गिरीश कुबेर
विविध ११ देशांतल्या ५८ कंपन्यांचे प्रमुख भारतीय वंशाचे आहेत. त्या परदेशांनी या सर्वाना आपलं मानलं..
या दोन घटना एकाच मुद्दय़ाबाबतच्या आहेत. एकेकाळी एकच, अखंड असलेल्या प्रांतात त्या घडल्या. पण त्यातून दिसून येणाऱ्या मानसिकतेतही काही एकवाक्यता दिसते का?
प्रसंग आहे ट्विटर कंपनीच्या प्रमुखपदी पराग अगरवाल या शुद्ध ‘देसी’ अभियंत्याची निवड होण्याचा. साहजिकच इतक्या मोठय़ा कंपनीचं प्रमुखपद एका -माजी का असेना- भारतीयाला मिळणं ही कौतुकाची बाब. असा कोणी भारतीय कुठल्या तरी शिखरावर चढला की आपल्याकडे त्याच्या कौतुकाचे पूर येतात. त्यात अनैसर्गिक असं काही नाही. याहीवेळी ते आले. पण याच घटनेमुळे पाकिस्तानात अनेकांची चिडचिड झाली. एकापाठोपाठ एक भारतीय अशी जागतिक आस्थापनं पादाक्रांत करत असताना पाकिस्तानला आपण मागे पडल्याचं दु:ख असणं आणि त्यांच्या त्या अपयशाचा आपण आवर्जून उल्लेख करणं हेदेखील नैसर्गिकच.
पण हे ज्या अमेरिकेत घडलं त्या अमेरिकेत या घटनेकडे कसं पाहिलं गेलं?
पराग अगरवालची ट्विटरच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर मुद्दाम अमेरिकी वर्तमानपत्रं, माध्यमं वगैरे या घटनेकडे कसं बघतायत यावर लक्ष ठेवून होतो. ‘फायनान्शियल टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ आदी मातबर वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरच्या याबाबतच्या बातमीत पराग अगरवाल याच्या राष्ट्रीयत्वाचा उल्लेखही नाही. ट्विटरचा संस्थापक जॅक डोर्सी यानं आपला उत्तराधिकारी म्हणून पराग अगरवाल याची नेमणूक केली, इतकाच काय तो तपशील. काहींनी आतल्या पानावरील मजकुरात जाता जाता त्याच्या भारतीयत्वाचा उल्लेख केला असेल/नसेल.
यातून काय दिसतं?
पराग हा भारतीय म्हणून भारतीय खूश होणार, आपल्याकडे असं कोणी नाही म्हणून पाकिस्तानी नाराज होणार आणि त्या देशाला टुकटुक करायला मिळतंय म्हणून आपला आनंद द्विगुणित वगैरे होणार. पण ज्या देशातल्या उद्योगात हे घडलं, जिथे असे उद्योग जन्माला आले त्या देशातल्या माध्यमांना आणि मुख्य म्हणजे नागरिकांनाही हे ज्यांच्याबाबत घडलं त्यांच्या राष्ट्रीयत्वात काडीचाही रस नाही. तिकडे चर्चा कसली? तर ट्विटर कंपनीच्या साध्या एका गुंतवणूकदारानं या कंपनीच्या प्रमुखावर पायउतार होण्याची कशी वेळ आणली त्याची.
या साध्या गुंतवणूकदारांचं नाव आहे एलियट मॅनेजमेंट. त्यांच्याकडे ट्विटर या कंपनीचे अवघे ४ टक्के इतके समभाग आहेत. गेली जवळपास दोन-तीन वर्ष हे ‘एलियट मॅनेजमेंट’ जॅक डोर्सी यांच्यामागे हात धुऊन लागलं होतं. ‘एलियट..’चं म्हणणं इतकंच होतं की डोर्सी याचं -भले तो संस्थापक असला तरी- ट्विटर कंपनीत हवं तितकं लक्ष नाही. या म्हणण्याचा आधार म्हणजे डोर्सी यानंच काढलेली आणखी एक कंपनी. तिचं नाव स्क्वेअर. ही वित्तक्षेत्रात काम करते आणि बिटकॉइनसारख्या कूटचलनात (क्रिप्टोकरन्सी) उलाढाल करते. ‘ही कूटचलन व्यवस्था हेच जगाचं भवितव्य आहे’ असं खुद्द डोर्सी याचं म्हणणं. त्यावर एलियट मॅनेजमेंटचा काही आक्षेप नाही. त्यांचं म्हणणं इतकंच की त्या कंपनीत लक्ष घालायचं तर ट्विटर सोड, तुझ्यामुळे कंपनीचा समभाग घरंगळतोय आणि आम्हा गुंतवणूदाराचं नुकसान होतंय. ते एका अर्थी खरंही आहेच. म्हणजे फेसबुक, अॅमेझॉन, गूगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल अशा तगडय़ा कंपन्यांच्या तुलनेत ट्विटरचा जीव अगदीच लहान आहे. या अन्य कंपन्यांच्या तुलनेत ट्विटरमधल्या गुंतवणुकीचा परतावाही कमी आहे.
या एलियट मॅनेजमेंटच्या संघर्षांला अखेर यश आलं आणि जॅक डोर्सी याच्यावर आपणच स्थापन केलेली ट्विटर ही कंपनी सोडायची वेळ आली. तसं याआधीही त्यानं केलं होतं. १५ वर्षांपूर्वी. अशाच वादातून त्याला ट्विटरमधून बाहेर जावं लागलं होतं. पण आपल्यासाठी जॅक डोर्सी वा त्याची कंपनी हा मुद्दा नाही.
तर भारतीयांचं असं परदेशात यशस्वी होणं आणि त्या यशाचे डिंडिम इथे पिटले जाणं हा विषय आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंदिरा नूयी आणि त्यांच्या ‘पेप्सी’तल्या यशापासून ही मालिका सुरू झाली. त्याआधी मेकॅन्झीचे रजत गुप्ता वगैरे अशी काही मोजकीच नावं होती ज्यांनी परदेशी, विकसित देशांतल्या कंपनीत आपल्या कर्तृत्वानं शिखरपदं गाठली. पण हे गुप्ता पुढे चांगलेच बदनाम झाले आणि इनसायडर ट्रेडिंगच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. आपला त्या वेळचा दुर्विलास असा की तशा प्रकरणाची चौकशी करणारा अधिकारीही भारतीयच. प्रीत भरारा असं त्याचं नाव.
पण नूयी यांच्यापाठोपाठ मात्र जागतिक कंपन्यांची प्रमुखपदं भारतीयांनी पटकावण्याची जणू स्पर्धाच लागली. नरसिंह राव-मनमोहन सिंग यांच्या उदारीकरण धोरणाला लागलेली ती फळं म्हणायची. यातले बहुसंख्य हे आयआयटी वा आयआयएम अशा संस्थांतले आहेत. आज एका आकडेवारीवरून दिसतं की विविध ११ देशांतल्या ५८ कंपन्यांचे प्रमुख भारतीय वंशाचे आहेत. सुमारे ७५ लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या कंपन्यांत ३५ लाख कर्मचारी आहेत.
यातून लक्षात घ्यावा असा मुद्दा काय?
पुरेशा संधीअभावी ही मंडळी आपली मायभूमी वगैरे सोडून गेली आणि त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या परदेशांनी या सर्वाना आपलं मानलं. त्या देशातल्या व्यवस्थांनी, नागरिकांनी या स्थलांतरितांमधल्या फक्त आणि फक्त गुणवत्ता या एकाच घटकाकडे पाहिलं आणि त्यांना पूर्ण वाव दिला. म्हणजे एखादं नागरिकत्व विधेयक आणून या सर्वाना भारतात हाकलून द्या अशी मागणी त्या त्या देशात ना कोणत्या राजकीय पक्षांनी केली ना कोणा धार्मिक संघटनांनी या भारतीयांच्या धर्माचा मुद्दा उपस्थित केला.
आताही ट्विटर संदर्भात लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे या ‘आपल्या’ कंपनीच्या प्रमुखपदी हा भारतीय कसा.. असा खास ‘आपला’ वाटावा असा प्रश्न अमेरिकेत एकाही व्यक्ती वा संघटना यांच्याकडून उपस्थित झाल्याचं दिसलेलं नाही. गूगल, मायक्रोसॉफ्ट, अडोब, मायक्रॉन टेक्नॉलॉजी वगैरे किती प्रचंड कंपन्यांची नावं घ्यावीत? या सर्व बहुतांशी अमेरिकी आहेत. पण त्यांचे प्रमुख भारतीय आहेत. आणि यातही उल्लेखनीय बाब म्हणजे हे सर्व काही अमेरिकेत स्थायिक झालेल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेले नाहीत. स्वत:च गेलेले आहेत आणि तरीही त्यांना आपल्या गुणवत्तेवर ही पदं मिळाली आहेत. पराग अगरवालला तर ट्विटरमध्ये लागून फक्त १० वर्ष झालीयेत. आणि आता थेट संस्थापकाऐवजी प्रमुखपद मिळालंय त्याला. खूप कौतुक होतंय त्याचं.
आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अशा बडय़ा कंपन्यांची कार्यालयं असलेल्या आपल्या हरयाणा राज्यानं नुकताच निर्णय घेतलाय. बिगर हरयाणवींना हरयाणातल्या कंपन्यात मिळणाऱ्या नोकऱ्यांवर नियंत्रणं आणण्याचा. हरयाणातल्या कंपन्यांतल्या नोकऱ्यांत फक्त हरयाणवींचाच अधिकार असं त्या सरकारचं म्हणणं. आपल्या अनेक कंपन्यांनी या निर्णयावर जमेल तितकं धाडस दाखवत नाराजी व्यक्त केली. आता बातमी आहे यातल्या अनेक कंपन्यांनी राज्याबाहेर जाण्याचे प्रयत्न सुरू केल्याची.
तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिल्लीत सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात गृहखात्याचे राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेली माहिती सांगते की, गेल्या पाच वर्षांत तब्बल सहा लाखांहून अधिक भारतीयांनी आपल्या मायभूमीचा, त्याहीपैकी अनेकांनी नागरिकत्वाचा त्याग करून परदेशवास पत्करलाय. कायमचा. त्या आकडेवारीनुसार २०१७ साली १ लाख ३३ हजार ४९, २०१८ साली १ लाख ३४ हजार ५६१, २०१९ साली १ लाख ४४, ०१७, २०२० साली अगदी कोविडकाळातही ८५ हजार २४८ आणि यंदाच्या ‘आपण प्रगतिपथावर घोडदौड करू लागल्याच्या’ वर्षांत पहिल्या नऊ महिन्यांतच १ लाख ११ हजार २८७ भारतीयांनी आपलं भारतीय नागरिकत्व गंगार्पण केलंय. यातले बरेचसे विकसित देशातच जातायत. त्यांचा आणि त्या देशाचा अधिक विकास करण्यासाठी.
त्यात काही असतील उद्याचे सत्या नाडेला, सुंदर पिचाई किंवा अगरवाल वगैरे. ते मोठे झाल्यावर आपण त्यांच्याही विजयाचे सनईचौघडे लावू काही वर्षांतच.
सहजच अटलबिहारींची कविता आठवली.. ‘छोटे मनसे कोई बडम नहीं होता..’
girish.kuber@expressindia.com
@girishkuber