|| गिरीश कुबेर
चीनमधे या लाटेत उडी घेऊन जवळपास साडेआठशे कंपन्या या क्षेत्रात पडल्या. त्यातल्या निम्म्याहून अधिक आज शब्दश: ‘पडल्यात’… हा अगदी अलीकडचा प्रसंग. एका असामीबरोबर प्रवासात होतो. एक ट्रक आमच्या मोटारीला ओलांडून पुढे गेला. भकाभक काळा धूर ओकत. पुढे वाटेत एक पेट्रोलपंप लागला. भलीमोठी रांग. आम्हालाही आत शिरावं लागलं. पेट्रोल भरणं आवश्यक होतं. टोल नाक्यांवर कशी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पटकन पुढे जाण्याची सोय असते, तशी पेट्रोल पंपावर (सुदैवानं) नसते. त्यामुळे आम्हालाही पेट्रोलसाठी रांगेत थांबावं लागलं. त्यामुळे सदर असामींना कमीपणा वाटत होता. त्यांच्या ‘व्यस्त दिनक्रमात’ पेट्रोल पंपावर वेळ घालवणं अपेक्षित नसावं. त्यामुळे त्यांची धुसफुस सुरू होती. एकदाचं पेट्रोल घातल्यावर पंपावरनं बाहेर पडता पडता सदर महनीय व्यक्ती जे उद्गारली तिथून पुढे झालेला संवाद याप्रमाणे :
अ: फार काळ नाही चालणारे. थोडेच दिवस राहिलेत.
मी: कोणाविषयी म्हणताय आपण?
अ: या या पेट्रोलपंपाविषयी…
मी: का काय झालं? बेकायदा वगैरे बांधलाय का.?
अ: तसं नाही. एकदा का विजेवर चालणाऱ्या मोटारी आल्या की कोण विचारतोय यांना? रस्त्यावर येतील हे पेट्रोलवाले…
मी: (जमेल तितक्या नम्रपणे) नाही हो. इतकं काही होणार नाही…
अ: कसं नाही होणार? जगात काय बदल होतोय ते तू लक्षात घेत नाहीयेस. या इंधनांवर चालणाऱ्या गाड्यांचे दिवस भरलेत आता. थोड्या दिवसांचा प्रश्न आहे…
मी: (तोच नम्रपणा आठवत) नाही. पण तरी इतकं काही नाही बदलणार…
अ: असं तुला वाटतंय कारण तुझा प्रॉब्लेम आहे…
मी: माझा प्रॉब्लेम? तो काय?
अ: तेलावर वगैरे दोनचार पुस्तकं लिहिल्यामुळे तुला जरा त्याविषयी जास्त कळवळा आहे. म्हणून तुला तसं वाटतंय. पण तेलाचे दिवस भरलेत आता…(मनातल्या मनात लक्षात घेत हीच संधी आहे या असामींची गाडी जमिनीवर आणण्याची हे ओळखत म्हणालो.)
मी: १९०१ सालीही लोक असंच म्हणत होते. आता पेट्रोलच्या गाड्यांचं काही खरं नाही…
अ: काहीही बोलतो का? १९०१ साली? तेंव्हा तर पेट्रोलवरच्या मोटारीही आल्या नव्हत्या.
मी: त्या येऊ लागल्या होत्या. अमेरिकेत हेन्री फोर्ड काम करत होते त्यावर. पण त्या आल्या आल्या आणि बॅटऱ्याही येत असताना पेट्रोल/डिझेल मोटारींचे मृत्युलेख लिहायला सुरुवात झाली होती. ते पाहून ‘लॉस एंजेलीस टाइम्स’ने बातमी दिली होती, आता पेट्रोल/डिझेल मोटारींची जागा विजेवर चालणाऱ्या गाड्या घेणार म्हणून…
अ: तेंव्हा ते झालं नसेल. पण आता नक्की होणार..
मी: तेवढंच नाही. त्यानंतर अवघ्या १० वर्षांतच साधारण १९११ साली ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ची मुख्य बातमी होती. ‘आता पेट्रोल/डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचं काही खरं नाही, त्यांचा अंत कसा जवळ आलाय…’ वगैरे. म्हणजे त्याला आता ११० वर्षे झाली. आहेत की नाही अजूनही पेट्रोल/डिझेलवर चालणाऱ्या गाड्या? विजेवरच्या येतायत ते मान्यच. त्या यायलाच हव्यात. पण म्हणून नामशेष झाल्यात का जुन्या?
अ: अरे पण कोणत्याही देशांच्या सरकारांनी विजेच्या मोटारींसाठी इतका आग्रह धरलेला नव्हता. म्हणून नाही झाला त्यांचा प्रचार हवा तेवढा…
मी: (एव्हाना माझा नम्रपणाचा दिवा विझलेला) हे बघा. लोकं सरकारला काय वाटतं त्यावर आपलं जगणं बेतत नाहीत. सरकारमुळे जग बदलत असतं तर…
अ: जग नाही बदलणार पण विजेवर चालणाऱ्या मोटारी तर वाढतील…
मी: तसं होत नाही. गेल्या शतकात, (बहुधा) १९९० च्या आसपास अमेरिकेत अनेक राज्यांनी विजेवर चालणाऱ्या मोटारींसाठी सवलती दिल्या, या मोटारी वापरणाऱ्यांसाठी बक्षिसं दिली. कॅलिफोर्नियासारख्या राज्यानं तर २००३ सालापर्यंत शून्य धूर सोडणाऱ्या मोटारींचं प्रमाण किमान १० टक्के असायलाच हवं असा नियम केला होता. आजही त्या राज्यात सात-आठ हजार डॉलर्सची सवलत दिली जाते विजेच्या मोटारींच्या किमतीवर. काय झालं पुढे? पण वाढतंय का प्रमाण या मोटारींचं हव्या त्या गतीनं?
अ: ते खरं असेल. पण अरे तेव्हा एलॉन मस्कसारखा धडाडीचा उद्योजक नव्हता, हे लक्षात घे. आता मस्कच्या कंपनीनं किती मुसंडी मारलीये या विजेच्या मोटारींत.
मी: अहो. हा लोकांमधला बदल आहे. उगाच मस्कला का श्रेय देताय?
अ: कुणाला श्रेय देताना तुझ्या इतकं का पोटात दुखतं कळत नाही. मस्कनी या मोटारी विकसित केल्यात तर दे की त्याला श्रेय…
मी: विजेच्या मोटारी एलॉन मस्कच काय पण त्याचे पणजोबाही जन्माला आले नव्हते तेंव्हापासून आहेत. आणि विजेवर चालणारी मोटार बनवण्याचं श्रेय मस्क काय किंवा अन्य कोणी अमेरिकी उद्योजक काय, यांचं नाही.
अ: म्हणजे?
मी: एक म्हणजे अशी विजेवर चालणारी पहिली मोटार बनली हंगेरीत. यॉडलीक नावाचा कोणी धर्मगुरू होता, त्यानं ती बनवली. तो अभियंता होता आणि त्याच्या नावावर आणखी काही शोधही आहेत. त्यानंतर नेदरलँडमधल्या एका प्राध्यापकानंही अशी विजेवर चालणारी चारचाकी बनवली होती, हे माहितीये का? नसण्याची शक्यताच अधिक. त्यामुळे कधी हेही माहीत असणार नाही. जेंव्हा आपल्या मायबाप सरकारनं नेटिव्हांसाठी ‘इंग्लिश एज्युकेशन अॅक्ट’ आणला आणि त्याच्या आधी बिटिश पार्लमेंटमध्ये आपल्याला ज्याची चर्चा करायला आवडतं त्या लॉर्ड मेकॉले याचं आपल्याला शिकवण्याबाबतचं भाषण झालं त्या सुमारास. म्हणजे १८३०-३३ च्या काळात पहिली विजेवर चालणारी चारचाकी बनली. इतकंच नाही तर त्याच्या आसपास कोणा अँडरसन नावाच्या अभियंत्यानं स्कॉटलंडमध्ये तर विजेवर चालणारा ट्रकही बनवला होता. तेव्हा मस्कला श्रेय देण्याचा प्रश्न नाही. तो लोकप्रिय आहे, काहीबाही आचरट करत असतो, अनेकांना माहितीये म्हणून काही हे श्रेय त्याचं नाही.
अ: हे सगळं खरं असेल. नाही म्हणजे आहे. असं मानलं तरी चीन सध्या या क्षेत्रात जो काही धुमाकूळ घालतोय तो पाहिला की असं वाटतं आता युग हे वीजमोटारींचंच? आपणही काही करायला हवं यासाठी…
मी: ते मात्र खरं. आपण याच काय पण बऱ्याच गोष्टींसाठी बरंच काही करायला हवं. पण ते कळत नाही, आपल्याला हाच तर प्रश्न आहे…
अ: गेली तुझी गाडी मूळ पदावर. पण आता वीज मोटारींसाठी आपण किती किती काय काय करतोय त्याचं काहीही कौतुक नाही तुला. काही वर्षांत चीनला मागे टाकू आपण.
मी: त्याची काहीही गरज नाही.
अ: म्हणजे?
मी: चीन आपोआपच मागे पडेल. निदान या बाबत…
अ: काहीही…
मी: अहो खरंच. या विजेवर चालणाऱ्या मोटारींचे इतके ढोल चीन वाजवतोय आणि ते पाहून आपणही नाचतोय! दुसऱ्याच्या कशावरही नाचायची आपली सवय काही जाता जात नाही. आपलं धोरण म्हणून वेगळं काय?
अ: हेच! पर्यावरणाच्या रक्षणासाठी, पेट्रोल/ डिझेलवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी विजेवरच्या मोटारींना उत्तेजन द्यायचं…
मी: पहिली गोष्ट म्हणजे ते ‘आपलं’ नाही. इतरांनी ते आधीच जाहीर करून झालंय. दुसरं म्हणजे आज चीनमध्येच वीजमोटारी बनवणाऱ्या अनेक कंपन्यांचं बंबाळ वाजलंय. त्यांना कसं वाचवायचं ही चीनची चिंता. त्या लाटेप्रमाणे ती चिंताही आता लवकरच आपली बनेल. चीनमध्ये या लाटेत उडी घेऊन जवळपास साडेआठशे कंपन्या या क्षेत्रात पडल्या. त्यातल्या निम्म्याहून अधिक आज शब्दश: ‘पडल्यात’. म्हणजे खड्ड्यात…
अ: किती नकारात्मकता? चीनचं असं असेल. पण अमेरिकेत तरी त्या लोकप्रिय होतायत ना…?
मी: अलीकडे वास्तवाला नकारात्मकता म्हणतात, तो काही माझा दोष नाही. आणि दुसरं असं की अमेरिकेत विजेवर चालणाऱ्या मोटारी घेणारा वर्ग अतिश्रीमंतांचा आहे आणि आपली दुसरी/तिसरी मोटार तो विजेवर चालणारी घेतोय. म्हणजे त्या ठेवलेल्या आहेत घेऊन. आपल्याकडे अनेकांची मुळात एक सांभाळताना मारामार- ठेवायला काय परवडणार?
अ: तुझा फारच विरोध दिसतोय…
मी: माझ्या विरोध/पाठिंब्याने काय फरक पडणार? टीव्ही आला तेंव्हा अनेकांनी रेडिओच्या स्मरणार्थ शोकसभाही घेतल्या. रेडिओ आहे का गेला? तसंच हे. आणि वीज बनवायची प्रदूषणकारी कोळशापासनं किंवा प्रचंड धरणं बांधून आणि ती वापरायची पर्यावरण वाचवण्याचं कारण सांगत वीज मोटारींसाठी.
त्यावर अ काही बोलणार तर तेवढ्यात त्यांना फोन आला आणि हा पर्यावरणस्नेही संवाद सोयीस्कररीत्या थांबला…!
girish.kuber@expressindia.com
@girishkuber