे, यावरून जनतेला कोण हवे आहे, हे समजू शकेल’, असे सांगत शरद पवारांनी काँग्रेसच्या नेतृत्व लादण्याच्या संस्कृतीवरही टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजप-सेना युतीच्या बरोबरीने काँग्रेस आघाडीला आता राज्यात मनसेलाही तोंड द्यावे लागणार आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी त्यांनी खरेतर कंबर कसायला हवी. राज्यात आपल्याच पक्षाचे जास्त खासदार आणि आमदार निवडून येणे, ही खरेतर दोघांचीही गरज आहे. त्यासाठीच सार्वजनिक व्यासपीठे आणि माध्यमे यांना आखाडय़ाचे स्वरूप देण्याची स्पर्धा दोघांमध्ये सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वीची ही शाब्दिक भांडणे येत्या काही काळात नळावरच्या भांडणाइतक्या खालच्या पातळीवर जाणार नाहीत, याची खबरदारी दोन्ही काँग्रेसच्या नेतृत्वाने घ्यायला हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा