|| गिरीश कुबेर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
औद्योगिक प्रगती तर सर्वाना हवीच असते, स्टालिनलाही हवी होती.. पण प्रगती वैचारिकसुद्धा हवी, तर उजवे/ डावे/ मधले/ कशातही न मावणारे अशा सर्वाचं मुक्त स्वागत असायला हवं आणि विचार वाचण्यासाठी वेळाबरोबरच पैसाही देणारे वाचक हवेत..
‘‘मि. एक्स यांचा मूळ लेख जसाच्या तसा वाचायचा असेल तर येथे क्लिक करा..’’ असा एक मेल गेल्या आठवडय़ात आला आणि एकदम धन्य धन्यच वाटलं.
दुसरं महायुद्ध नुकतंच कुठे संपलं होतं. त्यात तत्कालीन सोव्हिएत रशियाचा सर्वेसर्वा जोसफ स्टालिन यांचं भाषण ठरलं. मॉस्कोतल्या बोल्शॉय नाटय़गृहात १९४६च्या फेब्रुवारीतली ही घटना. नुकतंच युद्ध संपलंय. अमेरिकेनं अणुबॉम्ब निर्मितीत सोव्हिएत रशियावर मात केलीये, लवकरच दोघांत अंतराळ स्पर्धा आणि मग शीतयुद्ध सुरू होणार आहे. आणि अशा वेळी स्टालिन यांचं जाहीर भाषण. साऱ्या जगाचे कान लागले होते त्याकडे. आणि ज्या दिवशी त्यांचं भाषण होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी सोव्हिएत रशियात सार्वत्रिक निवडणुकांचं मतदान. दुसऱ्या महायुद्धाच्या अंतानंतरची ती पहिलीच निवडणूक. अशा अत्यंत महत्त्वाच्या दिवशी पूर्वसंध्येला स्टालिन बोलणार होते. म्हणजे ही दुधारी महत्त्वाची घटना.
त्यामुळे सर्वाना- म्हणजे प्रामुख्याने अमेरिकेला- अर्थातच अपेक्षा होती स्टालिन या भाषणात परराष्ट्र संबंधांविषयी काही बोलतील. कारण त्याआधी १९४४च्या ब्रेटन वूड्स परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांची स्थापना झालेली. यातली पहिली गेली युरोपच्या आधिपत्याखाली आणि दुसरी अमेरिकेच्या. या व्यवस्थेत आजतागायत बदल झालेला नाही. पण त्या वेळी ही विभागणी डोळय़ांवर आलेली. त्यात या दोन्ही ठिकाणी रशियाला काही स्थान मिळालं नाही. दोन्ही संस्था एका अर्थी अमेरिकेच्या प्रभावाखाली राहतील अशीच रचना तयार झाली. यामुळे स्टालिन फणफणत होते. या साऱ्याचं प्रतिबिंब या भाषणात उमटणार, अशीच खात्री आणि अपेक्षाही सर्वाची. म्हणून त्या भाषणाचा वृत्तांत लगोलग मिळेल अशी व्यवस्था झालेली.
पण या भाषणात स्टालिन हे अमेरिकेला अपेक्षित होतं त्यातलं काही म्हणजे काहीही बोलले नाहीत. सोव्हिएत रशियाचं औद्योगिकीकरण, त्याला गती किती आणि कशी देता येईल, कोणकोणत्या क्षेत्रात आपण अधिक संशोधन वगैरे करायला हवं असं आपलं साधं भाषण होतं त्यांचं. म्हणजे अगदी शब्दाशब्दांमध्ये काही अर्थ दडलाय का वगैरे असं शोधलं तरी त्यातून काही निष्पन्न होत नव्हतं.
त्यामुळे मॉस्कोतल्या अमेरिकी दूतावासातले अधिकारी जॉर्ज केनान यांनी या भाषणाचा अत्यंत त्रोटक असा वृत्तांत पाठवून दिला आपल्या मायदेशी. केनान यांचंही बरोबर होतं. त्या भाषणात खरंच तसं काही नवीन नव्हतं. त्यामुळे त्याकडे लक्ष ठेवून असलेले अमेरिकी मुत्सद्दी चांगलेच चक्रावले. विशेषत: अध्यक्ष हॅरी ट्रमन हे तर गोंधळून गेले. स्टालिन काय करू पाहतायत हे समजून घेण्यात त्यांना रस. पण त्यांच्या भाषणात तर हाताला काही लागेल असा ऐवज नाही. परत जॉर्ज केनान यांनी जो अहवाल पाठवला तो ही अगदीच सपक. ट्रमन यांना युद्धोत्तर रशिया समजून घ्यायचा होता. त्यासाठी योग्य अधिकारी व्यक्ती होती ती म्हणजे केनान. ते रशियाविषयक तज्ज्ञ. त्यात मॉस्कोत तैनात. अत्यंत अभ्यासू. पण त्यांचा अहवाल हा असा. त्यामुळे वॉशिंग्टनमधल्या अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी केनान यांना उलट कळवलं.. जरा सविस्तर लिहा. अध्यक्षांना रशियाचे मनसुबे जाणून घ्यायचेत.
त्याच रात्री उशिरापर्यंत जागून केनान यांनी नवा अहवाल पाठवला. त्या वेळी सर्व दूरस्थ दळणवळण व्यवहार तारेनं व्हायचे. त्यातल्या त्यात तोच अतिजलद मार्ग. तेव्हा केनान यांनाही तसा काही दुसरा मार्ग नव्हता. त्यांनी अत्यंत सविस्तरपणे रशियाच्या योजनांविषयी आपली मतं, निरीक्षणं पाठवली. त्यामुळे ही तार तब्बल ५,००० शब्दांची झाली. अमेरिकेच्या परराष्ट्र इतिहासातली बहुधा ही सर्वात प्रदीर्घ तार. त्यातील मजकूर इतका सुंदरपणे सादर केला गेला होता की त्यातून समग्र रशिया उभा राहिला. केनान यांनी स्टालिन यांचा पाच अंगांनी वेध घेतला. या इतक्या सविस्तर आणि तरीही सुलभ तारेची त्या वेळी खूप चर्चा झाली. केनान यांना रशियासंबंधी भाषण देण्यासाठी निमंत्रणं यायला लागली. अमेरिकेत आले असता त्यांनी काही ती निमंत्रणं स्वीकारलीदेखील. त्यातलं एक होतं ‘कौन्सिल ऑन फॉरिन रिलेशन्स’ या संस्थेतलं. कशामुळे काय ते माहीत नाही, पण हे भाषण अत्यंत अप्रतिम झालं. सर्वाचं मत पडलं, हे इथेच सोडून चालणारं नाही. हे छापायला हवं. या कौन्सिलतर्फे एक द्वैमासिक निघायचं. त्यात ते छापावं असं ठरलं. पण या मासिकाचे संपादक हॅमिल्टन फिश आर्मस्ट्राँग हे काही त्या दिवशी नेमके भाषणाला नव्हते. पण त्यांचे सहकारी होते. त्यांनीही संपादकांना सांगितलं, हे आपण छापायलाच हवं. त्यांच्या वतीने केनान यांना तशी विचारणा झाली.
‘या भाषणाचं संपादन करून छापू या का?’
केनान म्हणाले, ‘छापा.. पण माझं पद असं आहे की मला नावानं लिहिता येणार नाही. काही टोपण नाव द्या.’
ते हे ‘मि. एक्स’. आणि ते ज्या मासिकात छापलं गेलं ते मासिक ‘फॉरीन अफेअर्स’. जुलै १९४७च्या अंकात ते छापलं गेलं आणि अक्षरश: अभ्यासकांच्या जगात ते इतकं चर्चिलं गेलं की आज सुमारे ७५ वर्षांनंतरही रशिया म्हटलं की या ‘मि. एक्स’ यांच्या लेखाचा संदर्भ येतो. सुरुवातीला उल्लेख केला तो ई-मेल होता त्या मासिकाचा. या मासिकाच्या निष्ठावान वाचकांना हा लेख नव्यानं उपलब्ध करून दिला जातोय हे कळवणारा. सप्टेंबपर्यंत या मासिकात छापले गेलेले आणखीही काही महत्त्वाचे लेख असेच उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
कारण या महिन्यात हे मासिक शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. पहिल्या महायुद्धानंतर गोंधळलेल्या जगाला आणि त्या जगाचं नेतृत्व पाहणाऱ्या तितक्याच गोंधळलेल्या धुरिणांना मार्गदर्शन व्हावं या उद्देशानं न्यूयॉर्कमध्ये ‘कौन्सिल ऑन फॉरीन रिलेशन्स’ या संस्थेची स्थापना झाली. ‘फॉरीन अफेअर्स’ हे त्यांचं प्रकाशन. आज पदराला खार लावून जी काही प्रकाशनं वाचणं, त्यांचे खंड संग्रही असणं अत्यावश्यक आहे त्यातलं हे एक. कोणकोण लिहितात त्यात! अमेरिकेसह जवळपास सर्व प्रमुख देशांचे अध्यक्ष, अशा देशांचे परराष्ट्रमंत्री, (काही देशांतले हे उच्चपदस्थ मूलगामी लिहिण्याइतके प्रगल्भ असतात. म्हणजे नाव त्यांचं आणि लेखक भलताच असा काही प्रकार नसतो. तसं करणाऱ्यांना या मासिकात स्थान मिळत नाही.) हेन्री किसिंजर, सॅम्युएल हटिंग्टन यांच्यासारखे अभ्यासक/ विद्वान, अनेक जागतिक प्रकाशनांचे संपादक, आपल्याकडच्या अलीकडच्या लेखकांत प्रताप भानू मेहता, विनय सीतापती, सदानंद धुमे, ब्रह्मा चेलानी, भारतीय पण अमेरिकेत असलेले मिलन वैष्णव आणि तन्वी मदान वगैरे आहेत. इतिहासात पं नेहरू आणि इंदिरा गांधी यांचंही लेखन त्यात प्रकाशित झालेलं आहे. आपले माजी अर्थसल्लागार अरिवद सुब्रमणियन आणि जॉश फेल्मन यांचा ताज्या अंकातला ‘इंडियाज स्टॉल्ड राइज’ (भारताचा थिजलेला उदय) हा लेख आवर्जून वाचावा असा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्याचा उल्लेख झाला.
पूर्णपणे सरकार-निरपेक्ष, स्वत:च्या पायावर उभी असलेली, विद्वानांना भुरळ घालणारी ही संस्था अमेरिकेतल्या खऱ्या लोकशाहीचं एक भूषण. इंग्रजीखेरीज जगातल्या काही महत्त्वाच्या भाषांतही ‘फॉरीन अफेअर्स’ प्रकाशित होतं. या भाषा बोलणाऱ्यांची संख्या अर्थातच हिंदूी वा अगदी मराठी भाषिकांपेक्षाही कदाचित कमी असेल. उदाहरणार्थ जपानी. पण या भाषांत असं काही वाचू इच्छिणारे आणि त्यासाठी पैसे मोजायची तयारी असलेले असावेत बहुधा. उजवे/ डावे/ मधले/ कशातही न मावणारे अशा सर्वाचं तिथं मुक्त स्वागत असतं. म्हणून कोणा अभ्यासकाबरोबार अँजेलिना जोलीही तिथे काही मुद्दय़ांवर आपली मतं मांडते/लिहिते. वर्षभरात फक्त सहा अंक येतात ‘फॉरीन अफेअर्स’चे. पण ऐवज ग्रंथाच्या दर्जाचा.
अशी केवळ विचाराला वाहिलेली संस्था आणि तिचं प्रकाशन शंभरभर वर्ष नुसते टिकलेच नाहीत तर उत्तरोत्तर सुदृढ होत गेले हे पाहणंसुद्धा किती सुखद आहे ! ‘मि एक्स’ यांच्या लेखाइतकं.
निवडणुका, बहुमत, लोकशाही वगैरे सर्व ठीकच. पण देशाच्या प्रगतीसाठी ‘कौन्सिल’सारख्या संस्थांचा हा असा एक्स फॅक्टर जास्त गरजेचा! त्याची गरज भासतीये का, हा खरा प्रश्न.
girish.kuber@expressindia.com
@girishkuber