|| गिरीश कुबेर
करोनाला हाताळण्यात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगलाच गोंधळ घातला. त्याची शिक्षा त्यांच्यासकट त्यांच्या देशांना मिळाली. हा विषाणू या दोन देशांत इतका हाताबाहेर गेला, की यांचे प्राण कंठाशी आले. मग यांच्या प्रतिक्रियेचं दुसरं टोक. ते दिसलं लशीबाबत. कधी एकदा ती लस येतीये, असं त्यांना झालं. पण या वास्तविक कथेतली खरी गंमत तर पुढेच आहे..
१ जानेवारी २०२१ हा दिवस आणि हे वर्ष इतिहास घडवणार.
उदाहरणार्थ, आजपासून ब्रिटन हा युरोपीय संघटनेचा भाग राहणार नाही. या संघटनेशी ब्रिटननं घेतलेल्या घटस्फोटाचा प्रारंभ आज. म्हणजे उभयतांचं वेगळं राहणं वगैरे. ब्रिटनच्या रहिवाशांना युरोपातल्या २७ पैकी कोणत्याही देशात प्रवास करायचा तर आजपासून व्हिसा लागणार (या कल्पनेचीच शिसारी येऊन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या तीर्थरूपांनी ब्रिटनचा त्याग करून फ्रान्समध्ये स्थलांतर करायचं ठरवलंय. पण चिरंजीव राजकीय यशाच्या पोकळ आनंदात मश्गूल. असो.). युरोपीय संघटनेचा सदस्य म्हणून राहिलं की फारच निर्वासित येतात आपल्या देशात, असं जॉन्सन यांचं म्हणणं. या स्थलांतरितांच्या विरोधातून तर ब्रेग्झिट घडलं.
स्थलांतरितांवरचा राग हा बोरिस जॉन्सन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातला समान धागा. ब्रेग्झिट घडणं आणि ट्रम्प निवडून येणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू. ट्रम्प यांची सारी कारकीर्द या स्थलांतरितांच्या नावे बोटं मोडण्यात, त्यांच्याविरोधात नवनवे कायदे करण्यात गेली. तो त्यांचा निवडणूक प्रचाराचा मुद्दाही होता. दोन महिन्यांपूर्वीच्या निवडणुकीतही त्यांनी तो चालवून पाहायचा प्रयत्न केला. पण अमेरिकेचं आणि जगाचंही सुदैव असं की, ट्रम्प हरले.
स्थलांतरितांना विरोध हा मुद्दा जसा या उभयतांतला समान धागा, तसाच आणखी एक समान मुद्दा म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या देशांना करोनानं भयंकर छळलं. करोना आला तसा आपोआप निघून जाईल, असं ट्रम्प यांचं विधान. तर झुंड प्रतिकारशक्ती तयार झाली की त्याची तीव्रता कमी होईल, अशी जॉन्सन यांची भूमिका. या करोनाला हाताळण्यात या दोघांनी चांगलाच गोंधळ घातला. त्याची शिक्षा त्यांच्यासकट त्यांच्या देशांना मिळाली. हा विषाणू या दोन देशांत इतका हाताबाहेर गेला, की यांचे प्राण कंठाशी आले. मग यांच्या प्रतिक्रियेचं दुसरं टोक.
ते दिसलं लशीबाबत. ट्रम्प यांनी जे कोणी लसनिर्मितीच्या जवळपास पोहोचलेत त्यांना भराभर उत्पादन परवाने दिले, सरकार आणि या औषध कंपन्या यांच्यात करार केले आणि अमाप पैसा ओतून लस खरेदीची तयारी केली. मागणीही नोंदवली त्यासाठी. जॉन्सनदेखील या करोना कहरामुळे काकुळतीला आले होते. कधी एकदा ती लस येतीये, असं त्यांना झालं. गावभर उंडारल्यानं भुकेनं व्याकूळ झालेल्या चिरंजीवांना घरी आल्यावर दम धरवत नाही. दिसेल ते खातात, तसं या दोघांचं झालं. लससदृश काहीही औषधासाठी हे दोघेही हपापले. जॉन्सन यांनी तर जी हाताला लागली ती घेऊन लशीकरण कार्यक्रम हाती घेतला देखील.
या दोघांचं लशीसाठी हातघाईला येणं हे साऱ्या जगानं पाहिलं. पण या वास्तविक कथेतली खरी गंमत तर पुढेच आहे. ती अशी की, ज्या लशींमुळे आपल्या नागरिकांचे प्राण वाचतील अशी आशा या उभय नेत्यांना, आणि अर्थात जगालाही आहे, त्या लशींची निर्मिती ही स्थलांतरितांकडूनच झालेली आहे. फायझर, मॉडर्ना, बायो-एनटेक आणि आपल्या भारतातली सीरम इन्स्टिटय़ूट या सगळ्यांमागे स्थलांतरित आहेत.
कार्ल ख्रिस्तियान फ्रीडरिश फायझर असं दणदणीत नाव असलेले फायझर हे मूळचे जर्मन. १८४८ साली नशीब काढण्यासाठी ते अमेरिकेत आले. वडिलांकडून २,५०० डॉलर्स उधार घेऊन त्यांनी न्यू यॉर्कला, आजच्या भाषेत सांगायचं तर, एक गाळा घेतला आणि मलमं वगैरे बनवून विकायला सुरुवात केली. नंतर हळूहळू व्याप वाढवत नेला त्यांनी. आज जवळपास ५,२०० कोटी डॉलर्स इतका गगनभेदी महसूल आहे या कंपनीचा. न्यू यॉर्कचा फेरफटका ज्यांनी मारला असेल त्यांना मॅनहटन इथलं या कंपनीचं मुख्यालय दिसलं असेल. ज्या कंपनीच्या लशीवर ट्रम्प, जॉन्सन यांची आशा आहे, ती फायझर ही स्थलांतरिताची निर्मिती आहे. अमेरिकेतल्या अतिबलाढय़ अशा या फायझरचे सध्याचे प्रमुख आहेत अल्बर्ट बोर्ला. अमेरिकी औद्योगिक महासत्तेची ओळख सांगणाऱ्या काही महत्त्वाच्या कंपन्यांतील एक असलेल्या फायझरचा हा प्रमुख अमेरिकी नाही. ते आहेत ग्रीस या देशाचे. मुळात प्राण्यांचे डॉक्टर असलेले बोर्ला आज माणसांसाठी जीवनदायी ठरणारी औषधे बनवणाऱ्या कंपनीचे प्रमुख हा तर ट्रम्प यांच्यावर नियतीने उगवलेला दुसरा सूड. स्वत:वर अमाप प्रेम करणाऱ्या ट्रम्प यांना प्राण्यांचं प्रेम नाही. अमेरिकेच्या इतिहासातला हा असा अध्यक्ष, की ज्याच्या कालखंडात व्हाइट हाऊसमध्ये ना कुत्रा होता, ना मांजर. असो.
करोना लसनिर्मितीत बायो-एनटेक या कंपनीचं संशोधनही खूप निर्णायक ठरलं. या कंपनीचं संशोधन आणि फायझरची निर्मिती यांतून पहिली एक लस तयार झाली. तर ही बायो-एनटेक कंपनी जर्मनीची. त्या देशातल्या सुरम्य अशा ऱ्हाइनलँडची राजधानी मैन्झ इथली. ती तंत्र पुरवते अमेरिकेला. आणि या कंपनीचा प्रमुख उघुर साहिन हा लससंशोधक आहे टर्कीचा. इतकंच काय, पण या कंपनीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी ओझलेम र्तुसी या तर कुर्दिश. ही बिचारी टर्की-इराक देशांत विभागली गेलेली जमात. रोहिंग्या मुसलमानांप्रमाणे त्यांनाही मायभूमीच नाही. जर्मनीतल्या या बलाढय़ औषध कंपनीतले हे दोघे कळीचे नेते अशा देशांतले आहेत, की ज्यांना येऊ दिलं म्हणून चॅन्सलेर अँगेला मर्केल यांच्याविरोधात स्थानिक संकुचितांनी आगपाखड केली. मर्केल या ट्रम्प, जॉन्सन वा जगातील अन्य संकुचितवादी नेत्यांप्रमाणे नाहीत. अर्थातच ट्रम्प आणि जॉन्सन यांचं आणि मर्केल यांचं तितकं काही सख्य नाही. पण आता ट्रम्प, जॉन्सन आणि जगातील समस्त संकुचितवादी नेते टर्की/ कुर्दिश/ ग्रीस या देशांतल्यांनी बनवलेल्या लशीसाठी या कंपन्यांच्या नाकदुऱ्या काढतील.
मॉडर्ना ही अमेरिकेतली आणखी एक महत्त्वाची कंपनी. करोनाप्रतिबंधक लसनिर्मितीतली अग्रेसर अशी. तिचा अध्यक्ष/प्रमुख गुंतवणूकदार नुबार अफेयन हा मूळ आर्मेनियाचा. नंतर लेबनॉनमार्गे अमेरिकेत स्थलांतरित झालेला. लेबनॉन, आर्मेनिया वगैरे देश म्हणजे ट्रम्प यांच्या मते अदखलपात्रच. तिथल्या माणसांविषयी तर त्यांना घृणाच आहे. पण तिथल्या देशाचा एक नागरिक अमेरिकेत येऊन करोनाची लस बनवतोय आणि ट्रम्प चातकासारखी तिची वाट पाहताहेत, हा काळानं संकुचित राजकारणावर उगवलेला सूड आहे. हे रिपब्लिकन जखमेवर मीठ चोळणं इथंच संपत नाही. या मॉडर्नाचा सहसंस्थापक डेरेक रॉसी हा कॅनडाचा आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल हा आहे फ्रेंच. या दोन्ही देशांशी ट्रम्प फटकून वागले. आणखी गंमत म्हणजे, यातले रॉसी हे स्कंद पेशी (स्टेम सेल) संशोधक आहेत. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला हे संशोधन मान्य नाही. त्यांनी या संशोधनाची सरकारी मदतच आवळून टाकली. गर्भपाताप्रमाणे या स्कंद पेशी संशोधनास ट्रम्प यांचा पक्ष विरोध करतो. आता त्याच क्षेत्रातल्या संशोधकाची लस अमेरिका टोचून घेईल.
आत्मनिर्भरतेचा फुगा फोडणारं हे वास्तव फक्त अमेरिका वा ब्रिटन यांच्यापुरतंच मर्यादित नाही. आपल्याकडे सरकार ज्या लशीच्या मान्यतेसाठी देव पाण्यात बुडवून बसलंय, ती लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूटचे पुनावाला हे पारशी. म्हणजे पर्शियाचे. या कंपनीचे प्रमुख अदर पुनावाला यांचा जन्म, शिक्षण वगैरे सर्व इथलंच. पण ही मंडळी मूळची पर्शियाची. म्हणजे आताच्या इराणमधली. हे पारसी आता भारतीयच म्हणायचे. आपण सर्वात मोठे लस उत्पादक वगैरे म्हणतो सीरमला गौरवानं. ते योग्यच. पण ते फक्त उत्पादक आहेत. निर्माते नाहीत. ही लस तयार करणारे संशोधक, वैज्ञानिक वगैरे आहेत ऑक्सफर्डचे. म्हणजे परदेशी. लस संशोधन करणार ते. विकसितही करणार ते. आपण फक्त त्याचं घाऊक उत्पादन करणार. तेही तसं महत्त्वाचंच. पण संशोधनाइतकं नाही. यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे, आता लसही स्वदेशीच हवी असा आग्रह धरताना आपल्याकडे कोणी दिसत नाही. त्या मुद्दय़ावर शांतता. म्हणून मग पुनावाला यांचं भारतीयपण ठसवण्याचा आणि ऑक्सफर्ड लशीला भारतीय ठरवण्याचा खटाटोप!
हे सर्व डोळे उघडणारं आहे. जागतिकीकरणाची अखेर आलीये असं म्हणता म्हणता या करोनानं आपल्याला पुन्हा एकदा औदार्याचं महत्त्व दाखवून दिलंय. म्हणून आपले बाकीबाब बोरकर म्हणून गेलेत त्याप्रमाणे- ‘पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा/ शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा’ हे या वर्षांत आपल्याला कळलं, तर तेही ऐतिहासिक म्हणायचं.
girish.kuber@expressindia.com
@girishkuber