गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com
@girishkuber
वयाच्या ऐंशीतले, साठीतले, चाळिशीतले, तिशीही न गाठलेले, ११ देशांतले असे हे नागरिक. सगळय़ांच्या तोंडी ती गाणी. आणि सगळे त्या वातावरणात भारलेले..
त्या दिवशी तिथे त्या रम्य घरात एकूण ११ देशांतली माणसं होती. भारत, चीन, इंडोनेशिया, काही युरोपीय देश, अमेरिका आणि मेक्सिकोसुद्धा. सर्व वयांच्या हौशींचा हा समूह. त्यातल्या काही आज्यांच्या डोक्यावर शुभ्र पांढऱ्या केसांच्या म्हाताऱ्या भुरभुरत होत्या. डोक्यावरनं सुटल्या तर शेवरीच्या बोंडातनंच निघाल्या की काय असं वाटावं. त्या छान आपलं म्हातारपण मिरवत होत्या आणि त्यांचे साधारण त्याच वयांचे नवरे आपण मात्र अजून कसे फिट्ट आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात. या जमावातले अन्य काही मधुचंद्राचं हळवेपण सांभाळत ओशाळं हसू लपवण्याच्या फंदात अधिकच ओशाळे होत होते. आणि अन्य मोठा समूह आपला मध्यमवयीन. ना इकडचा ना तिकडचा. या जमावातल्यांचा एकमेकांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. परत तो येण्याचीही शक्यता नाही. पण तरीही या विजोड समुदायांत एक साम्य मात्र ठसठशीत.
सगळ्यांच्या तोंडी एकच गाणं.. ‘आय अॅम सिक्स्टीन गोइंग ऑन सेव्हन्टीन..’
पाश्र्वभूमीला तो गोडसा काचेचा गझीबो. सगळे एकाच उत्साहात हे गाणं गाणारे.. जणू राष्ट्रगीतच.. गाणं संपतं. आणि मग सगळ्यांचा बालिश वाटावा असा टाळ्यांचा गजर. या समूहातले आपला मंगोलियन वंश दाखवून देणारे हात उभे करून टाळ्या वाजवत होते. तर काही गोऱ्या महिला आपल्या झग्याची दोन टोकं दोन बाजूंनी धरून, बो करत होत्या. त्यातल्या एक आजी आपल्या नवऱ्याला ओढत त्या गझीबोसमोर उभ्या राहतात आणि चित्रपटातल्या नायकाच्या पसरलेल्या हातांवर नायिका जसं कलात्मक पडते, तसं पडतात. पुन्हा त्या गाण्याची ओळ आणि पुन्हा टाळ्यांचा एकच गजर. आता तसं करायला रांगच लागते. मग शेवटी सगळे त्या मधुचंद्रीय जोडप्यालाही तेच करायला लावतात.
दृश्य थक्क करणारं. वयाच्या ऐंशीतले, साठीतले, चाळिशीतले, तिशीही न गाठलेले, ११ देशांतले असे हे नागरिक. सगळय़ांच्या तोंडी ती गाणी. आणि सगळे त्या वातावरणात भारलेले.
स्थळ : साल्झबर्गजवळचं. रम्य या शब्दाच्या मर्यादा दाखवून देणारं एक गाव. तिथं आलेला प्रत्येक जण ते गाव डोळ्यात साठवावं की कॅमेऱ्यात पकडावं या पेचात पडलेला. काहींना त्या परिसराच्या दर्शनानं स्मरणरंजन होत होतं तर काही जण अमुक जागा कुठाय, हा प्रश्न चेहऱ्यावर वागवत काही तरी शोधताना दिसत होते. पण तरी यातला महत्त्वाचा मुद्दा असा की त्यातल्या सर्वाना सर्व काही माहीत होतं.
‘साऊंड ऑफ म्युझिक’ या अजरामर चित्रपटाचं माहेरघर असं ते गाव. तो चित्रपट त्या गावात सगळा चित्रित झालेला. ‘साऊंड ऑफ म्युझिक’ची गावातली ओळख सांगायची म्हणजे गुलजारजींचा ‘परिचय’ ज्यावर बेतलेला आहे तो चित्रपट.
‘साऊंड ऑफ म्युझिक’च्या केंद्रस्थानी असलेलं ट्रॅप कुटुंब या ठिकाणी राहिलेलं. हे त्यांचं खरंखुरं घर. या चित्रपटाची नायिका मारिया हिच्या १९४९ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकावर आधी तिथं एक संगीतिका बनली. आणि तिच्यावर नंतर चित्रपट. तो आला साठच्या दशकात. म्हणजे आज त्याला साठ वर्षे झाली. म्हणजेच या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर किमान तीन ते चार पिढय़ा पडद्यासमोरनं गेल्या.
पण तरीही आजही तो चित्रपट देशोदेशींच्या अनेक पिढय़ांना असा गारूड केल्यासारखा भावतो हा अनुभव रोमांचकारी होता. कोण कुठली जोगीण मारिया, ती मुलं सांभाळायला कोणा धनवानाच्या घरी नोकरीला लागते. तो विधुर तिच्या प्रेमात पडतो. ही असली कहाणी बॉलीवूडच्या बालामृतावर पोसल्या गेलेल्या आपल्यासारख्यांना अजिबात नवीन नाही.
पण तिचा उगम हा साल्झबर्गजवळच्या त्या खेडय़ात आहे आणि तो खरा आहे. ते त्यांचं घर, मागचा ‘जिथे शांतता स्वत:च निवारा शोधत थकून’ येते तो तलाव हे सारं पाहताना ट्रॅप कुटुंबाची कथा माहीत होती. पण ती जगात इतक्या सगळ्यांना एकाच वेळी तितक्याच तीव्रतेनं भावते हा साक्षात्कार केवळ थक्क करणारा होता.
आमच्याबरोबर ती कथा पुन्हा नव्यानं सांगणारा स्थानिक हा जर्मन होता. ओट्टो विल्हेम की काही असं त्याचं नाव. वयानं साठीच्या पुढचे नक्की. पण चाळिशीचे वाटावेत असे. ते जर्मन पण बायको ऑस्ट्रियाची. त्यामुळे नोकरी इथं करायचे. पण राहायला पलीकडच्या जर्मनीत. रोज जाऊन-येऊन करतात ते. ते ऐकल्यावर आश्चर्य व्यक्त केलं तर त्यांनी मागे वळून बोट दाखवलं आणि म्हणाले तिथून जर्मनी सुरू होतं.. तासाभराचाही प्रवास नाही.
‘साऊंड ऑफ म्युझिक’मध्ये एक दृश्य आहे. स्वित्र्झलडची सीमा त्या घरापासनं हाताच्या अंतरावर आहे असं दाखवणारं. ओट्टोंना त्याबाबत विचारलं. त्या देशाची सीमा पण इतकी जवळ आहे का, हाच प्रश्न. ओट्टो नाही म्हणाले. तो देश इतका जवळ नाही, असं त्यांचं उत्तर. पण ते दिल्यावर त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक रॉबर्ट वाइज यांचा दाखला दिला. हा प्रश्न वाइज यांनाही विचारला गेला. कारण चित्रपटात दाखवलं गेलं आहे त्यापेक्षा वास्तव वेगळं आहे. तर त्यावर हॉलीवूडचा हा महान दिग्दर्शक उत्तरला- ‘ओह् लीव्ह इट. वुई इन हॉलीवूड क्रिएट अवर ओन जिऑग्राफी’.
ओट्टोंशी चित्रपटाच्या बारकाव्यांबाबत खूप गप्पा झाल्या. त्यांच्या मते त्यांनी हा चित्रपट किमान ५०-५५ वेळा तरी पाहिलाय.. एक वेळ जास्तही असेल पण कमी नाही. संपूर्ण ट्रॅप कुटुंबाचा इतिहास त्यांना तोंडपाठ आहे. हे सगळंच्या सगळं कुटुंब कसं कलासक्त होतं.. कॅप्टन ट्रॅप कसा जरा सर्किट होता.. वगैरे सगळं काही ते उत्साहानं सांगत होते. पण नंतर या कुटुंबाची काही काळ चांगलीच दशा झाली.
का?
त्यांनी हिटलरची चाकरी करायला नकार दिला म्हणून. त्याचा उल्लेख चित्रपटातही असल्याचं आठवत होतं. महायुद्ध सुरू होतं, त्याला सन्यात दाखल होण्याचा आदेश येतो वगैरे. त्या वेळी हिटलरनं ऑस्ट्रिया गिळंकृत केलेलं. त्यामुळे या प्रांतावरही त्याचाच अंमल. पण ट्रॅप कुटुंब त्याच्या दबावाखाली यायला नकार देतं. आणि आधी स्वित्र्झलड या देशात आणि नंतर अमेरिकेत ते निघून जातात.
या सगळ्या इतिहासाचा ओट्टो यांना कोण अभिमान. जणू काही ते त्याचे कोणी लागत होते. असा भरभरून ते हा इतिहास सांगत होते की ते ऐकताना आणि पाहताना इतिहास अधिक प्रेक्षणीय की यांचं सांगणं असा प्रश्न पडावा. ते ऐकताना मध्येच सहज त्यांना छेडलं. सासुरवाडीचे होते म्हणून इतकं कौतुक करत नाही ना, असं काही. तर ते छान हसले. सगळं सांगून झालं आणि मग म्हणाले.. किती उत्तम ते गायचे वगैरे सर्व काही ठीक. पण मला त्यांचा अभिमान दुसऱ्याच कारणासाठी आहे.
म्हटलं कोणत्या?
ओट्टो म्हणाले : त्यांनी आपल्यासमोर गावं अशी खुद्द हिटलरची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडलं. पण ट्रॅप एकदाही गायले नाहीत हिटलरसमोर. यू नीड टेरिफिक गट्स टु से नो टु हिटलर.
वाचल्याचं आठवत होतं की हिटलर संगीताचा शौकीन होता. त्याच्या बंकरमध्ये बिथोवेनच्या सिंफनीचा मोठा संग्रह होता आणि महायुद्धात नरसंहार जोमाने सुरू असतानाही तो दररोज सायंकाळी शास्त्रीय संगीत न चुकता ऐकत असे. हे विचारलं त्यांना. ते म्हणाले ते खरं आहे.. पण त्याच्या राजकारणाचा निषेध म्हणून ट्रॅप त्याच्यासमोर गायले नाहीत.
मी विचारलं : आता त्यांच्यापैकी कोणी राहातं का या घरात?
ओट्टोंचे डोळे चमकले. म्हणाले, आता इथे कोणी राहात नाही. सगळेच्या सगळे अमेरिकेत असतात. पण ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे की ते अजूनही गातात. त्यांचा वाद्यवृंद आहे. मध्यंतरी ते येऊन गेले इकडे गाण्याच्या कार्यक्रमाला. कसा झाला तो जलसा हे ते उत्साहात सांगत गेले.
जरा श्वास घेतला आणि म्हणाले : बघ. हिटलरचं काय झालं. पण ट्रॅप यांचं गाणं मात्र आजही टिकून आहे.