चांगल्या गाण्याप्रमाणं ती दर वेळी नवंनवं काही ना काही देत राहिली. तिचं मूळ स्कॉटलंडचं असलं तरी, बेंगळुरूच्या एका मराठी कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीची जिद्द आणि परिश्रम, दर्जात तडजोड न करता उत्कृष्टतेची आस, यांचं ती एक प्रतीक ठरते आहे.
जगाच्या बाजारात आपल्या अनेक ब्रँड्सनी आता नाव काढलंय. टाटा तर आहेच, पण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली इन्फोसिस आहे, विप्रो आहे, टीसीएस आहे, मोटारींचे साचे बनवणारी जगातली अव्वल कंपनी म्हणून भारत फोर्ज आहे, जगातली सगळ्यात मोठी चहा कंपनी टाटा टी आहे.. या सगळ्या तालेवार कंपन्यांच्या प्रभावळीत एक अलवार ब्रॅण्ड जगात सध्या भारताचं नाव रोशन करून राहिलाय.
अमृत. त्याचं नावच आहे अमृत.
आता हे नाव असं फसवं आहे की, ते कोपऱ्यावरती कटिंगकटिंगने पाजणाऱ्या अमृततुल्यचं आहे, की डोकेदुखीवर उतारा म्हणून वापरलं जात असलं तरी डोक्यापेक्षा केवळ चोळणाऱ्या हातांना समाधान देणाऱ्या कुणा पिवळ्या बामचं आहे.. हे लक्षात येणार नाही, पण हे नाव आहे एका उच्च दर्जाच्या कुलीन व्हिस्कीचं.
आहे ती भारतीय, पण तिची ओळख झाली परदेशात. तिकडे एकदा नाव काढल्याखेरीज आपल्याला आपल्या अंगणातल्या अनेक वस्तूंचं मोठेपण कळत नाही. हिचंही तसंच झालं आणि त्यात ती बोलूनचालून व्हिस्की. ती प्यायची तर स्कॉटलंडची. स्पे नदीच्या शांतशार पाण्यात बार्लीसत्त्व सामावून घेणारी. आपल्या व्हिस्कीज म्हणजे मळीपासनं तयार झालेल्या. उग्र. उगाच मोठय़ानं बोलणाऱ्या व्यक्तींसारख्या. स्कॉटलंड, झालंच तर आर्यलड अशा साहेबाच्या देशातल्या व्हिस्कींची सर आपल्या व्हिस्कींना नाही, याचा अगदी पूर्ण परिचय होता. त्यामुळे परदेशातनं येताना डय़ुटी फ्रीमध्ये जायचं आणि दरडोई दोन (कारण तेवढय़ाच बाटल्या आणता येतात म्हणून) अशा किमान ग्लेन कुलातल्या सिंगल माल्ट घ्यायच्याच घ्यायच्या हा रिवाज. कधी तरी खिसा ठीक असला तर मग तलिस्कार किंवा लॅफ्रॉय वगरे. अशाच एका परतीच्या प्रवासात लंडनच्या हिथ्रो विमानतळावर डय़ुटी-फ्री विक्रेती माझी खरेदी बघून म्हणाली.. सिंगल माल्ट साधक दिसताय तुम्ही.
या सिंगल माल्ट साधकांचं एक पाहिलंय. ते कधीही व्हिस्की पितो, असं म्हणत नाहीत. सिंगल माल्ट पितो, असं म्हणतात. जणू अन्य व्हिस्की पिणारे कमअस्सलच. परत पंचाईत ही की, तसं बोललं नाही तर जणू हा सिंगल माल्ट साधकच नाही, असंच मानलं जातं. एका अर्थानं हे गर्व से कहो.. प्रकरण इथंही घुसलंच आहे. तर असो. तेव्हा हे सगळं आठवून जमेल तितकं नाक वर करून म्हणालो.. अर्थात.. फक्त सिंगल माल्ट. हे अपेक्षित उत्तर अपेक्षित टेचात ऐकून समाधान पावलेली ती म्हणाली.. क्षणभर थांबा. ती पटकन जाऊन एक बाटली घेऊन आली. म्हणाली, हिची चव घेऊन बघा.. यंदाच व्हिस्की बायबलमध्ये ती अव्वल क्रमांकाची व्हिस्की ठरलीये.
ती ही अमृत. तिचं ऐकून मी अमृत घेतली. ही अमृतची पहिली भेट. एरवी गोड वाटलेली पहिली भेट दुसऱ्या भेटीनंतर अर्थशास्त्रातल्या लॉ ऑफ डिमिनििशग रिटर्न्स या संकल्पनेची आठवण करून द्यायला लागते; पण अमृत हिचं तसं झालं नाही. चांगल्या गाण्याप्रमाणं दर वेळी नवंनवं काही ना काही देत राहिली. खरं तर त्या वेळी खजील व्हायला झालं. आपल्या अंगणातली ही आणि आपल्याला माहितीपण नव्हती. आपल्या घराशेजारी विश्वसुंदरी राहते हे बीबीसीवर बातमी आली की कळावं, तसंच. पण झालं होतं खरं. म्हणून मग पापक्षालनासाठी तिचं कूळमूळ शोधणं सुरू केलं, पण त्यामुळे उलट खजीलतेच्या लाटाच अंगावर आदळायला लागल्या. अमृत जागृतावस्थेतले धक्के देत गेली. बरंच काही कळलं तिच्याविषयी.
बेंगळुरूची आहे ती. मराठमोळ्या घरात जन्मलेली. राधाकृष्ण जगदाळे यांच्या डिस्टिलरीत तिचा उगम आहे. अर्थात त्यांनी डिस्टिलरी सुरू केली तेव्हा काही सिंगल माल्टचा त्यांचा विचार नसणार. कारण ही डिस्टिलरी सुरू झाली १९४८ साली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक उत्पादनं, अभियंते, औषधं आता स्वदेशी असायला हवीत या विचारानं आपल्या उद्यमशीलतेनं उसळी घेतली. त्याच काळात मद्य का स्वदेशी नको, या उदात्त विचारानं राधाकृष्णरावांनी या डिस्टिलरीचं उदक सोडलं असणार. काहीही असो. झालं ते उत्तम झालं. कारण इतकी र्वष भारतीयांच्या ढोसणे या सवयीशी जोडली गेलेली रम, छोटय़ामोठय़ा व्हिस्कीज वगरे करून पाहिल्यानंतर जगदाळ्यांच्या पुढच्या पिढीला सिंगल माल्टचे डोहाळे लागू लागले. पुढची पिढी वाडवडिलांचं काम पुढे नेते ती अशी. तेव्हा बऱ्याच खटपटी लटपटींनंतर त्यांना सिंगल माल्ट प्रसन्न झाली. तोपर्यंत त्यांच्या डिस्टिलरीतल्या व्हिस्कीज इतर भारतीय भगिनींप्रमाणे उसाच्या मळीपासून व्हायच्या. नव्या जगदाळ्यांना या सगळ्यात आमूलाग्र बदल करायचा होता. त्यांनी म्हणून स्वत:साठी बार्ली पिकवून घ्यायला सुरुवात केली. (अमृतच्या दुसऱ्या प्रकारासाठी तर ते स्कॉटलंडमधून बार्ली आयात करतात.) तिचीसुद्धा उस्तवारी अशी की, ती जास्तीत जास्त रसायनमुक्त असेल याची काळजी त्यांना घ्यावी लागली. कारण नाही तर रसायनं बार्लीमाग्रे पेयात उतरण्याचा धोका होता. तसं झालं असतं तर बिचाऱ्या व्हिस्कीचं नाव बदनाम झालं असतं. ती बदनामी त्यांना टाळायची होती. आपल्या घरच्या व्हिस्की चारित्र्यावर कसलाही िशतोडा उडलेला त्यांना नको होता. म्हणून त्यांनी इतकी काळजी घेतली की, तिच्यासाठी स्वतंत्र विहीर खणली आणि त्या विहिरींच्या झऱ्यातसुद्धा कोणतीही रसायनं मिसळली जाणार नाहीत, हे पाहिलं. व्हिस्कीचा बाज ठरतो तो पाण्याच्या आणि बार्लीच्या दर्जावर. स्कॉटलंडमध्ये तर व्हिस्कीसाठी वापरलं जाणारं पाणी उगमाकडचं आहे का खालच्या बाजूचं यापासनं तिची प्रतवारी आणि दर्जा ठरायला लागतो. ते कसं हे प्रत्यक्ष पाहिलेलं असल्यानं हे पाण्याचं प्रस्थ फार असतं ते माहीत होतं. त्याचमुळे एकदा अनेकांच्या जगण्यासाठी आनंदद्रव पुरवणाऱ्या स्कॉटलंडच्या स्पे नदीत अघ्र्यसुद्धा मी देऊन आलोय. या नदीच्या पोटी जितक्या व्हिस्कीज जन्माला आल्यात तितकी पुण्याई अन्य कोणत्याही नदीच्या किनारी लिहिलेली नाही. तेव्हा अशी नदी जवळ नसूनही जगदाळे यांनी विहिरीच्या पाण्याचा दर्जा वाढवत नेला आणि एकदाची सिंगल माल्ट बनवली. ही घटना अगदी अलीकडची, नव्वदच्या दशकातली.
पण ती घेणार कोण? हा मोठा प्रश्न. युरोपीय मंडळी हसायची सुरुवातीला भारतात कोणी सिंगल माल्ट बनवलीये हे सांगितल्यावर. सुरुवातीला त्यांची खूप अवहेलना झाली असणार. परत त्यांची पंचाईत दुहेरी. ती भारतातही विकायची सोय नाही. कारण मुदलात भारतीयांना सिंगल माल्ट हे काय प्रकरण आहे, हेच माहीत नव्हतं. अनेकांना नाहीही. ज्या देशात लोक व्हिस्कीबरोबर फरसाण किंवा मसाला पापड असं काही तरी छछोर खातात त्यांना सिंगल माल्टचं पावित्र्य कळणार तरी कसं? तेव्हा भारतात ती जाईना आणि युरोपियन ती घेईनात. मग त्यांनी एक क्लृप्ती लढवली. तिचं विकणं बंद केलं आणि उत्तमोत्तम मद्यालयांत चवीन पिणाऱ्यांना तिची ओळख करून द्यायला सुरुवात केली. तशाच युरोपीय पद्धतीनं. ते विशिष्ट आकाराचे ग्लास, त्यात ओतल्यावर ग्लासच्या आतल्या भिंतीवर तिला घुसळवणं, मग तिच्या गंधाची ओळख करून घेणं आणि मग अगदी हलकासा घोट घेऊन जिभेतल्या सर्व चवचिन्हांशी तिचा परिचय करून देणं.. हे सगळं त्यांनी केलं. दोन वर्षांच्या या उद्योगानंतर अमृत स्थिरावली. मग लोक आवर्जून ती मागायला लागले आणि एकदा लंडनमध्ये ती रुळल्यानंतर युरोपनं फार आढेवेढे घेतले नाहीत. फार वेळ न घालवता तिला आपलं म्हटलं आणि मग तो क्षण आला.
२००५ साली व्हिस्कीचा जगत्गुरू जिम मरे यानं तिला १०० पकी ८२ गुण दिले. तेव्हापासून अमृतचं सोनं झालं. हा हा म्हणता ती यशोशिखरावर चढली आणि जाताना अनेकांचं मनोबल अलगदपणे वर उचलून गेली. पुढे अनेक पुरस्कार तिच्या वाटय़ाला आले. पुन्हा २०१० साली मरे गुरुजींनी तिचा समावेश जगातल्या उत्तम व्हिस्कींमध्ये केला. व्हिस्की बायबलने तर तिचा जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट व्हिस्की म्हणून गौरव केला.
तर आता अमृत रुळावलीये. सूनबाईंच्या चेहऱ्यावर सुरुवातीला दिसणाऱ्या संसारातल्या नवखेपणाच्या खुणा जाऊन ती जशी नंतर सहजपणे मालकीण वाटू लागते तसं आता अमृतचं झालंय. अनेक दर्दीच्या घरात ठेवणीतल्या खास कपाटाची ती मालकीण झालीये. सणासुदीला काय चार पावलं चालत असेल तितकंच. असो.
पण तिचं हे मोठेपण ऐकून अनेकांना तोच खजीलतेचा अनुभव आला असण्याची शक्यता आहे. ती खजीलता घालवण्यासाठी एक चांगला वर्षांन्त योग जवळ असल्यानं तिचा परिचय करून दिला, इतकंच. ती ओळख आपल्यातल्या काही सुसंस्कृतांनी करून घेतली तर तेही नक्कीच मो. ग. रांगणेकर यांच्या ‘कुलवधू’प्रमाणं म्हणतील..
बोला अमृत बोला.. शुभसमयाला गोड गोड..
– गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
twitter @girishkuber