गिरीश कुबेर@girishkuber
girish.kuber@expressindia.com
ऑस्ट्रियाचे धडे – ४
‘साइट सीइंग’ हा शब्द उच्चारणंसुद्धा अभद्र वाटावं, इतकं अलौकिक सुंदर गाव. ते काहीही दाखवत नाही. पण तरी सौंदर्याचं दर्शन घडवतं. एखादं गाव इतकं सुंदर कसं असू शकतं?
पर्यटन म्हणजे काही ना काही बघणं. इतकीच बऱ्याच जणांची व्याख्या. ‘साइट सीइंग’. त्याची अशी यादी घ्यायची आणि वाणसामानाच्या यादीप्रमाणे एकेका स्थळावर टिक करत जायचं म्हणजे पर्यटन. आणि हे का करायचं त्यातल्या अनेक कारणांमागचं एक कारण म्हणजे ते करून परत आल्यावर सांगता (की मिरवता?) यायला हवं काय काय पाहिलं, काय काय केलं.. ते. सगळा अट्टहास त्यासाठी. पण पर्यटन त्याच्याही पलीकडे बरंच असतं. असायला हवं. कुमार गंधर्व म्हणायचे शांततेचा आवाज ऐकायला शिकलं पाहिजे, तसं.
‘साइट सीइंग’च्या यादीत मिरवावं असं काहीच नसेल, करण्यासारखंही काही नसेल तरीही ती जागा अनुभवण्यासारखी असू शकते. अशा काही जागा असतात की तिथं लौकिक अर्थानं काहीच नसतं. पण तरी तिथे जे काही असतं ते अन्यत्र फार म्हणजे फारच कमी ठिकाणी असतं. ज्यांना अशा काही अनवट स्थळांत रस आहे, त्यांनी आवर्जून अनुभवायला हवं असं गाव म्हणजे झेल अॅम सी. लिखाणाच्या सोयीसाठी त्याचा झेलम सी असा मराठी अपभ्रंश करू या.
सुंदर, स्वप्नमयी साल्झबर्ग इथून निघालो की स्वित्र्झलडच्या रस्त्यावर हे झेलम सी आहे. रेल्वेने जायचं तर जीनिव्हा किंवा झुरिकला जाणाऱ्या गाडय़ा आहेत. बव्हेरियन जंगलाची ताजी हवा खात प्रवासाचा आनंद शुद्ध स्वर्गीय. प्रवासाचे मार्ग कमालीचे रम्य. पण आनंदातिरेक आहे तो झेलम सी गावात पोहोचण्यात. तिथं पोहोचल्यापासून या आनंदाचे धक्के बसायला सुरुवात होते. आमच्याबाबत तर ही उत्सुकता जास्तच ताणली गेली. साल्झबर्गहून निघताना व्हिएन्नातल्या भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्याचा फोन आला. भेटणार होतो आम्ही. त्याला वाटलं आम्ही व्हिएन्नातच आहोत. सांगितलं, आता साल्झबर्ग सोडतोय ते. त्यानं सहज विचारलं, कुठे जाताय?
झेलम सी सांगितल्यावर त्याच्या तोंडून आनंद आणि धक्का तितक्याच तीव्रतेनं व्यक्त झाला. धक्का अशासाठी की झेलम सीला ‘कसं काय बुवा जाताय’ या प्रश्नाचा आणि आनंद हा अधिकारी नुकताच तिकडे राहून आला होता, म्हणून. ‘झेलम सीसारखी जागा पाहिली नाही कधी.. घायाळ करते ती’, या त्याच्या प्रतिक्रियेनं कुतूहल आणखीनच वाढलं. प्रवासात चार तरुणींचा एक ग्रुप भेटला. कोण कुठल्या वगैरे गप्पा सुरू झाल्या. त्यातल्या दोघी झेलम सीच्या होत्या. शिकायला ‘साल्झबर्गसारख्या’ शहरात राहावं लागतं, म्हणून तक्रार करत होत्या. ‘साल्झबर्गमध्ये राहावं लागतं म्हणून तक्रार?’ या माझ्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, आमचं झेलम सी बघा म्हणजे कळेल आमच्या तक्रारीचा अर्थ. बाकीच्या दोघी म्हणाल्या, ‘यू मस्ट हॅव टु बी सुप्रीमली लकी टु बी बॉर्न इन झेलम सी.’
त्यांचं म्हणणं तंतोतंत खरं होतं. गाडीतनं पाऊल टाकलं आणि डोळे विस्फारलेच. अख्खंच्या अख्खं स्थानक जणू बागेतच. बाहेर पडायला त्यातून दोन रस्ते. आल्प्सच्या डोंगरांकडे तोंड करून डावीकडून बाहेर पडलं की गाव आणि उजवीकडच्या रस्त्यानं बाहेर पडलो की थेट बागेतच. रेल्वे स्थानकाच्या परिसरात असं काही सुंदर असू शकतं, याची कल्पनाही असण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे ‘हॅ: बागेत बाहेर पडून काय करणार’, असा प्रश्न विचारत आम्ही आपले डावीकडच्या रस्त्याने बाहेर पडलो. सकाळचे ११ वाजले होते. आपल्याला करपवणारा सूर्य युरोपात मात्र निवृत्त झालेल्या गणिताच्या शिक्षकासारखा भासतो. हे सगळे शिक्षक निवृत्तीनंतर प्रेमळ वगैरे होतात. पण युरोपीय भाग्यवान. त्यांना सेवेत असणाऱ्यांचाही प्रेमळपणा अनुभवायला मिळतो. असतं एकेकाचं नशीब! असो. तर गावाच्या दिशेने बाहेर पडलो आणि लक्षात आलं.
की संपूर्ण गाव म्हणजेच मूर्तिमंत उद्यान आहे. नवख्या ठिकाणी उतरलं की इंग्रजी ‘आय’ ही खूण शोधायची सवय. अशा ‘इन्फम्रेशन सेंटर’मध्ये आपल्याला हवी ती माहिती मिळते. पहिला प्रश्न असतो की आपलं हॉटेल चालत जाण्यासारखं आहे की टॅक्सी वगैरे करायची? ते विचारण्यासाठी केंद्रात गेलो तर तिथल्या आजींनी (युरोपात बऱ्याच ठिकाणी आजीआजोबा ही अशी कामं करतात. वेळही जातो. वर चार पैसेही मिळतात.) असं काही स्वागत केलं की मी यांना कुठे भेटलो होतो की काय, हे आठवून पाहिलं. पण तसं काही नव्हतं. आजी प्रेमळ होत्या. हॉटेलचा पत्ता विचारल्यावर त्यांनी नकाशा काढला, आपण त्यावर कुठे आहोत हे सांगितलं आणि हॉटेलला कसं जायचं ते जातीनं बाहेर येऊन नकाशावर ‘इथं इथं बस रे मोरा’प्रमाणे खुणा करत समजावून गेल्या. त्यांना विचारलं चालत जायचं? त्यावर आजींचं उत्तर होतं : यू विल नॉट फाइंड मोअर ब्यूटिफुल प्लेस टु वॉक.
खरं होतं ते. तिथून चार पावलं टाकल्यावर रस्त्यात अध्रे अध्रे खांब टाकून तो बंद केला होता. म्हणजे वाहनांना तिथून पुढे प्रवेश नाही. त्यामुळे सारा आसमंत असा सलावलेला. हलकं ऊन आणि मंद झुळूक. रस्त्याच्या एका बाजूला डोंगर. दुसरीकडे अथांग, प्रचंड असं तळं. त्या तळ्याच्या कडेनं तितकंच अथांग उद्यान. त्यात बसायला बाकं. रस्त्यात मध्ये खाण्यापिण्याची दुकानं. मागच्या घरातलेच येऊन तिथं स्वयंपाक करताना दिसत होते. रस्त्यावरच खुर्च्या नाही तर सतरंज्या वगैरे अंथरून सारं गावच्या गाव सलावलेलं. गोंडस मुलं बागडतायत. पण त्यांच्या तशाच वा त्याहून गोंडस आयांना ‘करट रस्त्यावर धडपडेल’ याची जराही चिंता नाही.
उजवीकडे तर तळ्याच्या काठानं कुटुंबांची उद्यानं फुललेली. पाण्यातली. त्यात सहभागी आजी/ आजोबा/ आई/ बाबा/ नातू/ नात वगैरे अशी प्रत्येकाची स्वत:ची पाण्यात खेळायची, डुंबायची आयुधं होती. त्यातल्या लहान मुलांना पाहून त्यांना चालायला तरी येत असेल की नाही, असा प्रश्न पडत होता. पण तरी ती उत्तमपणे पाण्यात खेळत होती. या गावात पाण्यातच बाळंतपण करतात की काय. इतक्या लहानांना कसं काय पोहायला येतं अशी शंका यावी, असं वातावरण. यातही जी पोरं त्यातल्या त्यात मोठी- म्हणजे पहिलीत जाणारी फार फार तर- होती ती विंड सìफग करत होती. त्यांच्यासाठी आपल्याकडे कशा लहान मुलांच्या सायकली असतात तशा छोटय़ा छोटय़ा होडय़ा होत्या.
तळ्याच्या पलीकडे पुन्हा डोंगर. हिरवागार. त्यातून मधेच पांढरे शुभ्र ओहोळ. भांगाची रेषा जशी चेहरा विभागते तसे ते ओहोळ डोंगराच्या चेहऱ्याला विभागत होते. थंडीत तो डोंगर बर्फाचा होतो आणि मग स्कीइंगचा खेळ सुरू होतो. मधेच खेळण्यातलं वाटावं असं एखादं विमान पाण्यावर उतरतं आणि त्यातले पर्यटक शेजारच्या हॉटेलात शिरतात.
सगळी हॉटेलं तळ्याच्या कडेनं. आम्ही तर इतके नशीबवान की हॉटेलातला कोपऱ्यातला स्विट मिळाला. त्यामुळे दोन िभतीतनं तलाव समोर राहायचा. गॅलरीतनं उतरलं की लॉन आणि तलावच. तिथं बोट बांधलेली. आपली आपण घ्यायची आणि वल्हवत जायचं पाण्यात. वेळ वगैरे आपली आपण निवडायची. आम्ही गेलो त्या वेळी अंधार उशिरा पडायचा काळ होता. साडेआठ-नवाच्या सुमारास दिवेलागण व्हायची. ती झाली की या तळ्याच्या कडेनं आकाशातली तारकादलं खाली उतरल्यासारखं वाटतं. तिथेच बहुतेक हॉटेलांची जेवायची सोय. वातावरणात एक अद्भुत शांतता, किणकिणणाऱ्या ग्लासांचाच काय तो आवाज आणि अथांग तळ्यातल्या आकाशाशी स्पर्धा करणारं खरं आकाश. वातावरण इतकं प्रौढ आणि तृप्त की कुणालाच काही असुरक्षित वगैरे वाटत नव्हतं. एका रात्री मधेच तीन वाजता जाग आली, काचेच्या भिंतीपल्याकडच्या तलावाला थेट पाहण्यासाठी बाहेर आलो तर तिघीचौघी मुली जॉिगग करत जाताना दिसल्या. या वेळी? आणि तृप्ती म्हणाल तर गावातल्या सार्वजनिक बसगाडय़ांना तिकीटच नाही. हॉटेलचं कार्ड दाखवलं की फुकट प्रवास. कुठूनही कुठेही जा.
कुठेही गेलो तरी सगळीकडे तितकाच आनंद. शांत आणि तृप्त. गावची लोकसंख्या जेमतेम दहा हजार. सर्व घरांवर अशी समाधानाची साय पसरलेली. ‘साइट सीइंग’ हा शब्द उच्चारणंसुद्धा अभद्र वाटावं, इतकं अलौकिक सुंदर गाव. ते काहीही दाखवत नाही. पण तरी सौंदर्याचं दर्शन घडवतं. एखादं गाव इतकं सुंदर कसं असू शकतं या प्रश्नानं अचंबित झालेले आपण मग या सौंदर्यानुभवानं दमतो. हतबुद्ध होऊन बसतो.. आणि मग कवी अनिल आठवतात..
अशा एखाद्या तळ्याकाठी बसून रहावे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते.
इथं, शांततेच्या जोडीला आनंदही या गावात वस्तीला असतो.