गिरीश कुबेर
शिस्तबद्ध, व्यक्तिनिरपेक्ष व्यवस्था चोख असली की ती आपली जबाबदारी किती उत्तम पार पाडते, हे ब्रिटनमध्ये दिसलं. पण त्यात आश्चर्य नाही, कारण…
‘‘या लेखात इंग्लंडमधल्या वास्तवाचं यथोचित प्रतिबिंब पडलेलं आहे. हे असं वास्तव, ज्यात जगातला सर्वोत्तम लसीकरण कार्यक्रम राबवला जातोय आणि मीदेखील त्यात सहभागी आहे. ब्रिटिश हवामान आणि त्याची चर्चा विख्यात आहे. तशीच विख्यात आहे त्या देशाची शिस्त आणि तिच्या आचरणातून विशाल होत जाणारा दृष्टिकोन. हा लसीकरण कार्यक्रम पाहिल्यावर लक्षात येतं, हा देश इतकी वर्षं जगावर राज्य का करू शकला ते. आजच्या भाषेत मी याचं वर्णन ‘जोखीम विश्लेषण क्षमता (रिस्क अॅसेसमेंट)’ अशा शब्दांत करेन. इथं अगदी शालेय वयापासूनच सर्वांना जोखिमांचा परिचय, त्यांच्या विश्लेषणाची क्षमता आदी शिकवलं जातं. त्यामुळे मॉल ते सौंदर्य प्रसाधनं क्षेत्रातले कर्मचारी अशा सर्वांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातल्या जोखमींचा अंदाज असतो. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर जवळपास प्रत्येकाला इथं कृत्रिम श्वासोच्छ््वास कसा द्यायचा याचं प्रशिक्षण असतं. त्यामुळे एखाद्याचा श्वास थांबलाय असं दिसल्या दिसल्या समोरचा गांगरून न जाता हे पायाभूत तंत्र अमलात आणून त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. हे अगदी किमान ज्ञान आहे…
‘‘आता करोनाविषयी. मी आता या क्षेत्रातला माझा अनुभव सांगतो. त्यावरून तुम्हाला ब्रिटनच्या लसीकरण आणि त्यामुळे करोना-नियंत्रण मोहिमेच्या यशाचं मर्म निश्चित लक्षात येईल…
‘‘सर्वप्रथम म्हणजे जोखीम विश्लेषणानंतर ब्रिटिश सरकारनं ‘नॅशनल हेल्थ सव्र्हिस (एनएचएस)’मधून बिगर कोविड-सेवा पूर्णपणे थांबवण्याचा वा त्यांत लक्षणीय कपात करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत जे अनावश्यक वा अतिरिक्त ठरले, त्यांची सेवा करोना-केंद्रांत वर्ग केली गेली. तसं करताना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या क्षमता, त्याचा आत्मविश्वास पारखून घेतला गेला. असं केल्यानं करोनाची साथ टिपेला गेल्यावर होणाऱ्या अवस्थेला सामोरे जाऊ शकतील असे कर्मचारी लक्षात आले. (साथीच्या काळात) अनावश्यक सेवांतून आवश्यक गटांत वर्गवारी झालेल्यांसाठी तातडीचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले गेले. ही प्रक्रिया पूर्ण झाली २०२० च्या मार्च महिन्यात. मी अस्थिमज्जा स्नायूंवरील उपचार क्षेत्रातला. करोनाकाळात या क्षेत्रात काम कमी होणार होतं. म्हणून माझी बदली मग जखमोपचार केंद्रात करण्यात आली. माझं कौशल्य काय आणि कशात आहे हे लक्षात घेऊन माझा जास्तीत जास्त उपयोग कोणत्या क्षेत्रात होईल, याचा विचार करून त्यानुसार मला नवं काम दिलं गेलं आणि त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही! आम्ही नव्या विभागात कामाला लागल्यावर पहिले काही महिने दर आठवड्याला आमचा प्रतिसाद/प्रतिक्रिया यांची नोंद केली जायची. त्यानुसार आवश्यक ते बदल, सुधारणा केल्या जायच्या…
‘‘ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया सुरू असताना एनएचएसचे धुरंधर हातावर हात ठेवून स्वस्थ बसून नव्हते. त्यांच्याकडून करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या आगमनाचे अंदाज बांधले जात होते. दुसरी लाट जेव्हा थडकेल तेव्हा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कोणाची नियुक्ती कोणत्या आघाडीवर करायची, याचा संपूर्ण तपशील एव्हाना एनएचएसकडे तयार होता. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याची संमती घेतली गेली. करोनाच्या पहिल्या लाटेनं शिकवलेले धडे एनएचएसनं अभ्यासले होते. पहिल्या लाटेत मी जे काम केलं त्याच्याआधारे दुसऱ्या लाटेत माझ्या नियुक्तीचा निर्णय घेतला गेला. करोना रुग्णकक्षातच फिजिओथेरपी सेवा देता येईल का, हे मला विचारलं गेलं. तसं विचारण्याचा त्यांचा उद्देश असा की, त्यामुळे एनएचएसला या विभागातच ही पदनिर्मिती करता येईल किंवा काय, याची तपासणी करणं. हे असं करता येईल का हे पाहायचं कारण रुग्णाला फिजिओथेरपीसाठी दुसऱ्या कक्षात जावं लागणार नाही आणि सरकारी खर्चही समर्थनीय ठरेल. माझ्या होकारावरच ते थांबले नाहीत. तर त्यांनी असा एक चाचणी प्रयोग करून पाहिला. त्यात अपेक्षित परिणाम दिसल्यावरच तो राष्ट्रीय स्तरावर राबवण्याचा निर्णय झाला…
‘‘हे सर्व प्रत्यक्ष कार्यालयात यायला मिळत असताना आणि तसं मिळणार नाही हे गृहीत धरून दूरसंवाद… अशा दोन्ही पद्धतींनी हे कसं करता येईल त्याची चाचणी घेतली गेली. सर्वांना मायक्रोसॉफ्ट टीम्स वापरायचं प्रशिक्षण दिलं गेलं…
‘‘याचा परिणाम असा झाला की, प्रत्यक्ष दुसरी लाट जेव्हा थडकली तेव्हा आमच्या कार्यक्षमतेवर काहीच परिणाम झाला नाही. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत आमच्याकडे सर्व काही सुरळीतच होतं. आताच आकडेवारीही आली. करोना कक्षात फिजिओथेरपीस्ट नियुक्त केल्यानं कसा आणि किती फायदा झाला, याचं विश्लेषण त्यात आहे. आता टाळेबंदी चांगलीच शिथिल झालेली आहे. त्यामुळे आता रुग्णांना आम्ही समोरासमोर पाहायला सुरुवात केली आहे…
‘‘आता लसीकरणाविषयी. त्यासाठी सरकारनं प्रचंड प्रमाणावर लसीकरण कर्मचारी प्रशिक्षणाचा देशव्यापी कार्यक्रम हाती घेतला. त्यानंतर समाजातल्या प्रत्येक घटकासाठी सरकारकडून स्वच्छ, नि:संदिग्ध सूचना दिल्या गेल्या. या सूचनांचा माराच झाला. तो आवश्यक होता, कारण यामुळे सर्व संबंधितांची एकच एक मनोभूमिका तयार झाली. म्हणजे याला एक वाटतंय, तो दुसरंच समजला- असं नाही. सर्व काही शिस्तबद्ध, पूर्वनियोजित आणि गोंधळाला काहीही वावच न ठेवणारं…
‘‘तर… असा हा माझा वैद्यकीय अनुभव. सभ्य गृहस्थ आणि महिलांच्या देशात काम करण्याचा. इथे करोनाचा जो काही सामना झाला त्यातील हे निवडक क्षण. संपूर्ण सामनासुद्धा समजून घ्यावा इतका रोचक आहे. इंग्लंडला अवघड धावपट्टीवर खेळायची सवय आहे. आता आम्ही नव्या सामन्याच्या तयारीला लागलोय. कोणत्याही परिस्थितीत खेळ थांबवण्याची वेळ देशावर परत येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे…
‘‘आता सरकारच्याही जिवात जीव आलाय. आत्मविश्वासही परत आलाय. पण त्यात सावधपणा आहे, फाजील आत्मविश्वास नाही. आम्हाला सांगितलं गेलंय आणखी किमान दोन वर्षं तरी आपण असंच सावध असायला हवं.’’
***
याआधीच्या ‘अन्यथा’त (‘‘उत्सव’ बहु थोर होत…’; १० एप्रिल) इंग्लंडनं करोना लसीकरण कसं राबवलं याचा विस्तृत धांडोळा होता. अनेकांना तो आवडला. त्यातली माहिती काहींना चकित करून गेली. विचार करणं झेपत नाही अशांनी बोटं मोडली. मूठभरांना त्यात आपली गुलामी वृत्ती दिसली. इत्यादी इत्यादी. यात नवीन काही नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती तसं वाचक तितक्या प्रतिक्रिया आल्याच. पण ‘लोकसत्ता’वर अमाप प्रेम करणाऱ्या आणि एक्स्प्रेस समूहाच्या पत्रकारितेचं कौतुक आणि अप्रूप असणाऱ्या पुण्यातल्या एका वाचकानं तो लेख इंग्लंडात त्यांच्या मित्राच्या मुलापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली. त्यानं तो वाचावा अशी त्यांची इच्छा, कारण हा मित्राचा मुलगा इंग्लंडमध्ये सरकारी वैद्यकीय सेवेत आहे आणि करोनाकाळातही कार्यरत आहे.
त्या इंग्लंडस्थित डॉक्टरनं तो वाचला आणि नुसता वाचला नाही, तर त्यावर लिहून दीर्घ प्रतिक्रिया कळवली. त्या पत्राचा वर अनुवाद.
***
करोनाच्या पहिल्या लाटेत ब्रिटन पार फाफललं होतं. करोनाची तितकी काही दखल घ्यायची गरज नाही, असं सुरुवातीला म्हणणाऱ्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची बेफिकिरी लवकरच इतकी अंगाशी आली, की त्या देशाचं शब्दश: होत्याचं नव्हतं व्हायची वेळ येऊन ठेपली. पण लवकरच ते सावरले. हे एकट्या सरकारचं काम नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि अनेकांची मदत घेत त्यांनी ब्रिटनला आश्चर्यकारकरीत्या या साथीच्या दाढेतून बाहेर काढलं.
पण त्यात आश्चर्य का नाही, हे वरच्या पत्रातून दिसतं. शिस्तबद्ध, व्यक्तिनिरपेक्ष व्यवस्था चोख असली की ती आपली जबाबदारी किती उत्तम पार पाडते, याचं हे आणखी एक उदाहरण.
विन्स्टन चर्चिल त्याच देशाचे. त्यांचा अजरामर सल्ला आहे : कोणतंही यश (कधीच) अंतिम नसतं!
आणि नेमका हाच तर फरक आहे…!
girish.kuber@expressindia.com
@girishkuber