भारतातली शेती रसातळाला जात असताना त्या क्षेत्राचं राज्यकर्त्यांमध्ये ९० टक्के प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे ना धड शेतकऱ्याचं भलं होतं, ना शहरांचं.. चीनमध्ये होणारा राज्यकर्त्यांचा खांदेपालट मात्र शहरी चेहऱ्याचा आहे..
वरवर पाहिलं तर या नावांतून काहीही बोध होणार नाही. ही नावं अजून इतकी मोठी नाहीत की ती आपण लक्षात ठेवावीत, पण या वाक्यातलं ‘अजून’ तसं महत्त्वाचं. कारण यातली काही नावं आज ना उद्याच आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहेत. कारण हे सर्व आहेत चीनचे संभाव्य राज्यकर्ते.
जगातल्या सध्याच्या एकमेव महासत्तेचा, म्हणजे अमेरिकेचा, नवीन राज्यकर्ता निवडला गेला की दोनच दिवसांनी, ९ नोव्हेंबरला, महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशात, म्हणजे चीनमध्ये, दशकातून एकदाच होणारी सत्ताबदलाची प्रक्रिया सुरू होईल. कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस हु जिंताव यांची दहा वर्षांची राजवट संपुष्टात येईल आणि शक्यता अशी की विद्यमान उपाध्यक्ष झि जिंगपिंग हे अध्यक्षपदाच्या खुर्चीत स्थानापन्न होतील. एकीकडे जगातील सगळ्यात मुक्त लोकशाही आपला नेता जाहीरपणे निवडेल; तर त्याच वेळी जगातील सर्वात पडदानशीन व्यवस्था बंद दरवाजाआडच्या गुप्त चर्चेत आपला नवा नेता ठरवेल. याच बैठकीत चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च सत्तापरिषदेचे संभाव्य सदस्य ठरवले जातील. त्यात ज्यांना स्थान मिळणार नाही ते दुसऱ्या फळीत सामावले जातील.
ही सर्व नेतेमंडळी वर दिलेल्या यादीतूनच असतील. त्या यादीकडे बारकाईनं नजर टाकली तर एक-दोन गोष्टी प्रकर्षांने जाणवतील. एक म्हणजे वय. यात एकही सत्तरी पार केलेला नाही. नव्या देशप्रमुखांनी तर साठीही गाठलेली नसेल. काही तर पन्नाशीच्या आतलेच आहेत. चिनी पद्धतीप्रमाणे यातल्या तरुण मंडळींना २०१७ आणि २०२२ सालापर्यंत देशाचं नेतृत्व करण्यासाठी तयार केलं जाईल. यासाठीची बांधणी आतापासूनच सुरू केली जाईल.
आणि दुसरी आवर्जून लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे या सगळ्या मंडळींचा तोंडवळा हा शहरी आहे. कम्युनिस्ट नेतेमंडळी कामगार, कष्टकरी वगैरेंच्या उल्लेखानं हळवी होत असतात. पण या संभाव्य नेतेमंडळींत कामगारपण अनुभवलेला असा फक्त एक जण आहे. शेतकरी वगैरेंचं प्रतिनिधित्व तर जराही नाही. जागतिकीकरणाच्या रेटय़ानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारानं अनेक देशांचा तोंडवळाच बदलून गेला. या काळात झपाटय़ानं शहरीकरण सुरू झालं. शहरांच्या प्रेरणा वेगळ्या असतात. त्यांच्या व्यवस्थापनाच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्याच जाणिवेनं शहरं चालवायची असतात. हा भाग चीननं बरोबर ओळखला.
हे फार महत्त्वाचंच म्हणायला हवं. कारण शहरात राहायला जाणं ही विकासाभिमुखतेची पहिली पायरी मानली जाते. जगाचा इतिहास हा शहरांचा इतिहास आहे. इतका की नागरिकाला इंग्रजीत सिटिझन म्हणतात, व्हिलेजर नाही. म्हणजे शहरांत राहणाराच फक्त मोजला जातो. हे योग्य की अयोग्य या वादात पडण्यात अर्थ नाही. पण हे आहे हे असं आहे हे मान्य करायला हवं.
पण आपण ते करत नाही. गरिबीप्रमाणे खेडय़ांविषयीही आपल्याकडे उगाच रोमँटिसिझम आहे. खेडय़ामधले घर कौलारू.. वगैरे असं. त्यातही मराठीपण असं की मराठी माणसाची प्रिया स्वप्नातसुद्धा महालात राहत नाही. त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे.. असं तो आनंदात सांगतो. म्हणजे खेडय़ातलं काय ते सर्व चांगलं. तिथली माणसं, जगणं वगैरे. यामुळे होतं काय, तर आपण राहतो शहरांत आणि आठवणींचे फुकाचे कढ काढतो ते खेडय़ांचे आणि ज्याला खेडय़ातच राहावं लागतं तो शहरात राहायला मिळत नाही म्हणून टिपं गाळत असतो. म्हणजे दोघेही तसे असमाधानीच.
या भावनिक अप्रामाणिकपणाचं प्रतिबिंब आपल्याला आपल्या राज्यकर्त्यांत दिसेल. उदाहरणार्थ महाराष्ट्र. आजमितीला राज्याचं म्हणून जे काही उत्पन्न म्हणता येईल त्यात शेतीचा वाटा दहा टक्केही नाही. हे अर्थातच वाईट आहे. म्हणजे आपली शेती रसातळाला जातीये असा त्याचा अर्थ. परंतु विरोधाभास हा की ज्या क्षेत्राचा वाटा दहा टक्केही नाही त्याचं प्रतिनिधित्व राज्यकर्त्यांत किती असावं? तर ९० टक्के. आपले राज्यकर्ते काढून बघा.
या सगळ्यांची आलिशान घरं असणार मुंबई-पुण्यात. पण या सगळ्यांची भाषा ऐका. आपण किती शेतकरी आहोत हेच ते सांगतील. जिवाची मुंबई करायची, पण मुंबईसाठी काहीही करायचं ते बोलणारदेखील नाहीत. याचं साधं कारण असं की, मुंबईसाठी काही करताना गावाकडे कळलं, की ती व्यक्ती एकदम श्रीमंतधार्जिणी मानली जायला लागते. सांस्कृतिकदृष्टय़ा वाळीतच टाकतात त्याला गावाकडे.
आपण हे असे सांस्कृतिकदृष्टय़ा लबाड आहोत. या लबाडीमुळे होतं काय? तर शेतकऱ्यांची भाषा बोलणारे ना धड शेतकऱ्यांचं भलं करतात, ना जिथे जगत असतात त्या शहरांचं. खेडी बकालच्या बकालच राहतात. पाणी नाही. लोडशेडिंग. शेणामुतात भिजलेल्या धुळीत घोंघावणाऱ्या माशांचे थवे जपणारे रस्ते आणि मग यातलेच काही तोच बकालपणा मनात ठेवून शहरं हाकतात. उसवणाऱ्या वस्त्या. फुगून ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंडय़ा आणि खेडय़ाची आठवण करून देणारे रस्ते.
चीनकडून काही तरी शिकायला हवं.
शेजारधर्म पाळू न पाळू आपण, पण शेजारशिकवण घ्यायला काही हरकत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा