गिरीश कुबेर – girish.kuber@expressindia.com , @girishkuber
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऑस्ट्रियाचे धडे – १
संगीत आणि डॅन्यूब नदी इथं एकमेकांच्या काठाकाठानं वाहतात.. संगीत ओसंडत असतं रस्त्यांवरही..आणि डॅन्यूब?
मानव समूहांप्रमाणे नद्यांचं भाग्यही वाहातं असावं. किती भाग्यवान असतात काही नद्या. आंतरराष्ट्रीय कौतुक येतं त्यांच्या वाटय़ाला आणि मुख्य म्हणजे गेल्या अनेक वर्षांत त्यांच्या साफसफाईची मोहीम हाती घ्यायची वेळ आलेली नाही. म्हणजे लंडनला कवेत घेणारी थेम्स, वाहत्या पॅरिसच्या आनंददायी तरंगण्यात आपल्याला सहभागी करून घेणारी सीन, सगळ्या जगाची जबाबदारी आपल्यावर असल्यासारखी वॉिशग्टनची धीरगंभीर पोटोमॅक, न्यूयॉर्कची उच्चभ्रू, शिष्ट दिसणारी, पण प्रसंगी विमानालासुद्धा हात देणारी हडसन.. अशी किती उदाहरणं द्यावीत प्रसन्न करणाऱ्या नद्यांची! त्यांना पूजनीय माता वगरे मानायची तिकडे प्रथा नसल्यामुळे असेल बहुधा पण त्या नद्या फार भाग्यवान. माझी यातली सर्वात आवडती म्हणजे डॅन्यूब.
जवळपास दहा-बारा देश आणि चार आंतरराष्ट्रीय शहरं यांना आपल्या पायावर उभं करणं ही काही लहानसहान कामगिरी नाही. खरं तर डॅन्यूब ही नद्यांमधली महासत्ताच म्हणायची. काय काय पाहिलंय या नदीनं. प्रा. एडवर्ड गिबन यांनी ज्या महाकाय साम्राज्याचा इतिहास सांगणारा तितकाच महाकाय ग्रंथ लिहिला ते रोमन साम्राज्य या नदीकाठीच फुललं आणि या नदीकाठीच त्याचं निर्माल्य झालं. तिने हिटलरचा उदयास्त पाहिलाय आणि साम्यवादाची एके काळची बुलंद भिंत कोसळतानाही पाहिलीये. जर्मनी कुठे, रोमानिया कुठे.. ही नदी तितक्याच उत्साहानं वाहात असते. स्वित्र्झलडमधनं ब्लॅक फॉरेस्टच्या थंडाव्यातनं जर्मनीत किंवा जर्मनीतनं झेक प्रजासत्ताकात उतरताना किंवा हंगेरीतनं सर्बियात जाताना.. वाटेत डॅन्यूब दिसतेच दिसते. तिचं प्रशांत आणि तरीही रोमँटिक दर्शन मन हरखून टाकतं.
या वेळी ती अशी समोरासमोर भेटणार होती. ऑस्ट्रियाच्या दौऱ्यात. राहण्यासाठी जगातलं सर्वोत्तम शहर म्हणून अनेकदा पहिल्या क्रमांकावर निवडलं गेलेल्या व्हिएन्ना शहरात शिरताना त्यामुळे डॅन्यूब कोणत्या वळणावर समोर येईल ही हुरहुर होती. पण वाटत होतं तितक्या काही सहजपणे ती भेटली नाही. साहजिकच म्हणायचं ते. अशी सहजी भेटायला ती काही रस्त्यावर थोडीच पडून होती. पण तिची भेट होईपर्यंत तिचं महत्त्व लक्षात येईल याची पुरेशी व्यवस्था व्हिएन्ना शहर करतं.
सुंदर या शब्दाची मर्यादा या शहराचं वर्णन करताना अगदी लगेच जाणवून जाते. एकसारख्या इमारती हे तर तर कोणत्याही युरोपीय शहराचं वैशिष्टय़च. इथेही ते दिसतं. शिवाय प्रत्येक मोठय़ा रस्त्याचा जायचा आणि यायचा भाग वेगळा, परत त्या प्रत्येक भागाचे चार हिस्से : एक चालणाऱ्यांसाठी, त्या शेजारी सायकलवाल्यांचा दुसरा, त्या पलीकडे ट्रामचा आणि मधला मोठा मुख्य वाहनांचा.. यातलं कोणीही अन्य कोणाच्या मार्गावर अतिक्रमण करत नसणं, वगैरे इथं होतंच. पण सगळ्यात गजबज होती ती सायकलींसाठीच्या पट्टय़ात. सायकलवाल्यांचा तोरा असा की मर्सिडीझवाले खाली मान घालून जाताना दिसत होते. आयांच्या किंवा आज्ञाधारक बापांच्या मागे त्यांची पिल्लं. मूठभर आकाराच्या डोक्यांवर सव्वामूठ आकाराची हेल्मेटं घातलेली. आणि प्रत्येकाची स्वतंत्र दुचाकी. स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र. मागच्या चाकांना दोन आधाराची चाकं वगरे आपल्याकडे दिसतात तशी नाही. खरी दुचाकी. ते पाहून ऑस्ट्रियातल्या पोट्टय़ांना पावलं टाकायला यायच्या आधी पेडल मारायलाच शिकवलं जातं की काय, अशी शंका आली.
फिरत फिरत ऑपेरा परिसरातल्या मुख्य रस्त्यावर, मध्यवर्ती भागात पोहोचलो तर सारा परिसर नुसता फुलून आलेला. रविवार होता. त्यात छान प्रसन्न सूर्यप्रकाशाचा दिवस. ते वातावरण सर्वागाने सहकुटुंब पिऊ पाहणारे नागरिक आणि त्यांना तो आनंद विनासायास लुटता यावा यासाठी काळजी घेणारं प्रशासन.. असा हा संयोग. दर शंभर पावलांवर झाडाखाली बसण्यासाठी असे चौथरे बांधलेले. शेजारच्या इमारतींच्या आडोशानं बांधून ठेवलेली दगडी बाकं.
आणि प्रत्येक चौकात गाणारा अथवा काही वाजवणाऱ्यांचा उत्साही चमू. चांगले शिकले सवरलेले दिसत होते ते सगळे. म्हणजे बेरोजगार आहेत, चार पैसे कमावण्यासाठी काहीबाही करताहेत असे नाहीत. तिथल्या एकाला विचारलं तर अंदाज बरोबर निघाला. तो म्हणाला.. हो, संगीत आमचा आनंद.. आमच्या रक्तातच आहे म्हणा ना. ते जे वाजवतायत वा पलीकडे जे गातायत त्यातलं सर्व किंवा काही ना काही आम्हा सर्वानाच येतं.
तरीच समोर बसलेले सुरात सूर मिसळत होते. त्यातले काही वर मंचावर जाऊन मध्येच त्यांत सहभागीही होत होते. जणू व्यावसायिकच कलाकार सगळे. त्यामुळे वातावरण अधिकच उत्फुल्ल झालेलं. या सगळ्याकडे पाहून जगातलं सर्व दु:ख, समस्या आता मिटल्या.. असाच कोणाचाही समज व्हावा. सारंच्या सारं शहर इतकं आनंदी म्हणजे जरा अतिच होतंय असं वाटलं. पण त्याला ऑस्ट्रियापुरता तरी इलाज असणार नाही, हे जाणवत होतं. म्हटलं रविवार म्हणून दिसतोय इतका उत्साह, तर शेजारचा म्हणाला उद्या संध्याकाळी या.. वातावरण असंच असेल.
ते तसंच होतं. आणखी एक पाहिलं. मध्येच माणसं उठायची आणि टप्प्याटप्प्यांवर असणाऱ्या कारंज्यासारखं दिसणारं काही तरी होतं तिथं जाऊन यायची. त्याविषयी विचारलं तिथल्या एकाला तर तो चेहऱ्यावर उत्साही उद्गारचिन्हं जमा करत म्हणाला : ओह.. तेऽ. तो तर आमच्या शहराचा अभिमानाचा भाग.
०
व्हिएन्ना शहराच्या ऐन मध्यवर्ती भागात प्रचंड म्हणता येईल अशी बाग आहे. बर्लिन आणि न्यूयॉर्क शहरातल्या उद्यानांशी तुलना व्हावी इतकी मोठी. तिथलं दृश्यही तसंच. निवांत.. आनंद वातावरणात पुरेपूर भरलेलं. गंमतच म्हणायची. रस्त्यावरच्या आणि उद्यानांतल्या वातावरणात साम्य असणं हेच मुळात थोर. मध्येच एखाद्या कोपऱ्यात कोणी समोर नोटेशन्स ठेवून काही सुरेल अशा सुरावटी वाजवत बसलेला. काही कुटुंबंच्या कुटुंबं वाद्यमेळ जमवत बसलेली. सहज त्यातल्या एका कुटुंबवत्सलाला बोलतं केलं.. इथे सगळ्यांनाच संगीताचं इतकं प्रेम कसं काय?
त्यानं नावंच फेकली तोंडावर. त्यातले मोझार्ट आणि बिथोवेन यांचा ऑस्ट्रिया संबंध चांगलाच माहीत होता. पण या दोघांशिवाय किती तरी जागतिक संगीतकार या देशातले तरी आहेत किंवा या देशात येऊन तरी त्यांनी संगीतसाधना केलेली आहे. खरं तर आपण भारतीयांनीसुद्धा या संगीतकारांचं किती ऋणी राहायला हवं तेही जाणवत होतं. या सुरावटींनी आपल्या अगणित चित्रपटगीतांना स्वरबीज पुरवलेलं. त्यामुळे त्या ऐकताना अनेक िहदी गाणी आठवण करून देत होती.
तिथेही तेच. खाऊनपिऊन झालं की माणसं जवळच्या कारंज्यासारख्या नळावर जायची आणि ताजंतवानं होऊन यायची. आश्चर्य वाटलं. न राहून शेवटी एकाला विचारलं.. हे काय?
त्याचंही उत्तर तेच.
ते? तो तर आमचा अभिमानिबदू!
०
नंतर साल्झबर्ग, इन्सब्रूक, झेल अम सी या गावांत/ शहरांत, मधल्या प्रवासात.. सगळीकडे तेच आणि त्याबाबतच्या प्रश्नाला तसंच उत्तर.
संपूर्ण देशाला आपल्या या एका गोष्टीविषयी इतका अभिमान वाटावा, हे अद्भुत, अविश्वसनीय वाटेल. पण हे संपूर्ण सत्य आणि सत्यच आहे.
समग्र ऑस्ट्रियाच्या अभिमानाचा हा विषय म्हणजे पाणी. या देशात कोणत्याही गावात, शहरात मध्येमध्ये कारंजी, नळ आहेत आणि येणारेजाणारे – स्थानिक आणि पर्यटकदेखील- त्यातलं पाणी पितात आणि आपल्या हातातल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतात. हे पाहिल्यावर आपला पहिला सवयीतनं आणि पोटदुखी/ पटकी/ विषमज्वर आदींच्या भीतीतून आलेला बाटलीबंद प्रश्न असतो.. हे असलं सार्वजनिक नळांवरचं पाणी प्यायचं?
त्यावर सर्वसामान्य ऑस्ट्रियन असो किंवा तिथला कोणी प्राध्यापक/ पत्रकार असो, यांचं उत्तर असतं : ओ यस.. वी आर प्राऊड ऑफ अवर वॉटर..
प्रत्येक वेळी हे उत्तर त्या पाण्याचं आणि त्यामागच्या डॅन्यूबचं अस्तित्व डोळ्यांच्या कडांवर जाणवून देत राहातं..