|| गिरीश कुबेर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण सर्वशक्तिमान असल्याच्या आविर्भावात मुसंडी मारत येणाऱ्या शत्रूला धूळ चारण्यासाठी ताकदीपेक्षाही ‘जिगर’ असावी लागते. ८३ वर्षांपूर्वी पुतिन महाशयांचे पूर्वज स्टालिन यांनी अशी जिगरबाज लोकांकडून माती खाल्ली आहे.

या इतिहासाची पुनरावृत्ती होईल? वेग दिवसाला सरासरी तब्बल ५० चौरस किलोमीटर. अशी किमान १०० वर्षे. काय म्हणता येईल इतक्या वेगाने प्रसरण पावणाऱ्यास? रशिया हे त्याचं उत्तर!

सोळाव्या शतकातल्या ‘इव्हान द टेरिबल’पासून ते ‘पुतिन द हॉरिबल’पर्यंत रशिया नामक देशाचा विस्तारवाद असा अखंड सुरू आहे. ताजी युक्रेनविरोधातली मोहीमही याच रक्तात भिनलेल्या विस्तारवादी धोरणाचा परिपाक. या विस्तारवादातून १९०० शतकाच्या आसपास त्यातून एक अस्ताव्यस्त पसरलेला देश तयार झाला. आपल्या विस्तार-ताकदीची चांगलीच मस्ती या देशाला होती. म्हणूनच ‘‘माझ्या सीमांचं रक्षण करायचं तर मला त्या वाढवण्याखेरीज पर्याय नाही,’’ असं मिजासखोर विधान कॅथरीन द ग्रेट करू शकली. तिच्याच काळात रशियाचा जवळपास ५ लाख २० हजार चौरस किमी इतका महाप्रचंड विस्तार झाल्याची नोंद आहे. त्या वेळी किती मोठा असावा हा देश? तर पृथ्वीवरच्या एकूण भूमीतली एक षष्ठांश जमीन या देशाची होती. पण इतका अगडबंब आकार वाढवून रशियाला काय मिळालं? ज्या पाश्चात्त्य देशांना तो पाण्यात पाहात होता त्यांना रशिया मागे टाकू शकला का? यांची उत्तरं शोधतान पीटर द ग्रेट, साम्यवादाचा उदय, रशियन राज्यक्रांती, मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे पेरिस्त्रोयका, ग्लासनोस्त वगैरे इतिहासात जायची काही गरज नाही. तरीही त्या इतिहासाचा एक चतकोर अंश आठवावा असा. तो लढाईशी संबंधित आहे. पण ती लढाई विस्मरणात गेलेली आहे. त्या लढाईची ही गोष्ट.

ती स्टालिनची आहे.

साधारण १९३९ च्या आसपासची ही घटना. तोपर्यंत रशिया हा सोविएत महासत्ता बनलेला होता. पहिलं महायुद्ध संपलेलं होतं. दुसऱ्यास नुकतंच तोंड फुटत होतं. पण त्याची झळ रशियाला लागायला बराच वेळ होता. त्याआधी काही वर्ष उत्तर चीनमधे एका बलाढय़ स्फोटात एक महत्त्वाचा पूल पाडला गेला. चीनमधल्या असंतोषाची पार्श्वभूमी त्या घटनेला होती. त्यामुळे चीनमधल्या अंतर्गत वादातून हा स्फोट घडवला गेल्याचं मानलं गेलं. सर्वाना ते पटलंदेखील.

पण सत्य हे होतं की हा स्फोट घडवून आणला होता प्रत्यक्षात जपाननं. तो करवणारे सर्व चिनी भासतील अशी चोख व्यवस्था केली गेलेली. त्यामुळे प्रत्यक्षात त्या वेळी जपान नामानिराळा राहिला. पण हे जपाननं का केलं? कारण मांचुरिया प्रांतात घुसखोरी करण्यासाठी त्या देशाला काही कारण हवं होतं. आज अनेकांस माहीत नसेल. पण त्या काळात जपाननं केलेल्या उचापती या प्रत्यक्षात हिटलरलाही मान खाली घालायला लावतील इतक्या भयानक आहेत. तर चीननंच कागाळी केल्याचं कारण पुढे करत जपाननं मांचुरियावर हल्ला केला.

स्टालिन याला ही पद्धत भयंकर आवडली. (पुढे अनेक देशांनी आणि नेत्यांनी स्वदेशातही या मार्गात अवलंब केला, हे वर्तमान वास्तव चाणाक्ष लक्षात घेतीलच) पण त्याही आधी तिचा वापर करणारा नेता म्हणजे हिटलर. त्या वेळी झालं असं की जर्मनीतल्या एका दूरसंचार मनोऱ्यावर हल्ला होऊन तो पाडला गेला. हिटलरनं बोभाटा केला पोलंडच्या नावानं. पोलीश फौजांनी हे कृत्य केलं असं सांगत त्यांच्या नावे ठणाणा करत हिटलरनं पोलंडवर सरळ हल्ला केला. प्रत्यक्षात हा मनोरा पाडलेला होता तो जर्मन फौजांनीच. त्यांना पोलंडमधील घुसखोरी करण्यासाठी काही कारणच हवं होतं. ते कारण हिटलरनं स्वत:च तयार केलं. पोलंडवर हल्ला केला.

ही दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात. असा खोटेपणा त्यामागे होता. जगातल्या सर्व हुकूमशहा प्रवृत्तीच्या नेत्यांना हा असा खोटेपणा नेहमीच मोहवतो. स्टालिन त्याला अपवाद नव्हता. त्याला वाटलं जपानला जे जमलं आणि हिटलरनं जे करून दाखवलं ते आपल्याला का नाही करता येणार? या उद्देशानं तो आपल्याच देशाचा नकाशा पाहू लागला. हा नवा प्रयोग करण्यासाठी त्याला देश सापडला.

 त्या देशाच्या उत्तर टोकापासून अगदी हाकेच्या अंतरावर. जेमतेम २० किमी. त्या देशावर त्याची नजर गेली. पण घुसायचं कसं? कारण जर्मनीप्रमाणेही त्या देशानं रशियाशी ना-युद्ध करार केलेला. आणि मुख्य म्हणजे १९१७ सालीच या दोन देशांनी आपापल्या सीमा नक्की करून घेतलेल्या. त्याचं पावित्र्य उभयतांनी जपायच्या आणाभाकाही घेतलेल्या. पण स्टालिनला काही राहवेना. त्यानं त्या देशाला निरोप पाठवला: आपण भूगोलाचं काही करू शकत नाही. लेनिनग्राड तर मी काही हलवू शकत नाही. पण त्यापासूनच आंतरराष्ट्रीय सीमेचं अंतर मात्र निश्चित कमी करू शकतो.

त्या देशाला काय ते कळालं. खरं तर स्टालिनविषयी कोणाच्याही मनात कसलाही संदेश नव्हता. हा गृहस्थ काहीही करू शकतो, याची जाणीव होती आसपासच्या सर्वाना. त्यामुळे त्यापासून सर्वच सावध होते. या गृहस्थाला लोकशाहीची चाड नाही, दिल्या शब्दाचा मान राखायचा नाही, हे सर्वानाच माहीत होतं. पण ते माहीत असून करणार काय हाही प्रश्न होताच. हे अंतर कमी करायचं भाष्य करून त्यात त्यानं आपल्या मनात काय आहे हे दाखवून दिलं होतं. त्यामुळे आसपासचे देश सावरून बसले. जमेल तितकी स्वत:च्या संरक्षणाची तयारी करायला लागले. तिकडे युरोपात दुसरं महायुद्ध तापू लागलेलं. सर्वाना त्याच्या झळा बसू लागलेल्या. पण हिटलरशी ना-आक्रमण करार झाल्यानं स्टालिन मात्र निवांत होता. म्हणजे परिस्थिती अशी की स्टालिन शांत आणि या आसपासच्या देशांत मात्र अस्वस्थता. लवकरच तिचा भंग झाला.

 त्या वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यात रशियाच्या उत्तर ध्रुवाजवळील सीमेवर बॉम्बहल्ला झाला. अनपेक्षित होता तो. कारण महायुद्ध काही तिथपर्यंत पोहोचलं नव्हतं. तरीही हा बॉम्बहल्ला कसा, का आणि करवला कोणी? नाही म्हटलं तरी त्यात रशियाचे पाच सैनिक ठार झाले. या प्रश्नाचं उत्तर स्टालिननं दिलं.

 फिनलंड या देशानं आपल्यावर हल्ला केलाय, आपल्याविरुद्ध युद्ध पुकारलंय असं त्यानं जाहीर केलं. पुढे काय होणार हे नक्की होतं. रशियन फौजा तुफान गतीनं फिनलंडमध्ये घुसल्या. सुरुवातीला त्यांच्या मुसंडीला चांगलंच यश आलं. थेट हेलसिंकीपर्यंत त्या गेल्या. तिथं गेल्यावर काय करायचं हे स्टालिननं आधीच ठरवलेलं होतं. स्थानिक साम्यवादी नेत्याला त्यानं फिनलंडच्या प्रमुखपदी बसवलं आणि स्वत:चा विजय जाहीर केला. ‘‘फिनलंडमधील मागास, नाझी-वृत्तीच्या सरकारचा पाडाव झाला,’’ असं तो म्हणाला. एकदा का ही कठपुतळीवत् सत्ता विराजमान झाली की आपलं काम संपलं, हे कचकडय़ाचं सरकार आपल्या तालावर नाचणार याची त्याला कोण खात्री. पण फिनीश जनतेला हे मान्य नव्हतं. स्टालिनचा समज होता त्यानं नेमलेल्या साम्यवादी नेत्यामागे फिनलंडमधल्या कामगार संघटना वगैरे उभ्या राहतील आणि हे सरकार स्वीकारलं जाईल.

 त्याचा अंदाज चुकला. या संघटनांनी, सामान्य नागरिकांवर रशियन फौजांना विरोध सुरू केला. गनिमी काव्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. उंच झाडं, गवतात किंवा भर रस्त्यात अनपेक्षित ठिकाणी खणलेले खंदक वगैरेंतून ते रशियन सैनिकांना टिपू लागले. याची तीव्रता इतकी वाढली की शेकडो रशियन सैनिक त्यात मरू लागले. स्टालिनही हैराण झाला. हा टिकलीएवढा देश आपल्याला इतकं छळू शकतो हेच त्याला पटेना. पण होत होतं तसं खरं. हा संघर्ष काही संपेना. स्टालिनचे किती सैनिक मारले गेले असावेत या लहानशा देशाच्या प्रतिहल्ल्यात? तब्बल चार लाख.

आता मात्र स्टालिनचा धीर खचला. फिनलंडनं दिलेलं चर्चेचं निमंत्रण त्यानं ताबडतोब स्वीकारलं. युद्धकरार झाला. ज्या बलाढय़ स्टालिनला समग्र फिनलंडचा घास घ्यायचा होता त्या स्टालिनच्या रशियाला उभय देशांच्या सीमेवरचा एक चिंचोळा पट्टा देण्यावर तोडगा निघाला. स्टालिनला तो स्वीकारावा लागला. १९९८ साली फिनलंडच्या सीमेवरून समोर दिसणाऱ्या रशियाकडे पाहत असताना त्या लहानग्या देशाचा हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला होता.

 स्वत:ला असं अजेय मानणाऱ्यांचा पराभव झाला की दुष्यंतकुमार यांच्या कवितेच्या ओळी आठवतात..

 कौन कहता है आसमां में

सुराख नहीं हो सकता..

 एक पत्थर तो तबियत से उछालो यारों..

(कोण म्हणतं आकाशाला छिद्र पाडता येत नाही..) आज त्या स्टालिनचा व्लादिमीर पुतिन नावाचा वंशज लहानग्या युक्रेनबाबत या इतिहासाची पुनरावृत्ती करू पाहात असताना युक्रेनियन्सदेखील या फिनीश इतिहासाची पुनर्भेट घडवतील का?

girish.kuber@expressindia.com

      @girishkuber

नोव्हेंबर १९३९ मध्ये स्टालिनच्या फौजांनी हल्ला सुरू केला, त्यात अडथळा होता गोठवणाऱ्या हिवाळय़ाचाच!

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Almighty putin stalin russia ivan the terrible putin horrible anti ukraine akp