|| गिरीश कुबेर
सौम्यशक्ती वाढवायचीच, असं ठरवून साम्यवादी देशांनी ऑलिम्पिक पदकं मिळवण्याचा सपाटा लावला… पण खेळाडूंचं काय झालं?
न्यूयॉर्कमधल्या मेडिसन स्क्वेअर गार्डनच्या प्रवेशद्वारावरचं एक लोभस चित्र आठवतंय. अजूनही बहुधा तसंच असावं ते. त्या चित्रातल्या गोड मुलीचा चेहरा तर ओळखीचा होता, पण ते पाहिल्यापाहिल्या प्रश्न पडला होता : हिचं चित्र इथे का?
नादिया कोमिन्स्की हिनं या गार्डनमधल्या स्पर्धांत पहिल्यांदा जिम्नॅस्टिक्समधे १० पैकी १० गुण मिळवले. १९७६ सालच्या मार्च महिन्यात. त्यानंतर तीन महिन्यांतच कॅनडातल्या माँट्रियल इथं भरलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांत तिनं हाच विक्रम नोंदवला. पहिल्यांदा १० पैकी १०. असं कधी घडलं नव्हतं आणि घडणारही नाही याची अनेकांना खात्री होती. अगदी ऑलिम्पिकसाठी गुण आणि वेळ नोंदणी करणाऱ्या ‘ओमेगा’ या घड्याळ कंपनीलाही! त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गुणफलकावर १० गुण दाखवायची सोयच नव्हती त्या वेळी. म्हणून नादियाचा विक्रम ‘ओमेगा’च्या फलकावर ‘१.०’ असा दिसला. परीक्षकांना मध्ये पडून सांगावं लागलं या मुलीनं पैकीच्या पैकी गुणांचा विक्रम केलाय ते!
आज विनेश फोगटची हृदयद्रावक कथा वाचली आणि नादिया आठवली. विनेशला मेल्याहून मेल्यासारखं वाटतंय. तिला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये काही पदकबिदक मिळालं नाही. संभाव्य पदकविजेत्यांत नाव होतं तिचं. पण ते काही झालं नाही. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन पदक न मिळाल्यानं उपेक्षेच्या अंधारात दुर्लक्षाच्या नजरा चुकवत विनेश पदक विजेत्यांभोवतीची रोषणाई हताश होऊन पाहातेय. तिची सत्यकथा वाचताना नादिया आठवली कारण एकेकाळची ही जगज्जेती रोमानिया या आपल्या मायदेशात आत्महत्येच्या प्रयत्नांपर्यंत गेली. तिथल्या तत्कालीन साम्यवादी पदकाग्रही, पदककेंद्री सरकारच्या दांडगाईमुळे तिला नैराश्य आलं होतं.
आता नादिया अमेरिकेची नागरिक बनलीये. फक्त पदक विजेत्यांनाच महत्त्व देणाऱ्या, खेळ म्हणून अजिबात खिलाडूवृत्ती नसलेल्या साम्यवादी रोमानिया या आपल्या मातृभूमीचा तिनं त्याग केला आणि गुणवंतांना त्यांचा पैस मनमुराद उपभोगू देणाऱ्या अमेरिकेला तिनं घर मानलं. तीच अमेरिका की जी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ३९ सुवर्ण आणि एकूण ११३ पदकं पटकावून पहिल्या क्रमांकावर राहिली. दुसरा क्रमांक ३८ सुवर्णपदकं मिळवणाऱ्या चीनचा. एरवी अमेरिकेशी अटीतटीनं लढणाऱ्या रशिया या देशाला या ऑलिम्पिकमध्ये अधिकृत प्रवेश नव्हता. त्या देशाच्या अंमली कर्माची ही शिक्षा. पण त्या देशातल्या खेळाडूंवर अन्याय नको म्हणून ‘आरओसी’ (रशियन ऑलिम्पिक कमिटी) अशा झेंड्याखाली त्या देशातल्या खेळाडूंना या स्पर्धेत प्रवेश दिला गेला. त्यांनी २० सुवर्णांसह एकंदर ७१ पदकं मिळवून पाचवा क्रमांक गाठला. यजमान जपान (२७) आणि इंग्लंड (२२) हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिले.
या यादीतल्या चीन आणि रशिया यांचा ऑलिम्पिक इतिहास अभ्यास करावा असा. एकतर मुळात ऑलिम्पिक स्पर्धांचं १८९६ साली पुनरुज्जीवन झाल्यापासून १९८४च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकपर्यंत चीनचा या स्पर्धेतला सहभाग नगण्य होता. या उलट या काळात अमेरिकेच्या नावावर मात्र एकूण १७७३ इतकी पदकं होती. या तुलनेत साम्यवादी सोव्हिएत रशियानं सुरुवातीला ऑलिम्पिककडे तितकं लक्ष दिलं नाही. रशियन राज्यक्रांतीनंतर दोन महायुद्धं होईपर्यंत या देशाला या खेळांचं महत्त्व लक्षातच आलं नाही. कदाचित हे खेळ म्हणजे पाश्चात्त्य चंगळवादी संस्कृतीचा बुझ्र्वा आविष्कार वाटला असेल या डाव्यांना. पण दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आणि शीतयुद्ध तापणार याचा अंदाज आल्यावर मात्र सोव्हिएत रशियानं ऑलिम्पिक गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केली. ५१ साली ऑलिम्पिक समिती वगैरे स्थापन केल्यानंतर पुढच्याच वर्षीच्या हेलसिंकी ऑलिम्पिक्समध्ये सोव्हिएत क्रीडा फौजा पहिल्यांदा धडकल्या. त्या वर्षी रशियाच्या महिला थाळीफेकपटूनं नवा विक्रम करत सुवर्ण पटकावलं. त्यानंतर मात्र रशियाचे क्रीडापटू अमेरिकेशी स्पर्धा करू लागले. १९९२च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये तर एव्हाना दुभंगलेला रशिया पहिल्या क्रमांकावर राहिला. त्याआधी १९८०च्या बहिष्कृत मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धांत रशियानं ८० सुवर्णांसह १९५ पदकं लुटली (अमेरिका, पश्चिम जर्मनी अशा महत्त्वाच्या देशांनी बहिष्कार घातलेल्या याच ऑलिम्पिकमध्ये आपलं पुरुषांचं हॉकीचं शेवटचं सुवर्ण नोंदलं गेलंय. त्या ऑलिम्पिकमधलं आपलं ते एकमेव पदक. असो). पण पुढे रशियाचा जोर तसा कमी कमी होत गेला.
पण स्वत:ला साम्यवादी म्हणवणाऱ्या चीनचा वाढला. आपलं यश जगाच्या पटलावर कोरण्याची घाई त्या देशाला झाली होती. सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्या जोडीला हंगेरी, पूर्व जर्मनी, रोमानिया वगैरे त्या काळचे साम्यवादी देश अकल्पित अशा स्पर्धा भावनेतून ऑलिम्पिकमध्ये उतरायला लागले. आपला देश किती आकर्षक आहे, हे त्यांना जगाला सांगायचं होतं. ऑलिम्पिकमध्ये दणदणीत पदकं मिळवणं हा जगासमोर आपलं स्वामित्व मिरवण्याचा सोपा मार्ग मानला जाऊ लागला. जोसेफने (आडनावाचं स्पेलिंग ‘एनवायई’) या हार्वर्ड प्राध्यापकानं देशांच्या या वृत्तीचं अचूक वर्णन केलं. ‘सौम्यशक्ती’ (सॉफ्ट पॉवर) ही संकल्पना त्याची. ऑलिम्पिक खेळ हे सौम्यशक्ती प्रदर्शनाचं सर्वात मोठं जागतिक व्यासपीठ मानलं जाऊ लागलं. देशांची सौम्यशक्ती ही एक रम्य कल्पना. तिची व्याख्या करण्यापेक्षा ती समजून घेणं अधिक सोपं. म्हणजे हॉलीवूड ही अमेरिकेची सौम्यशक्ती. पाकिस्तानच्या अधिकृत भेटीत अटलबिहारी वाजपेयी आपल्याबरोबर देव आनंद याला घेऊन गेले ते भारताचं सौम्यशक्ती प्रदर्शनच.
ही कल्पना पुढे आली आणि चीन, रशिया अशा साम्यवादी, हुकूमशाही देशांनी ऑलिम्पिक कामगिरीत उचल खाल्ली. या देशांनी आपले खेळाडू, स्पर्धक जास्तीत जास्त पदकं कशी मिळवतील यासाठी सरकारी योजनाच आखल्या. चीननं खेळाची ‘पंचतत्त्वं’ आपल्यासाठी निश्चित केली. ‘स्मॉल, फास्ट, विमेन, वॉटर, एजाईल’ ही ती पंचतत्त्वं. चीननं मग अशा खेळांवर लक्ष केंद्रित केलं. स्मॉल म्हणजे टेबल टेनिस, बॅडमिंटन, डायव्हिंग, नेमबाजी, महिलांच्या कमी वजन गटांतल्या भारोत्तोलन स्पर्धा वगैरे. आपल्या देशातल्या नागरिकांसाठी कोणते खेळ जास्त योग्य आहेत याच्या शास्त्रीय पाहण्या चीननं केल्या आणि त्या खेळांतले जगज्जेते तयार करण्यावर भर दिला. याची फळं दिसू लागली. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकपर्यंत चीननं फक्त या सहा खेळांतनं १५२ सुवर्णपदकं पटकावली. त्याआधी चार वर्षं, २००८ साली, बीजिंग ऑलिम्पिक्स या घरच्या स्पर्धांत ४८ सुवर्णपदकं खिशात घालून १०० पदकं मिळवत चीन पहिल्या क्रमांकावर राहिला. अमेरिका इथं दुसरी आली. त्या देशाला ३६ सुवर्ण आणि ११२ एकूण पदकं मिळाली. आपल्या घरी ऑलिम्पिक आहेत, तेव्हा आपलाच पहिला क्रमांक हवा असा चीाचा हट्ट होता. सौम्यशक्तीचा हा कडकडीत आविष्कार. पण तो तेवढ्यापुरताच. कारण नंतर २०१२, २०१६ आणि २०२० (म्हणजे आताचं टोक्यो) या तीनही ऑलिम्पिक स्पर्धांत अमेरिकाच पहिल्या क्रमांकावर राहिली. २०१२ साली चीन दुसरा होता आणि तिसरा क्रमांक होता इंग्लंडचा. २०१६ साली पहिला क्रमांक अमेरिकेकडेच राहिला पण दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड. चीन गेला तिसऱ्या क्रमांकावर. आताच्या ऑलिम्पिकमधेही लक्षणीय कामगिरी आहे ती इंग्लंड, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांची. मात्र चीन आहे दुसऱ्या क्रमांकावर.
पण तरीही महत्त्व लक्षात घ्यायचं ते अमेरिका, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इंग्लंड या देशांचं. या सर्वांच्या यशात, त्यांच्या कामगिरीत एक समान धागा आहे. हे सर्व देश खरेखुरे लोकशाही आहेत. आणि त्या देशांत खेळाडू, कलाकार यांना त्यांचा त्यांचा एक पैस आहे. त्याचं पावित्र्य राखलं जातं. खेळाडूंना, कलाकारांना खेळाडू आणि कलाकार असंच मानलं जातं. देशाचा ध्वज वगैरे उंच करायची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर टाकली जात नाही. म्हणूनच त्या त्या देशांचे सर्वोच्च सत्ताधीश पदक विजेत्या खेळाडूंच्या गळ्यात पडत नाहीत. आणि म्हणूनच विजयाचा दबाव झुगारून सिमॉन बाइल्स सहज स्पर्धा सोडू शकते. नादियासारखी देश सोडायची वेळ तिच्यावर येत नाही.
सौम्यशक्ती या संकल्पनेचं महत्त्व या देशांना आहेच. पण ही सौम्यशक्ती दंडावरच्या बेंडकुळ्यांप्रमाणे कधी मिरवायची नसते, ती आभासी असते हेही त्यांना लक्षात आलंय. समजून घ्यायला कठीण असतो सौम्यशक्तीचा अर्थ! किती ते विनेश फोगट सांगेल.
girish.kuber@expressindia.com
@girishkuber