प्रत्येक ठिकाणी इतिहासाला इतकं काही महत्त्व द्यायलाच हवं असं नाही. वर्तमानाची दखल मात्र घ्यायला हवी. ती आपण घेतोय का, हा प्रश्न आहे. तशी ती घेत असू तर शेतीला कवितेतनं बाहेर काढून अर्थव्यवहाराच्या गल्ल्यावर बसवायला हवं..
बळीराजा, काळी आई, घामातून मोती पिकणे, कालच्या पावसाचे आपल्या गावी न येणे, आसवांवर पिके काढणे, कोरडवाहू, दुबार पेरण्या, आधारभूत किंमत असं बरंच काही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी..
आपल्या शेतजाणिवा काही या पलीकडे जात नाहीत. त्या जाव्यात असे काही प्रयत्नच नाहीत. म्हणून मग भावनेच्या आधारे वाळूत या शब्दांच्या रेघोटय़ा ओढत बसायचं. एक दुष्काळ पडतो, अतिवृष्टी होते आणि सगळं सुकून तरी जातं किंवा वाहून. आपली शेती आपली आहे तिथेच. हाती तर काहीच लागत नाही. तेव्हा पुढे जायचं तर आपल्या जाणिवा बदलायला हव्यात.
त्यासाठी ताजं, कोरं-करकरीत कारण म्हणजे बायर या विख्यात रसायन कंपनीनं मोन्सॅन्टो ही बी-बियाण्यांची निर्मिती करणारी कंपनी ताब्यात घेण्यासाठी सुरू केलेल्या हालचाली. तब्बल ६६०० कोटी डॉलर्सच्या बदल्यात मोन्सॅन्टो आपल्या झोळीत टाकली जावी असा बायरचा प्रयत्न आहे. मुळात बायर ही जर्मन कंपनी. रसायनं, कीटकनाशकं वगैरे बनवण्याच्या क्षेत्रातलं मोठं नाव. मोन्सॅन्टो ही अमेरिकी. जनुकीय पद्धतीनं बियाणं विकसित करण्याच्या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं नाव. आपल्याकडे बीटी कॉटनमुळे तिचा परिचय तसा आहेच. जनुकीय पद्धतीनं अभियांत्रिकी तंत्रानं नवनवी बियाणं विकसित करणं यात तिचा हातखंडा. या क्षेत्रावर जणू मक्तेदारीच आहे या कंपनीची. तर बायरनं या मोन्सॅन्टोचा हात हातात घेण्याची तयारी दर्शवली आहे. वरवर पाहता, त्यात काय एवढं अशी प्रतिक्रिया कोणाही सर्वसामान्याची होऊ शकेल. पण ते तसं नाही. या कंपन्यांनी एकत्र येण्यात काय आहे इतकं?
बरंच काही.
सगळ्यात मुख्य म्हणजे या प्रस्तावित विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या कंपनीचा आकार. बायर आणि मोन्सॅन्टो एकत्र आल्या तर जो काही नवा जीव तयार होईल त्याच्या हाती जागतिक शेतीतल्या तब्बल एकतृतीयांश बियाण्यांची मालकी हाती जाईल. म्हणजे प्रत्येकी शंभर किलो बियाण्यांमधला तीस किलो बियाण्यांचा वाटा या नव्या एकाच कंपनीचा असेल. हे इतकंच नाही, तर जगभरात झाडांवर, पिकांवर जी काही कीटकनाशकं वापरली जातात, त्यातली २५ टक्के कीटकनाशकं या कंपनीत तयार झालेली असतील. एकटय़ा अमेरिकेतल्या कापसाच्या बियाणं बाजारपेठेतला थेट ७० टक्के वाटा या नव्या कंपनीच्या हाती जाईल.
याचा अर्थ असा की या एकाच कंपनीच्या हाती आपल्या अन्नसुरक्षेच्या नाडय़ा जातील. एका बाजूला जगभरातल्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या बियाण्यांची मालकी आणि त्याच वेळी ते पेरल्यानंतर किडा-मुंग्यांपासनं ही पिकं वाचवायच्या रसायनांवरही मक्तेदारी, असं हे चित्र. अत्यंत वास्तव असं. इतकं काळजी वाटावं असं यात काय? तर ही एकमेव अशी घटना नाही. याआधी केम चायना आणि सिंजेंटा या दोन कंपन्या आणि डय़ुपाँ आणि डाऊ केमिकल्स या दोन कंपन्याही अशाच एकत्र आल्या. त्यात आता पुन्हा बायर आणि मोन्सॅन्टो एकत्र आल्या तर या तीन कंपन्या मिळून जगातल्या जवळपास दोनतृतीयांश शेतीवर या कंपन्यांचाच कब्जा तयार होईल. आताच या कंपन्यांचा आकार प्रचंड आहे. पण एकत्र आल्यावर त्या महाप्रचंड होणार आहेत. जगातल्या आधुनिक बियाण्यांच्या बाजारपेठेवर या नव्या कंपनीचंच पूर्णपणे नियंत्रण राहील, अशी परिस्थिती आहे. पण कंपन्यांनी एकत्र येणं, विलग होणं हे तर सुरूच असतं. तेव्हा याचबाबत इतकी दखल का घ्यायची?
कारण शेती बाजारपेठेवर या तीन कंपन्यांची मिळून तयार होत असलेली मक्तेदारी. अगदी फार पूर्वी नाही पण १९९४ साली जगातल्या चार सर्वात मोठय़ा बियाणे कंपन्यांचा मिळून बाजारपेठेतला वाटा होता २१ टक्के इतकाच. आज २५ वर्षांनंतर परिस्थिती अशी की या चार बियाणे कंपन्या आणि चार रसायन कंपन्या यांनी बाजारपेठेवर अशी काही पकड घेतलीये की तिला आव्हान देता येणं केवळ अशक्य आहे. अनेकांना हे माहीतदेखील नाही. आणि शेती क्षेत्रातल्या कंपन्या औद्योगिक उत्पादनांच्या कंपन्यांइतक्या काही आकर्षक नसतात. त्यामुळे त्यांचं काय चाललंय ते पटकन डोळ्यांवरही येत नाही. त्याचमुळे आपल्याला लक्षात नसतं की गेल्याच वर्षी सिंजेंटा ताब्यात घेण्यासाठी मोन्सॅन्टोची हालचाल सुरू होती. ते जमलं नाही. आता मोन्सॅन्टोच जर्मन बायरच्या घशात जाते की काय, अशी परिस्थिती आहे. गतसाली डाऊ केमिकल्स आणि डय़ुपाँ यांनी आपला कृषी संशोधन विभाग एकत्र केला. पाठोपाठ यंदा चायना नॅशनल केमिकल कॉर्पोरेशन या कंपनीनं स्विस सिंजेंटा कंपनी ४३०० कोटी डॉलर्स मोजून आपल्या पदराखाली घेतली. म्हणून आता हे बायर आणि मोन्सॅन्टो यांचं एकत्रं येणं काळजी वाटेल असं.
आपल्याला आहे की नाही, ते माहीत नाही. पण जगातल्या शहाण्यांना मात्र या एकत्रीकरणाची काळजी लागून राहिलेली आहे. म्हणूनच अमेरिकी नियंत्रकांनी अजून या व्यवसायमीलनास मान्यता दिलेली नाही आणि युरोपीय नियंत्रकांकडूनही त्याला अजून परवानगी मिळायची आहे. तज्ज्ञांचं मत असं की इतक्या मोठय़ा प्रमाणावर या कंपन्यांची मक्तेदारी तयार झाली, तर या कंपन्या आपल्याला काय हवं, त्यापेक्षा त्यांना काय विकायचंय यावर भर देतील. मग त्यांचीच बियाणं, त्यांचीच रसायनं हीच जगातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना वापरावी लागतील. शिवाय इतकी बाजारपेठेवर पकड आहे हे दिसलं की या कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमतीही हव्या तशा वरखाली करू शकतील. खेरीज गरीब देशांत – जिथे या कंपन्यांच्या बियाण्यांना मागणी नाही – अशा म्हणजे आफ्रिका वगैरे ठिकाणच्या पीक संशोधनांत या कंपन्यांना रस असणार नाही. आणि सर्वात मुख्य म्हणजे जर या कंपन्यांना स्पर्धाच राहिली नाही, तर त्या नवनव्या पिकांच्या, वाणांच्या संशोधनात लक्ष तरी कशाला घालतील? नाही तरी बाजारपेठेवर त्यांचीच मक्तेदारी असणार आहे. संशोधनावर खर्च करायचाच कशाला?
मोन्सॅन्टोचं वय आहे ११५ आणि बायरचं १५३. मोन्सॅन्टो जन्माला आली तेव्हा कृत्रिम साखर – सॅकरीन – तयार करायची आणि बायरचं पहिलं उत्पादन आहे अॅस्पिरिन. आता सध्या जगात बंदी असलेलं हेरॉइन हे देखील बायरचंच उत्पादन. त्या वेळी ते खोकल्यावरचं औषध म्हणून दिलं जायचं (खोकल्याच्या औषधांनी पेंगुळल्यासारखं का होतं, ते लक्षात येईल आता.). आता बी-बियाणं तयार करणारी मोन्सॅन्टोही एके काळी ‘एजंट ऑरेंज’ची निर्मिती करायची. ‘एजंट ऑरेंज’ म्हणजे अमेरिकेनं व्हिएतनाम युद्धात वापरलेलं रसायन. ते फवारलं की जंगलच्या जंगल मरून जायची. झाडाचं पान न् पान गळून जायचं. अमेरिकेनं ते वापरलं कारण व्हिएतनामी सैनिक जंगलात लपून बसायचे. तेव्हा त्यांना शोधण्यासाठी जंगलात जाण्यापेक्षा जंगलच संपवून टाकलेलं बरं हा विचार.
असो. प्रत्येक ठिकाणी इतिहासाला इतकं काही महत्त्व द्यायलाच हवं असं नाही. वर्तमानाची दखल मात्र घ्यायला हवी. ती आपण घेतोय का, हा प्रश्न आहे. तशी ती घेत असू तर शेतीला कवितेतनं बाहेर काढून अर्थव्यवहाराच्या गल्ल्यावर बसवायला हवं. तरच मग बळीराजा, काळी आई.. वगैरे वगैरे अरण्यरुदन बंद होईल. त्याची गरज आहे. काळ्या मातीत मातीत.. इत्यादी आता पुरे.
– गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
Twitter : @girishkuber