गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com
@girishkuber
२०१४ साली ती सरकारचे वाभाडे काढणारी पत्रकारिता करण्यासाठी ओळखली जायची. आता ती विरोधकांची सालटी सोलते.. हा बदल कसा काय साध्य झाला?
तसं दिसायला सगळं उत्तम आणि जागच्या जागी आहे. म्हणजे न्यायालयांना स्वातंत्र्य आहे, त्यांच्या अधिकारांवर कोणाचं आक्रमण नाही. लोकप्रतिनिधीगृहं नियमाप्रमाणे सुरू आहेत. लोक प्रामाणिकपणे मतदान करतायत, जिंकणारे जिंकतायत, हरणारे हिरमुसले होतायत. माध्यमं बातम्या देतायत. जमेल तितकी मतं व्यक्त करतायत. वाचणारे/ पाहणारे हवे ते वाचतायत/ पाहतायत. थोडक्यात लोकशाहीसाठी जे/जेवढं काही असायला हवं ते/तेवढं जिथल्या तिथे आहे.
नाहीये ती फक्त ओरिगो. तिचं नसणं अनेकांना जाणवतंय. केवढा आधार होता समाजाला ओरिगोचा. आता ती कागदोपत्री आहे म्हणायला आहे. पण पूर्वीसारखी नाही. पूर्वी ती धनदांडग्यांना रोखायची. त्यांचे मुखवटे टराटरा फाडायची. धार्मिक विद्वेषाचा प्रयत्न जरी कोणी केला तरी ओरिगो ती व्यक्ती/संस्था यांच्यामागे हात धुऊन लागायची. महिला, अल्पसंख्य, स्थलांतरित.. अशा अनेकांच्या हक्कांच्या रक्षणात ओरिगो अहमहमिकेने उतरायची.
ओरिगो ही अत्यंत लोकप्रिय अशी बातम्यांची वेबसाइट. हंगेरी या देशातली. खूप लोकप्रिय होती ती तिच्या पत्रकारितेसाठी. तिची एक बातमी तर प्रचंडच गाजली. पंतप्रधान व्हिक्टर ओबान यांच्या सहकाऱ्यानं एका गुप्त परदेश दौऱ्यात करू नये त्या उद्योगावर केलेल्या खर्चाचं बिल सरकारी पशातनं दिलं, अशी ती बातमी. काय खळबळ उडाली असेल तिच्यामुळे याची कल्पनाच करवत नाही. भयंकर वादळच निर्माण झालं. ते शमवता शमवता पंतप्रधान ओबान यांची चांगलीच दमछाक झाली. बदनामी झाली ती झालीच. हंगेरीसारख्या एके काळच्या साम्यवादी देशात लोकशाही कशी रुजली आहे, हेच यातून दिसलं. अशी धाडसी पत्रकारिता हेच तर जिवंत लोकशाहीचं लक्षण. त्यामुळे जागतिक पातळीवरही या बातमीचं आणि ती देता येईल अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांचं खूप कौतुक झालं.
ही घटना २०१४ सालची.
आज पाच वर्षांनंतरही ओरिगो आहे. पत्रकारिता करतीये. बदल झालाय तो तिच्या लक्ष्यात. २०१४ साली ती सरकारचे वाभाडे काढणारी पत्रकारिता करण्यासाठी ओळखली जायची. आता ती विरोधकांची सालटी सोलते. जरा कोणी पंतप्रधान ओबान यांचा विरोधक असल्याचा संशय जरी आला तरी ओरिगो त्याच्या मागे हात धुऊन लागते. त्याच्या देशविषयक निष्ठांवर संशय घेते. पंतप्रधानांच्या टीकाकारास प्रसंगी देशद्रोहीदेखील ठरवायला ओरिगो मागेपुढे पाहत नाही. मूळचे हंगेरीचे पण अमेरिकेतल्या काही नामांकित धनाढय़ांतले एक म्हणजे जॉर्ज सोरोस. ते पंतप्रधान ओबान यांचे टीकाकार. ओबान यांची अतिउजवी धोरणं सोरोस यांना मान्य नाहीत. ओबान यांनी देश मागे नेऊन टाकल्याचं त्यांचं मत आहे.
ओरिगो सातत्यानं या सोरोस यांचं वस्त्रहरण करते. देशाच्या पंतप्रधानांविरोधात असं कोणी बोलणं ओरिगोला मान्य नाही. देशात अल्पसंख्याकांचं महत्त्वही फारच वाढलंय, असं ओरिगोचं निरीक्षण आहे. त्यातही परत ते मुसलमान. म्हणजे तर स्थानिक संस्कृतीला मोठाच धोका. तो धोका ओरिगोनं सर्वाआधी ओळखला. तेव्हापासून या मुसलमान स्थलांतरितांपासून देश कसा वाचवता येईल या पंतप्रधान ओबान यांच्या चिंतेत ओरिगोही सहभागी झाली. या स्थलांतरितांना वेचून काढून हाकलून लावण्याच्या पंतप्रधानांच्या मोहिमेला ओरिगोनं भरभरून साथ दिली. देशातलं वातावरण या आणि एकूणच स्थलांतरितांविरोधात कसं तापलेलं राहील याची पुरेपूर काळजी ओरिगो घेते. त्यामुळे पंतप्रधान ओबान यांना चांगलीच मदत होते. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना साथ देणं हे तसं चांगल्या माध्यमाचं कर्तव्यच. त्यात ओरिगो जराही चुकत नाही.
झालंच तर नागरिकांत देशप्रेमाची भावना निर्माण करणं हेदेखील किती महत्त्वाचं काम. देशाला नेहमी धोका असतो तो बाहेरच्या शत्रूंचा. शेजारच्यांचा. धार्मिक अतिरेक्यांचा. विशेषत: इस्लामी धर्माध. हे धोके टाळायचे तर पहिल्यांदा त्यांच्याविषयी वातावरणनिर्मिती करावी लागते. या धोक्यांची जाणीव नागरिकांना करून द्यावी लागते. हे काम फार म्हणजे फार महत्त्वाचं. आता ते करताना देशांतर्गत समस्यांकडे, घसरत्या अर्थव्यवस्थेकडे किंवा रोजगारशून्यतेकडे दुर्लक्ष होतं असं काही म्हणतात. पण दहशतवादाच्या धोक्याचं महत्त्व यापेक्षा फार अधिक. नोकऱ्या काय देता येतील नंतरसुद्धा. आधी जिवंत राहता आलं तर नोकरी. तेव्हा पहिली चिंता करायची ती जिवंत कसं राहता येईल याची. त्यामुळे या जगण्याच्या गळ्यालाच नख लावणाऱ्या बाह्य़ शत्रूंचा बीमोड पहिल्यांदा करायला हवा.
पंतप्रधान ओबान यांनी त्याच ध्येयासाठी स्वत:ला वाहून घेतलंय. तहान नाही, भूक नाही, रात्र नाही, दिवस नाही.. ओबान यांचं एकच ध्येय : आपल्या मायभूमीला म्हणजे हंगेरीला दहशतवादाच्या धोक्यापासून वाचवायचं. त्यासाठी ते अगदी जिवाची पराकाष्ठा करतायत. ती करताना एखादा न्यायालयाचा निर्णय किंवा काही नतद्रष्ट माध्यमं आडवी आली तर त्यांना दूर करायलाच हवं. देश मोठा की माध्यमं किंवा न्यायालयं मोठी?
ओरिगो नेमका हाच प्रश्न उपस्थित करते. त्यामुळे पंतप्रधान ओबान यांना खूप मदत होते. अशी राष्ट्रवादी भावनेनं मुसमुसलेली माध्यमं असली की देशाची प्रगती व्हायला कितीसा वेळ लागणार?
पंतप्रधान ओबान हेदेखील नेमका हाच प्रश्न विचारतात. नागरिकांचा त्यांच्यावर चांगलाच विश्वास आहे. देशासाठी अपार कष्ट करण्यातून त्यांनी तो मिळवलाय. ओरिगो त्यासाठीच त्यांना मदत करते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या पंतप्रधानांची महत्ता पोहोचवायची आणि त्याच लोकांना विरोधकांची नालायकता दाखवून द्यायची हेच आता ओरिगोचं ब्रीद आहे.
कसं काय तिला हे साध्य करता आलं? त्याचं श्रेयसुद्धा ओबान यांनाच द्यावं लागेल.
झालं असं की ओरिगोची पत्रकारिता पंतप्रधान ओबान यांच्या राष्ट्रविकासाच्या मार्गात फारच अडथळा आणत होती. देशप्रेमानं भारलेल्या ओबान यांना ते सहन होईना. पण सांगणार तरी कसं? या विवंचनेत असतानाच त्यांना एक मार्ग सापडला.
ओरिगोची मालकी.
ती होती जर्मन दूरसंचार कंपनी मग्यॉर टेलिकॉम या कंपनीकडे. या कंपनीकडे हंगेरीतल्या दूरसंचार सेवेचं कंत्राट होतं. भरभक्कम नफा मिळत होता तिला या देशातनं. देशप्रेमी ओबान यांना वाटलं आपल्या देशात कमावलेला नफा आपल्याच देशात खर्च व्हायला हवा. म्हणून मग १० कोटी डॉलरचा कर भरण्याची नोटीस दिली पाठवून पंतप्रधानांनी या कंपनीला. हे कराचं प्रमाण वाढत गेलं. कंपनीला व्यवसाय करणं झेपेना. कंपनी पंतप्रधानांना भेटण्यासाठी गयावया करायला लागली. पण पंतप्रधान कशाला भेटतील अशा कंपनीला? शेवटी त्यांच्या कार्यालयालाच दया आली. पंतप्रधानांचे उजवे हात मग या कंपनीला शेजारच्या ऑस्ट्रियातल्या व्हिएन्नात जाऊन भेटले. बोलता बोलता अन्य गप्पाही झाल्या. पंतप्रधानांची लोकशाहीवर निष्ठा होती. त्यामुळे त्यांनी काही ओरिगोचा, त्यांच्या पत्रकारितेचा विषय काढला नाही. पण सहज सुचवलं काही लिहिण्याआधी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधत चला म्हणून. कंपनीला ती सूचना आवडली. योग्यच होतं ते. मग याच बठकीत पंतप्रधानांच्या कार्यालयातले काही अधिकारीच या वृत्त-संकेतस्थळासाठी नियुक्त केले गेले. मग बातम्या देण्याआधी सगळे या अधिकाऱ्यांकडून मंजुरी घेत.
त्यामुळे नाराज होत काही पत्रकारांनी वगैरे नोकऱ्या सोडल्या. मग जर्मन कंपनीलाही ही वेबसाइट चालवण्यात काही रस राहिला नाही. त्यांनी ती विकायचा निर्णय घेतला. हंगेरीतल्याच देशप्रेमी उद्योगपतींनी मग ती विकत घेतली. आता हा नवा खरेदीदार पंतप्रधान ओबान यांच्या वर्तुळातलाच आहे हा केवळ योगायोग.
हल्ली ओरिगो ही पंतप्रधानांच्या सुरात सूर मिसळून राष्ट्रउभारणीच्या आणि त्यात आडवे येणाऱ्या विरोधकांना उघडे पाडण्याच्या कामाला लागलीये.
आता, ३ मे या जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिनी हंगेरीत काहींनी दु:ख व्यक्त केलं ओरिगोची खरी पत्रकारिता लयाला गेल्याबद्दल. पण पंतप्रधान ओबान यांचं म्हणणं खरं.. ‘लोकशाही टिकवायची तर पत्रकारितेनंही बदलायला हवं’.