गिरीश कुबेर

ग्रीसचे धडे – १

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Hafiz Assad statue vandalized
असाद घराण्याची पाच दशकांची सत्ता संपुष्टात

अथेन्समधली संध्याकाळी स्थानिकांच्याही उत्साहानं फुलणारी खाद्यगृहं असोत की शहराचा आणखी कुठला कोपरा असो. अ‍ॅक्रोपोलिस दिसत राहातं, रात्रीसुद्धा उन्हासारख्या पिवळय़ा प्रकाशझोतांमध्ये, इतिहासाच्या साऱ्या खुणा वागवणारं..

शालेय वयात झोप उडवणारा पायथागोरस, भूमितीवाला युक्लीड, आर्किमिडीज, डॉक्टरमंडळी ज्याच्या नावे शपथ घेतात तो हिपोक्रॅटिस, दंतकथेतले पैलवान हक्र्युलिस, योद्धा अचिलीस, ओडिसस, ट्रोजन युद्धातला हेक्टर, स्त्री-पुरुष प्रेमदेवता अ‍ॅफ्रोडाईट, अथिना, अपोलो, सध्या बदनाम झालेला उडता घोडा ‘पेगॅसस’ला जन्माला घालणारा पोसेडिऑन, काव्यकाराबाबत ‘महाभारत’कार व्यासांशी स्पर्धा करणारा होमर, झालंच तर तत्त्वज्ञ सॉक्रेटिस, आधुनिक विश्वाची रचना ज्याच्या मांडणीवर झालेली आहे तो प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, तत्त्वज्ञानाची नवी शाखा देणारा एपिक्युरस, नाटककार सोफोक्लीस, साऱ्या जगावर राज्य करण्याचं स्वप्न पाहणारा अलेक्झांडर द ग्रेट, अणुसिद्धांत मांडणारा सॉक्रेटिसच्याही आधीचा डेमॉक्रिटस, ऑलिम्पिक्स, मॅरेथॉनङ्घ वगैरे वगैरे वगैरे. हे फक्त सहज आठवणारे. शोधू गेल्यास आणखी अनेक सापडतील अशा एकापेक्षा एक महाभाग, घटना, परंपरा एकाच देशात जन्माला आल्या.

तो हा ग्रीस आहे तरी कसा हे पाहायची बऱ्याच दिवसांची इच्छा होती. ती आता पूर्ण झाली. करोनानं दोन वर्ष खाऊन टाकल्यामुळे जरा उशीर झाला. ग्रीसमधेही यंदा करोनोत्तर पहिला पर्यटक हंगाम. तो सुरू व्हायच्या आधी आणि मुख्य म्हणजे ‘ग्रीसमध्ये गुलाबजाम’ खाण्याच्या मिषाने येणाऱ्यांची गर्दी वाढायच्या आधीच ग्रीसचा काही अंश डोळे आणि मन भरून पाहाता आला. त्यातली ही काही निरीक्षणं..

त्याची सुरुवात अथेन्सपासून झाली. पहिल्या काही तासांतच या शहरानं रोमची आठवण करून दिली. ही दोन शहरं अशी आहेत की पायाखालचा दगड काय कथा सांगेल याचा काही नेम नाही. इतका इतिहास या दोन शहरांत ठासून भरलाय की तो सतत मिळेल तिथून बाहेर डोकावत असतो. एखाद्या स्थूल व्यक्तीचा देह जसा अंगावरच्या कपडय़ात मावू नये तसा अथेन्समध्ये इतिहास मावत नाही. पण या दोहोंत महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे अथेन्सच्या सांदिकपारीतून डोकावणारा इतिहास पाहणं, अनुभवणं यात एक सौंदर्यानंद आहे.

हे शहर आपल्याला वर्तमानात आणतच नाही. सर्व इमारतींत एकसारखा सारखेपणा. मध्येच कोणा धनवंतानं २७ मजली इमला बांधलाय असा प्रकार नाही. त्यामुळे सगळय़ा शहराची म्हणून एक समान आकाशरेषा दिसत राहाते. आणि हा काळही त्या भागात हिंडण्यासाठी आदर्श. एकतर तापमान सुखद असतं. ऊन फक्त दिसायलाच सणसणीत. सूर्य..  पुलंच्या शब्दांत पेन्शनीत निघाल्यासारखा. अधिकारशून्य. आपल्याकडे या काळात सूर्यापासून मिळेल तो देहावयव झाकावा लागतो. युरोपात उलट. तिथले सर्व रती-मदन देहावयांना अधिकाधिक सूर्यदर्शन कसं होईल या प्रयत्नांत. भूतलावरच्या या आकर्षणामुळेही असेल पण सूर्य रात्री साडेआठाच्या आत काही अस्तास जाण्याचं नाव काढत नाही तिथे. नंतर किमान तासभर तरी  त्याची आभा रेंगाळत राहाते.

आणि मग सारं शहर मंद दिव्यांच्या आणि रस्ते पदपथांवरच्या खाद्यपेय विक्रेत्यांनी हारीनं माडून ठेवलेल्या मेणबत्त्यांच्या उजेडात चमकू लागतं. कुसुमाग्रज ‘उतरली तारकादळे जणू नगरात’ म्हणतात ती अवस्था हीच.

युरोपीय शहरांची ही खासियत मोठी विलक्षण. दिवसभर वर्दळीचे वाटणारे रस्ते संध्याकाळनंतर असे काही जीव लावतात की दिवसा पाहिला तो हाच का, असा प्रश्न पडावा. शाळेतले गणिताचे गुरुजी घरी भेटल्यावर हातात गोडधोड ठेवायला लागले की ओळखीचे वाटेनासे होतात, तसंच हे. रस्त्यांच्या दुतर्फा सुंदर खाद्यविक्री. रीतसर खुच्र्या टेबलं मांडलेल्या. काय काय आमच्याकडे आहे त्याची यादी तिथल्याच एका उभ्या स्टॅण्डवर. तिच्यावरही मेणबत्ती. त्या मंद प्रकाशात तिथल्या गंध घटकांची यादी वाचायची आणि इथे ‘बसायचं’ का आणखी कुठे याचा निर्णय घ्यायचा. ती जागा कोणतीही असो. अथेन्समध्ये एक प्रकार अनुभवला.

‘हाऊस वाइन्स’ नावाचा. म्हणजे तिथे विविध नाममुद्रांची पेय असतातच. पण प्रत्येक खाद्यगृहाच्या घराण्याची स्वत:ची अशी वाइन. श्वेत आणि रक्तवर्णी हे दोन्ही पर्याय उपलब्ध. आणि गंमत म्हणजे ती लिटरवर मिळते. साधारण ५ युरो ते १२-१३ युरो प्रतिलिटर असा दर. तिथल्या यजमानानं खास सांगितलं विविध रोझ (उच्चार रोझे) वाइन्स चुकवू नकाच. ही रोझे मूळची तशी श्वेतच. पण ती बनवण्याच्या प्रक्रियेत द्राक्षाच्या सालाला जास्त उष्णता लागू देत नाहीत. कडक उष्णतेपासून वाचल्यामुळे तिच्यात एक गुलाबी झाक दिसते. म्हणून तिचं नाव रोझ. तसा तिचा गुलाबाशी काही संबंध नाही. पण गुलाबाशी नातं नसतानाही गुलाबी होता येतं हे तिच्याकडे पाहून आणि तिच्या चवीवरून कळतं. रात्री उशिरापर्यंत, म्हणजे कामाच्या दिवशीही रात्री साडेबारा-एक पर्यंत अधिकृतपणे ही खाद्यगृहं सुरू असतात. ते पाहून वाटलं इथे फक्त पर्यटकच येत असतील. भोचकपणे एकाशी बोलून ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण अंदाज चुकला. ते सर्व स्थानिक होते. काही सहकुटुंब होते, काही सहकुटुंबावस्थेत शिरण्याची तयारी करणारे होते. त्यांना पाहाणं सुखद होतं. तशी उशिरापर्यंत जाग अनेक शहरांत असते. पण मध्यरात्रीनंतर दमून-भागून घरी जाताना पोटाची खळगी भरण्यासाठी उभ्याउभ्या चार घास कोंबणं वेगळं आणि हे असं बैठकीचं जेवणं वेगळं.

आणि हे सर्व मागे, पुढे किंवा बाजूला डोक्यावर अ‍ॅक्रोपोलिस पाहात असताना. हे अ‍ॅक्रोपोलिस ही अथेन्सची ओळख. जगात अनेक अ‍ॅक्रोपोलिस आहेत. पण हे आद्य. या अ‍ॅक्रोपोलिसच्या वास्तूचं जगभरातलं आकर्षण थक्क करणारं आहे. ठिकठिकाणच्या इमारती पाहाताना त्यांचं मूळ हे या अ‍ॅक्रोपोलिसमध्ये आहे हे जाणवतं. उदाहरणार्थ वॉशिंग्टनमधली अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाची इमारत किंवा लंडनमधली बँक ऑफ इंग्लंडची इमारत किंवा मुंबईतली एशियाटिक लायब्ररीची वास्तू वगैरे वगैरे. भव्य स्तंभ, त्यांची भूमिती रचनेतली उभारणी आणि विशिष्ट कोनातून त्यावर छत. साधी पण दणदणीत. आपली हेमाडपंती म्हणून ओळखली जाणारी रचना असो वा या अ‍ॅक्रोपोलिशियन. त्यांचे खांबच इतके मस्त असतात की पाहूनच आधार वाटतो. आणि दुसरं म्हणजे त्यांना पाहिल्यावर अलीकडच्या खांबांचा पोकळपणा फारच टोचू लागतो. असो. तर हे अ‍ॅक्रोपोलिस बरंच काही आहे. मर्त्य मानवांचा राजवाडा. शहराचं मध्यवर्ती केंद्र. अथेना या देवीचं आद्यपीठ. इसवीसनाच्याही आधी सहा-सात शतकं इथल्या वास्तूची निर्मिती झाली. तिथल्याच एका कोपऱ्यात मग अथिना या देवीचं ‘देऊळ’ उभारलं गेलं. ही त्या अर्थी अथेन्सची ग्रामदेवता.

हे अ‍ॅक्रोपोलिस असं टेकडीवर आहे. शहराच्या कोणत्याही भागातून जरा मान वर करून इकडे तिकडे पाहिलं की ते दिसतं. रात्रीच्या वेळी तर त्याची शोभा भलतीच उठून दिसते. उत्तम दगडी बांधकाम, त्यातल्या काहीचे भग्नावशेष. काही खांब तसेच उभे. आणि या सगळय़ावर अत्यंत कलात्मक पद्धतीने टाकलेले हलक्या पिवळय़ा उन्हाच्या प्रकाशासारखे प्रकाशझोत. अलीकडे प्राचीन इमारतींवर स्वस्तात मिळतात म्हणून नारिंगी, हिरवे वगैरे चिनी दिव्यांचे प्रकाशझोत टाकले जातात. ग्रीकांना ही कलात्मकता माहीत नसावी. त्यामुळे त्यांच्या रोषणाईतही एक खानदानी सभ्यता आहे. आसपास अंधार आणि त्यात ते तळपणारं अ‍ॅक्रोपोलिस मनाच्या पडद्यावर भव्यतेचा एक मानदंड तयार करतं.

खूप दशा झाली काळाच्या ओघात अ‍ॅक्रोपोलिसची. ते उभारलं ग्रीकांनी. नंतर हल्ले केले रोमन्सनी. मग बायझंटाईनांच्या काळात त्यांनी ते लुटलं. ऑटोमन साम्राज्यात इस्लामी चढाया झाल्या. त्या सर्व जखमांच्या खुणा अथीनाच्या अंगावर आजही दिसतात.

पण तिच्या चेहऱ्यावरच्या शांततेत तसूभरही फरक झालेला नाही. मुख्य म्हणजे या जखमा, त्याची वेदना, तिच्या खाणाखुणा आता ग्रीकांच्याही अंगावर नाहीत. अथेन्समध्ये अनेकांना विचारलं: रोमन्स, यवन सर्वानी तुमच्यावर अत्याचार केले, हल्ले केले. ते सर्व आता तुम्ही एकत्र राहाताय. काही राग नाही? अ‍ॅक्रोपोलिसच्या साक्षीनं त्याचं उत्तर होतं : ते सर्व इतिहासात होऊन गेलं. आता काय त्याचं..? इतिहासातले दगड वर्तमानात वाहायचे नसतात.. हे त्या इतक्याशा देशाला कळतं..

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

Story img Loader