या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गिरीश कुबेर

इलॉन मस्कनं ‘ट्विटर’ या समाजमाध्यमावरून केलेल्या दोन नोंदींनंतरच्या त्याच्या आर्थिक उलाढाली नियामकांच्या नजरेतून सुटल्या नाहीत.. पण आता प्रश्न आहे तो याच ट्विटरची मालकी त्यानं कधी घेतली, हा! 

इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’मध्ये सुमारे ९.२ टक्के इतके समभाग घेतल्याची बातमी आली आणि एकंदरच ट्विटरवर्गीयांत आनंद, उत्साहाची लाट आली. ‘टेस्ला’चा निर्माता, ‘स्पेसएक्स’ या खासगी उपग्रह सेवेचा कर्ता, जगातला सर्वात धनाढय़, जवळपास नऊ कोटी ट्विटरानुयायी पदरी बाळगणारा ढंगदार इलॉन मस्क याची मग ट्विटरच्या संचालक मंडळातच निवड झाली. या कंपनीचे प्रमुख पराग अगरवाल यांनी तशी जाहीर घोषणा केली.

पण हे प्रकरण वाटतं तितकं सरळ नाही. खरं तर मस्क यांचं तसं काहीच सरळ नसतं. गृहस्थ वाभरट म्हणतात तसा! अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता म्हणवतो स्वत:ला. पण ही अभिव्यक्ती स्वत:ला वाटेल तसं व्यक्त होता येतंय तोपर्यंतच. टीका सुरू झाली, त्याच्या शहाणपणाविषयी कोणी काही प्रश्न विचारले की मग एकदम आदळआपट आणि अद्वातद्वा प्रत्युत्तरं. यात खरं तर आगळं काही नाही. आपलंच बरोबर असं सर्वच यशवंतांना बऱ्याचदा वाटत असतं. आपल्याला प्रश्न विचारणारे छिद्रान्वेषी किंवा हेत्वारोपी. हे अशा स्वभावाचे यशवंत मग त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांच्या हेतूंविषयी शंका घेऊ लागतात. प्रसंगी प्रश्न विचारण्याच्या इतरांच्या अधिकारावरच प्रश्न उपस्थित करू लागतात. दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणाऱ्यांना हे असे प्रश्न विचारणारे नेहमीच खुपतात. अशा वेळी प्रश्न असतो : व्यवस्था, नियामक यंत्रणा काय करणार हा. सगळा फरक असतो या एका मुद्दय़ावर. जगातला सर्वात श्रीमंत, यशवंत, उद्याची आशा वगैरे गणल्या जाणाऱ्या मस्क याला आता हे जाणवत असेल?

गोष्ट आहे तीनेक वर्षांपूर्वीची. त्या वेळी मस्क यांनी एक ट्वीट केलं : ‘‘टेस्लाचे समभाग पुन्हा विकत घेण्यासाठी आवश्यक त्या निधीची व्यवस्था झालेली आहे. ज्यांच्याकडे ते आहेत त्यांच्याकडून कंपनी प्रति समभाग ४२० डॉलर्स इतका दर देऊन ते विकत घेईल’’. हे म्हणजे ज्याला उलट-खरेदी (बाय-बॅक) म्हणतात ते. आपल्याकडे अलीकडेच ‘टीसीएस’ या टाटा समूहाच्या कंपनीने ही अशी उलट-खरेदी केली. पण टीसीएस आणि टेस्ला यातला एक मूलभूत फरक दिसून आला.

तो असा की मस्क वा टेस्ला यांना अशी काही खरेदी करायचीच नव्हती. म्हणजे ती एक लोणकढीच. उगाचच सोडलेली पुडी. पण त्याचा परिणाम असा झाला की टेस्लाच्या समभागांत प्रचंड चढउतार होत राहिले. बराच काळ. पण प्रत्यक्षात असं काहीच होणार नव्हतं. शेवटी अमेरिकी भांडवली बाजाराची नियंत्रक- सेक्युरिटी एक्स्चेंज कमिशन- म्हणजे आपल्या ‘सेबी’सारखी यंत्रणा मध्ये पडली आणि तिनं मस्कला खुलासा करायला लावला. तसं झाल्यावर हा फुसका बार असल्याचं सर्वानाच कळलं. पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान झालं होतं गुंतवणूकदारांचं. आणि अमेरिकी कायद्यानुसार या नुकसानीला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी.

तशी ती झाली. मस्क आणि टेस्ला कंपनीला एसईसीनं प्रत्येकी दोन दोन कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला. मस्कनं तक्रार केली. पण तो देश सर्वात मोठा वगैरे असा लोकशाही नसल्यामुळे असेल कदाचित; पण तिथे सर्वाना नियम सारखेच असतात. आणि केवळ दंडावरच सुटका झाली नाही त्याची. त्याला तीन वर्षांसाठी टेस्लाच्या अध्यक्षपदावरनं उतरवायला लावलं एसईसीनं. पण यावरनं शिकेल तर तो मस्क कसा? त्यानं गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ट्विटरवरनं एक प्रश्न विचारला : टेस्लामधली मालकी मी १० टक्क्यांनी कमी करावी का?

धो धो प्रतिसाद आला या प्रश्नाला. मुळात मस्क अशा समाजमाध्यमांत लोकप्रिय आहे. साधारण निरीक्षण असं की एरवी तसे शहाणे म्हणता येतील असे नेमस्त समाजमाध्यमांत तितके लोकप्रिय नसतात. इथल्या लोकप्रियतेचे निकष जरा वेगळे असावेत. टोकाची भूमिका घेणारे, अद्वातद्वा बोलू-करू शकणारे, नियमांच्या चौकटीबाहेर डोकं काढून आपली उपस्थिती नोंदवणारे वगैरेंचे फार चाहते असतात या समाजमाध्यमांत. त्यामुळे मस्क यांच्या या प्रश्नाला दणदणीत प्रतिसाद नसता तरच नवल. पण यातही त्यांना नियामकांचा दणका बसला.

तर झालं असं की मस्क यांनी हा प्रश्न जाहीर विचारला त्याच्या बरोबर आदल्या दिवशी इलॉनचा भाऊ किंबल मस्क यानं आपल्या ताब्यातले ८८,५०० इतके टेस्ला समभाग अचानक विकले. हा व्यवहार जवळपास ११ कोटी डॉलर्सचा! म्हणजे ही रक्कम त्यानं कमावली. आता आपल्यासारख्या देशात म्हटलं असतं आपण, ‘‘हा तर योगायोग’’. आणि आपल्या उदार अंत:करणाच्या नियंत्रकांनी हो हो म्हणत दुर्लक्षही केलं असतं त्याकडे. नाही तरी बँकांची कर्जे बुडवली म्हणून धाकटय़ाच्या लिलावात निघालेल्या कंपन्या विकत घ्यायला ज्यांची कर्जे बुडवली त्याच बँका थोरल्याला हवी तितकी कर्जे देतातच की आपल्याकडे. तसे आपण उदार अंत:करणाचेच. पण मस्क याचं दुर्दैव हे की त्यानं हा उद्योग भारतात केला नाही. ती होती अमेरिका.

त्यामुळे तिथल्या एसईसीनं ताबडतोब मस्क बंधूंची चौकशी सुरू केली. ‘इनसायडर ट्रेडिंग’ या आर्थिक गुन्ह्यासाठी. इलॉनचा हा प्रश्न विचारण्याचा निर्णय किंबलला ठाऊक होता का, म्हणून त्यानं हे समभाग विकले का याची ही चौकशी. सामान्य गुंतवणूकदारांची प्रतारणा हा अमेरिकेत आणि विकसित देशांत गंभीरातील गंभीर गुन्हा मानला जातो. इनसायडर ट्रेडिंग म्हणजे कंपनीत ‘आत’ असलेल्यांनी आपल्याला मिळालेल्या/मिळत असलेल्या माहितीचा फायदा स्वत:साठी करायचा. ही माहिती ‘आत’ नाहीत अशा अन्य असंख्य गुंतवणूकदारांना मिळालेली नसते. त्यामुळे त्यांचं नुकसानच होतं. आपल्या अधिकारपदावरील अस्तित्वाचा गैरफायदा घेत गुंतवणूकदारांची फसवणूक आणि स्वत:ची धन करणं म्हणजे इनसायडर ट्रेडिंग. भल्याभल्यांना यासाठी विकसित देशांत गंभीर शिक्षा झालेल्या आहेत. इलॉन मस्कच्या मस्तीचं दुसरं उदाहरण. आणि आता तिसरं.

इलॉन मस्कनं ट्विटर कंपनीचे नऊ टक्के इतके समभाग घेतल्याची बातमी आली अवघ्या दोन दिवसांपूर्वी. त्याच दिवशी ट्विटरचे मुख्याधिकारी पराग अगरवाल यांनी घोषणा केली मस्क याला ट्विटरच्या संचालक मंडळात घेतल्याची. याबाबतचा सारा तपशील मस्क याच्याकडून एसईसीला सादर केला गेला ४ एप्रिल या दिवशी. म्हणजे या आठवडय़ातल्या सोमवारी. त्यात असं आढळलं की इलॉन मस्क याच्याकडच्या ट्विटर समभागांनी प्रत्यक्षात १४ मार्च या दिवशीच पाच टक्क्यांची मर्यादा ओलांडली. पण ही सारी माहिती एसईसीला दिली गेली ४ एप्रिल या दिवशी. अमेरिकेतला नियम असा की (आपल्याकडेही तसाच नियम आहे) कोणत्याही सूचिबद्ध कंपनीत एखाद्याने पाच वा अधिक टक्के मालकी विकत घेतली तर त्याची माहिती त्याच वेळी भांडवली बाजाराच्या नियंत्रकाला द्यावी लागते. म्हणजे इथे प्रत्यक्षात १४ मार्च याच दिवशी मस्क यानं एसईसीला रीतसर ट्विटरमधल्या आपल्या मालकीविषयी कळवायला हवं होतं.

पण हा(ही) नियम काही मस्क यानं पाळला नाही. ट्विटरवर भले स्वागत होत असेल मस्क यांच्या गुंतवणुकीचं. पण एसईसी त्यामुळे अजिबात बधलेली आणि भारलेली नाही. या यंत्रणेच्या प्रमुखांनी जाहीर विधान केलंय.. आम्ही मस्क यांची चौकशी करीत असल्याचं. ‘‘मस्क यांची ट्विटरमधली गुंतवणूक ही काही साध्या गुंतवणूकदाराची कृती नाही. कंपनीत मालकीवाटा मिळवण्याच्या दृष्टीनेच ही गुंतवणूक झालेली आहे. तिची माहिती यंत्रणेला न देणं हे गंभीर आहे,’’ अशा स्पष्ट शब्दांत एसईसीनं आपलं मत मांडलंय. याप्रकरणी आता चौकशी होणार आहे. सरकारी नियम म्हणजे मस्करी समजून त्यांची सर्रास पायमल्ली करणाऱ्यांची मस्ती.. मग तो इलॉन मस्कसारखा जगातील सर्वात बलाढय़, सर्वदेशीयांना हवाहवासा उद्योगपती का असेना.. एक साधी सरकारी यंत्रणा उतरवते हे वाचूनसुद्धा किती आश्वासक वाटतं! आपण ते वाचून आनंद मानू या!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber