जनांचा हा लोंढा येणारच.. ते जगायला बाहेर पडलेत. मिळेल त्या मार्गानं.. रस्त्यातनं.. बोटीनं.. हवेतनं.. मिळेल त्या मार्गानं माणसं बाहेर पडणार.. हा संघर्ष आहे मिष्टान्नाची काळजी करणारे आणि साध्या भाकरतुकडय़ाला मोताद झालेले यांच्यातला..

शुक्रवारी अब्दुल्ला कुर्डी यांचं छायाचित्र पाहिलं. डोळे शून्यात. त्यात नजर आहे. पण दिसत काहीच नाहीये. शुष्क. रडायला पण त्राण नाहीये त्या डोळ्यांत.
हे छायाचित्र ताजं. टर्कीतलं.
ते पाहिलं आणि अगदी काही महिन्यांपूर्वी पुन्हा अनुभवलेले इस्तंबूलमधले दिवस आठवले. पूर्वी गेलो होतो तेव्हा वेगळ्या भागात राहिलो होतो. बॉस्फरसपासून अगदीच दूर. या वेळी अगदी मध्यवर्ती भागात. हागिया सोफियाची रम्य मशीद हाकेच्या अंतरावर होती. या वेळी टर्कीत पोहोचायला मध्यरात्र उलटून गेली होती. त्यामुळे हॉटेलवर पोहोचेपर्यंत तसं सगळंच शांत होऊन गेलं होतं. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी बाहेर पडलो आणि चर्र झालं.
हॉटेलच्याच बाहेर एक बाई आपल्या मुलाला कडेवर घेऊन भीक मागत होती. अंगावर थंडीचे कपडे होते. डोक्याला गुंडाळलेलं काही तरी. हातातल्या तान्ह्य़ा बाळालाही तसं उबेच्या कपडय़ात गुंडाळलेलं होतं. त्यामुळे तशी ती भिकारी वाटत नव्हती. पुढे गेलो तर पावला-पावलावर अशा आया आणि त्यांची तान्ही बाळं. भीक मागताना. सोफियाचा परिसर सगळा माणसांनी फुललेला. छान ऊन होतं. हवेत गारवा होता. वातावरणातला उत्साही, उत्सवी आनंद शोषून घेईल असं एकच तिथे काही होतं.
या अशा तान्ही बाळं घेऊन िहडणाऱ्या बायका. सोफियाच्या परिसरात तर त्यांनी बसकणच मारली होती. मागे एक फलक. पुठ्ठय़ाचा. त्यावर खडूनं लिहिलेलं.. मदत करा.. आम्ही सीरियन निर्वासित आहोत.
तिथल्या यजमानाशी बोलायला गेलो त्याबाबत. यजमानीणबाईंनी तिरस्कारानं पाहिलं त्या बायकांकडे. ती नजर चांगलीच ओळखीची वाटली. आपल्याकडे मलबार हिलवर उत्तुंग इमारतीत राहणाऱ्या महिला आपल्या कोटय़वधींच्या मोटारीतून जाताना रस्त्यावरच्या भय्या म्हणून जो ओळखला जातो त्याच्याकडे साधारण याच नजरेतनं बघतात. तर त्या टर्कीश बाई म्हणाल्या.. ही यांची ब्याद अलीकडे चांगलीच वाढलीये.. सीरियातनं येतायत यांचे लोंढे.. आमचं जगणं महाग करून टाकलंय यांनी. कशाला आपला देश सोडून मरायला येतायत आमच्याकडे कुणास ठाऊक.
प्रश्न महत्त्वाचाच होता त्यांचा! पण त्या बाईंना अमेरिका नावाची महासत्ता, तिचा लोकशाहीसाठीचा कथित.. आणि निवडक.. आग्रह, सीरियातली असाद पितापुत्रांची कराल राजवट, ती उलथून पाडण्याचे सुरू असलेले अर्धवट आणि अपयशी प्रयत्न, त्या देशास इराणची असलेली मदत आणि आता त्याच इराणशी अमेरिकेने केलेला करार.. हे सगळं कसं सांगणार? त्या बाईंचा संबंध त्यांच्या जगण्याशी होता आणि त्या जगण्याचा संबंध जगण्यासाठी आपापल्या देशांतून बाहेर पडून स्वखुशीने देशोधडीला लागणाऱ्या या अशा निर्वासितांशी होता.
त्यांना माहीतही नसणार हे सगळं २००३ पासनं नव्यानं सुरू झालंय. त्या वर्षी मार्च महिन्यात अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांना वाटलं इराकच्या सद्दाम हुसेन याला काढून टाकावं. त्यांनी हल्ला केला इराकवर. अमेरिकेच्या ताकदीपुढे कोण टिकणार? अर्थातच सद्दामची राजवट पडली. अमेरिकेनं जगाला सांगितलं, तो खूप क्रूर होता, त्याची रसायनास्त्रं होती. त्यामुळे त्याला मारणं आवश्यक होतं. पण हे नाही सांगितलं की, १९९१ साली अमेरिकेनंच त्याला ते रसायनास्त्राचं तंत्रज्ञान दिलं होतं ते. असो. तेही साहजिकच. सद्दामनंतर मग लिबियाचा क्रूरकर्मा मुअम्मर गड्डाफी. तोही गेला. एव्हाना अरब इस्लामी जगात आपापल्या राज्यकर्त्यांविरोधात चांगलंच जनमत तयार झालं होतं. त्याचा फायदा उठवत अमेरिकेनं मग ओसामा बिन लादेन याला टिपलं. या सगळ्यांना मदत करणारा एक शिल्लक होता. बशर अल असाद. सीरियाचा सर्वेसर्वा. त्याला काढण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू झाले.
पण एव्हाना अमेरिकेतच राजवट बदलली. बुश यांच्या रिपब्लिकनांऐवजी डेमॉक्रॅट्सचे बराक ओबामा अध्यक्ष झाले. त्यांना अमेरिकेनं हे बंदुका घेत दादागिरी करणं तितकं मंजूर नव्हतं. त्यांनी असाद यांना इशारा वगरे देऊन बघितला, पण असाद यांनी ओबामा यांना भीक घातली नाही. दरम्यान त्यांना आणखी एक पाठीराखा मिळालेला होता. रशियाचे पुतिन. इराणच्या मेहमूद अहेमदीनेजाद यांची मदत होतीच असाद यांना. तेव्हा ही स्फोटक परिस्थिती लक्षात घेता ओबामा यांनी या भानगडीत न पडण्याचं ठरवलं. त्यांच्या या विचाराला अमेरिकेच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेची वास्तववादी किनार होती. आधीच्या बुश यांच्या युद्धखोरीमुळे अमेरिकेच्या डोक्यावरची कर्जे प्रचंड वाढली होती. तेव्हा ओबामा यांचा निर्णय शहाणपणाचाच होता.
परंतु तोपर्यंत आखातात हाहाकार माजलेला. अमेरिकी हस्तक्षेपाचा लंबक एकदम दुसऱ्या बाजूला जाणं या देशांना झेपलेलं नाही. एखाद्याला बरीच वर्षे पांगुळगाडय़ावर ठेवायचं आणि अचानक तो काढून घेऊन धाव..म्हणायचं.. कसं जमेल त्याला? तसंच या देशांचं झालं. हुकूमशहा तर हुकूमशहा, पण कुंकू लावायला राज्यकर्ता म्हणून कोणी होता. त्यांना अमेरिकेनं उडवलं आणि पर्यायी व्यवस्था मात्र काहीच नाही. त्यामुळे या साऱ्या देशांत अक्षरश: अंदाधुंदीची परिस्थिती आहे. इतके दिवस इराक शांत होता, पण तोही आता फुटू पाहतोय. तिथल्या कुर्दाना वेगळं व्हायचंय. जे कोण टिनपाट राज्यकत्रे या साऱ्या देशांना लाभलेत त्यांनी आपली खुर्ची बळकट करण्यासाठी नागरिकांवर अनन्वित अत्याचार सुरू केलेत. नागरिकांना एकच पर्याय उरलाय.
परागंदा होण्याचा. अखेरचा हा तुला दंडवत.. म्हणत आपलाच देश सोडून जाण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही आणि जाणार तरी कुठे? पश्चिम आशियात सगळीकडेच आनंदीआनंद आहे. हे सगळेच देश अमेरिकेच्या आणि त्यामुळे युरोपीय सत्तांची बांडगुळं म्हणून जगले. त्यामुळे त्या देशांतल्या हताश नागरिकांना जाण्यासाठी एकच जागा उरली.
युरोप. नेमकं तेच सध्या होतंय. एका आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत युरोपात तब्बल ४० लाख इतके निर्वासित आलेत. म्हणजे वर्षांला दहा लाख. याच्या दहापट, म्हणजे एक कोटी इतके, निर्वासित भारतात बांगलादेश युद्धानंतर आले. त्या वेळी आपलं बिघडलेलं गणित अजूनही कसं सुधारलेलं नाही, हे आपण पाहतोय. त्यामुळे युरोपचं आता काय होत असेल याचा अंदाज येईल.
पण तो अंदाज युरोपियनांना मात्र अजूनही नाही. ते भांबावलेत. स्वच्छ, सुंदर, परीटघडीचं जगणं जगणाऱ्या युरोपियनांना या इतक्या माणसांची सवय नाही. तीसुद्धा गरीब आणि अस्वच्छ. मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीत स्थिरावलेल्या, उष्मांकांची काळजी करत मोजकं खाणाऱ्या, चौकोनी आयुष्य जगणाऱ्यांच्या घरी अचानक गावाकडचा लबादला आला तर त्यांचं काय होईल तसं युरोपियनांचं झालंय. त्यामुळे आपण एका प्रचंड मानवी संकटाच्या केंद्रस्थानी आहोत, याची जाणीव त्यांना अद्याप झालेली नाही. दुसऱ्या महायुद्धाचे व्रण बुजवून उभारी घेणाऱ्या युरोपला या अशा संकटाची सवय नाही.
पण हे संकट ही शिक्षा आहे. केवळ स्वत:ची प्रगती साधण्याचा अप्पलपोटेपणा केल्याची शिक्षा. अमेरिकेनं ती भोगली. मेक्सिकन, चिनी, आशियाई आणि आफ्रिकींना अमेरिकेनं आपलं म्हटलं. आता युरोपवर ती वेळ आली आहे. युरोपातल्या अनेक छोटय़ा देशांना यासाठी मनाची तयारी करावी लागणार आहे. जनांचा हा लोंढा येणारच.. ते जगायला बाहेर पडलेत. मिळेल त्या मार्गानं.. रस्त्यातनं.. बोटीनं.. हवेतनं.. मिळेल त्या मार्गानं माणसं बाहेर पडणार.. हा संघर्ष आहे मिष्टान्नाची काळजी करणारे आणि साध्या भाकरतुकडय़ाला मोताद झालेले यांच्यातला.. कारणं काहीही असोत.
अब्दुल्ला कुर्डी यांना हे कळेल का? राजकारणाच्या साठमारीत त्यांच्यावरही देश सोडून जायची वेळ आली. ते बोटीतनं पळू पाहात होते. ती कलंडली आणि त्यांची बायको रिहाना आणि दोन मुलं आयलान आणि घालेब पाण्यात पडून मेली. आयलान तीन वर्षांचा आणि घालेब एक वर्षांनी मोठा. सगळेच गेले.
किनाऱ्यावर वाहत आलेलं.. छायाचित्रात दिसतंय ते.. ते शव हसऱ्या, मस्तीखोर आयलान याचं. ज्या वयात चौपाटीवर वाळूत खेळायचं.. त्या वयात आयलानचा प्राणहीन देह त्याच वाळूत तोंड खुपसून पडलाय. ज्या लाटांनी अचंबित व्हायचं त्याच लाटांनी त्याचा चिमुकला देह किनाऱ्यावर आणलाय.. पायातले बूटसुद्धा तसेच आहेत त्याचे.. आता त्याच्या वडिलांना, चाळिशीच्या अब्दुल्ला यांना हे तीन तीन मृतदेह न्यायचेत. त्यांना प्रश्न पडलाय आपले खांदे इतके मजबूत आहेत का.. आणि आपण का, कुणाचं हे ओझं वाहतोय..
अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हाळी त्याचा पडे बळी आधी
..कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..
girish.kuber@expressindia.com
@girishkuber