गिरीश कुबेर @girishkuber

girish.kuber@expressindia.com

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि आपल्या सरकारलाही एकाच वेळी ई सिगरेटच्या धोक्याची जाणीव व्हावी हे छानच. दोन्ही देश प्रमुखांच्या मनात एकाच वेळी ई सिगरेट्सवर बंदी घालायची भावना दाटून येणं हे ‘ग्रेट माइंड्स थिंक अलाईक’ या उक्तीनुसारच असणार..  

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला जाणार की नाही, तसा निर्णय झालाच आणि महाभियोग सुरू झालाच तर ते राहतील की जातील.. अशा अनेक मुद्दय़ांच्या गरमागरम चर्चेनं सध्या वॉशिंग्टनची हवा चांगलीच तापलीये. साहजिकच आहे ते. पण व्हाइट हाऊस जिथं आहे त्या पेनसिल्वेनिया मार्ग परिसरात आणखी एका विषयानं वातावरण तापलंय. एका उद्योगातल्या जगभरच्या साऱ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी वगैरे उच्चपदस्थ त्या हॉटेलात जमलेत. चर्चेचा विषय काय?

तर ऑक्टोबर महिन्यापासून- म्हणजे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पुढच्याच महिन्यात- ई सिगरेटवर बंदी घालण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला इशारा. अलीकडच्या काळात पौगंडावस्थेतील मुलं/मुली अमेरिकेत मोठय़ा प्रमाणावर या ई सिगरेटच्या प्रेमात पडताना आढळत असल्यामुळे हा निर्णय ट्रम्प घेणार आहेत म्हणे. तसं सूतोवाच त्यांनी केलं. त्याचमुळे व्हाइट हाऊसपासनं जवळच असलेल्या एका हॉटेलात हे ई सिगरेट उत्पादक जमलेत. ट्रम्प यांना भेटणं, त्यांना या संदर्भात अधिक माहिती देणं, अमेरिकेतल्या शास्त्रीय पाहण्यांचे दाखले देणं वगैरे बरंच काही या उद्योजकांकडून पुढच्या काही दिवसांत केलं जाणार आहे.

तर या ई सिगरेट निर्मात्यांच्या परिषदेत काही नामांकित डॉक्टरदेखील आहेत. त्यातले एक म्हणजे ग्रीक हृदयरोगतज्ज्ञ कॉन्स्टँटिनो फर्सालिनोस. त्यांनी या परिषदेतल्या भाषणात ई सिगरेटवर बंदी घालायच्या भारत सरकारच्या निर्णयाचा दाखला दिला. ते म्हणाले, ‘‘भारतात धूम्रपानामुळे दरवर्षी १० लाख मृत्यू होतात. पण भारत सरकारने मात्र त्यातल्या त्यात कमी धोकादायक अशा ई सिगरेटवर बंदीचा निर्णय घेतला.’’ त्यावर ओटावा विद्यापीठाचे विधि शाखेचे प्राध्यापक डेव्हिड स्विनोर म्हणाले : सार्वजनिक आरोग्याची ही अक्षम्य हेळसांड ठरते.

तशी ती असेल/नसेल. पण यातले योगायोग मात्र लक्षात घ्यावेत असे.

सध्या जगात या क्षेत्रातल्या दोन बलाढय़ कंपन्यांत स्पर्धा सुरू आहे. ब्रिटिश अमेरिकन टोबॅको ही एक आणि दुसरी म्हणजे गॉडफ्रे फिलिप्स. ‘फिलिप मॉरिस इंटरनॅशनल’ ही यातल्या गॉडफ्रे फिलिप्सची मूळ कंपनी. मार्लब्रो हा या कंपनीचा विख्यात सिगरेट ब्रॅण्ड. तो तगडा, रूपानं पुरुषोत्तमी काऊबॉय आणि त्याच्या शेजारी त्याचा तसाच उमदा घोडा.. कधी हा घोडय़ावरनं गुरांचा कळप हाकताना.. आणि ओठात सिगरेट.. अशा आकर्षक जाहिराती पाहिल्याचं अनेकांना आठवत असेल. जगभरात धूम्रपानाची लाट तयार झाली ती या जाहिरातींमुळे. सुरुवातीला बरीच वर्ष या जाहिराती टीव्हीवरनंही दाखवल्या जायच्या. त्यामुळे धूम्रपानाचा प्रसार थेट घरातच पोहोचला. पण धूम्रपान आणि कर्करोग यांचा संबंध जसजसा दिसायला लागला तसतशा या जाहिरातींवर बंदी आली. टीव्हीवरच्या तर बंदच झाल्या. नंतर नंतर या मार्लब्रोच्या जाहिराती करणारे मॉडेल्सही कर्करोगानं गेले. एक नव्हे, तब्बल पाच मॉडेल्सचा अंत या धूम्रपानजन्य कर्करोगाने झाला. इतकंच काय पण या जाहिरातीतल्या घोडय़ालाही कर्करोगाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. ही बातमी प्रसिद्ध झाली आणि या सिगरेटविरोधात राग उफाळून आला. अनेकांनी मोठय़ा प्रमाणावर त्या काळात धूम्रपानाचा त्याग केला. या कंपनीच्या अनेक सिगरेटी आपल्याकडे लोकप्रिय आहेत.

त्या तुलनेत ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कंपनीच्या सिगरेट्स म्हणजे बेन्सन अँड हेजेस, डनहिल किंवा कॅमल वगैरे. त्यादेखील लोकप्रिय आहेत. पण फिलिप्स कंपनीच्या सिगरेटच्या तुलनेत काहीशा कमी. या कंपनीने गेल्या काही वर्षांत ई सिगरेटच्या निर्मितीत मोठी आघाडी घेतलेली आहे. धूम्रपानाच्या क्षेत्रातली ही पण एक बलाढय़ कंपनी. फिलिप्सपेक्षाही मोठी.

तर यातली फिलिप्स आणि अमेरिकेतली आणखी एक मोठी सिगरेट कंपनी आल्ट्रिया नावाची यांचं विलीनीकरण जाहीर झालं होतं. जगातल्या या दोन मोठय़ा सिगरेट कंपन्या एकत्र येणं म्हणजे बाजारपेठेवर चांगलीच हुकमत मिळवणं. या विलीनीकरणाचं महत्त्व आणखी एका कारणासाठी. ते म्हणजे जूल ही कंपनी. या जूल कंपनीत आल्ट्रियाची ३५ टक्केइतकी गुंतवणूक आहे. गेल्याच वर्षी आल्ट्रियानं या नव्या जूल या कंपनीवर मालकी मिळवली. जूल ही अनेकांना माहीत नसेल. पण तिचा परिचय आहे ई सिगरेटसाठी. बाहेर या ई धूम्रपानास व्हेपिंग म्हणतात. यासाठी लागणारी नवनवी उपकरणं जूल बनवते.

पुन्हा हा योगायोगच की या जूलचा मुख्य कार्यकारी अधिकारी केविन बर्न्‍स हा गेल्या आठवडय़ात या कंपनीतनं पायउतार झाला. अमेरिकेनं व्हेपिंगवर बंदी घातली जाण्याच्या पाश्र्वभूमीवर आपल्याकडेही तसा निर्णय झाला. तिकडे अमेरिकेत काही राज्यांनी जाहीर केलं आम्हीही व्हेपिंगवर बंदी घालू म्हणून. तेव्हा आपल्या कंपनीसमोर येऊ घातलेली आव्हानं लक्षात घेऊन या बर्न्‍स यानं राजीनामा दिला.

पाठोपाठ फिलिप्स आणि आल्ट्रिया यांच्यातल्या जाहीर झालेल्या विलीनीकरणाच्या घोडय़ानं पेंड खाल्ली. फिलिप्स कंपनी या विलीनीकरणासाठी तब्बल १८,७०० कोटी डॉलर्स खर्च करणार होती. पण काही योगायोगांमुळे जगभरात अचानक व्हेपिंगविरोधात खूप धूर यायला लागला आणि हे विलीनीकरणाचं व्हायच्या आधीच फाटलं.

तर, फिलिप्स-आल्ट्रिया आणि ब्रिटिश अमेरिकन टोबॅको यांच्यात यानिमित्तानं एक मोठं व्यापारयुद्ध होऊ घातलं होतं. ते आता टळलं. या युद्धाची ठिणगी पडली होती गेल्या वर्षी. त्या वेळी फिलिप्स कंपनीनं ब्रिटिश अमेरिकन कंपनीविरोधात तक्रार केली होती. कशाबद्दल? तर ब्रिटिश कंपनीनं व्हेिपगचं एक नवं उपकरण बाजारात आणण्याची घोषणा केली होती, त्याविरोधात. आधीच व्हेिपग बाजारात ब्रिटिश कंपनीचा वरचष्मा. आणि वर त्यात नव्या उपकरणाची तयारी. त्यामुळे बाजारपेठेत चांगलीच- पण असमान- स्पर्धा तयार झाली असती. तिला तोंड देण्याची फिलिप्सची तयारी दुहेरी होती. एका बाजूने या नव्या उपकरणाविषयी तक्रार करायची आणि त्याच वेळी आल्ट्रियाचं विलीनीकरण करत या बाजारपेठेत आघाडी घ्यायची.

आता या विलीनीकरणाची गरजच फिलिप्सला नसावी. कारण एकापाठोपाठ एक अशा अनेकांनी ई सिगरेट्सवर बंदीचा निर्णय घेतला! त्यामुळे आता ई सिगरेटच्या क्षेत्रात आघाडीवर असणारी कंपनी घेऊन करायचंय काय, असा विचार फिलिप्सच्या धुरीणांनी केला असणारच.

या टप्प्यावर येतो योगायोगाचा मुद्दा. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि आपल्या सरकारलाही एकाच वेळी ई सिगरेटच्या धोक्याची जाणीव व्हावी हे छानच. यात उभय देश नेतृत्वाच्या जनहित दक्षतेचीच खात्री पटते. दोन्ही देशप्रमुखांच्या मनात एकाच वेळी ई सिगरेट्सवर बंदी घालायची भावना दाटून येणं हे ‘ग्रेट माइंड्स थिंक अलाइक’ या उक्तीनुसारच असणार.

तसंच ही बंदी घालत असताना या ई सिगरेट्सपेक्षाही जास्त धोकादायक अशा पारंपरिक धूम्रकांडय़ांच्या वाढत्या अस्तित्वाकडे डोळेझाक होत असेल तर तोदेखील योगायोगच. आपल्या मार्लब्रो या ब्रँडचं काय होणार या चिंतेत असणाऱ्या कंपनीसाठी आता आशादायक वातावरण तयार होणं आणि या कंपनीचं अमेरिकी असणं हे योगायोग नाहीत, असं कोण म्हणेल?

आणि यातले आणखी दोन महायोगायोग म्हणजे भारतातल्या सिगरेट बनवणाऱ्या कंपनीतला सगळ्यात मोठा गुंतवणूकदार भारत सरकारच असणं आणि ई सिगरेटवर घातलेल्या बंदीमुळे या कंपन्यांच्या समभाग दरांत सणसणीत वाढ होऊन भारत सरकारलाच त्याचा फायदा मिळणं!! आणि सरकारला पसा मिळत असेल तर यापेक्षा दुसरा चांगला योगायोग कोणता? जनतेच्या कल्याणासाठीच तर हा पसा खर्च होणार..!

फक्त यात बारीकशी अडचण अशी की ई सिगरेटचं वाफाळ धूम्रपान करणाऱ्यांची आपल्या देशातली संख्या आहे साधारण एक लाख ९० हजार इतकी. आणि पारंपरिक धूम्रकांडय़ातनं धूर काढणाऱ्या/तंबाखू खाणाऱ्यांची संख्या आहे २६ कोटी ७० लाख इतकी. आता हादेखील योगायोगच की ज्यावर बंदी घातली ते फक्त ०.०७ टक्के इतके आहेत आणि उरलेल्यांना रान मोकाट आहे.

असा हा धूर.. योगायोगाचा.. विचार केला की डोळ्यातच जाणारा..!

हे चित्र फिलिप्स आणि आल्ट्रिया यांच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात होती, तेव्हाचे.. पाकिटात मध्यभागी अर्थातच ‘जूल’!

Story img Loader