गिरीश कुबेर
एक आटपाट नगर होतं. त्यात दोन भाऊ रहायचे. दोघांचेही व्यवसाय वेगवेगळे असले तरी धंदा जोरात होता. पण कालांतराने एका भावाला धंद्यात खोट यायला लागली आणि नंतर तो पार गाळातच गेला. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या भावाला मग दुसऱ्या भावानं आपल्या खिशाला तोशीस पडू न देता अलगद बाहेर काढलं आणि आता दोघेही खूश आहेत, असे म्हणतात..
एक आटपाट नगर होतं. एकविसाव्या शतकातलं. तरीही आटपाटच राहिलेलं. तिथे लोकशाही होती. असं म्हणतात. आणि कायद्याचं राज्य होतं. असंही म्हणतात. या नगरात एक वैश्य वृत्तीचा उद्योगी गृहस्थ राहात असे. तो फारच धडपडय़ा. उगाच कष्ट करायचा नाही तो. आवश्यक तितकंच काम करायचा. आटपाट नगरातले सगळे अन्य मिळेल ती कामं करत असताना यानं फक्त एकच काम केलं. या नगराच्या नाडय़ा कोणाच्या हातात असतात ते ताडलं. मग तो त्यांचंच काम करत राहिला. त्यांना हे दे. त्यांना ते दे. मग ते सगळे याला काय काय देऊ लागले.
मग तो खूप मोठ्ठा झाला. आटपाट नगराच्या सूत्रधारांपेक्षाही मोठा. त्यामुळे त्या नगराची सूत्रंच त्याच्याकडे आली. सूत्रधार त्याच्या घरीच राबायला लागले. याचं काम करणं म्हणजेच आटपाट नगराचं काम करणं असंच मानलं जाऊ लागलं. त्यामुळे सगळं नगर त्याला नमन करू लागलं. तो खूप खूप मोठा झाला. इतका की आटपाट नगरातनं कुठूनही त्याची हवेली दिसायची.
त्याला दोन मुलगे. आटपाट नगरात संतांच्या पोटी संतच निपजतात, वैद्याच्या पोटी जन्मलेला वैद्यच असतो आणि गायकाच्या पोटचा मातेच्या उदरातनं बाहेर येतानाच आपल्या पट्टीचा तानपुरा लावून येतो.. असं मानलं जायचं. तशी संस्कृतीच होती आटपाट नगराची. आणि संस्कृती म्हटलं की तिला कोण प्रश्न विचारणार? तेव्हा या सांस्कृतिक परंपरेप्रमाणे या मोठय़ा माणसाच्या पोटी आलेले दोन्ही मुलगे जन्मतानाच मोठे होऊन आले. म्हणजे आकारानं नाही. तसे ते इतरांसारखेच शिशू, बाल वगैरे होते. पण तरीही ते मोठे होते.
तर हे दोन्ही सुपुत्र मोठे झाल्यावर अधिकच मोठे झाले. मोठय़ा माणसाच्या पोटीच जन्माला आलेले. आणि बाप से बेटा सवाई असतो त्यामुळे ते तीर्थरूपांपेक्षा मोठे होणार हे ओघानं आलंच. आटपाट नगरात सगळं असं ओघानंच येतं. त्यामुळे हे दोन्ही विनासायास मोठे झाले. त्यांच्या मोठेपणात कोणाचाही अडथळा आला नाही. कसा येणार? कारण आटपाट नगराचे भाग्यविधाते सगळेच या मोठय़ा माणसाचे हितचिंतक होते. कोणी कोणी काय काय कोणा कोणाला देत राहिलं की एकमेकांचे हितचिंतक होण्याची सोय होती आटपाट नगरात. त्यामुळे ज्यांना कोणाला मोठं व्हायचंय ते सतत देत राहायचे. आणि आपल्याकडचं दिलं की दामदुप्पट परत मिळतं अशी श्रद्धाही होती आटपाट नगरात. त्यामुळे तिथले जमेल तितकं टेबलावरून द्यायचे. नाही जमलं तर टेबलाखालून द्यायचे. ज्यांच्याकडे कोणाला देण्यासारखं काहीच नव्हतं, ते त्यामुळे आटपाट नगरात कधीच मोठे होऊ नाही शकले. पण त्याला इलाज नव्हता. सगळेच मोठे व्हायला लागले तर छोटय़ांची काळजी घेणार कोण?
तर हा मोठा माणूस काळाच्या नियमाप्रमाणे एकदा गेला. अर्थात अन्य नगरांप्रमाणे आटपाट नगरातही माणसं एकदाच जातात. ते जाणं थांबवण्याची सोय काही अजून करता आली नव्हती आटपाट नगराच्या धुरीणांना. प्रयत्न सुरू होते. ते यशस्वी होईपर्यंत मग गेलेल्याच्या नावे स्मारक, मोठमोठे पुतळे वगैरे पर्याय त्याला जिवंत ठेवण्यासाठी होते आटपाट नगरात. असो. तर हा माणूस गेल्यावर आटपाट नगराचे सेवक त्याच्या मुलांकडे चाकरी करू लागले. त्यामुळे ते दोघेही आणखीनच मोठे होऊ लागले. या दोघांनी स्वत:ही बरंच काय काय मिळवलं. पण वडिलांनी मिळवलेल्याचं काय करायचं यावर दोघांत मतभेद तयार व्हायला लागले. या दोघांतल्या धाकल्याला जे हवं होते तेच थोरल्यालाही हवं होतं आणि जे त्याला नको होतं ते धाकल्यालाही नकोच होतं. त्यामुळे या दोघांचं चांगलंच वाजू लागलं. त्या वेळी त्या मूळ मोठय़ा माणसानं उपकृत केलेल्यांतील काही शहाणेजन पुढे आले आणि या दोघांत समेटचा प्रयत्न करते झाले. ते यशस्वी झालेदेखील. मग मोठा त्याला दिलेले उद्योग चालवायला लागला आणि धाकला त्याचे त्याचे. अशा तऱ्हेने एका मोठय़ा माणसातून दोन मोठी माणसं तयार झाली. त्यामुळे आटपाट नगराचा, ते चालवणाऱ्यांचाही फायदा झाला. त्यांना इतके दिवस एकाच मोठय़ा माणसाकडून काय ते मिळत होतं. आता ते दोघांकडून मिळू लागलं. त्यामुळे सगळेच खूश.
पण दैवाला ते मान्य नसावं. धाकटय़ाचे उद्योग संकटात पडू लागले. बँकांची कर्ज त्यामुळे बुडायला लागली. नवीन कर्ज मिळेनात. संकट आलं की नगरपितेही दुर्लक्ष करतात. त्यामुळे धाकल्याला कोणी विचारेना. आटपाट नगराच्या प्रमुखानं दुसरा एखादा उद्योग देता येतोय का त्याला याचा प्रयत्न केला. पण त्यालाही विरोध व्हायला लागला. आता काय करायचं काही कळेना धाकल्याला. संकटांमुळे मोठी माणसं लहान झाली की त्यांना कायद्याचा धाक दाखवायची प्रथा होती आटपाट नगरात. त्यामुळे तिथली न्यायालयंही धाकल्याच्या विरोधात निकाल द्यायला लागली. पार अगदी दिवाळं जायची वेळ आली धाकल्यावर. मग काय केलं त्यानं?
तर आपली कंपनी हळूच थोरल्याला विकली. त्यासाठी थोरल्यानं आपले पैसे खर्च केले की काय? अजिबात नाही. तोही मोठय़ा माणसाचा मोठा मुलगा. त्यानं घेतलं बँकेकडनं कर्ज. म्हणजे ज्या बँकेचं कर्ज धाकटय़ानं बुडवलं होतं, त्याच बँकेनं थोरल्याला कर्ज दिलं. आटपाट नगरातल्या बँका अशा मोठय़ांसाठी नेहमीच उत्साहानं कर्ज द्यायच्या. त्यामुळे त्यालाही मिळालं भरपूर कर्ज. मग थोरल्यानं या कर्जातनं आपल्या धाकल्या भावाच्या, बाराच्या भावात गेलेल्या कंपनीचा काही भाग विकत घेतला.
मग दोन्ही भावांनी या आनंदात खूप जोरजोरात टाळ्या पिटल्या. मोठय़ांनी टाळ्या वाजवल्या की सगळ्यांनीच तसं करायची प्रथा होती आटपाट नगरात. त्यामुळे सगळ्या शहरानंच टाळ्या वाजवल्या. सगळेच खूश झाले. बुडलेली कंपनी थोरल्यानं विकत घेतली म्हणून धाकटा खूश. या बुडत्या कर्जासाठी नवं गिऱ्हाईक मिळालं म्हणून बँका खूश. परत त्यांच्या कर्जाची परतफेड झाली, बुडीत कर्ज कमी झालं म्हणूनही बँकांना आनंद. आणि आपल्याच भावाच्या कंपनीसाठी लोकांकडनं पैसा उभा करता आला, आपला घालावा लागला नाही म्हणून थोरलाही खूश. त्यामुळे कंपनीचा समभागही चांगलाच वधारला. अनेकांनी तो विकला आणि चार पैसे कमावले. मग या आनंदी आनंद गडेच्या वातावरणाच्या फुग्याला दोघाही भावांनी टाचणी लावली. कशी? तर धाकटय़ानं जाहीर केलं : माझी कंपनी दिवाळखोरीत गेलीय. ती काही मी चालवू शकणार नाही.
झालं.. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळ्यांना धक्का बसला. एवढय़ा मोठय़ा माणसाच्या तितक्याच मोठय़ा होऊ घातलेल्यांतल्या एका मुलावर कंपनी विकायची वेळ यावी म्हणजे काय..अं. असं बऱ्याच जणांना वाटून गेलं. पण थोरला खूश होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. धाकटय़ा भावाची कंपनी बुडाली त्याचा आनंद होता का त्याच्या चेहऱ्यावर? तर तसं नाही.
झालं असं की आपल्या कंपनीच्या दिवाळखोरीची बातमी धाकटय़ानं जाहीर केल्या केल्या कंपनीचा समभाग असा काही घसरला की तो गटांगळ्याच खायला लागला. अगदी कवडीमोल झाला तो. मग थोरल्यानं धाकल्याच्या कंपनीची उरलीसुरली मालकीही विकत घेतली. तरीही पैसे उरले. त्याच पैशातनं बँकेच्या कर्जाची परतफेड केली.
अशा तऱ्हेनं आटपाट नगरातले हे मोठे अधिकच मोठे झाले. ते तसेच होतात.
म्हणून हे नगर आटपाटच राहतं.. वर्षांनुवर्ष..
girish.kuber@expressindia.com
@girishkuber