बाई मूळच्या शास्त्रज्ञ. त्यामुळे स्वभाव अत्यंत चिकित्सक. कोणताही विषय समोर आला की थेट मुळालाच हात घालायचा. चहूबाजूंनी त्याचा विचार करायचा आणि एकदा निर्णय घेतला की परिणामांचा कसलाही विचार करायचा नाही, हा खाक्या..
काही काही गोष्टी आपल्याला खऱ्या वाटूच शकत नाहीत. ही त्यातलीच.
तीन वर्षांपूर्वी बíलनला गेलो होतो तेव्हा अनुभवलेली. शहरातल्या मित परिसरात एक वस्तुसंग्रहालय बघून परतत होतो तर यजमानानं गाडी कडेला घेतली आणि म्हणाला उतर. सहज बाहेर नजर टाकली. तसं वेगळं काहीच नव्हतं. एक रस्ता. बऱ्यापकी रहदारी. खूप गजबजलेला होता असंही नाही. दोन्ही बाजूंना युरोपीय शहरांमध्ये असतात तसेच रेखीव पदपथ. दगडी. दोन्ही बाजूंना इमारतींची रांग. सगळ्या अगदी एकाच उंचीच्या. मध्येच एखादी भसकन मान वर करतीये असा प्रकार नाही. सगळ्या इमारतींमधल्या घरांच्या खिडक्या रस्त्याकडे तोंड करून. त्या इमारत रांगांत मध्ये एक फिकट पिवळ्या रंगाची इमारत. तिच्याकडे बोट दाखवून माझ्या यजमानानं विचारलं, तिथं कोण राहात असेल?
त्या घराला कसलाही डामडौल नव्हता. अगदी साधं घर. अशा घरात कोण राहात असेल? एखादा लेखक/ कलाकार/ प्राध्यापक/ किंवा असंच कोणी तरी.. मी याचं क्रमानं उत्तर दिलं. तर यजमान म्हणाला, शेवटचं अर्ध बरोबर आहे.. म्हणजे प्राध्यापकाचंच घर आहे. पण फक्त प्राध्यापक नाही राहात.. म्हटलं म्हणजे काय?
अँगेला मर्केल. तो म्हणाला, अँगेला मर्केल तिथं राहतात. आताही. म्हणजे जर्मनीच्या चॅन्सेलर आहेत तरीसुद्धा त्या याच घरात राहतात. जगातल्या एका बलाढय़ राष्ट्राची प्रमुख त्या इमारतीत राहते, हे सांगितल्याशिवाय कळतसुद्धा नाही. तिकडे इमारतीत राहणाऱ्यांची नावं खालती पाटीवर असतात. त्याच्यासमोर एक बटन. ते दाबलं की ज्याच्याकडे जायचं त्याच्या घरी घंटा वाजते. म्हणजे इतरांना त्रास नाही. तशाच पाटय़ा या इमारतीच्या तळमजल्यावर आहेत. त्यातल्या एका पाटीवर नाव आहे प्रा. सोर. हे मर्केल यांचे पती. जवळच्याच विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. नीट पाहिलं तर कळतं इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी दोन सशस्त्र पोलीस फक्त आहेत. बाकी जर्मनीचा चॅन्सेलर या इमारतीत राहतो याच्या कोणत्याही खुणा वातावरणात सापडत नाहीत. खरं तर जर्मन सरकारनं चॅन्सेलरसाठी भली मोठी, अद्ययावत चॅन्सलरी बांधलेली आहे. ती बघताही येते बíलनमध्ये. मंत्रिमंडळाची खोली, चॅन्सेलरचं घर, कार्यालय तिथं आहे, पण मर्केल तिथं राहत नाहीत. त्या सरकारी घरापेक्षा त्यांना आपलंच घर आवडतं. साधा फ्लॅट. हजारभर चौरसफुटांचा असेल नसेल.
त्यांचं आधीचं घर तर फक्त ५५० चौ. फुटांचं आहे. १९८६ ते ९० अशी चार र्वष मर्केल त्या घरात राहिल्या. ते घर जर्मनीला पूर्व पश्चिम असं दोन भागांत करणाऱ्या बíलन िभतीलगत आहे. त्या घरात तर आता पर्यटकांना राहतासुद्धा येतं. ‘लिव्ह लाइक अँगेला’ अशी पर्यटक घोषणाच आहे तिकडे. चांगलीच मागणी आहे त्या घराला. त्या घराची इमारतही पाहिली. अगदीच साधी.
पण हेच मर्केलबाईंचं वैशिष्टय़ आहे. टाइम साप्ताहिकानं पर्सन ऑद द इयर.. या वर्षांची मानकरी म्हणून मर्केलबाईंची निवड केली, त्यात या साप्ताहिकाच्या संपादकांनी नेमकी हीच बाब आग्रहानं नमूद केलीये. कोणताही भपका नाही, कसलाही तोरा नाही. काही खास करिश्मा आहे म्हणावं तर तोही नाही. तरीही आपल्या वरकरणी साध्या व्यक्तिमत्त्वानं पण निश्चयी स्वभावानं मर्केलबाईंनी यंदा जग गाजवलं. मग तो सीरियातनं येऊ पाहणाऱ्या निर्वासितांचा प्रश्न असेल किंवा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना खडसावण्याचा मुद्दा असेल. मर्केलबाई आपल्या अंगभूत शांतपणानं आणि तरीही ठाम वाणीनं जे म्हणायचं ते म्हणतात. ‘टाइम’च्या वर्षमानांकितात स्थान मिळवणारी ही फक्त चौथी महिला. पहिली म्हणजे ब्रिटनच्या इतिहासात वादग्रस्थ ठरलेली वॅलिस सिम्प्सन.. हिच्यासाठी आठव्या एडवर्डनं राजपदाचा त्याग केला. आणि ते तिचं तिसरं लग्न होतं. ते असो. दुसऱ्या पर्सन ऑफ द इयर म्हणजे राणी एलिझाबेथ. नंतर फिलिपिन्सच्या अक्विनो आणि मग थेट अँगेला मर्केलच.
बाई मूळच्या प्राध्यापक. जन्मानं अँगेला केस्नर. वडिलांना धर्माचं आकर्षण होतं. एका स्थानिक चर्चमध्ये नेमणूक झाल्यानंतर हे सर्व कुटुंबीय पूर्व जर्मनीत गेले. कारण ते चर्च पूर्व जर्मनीत होतं. शाळेत गणित आणि भाषा हे त्यांचे आवडते विषय. रशियन भाषेत त्यांना उत्तम गती आहे. इतकी की व्लादिमीर पुतिन यांच्याशी त्या रशियन भाषेत बोलतात त्या वेळी त्यांच्याकडून काही शिका असं पुतिन यांना आपल्या सरकारी भाषांतरकारांना सांगावं लागतं. महाविद्यालयात त्यांना शास्त्रात गोडी निर्माण झाली. क्वांटम केमिस्ट्री हा त्यांच्या अभ्यासाचा, संशोधनाचा विषय. बíलनच्या विज्ञान अकादमीत त्या संशोधक, प्राध्यापक होत्या. तो काळ जर्मनीच्याच नव्हे तर साऱ्या जगाच्या धामधुमीचा.
तेव्हाच्या सोविएत रशियात सत्तेवर आलेल्या मिखाइल गोर्बाचोव यांनी कम्युनिझमच्या मुळावरच घाव घातला होता. त्यामुळे बíलनची िभत डळमळू लागली होती. १९८९ साली ती पडलीच. त्या काळात अँगेला राजकारणाच्या परिघावर होत्या. नंतर त्या आत आल्या. वैयक्तिक आघाडीवर त्या आधी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांचा भौतिकशास्त्राचा विद्यार्थी होता उलरिच मर्केल नावाचा. अँगेलांनी त्यांच्याशी लग्न केलं, पण ते चार वर्षच टिकलं. दोघांचं काही पटलं नाही. चार वर्षांत घटस्फोट झाला त्यांचा. पण मर्केल आडनाव राहिलं. याच दरम्यान त्यांचा जोआकिम सोर यांच्याशी परिचय झालं. मग स्नेह. मग ते जोडपं म्हणून राहू लागले आणि आपलं जमतंय हे लक्षात आल्यावर अगदी अलीकडे १९९८ साली त्यांनी लहानशा, खासगी समारंभात सोर यांच्याशी अधिकृत लग्न केलं. ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. अँगेला यांच्याप्रमाणेच. पण मुख्य म्हणजे चॅन्सेलरचा पती म्हणून ते कधीही कुठेही दिसत नाहीत. समारंभात तर नाहीच नाही. आपण बरं आपलं शिकवणं बरं, असाच त्यांचा दृष्टिकोन. हे फारच महत्त्वाचं. नाही तर आपल्याकडे ‘मि. प्रेसिडेंट’ आपली ‘प्रतिभा’ दाखवत किती फालतू गोष्टीत कशी ‘पाटील’की करत असतात ते आपण पाहिलेलंच आहे. असो.
खरं तर जर्मन राजकारणाची परंपरा बघितली तर मर्केल यांच्याकडे तीन तीन वैगुण्य आहेत. एक तर घटस्फोटित.. विवाहित महिला, त्यात संशोधक आणि परत पूर्व जर्मनीची. म्हणजे सगळाच आनंद. तरीही बाई इतकी खमकी की सगळ्यांना पुरून उरली. त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे त्या कधी रागवत वगरे नाहीत. म्हणजे भावनाच दाखवत नाहीत. भावनेला मी चार हात लांबच ठेवते.. कारण भावनेमुळे तर्कसंगत विचारावर परिणाम होतो.. असं त्या म्हणतात. मूळच्या शास्त्रज्ञ. त्यामुळे स्वभाव अत्यंत चिकित्सक. कोणताही विषय समोर आला की थेट मुळालाच हात घालायचा. चहूबाजूंनी त्याचा विचार करायचा आणि एकदा का निर्णय घेतला की मग परिणामांचा कसलाही विचार करायचा नाही, हा खाक्या. त्याच्या सहकाऱ्यांना तो अस्वस्थ करून सोडतो. बरं, त्यांच्या मनात काय आहे ते चेहऱ्यावर वाचायचीही सोय नाही. त्यामुळे मर्केलबाईंबरोबर काम करणं हे किती आव्हान आहे, याच्या अनंत कथा जर्मनीत ऐकायला मिळतात. सगळ्यात धक्कादायक आहे ती माजी चॅन्सेलर हेल्मट कोल यांचं मर्केल यांनी काय केलं ती. कोल यांचा पक्षात प्रचंड दरारा असताना पक्षाच्या निधीची एक भानगड बाहेर आली. पण पक्षात कोणाची िहमत नव्हती त्याबाबत ब्र काढायची. तर त्या वेळी मर्केलबाईंनी वर्तमानपत्राच्या संपादकाला फोन केला आणि म्हणाल्या यावर मला बोलायचंय. त्या वेळी मर्केल नवशिक्याही नव्हत्या. त्यामुळे संपादकानं कुत्सितपणे विचारलं.. काय बोलायचंय ते माहिती आहे का? त्यावर या म्हणाल्या मी ते लिहूनच काढलंय. पाच मिनिटांत फॅक्स मिळेल. तसा तो खरोखरच आला. या नवशिक्या मुलीनं थेट कोल यांच्यावर हल्ला करणारा लेख लिहिला होता आणि तो नावानिशी छापून यावा अशी त्यांची इच्छा होती. दुसऱ्या दिवशी त्या लेखानं भलतीच खळबळ माजली. मर्केल यांनी लिहिलं होतं, पक्षानं आता कोल यांना नारळ देण्याची वेळ आली आहे.. त्यांच्या चालीनं चालण्यात आता अर्थ नाही.
पुढच्या काही महिन्यांत पक्षानं कोल यांना खरोखरच नारळ दिला. खरं तर कोल यांनी त्यांना राजकारणात आणलं, पण त्यांनीच ते मागे पडतील अशी व्यवस्था केली. मर्केलबाई निवडल्या गेल्या. २००५ साली आपसूकच चॅन्सेलरपद त्यांना मिळालं ते आजतागायत कायम आहे. नंतर कोल म्हणाले, मी माझ्या मारेकऱ्यालाच पोसत होतो.
पुढे सलग तीन वेळा त्या निवडून आल्या. आणि आता हे ‘टाइम’चं पर्सन ऑफ द इयर.. म्हणून निवडलं जाणं. ती बातमी आली आणि त्यांचा हा इतिहास आणि साधेपणा आठवला.
तो पाहिला तर एक जाणवतं.. महत्त्व असतं ते समर्थाच्या साधेपणाला. असमर्थाच्या साधेपणाला कोणीही भीक घालत नाही.
तेव्हा..