गिरीश कुबेर

व्लादिमीर पुतिन यांनी ‘मेमोरियल’ संस्थेवर गेल्या आठवडय़ात बंदी घातली. तिच्यातर्फे राष्ट्रविघातक कृत्यं होत असल्याचा ठपका ठेवला गेला..

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Ravindra Chavan responsibility BJP state president post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा

आंद्रे साखारॉव्ह हे नाव पहिल्यांदा वाचल्याचं आठवतंय गोविंदराव तळवलकरांच्या अग्रलेखात.१९७५ च्या सुमारासची, पाचवी-सहावीत असतानाची ही गोष्ट असावी. साखारॉव्ह यांना तेव्हा शांततेचं नोबेल जाहीर झालं होतं. पण सोव्हिएत रशियाचे राज्यकर्ते काही त्यांना ते स्वीकारण्यासाठी जाऊ देत नव्हते. नंतर गोविंदरावांनी ‘वाचता वाचता’ मधेही साखारॉव्ह यांच्यावर लिहिल्याचं आठवतंय. मग साखारॉव्ह यांच्याविषयी मिळेल ते वाचण्याचा छंद लागला. त्यांचं त्याच नावचं रिचर्ड लौरी यांनी लिहिलेलं चरित्रही संग्रही आहे. माझा आवडता पत्रकार, ‘लेनिन्स टूम्ब’चा लेखक, ‘न्यूयॉर्कर’चा संपादक डेव्हिड रॅम्निक म्हणतो त्याप्रमाणे अमेरिकेच्या इतिहासात जसं जेफर्सन अथवा अ‍ॅडम्स यांचं स्थान तसं रशियात साखारॉव्ह यांचं. पण अर्थातच अमेरिका जेफर्सन, अ‍ॅडम्स यांचं अमेरिकी असणं ज्याप्रमाणे मिरवते त्याच्या काही अंशानेही रशिया कधी साखारॉव्ह यांच्याविषयी काही बोलत नाही.  साखारॉव्ह रशियन क्रांती जेव्हा अगदी चार-पाच वर्षांची होती तेव्हा जन्मले. वडील स्थानिक शाळेत भौतिकशास्त्र शिकवायचे. आई गृहिणी. त्या वातावरणात शिकणं हा प्रकार घरच्या घरीच. म्हणजे आंद्रे याला शाळेचा आनंद मिळाला नाही. पण तरी तो अभ्यासात चांगलाच हुशार होता. नवव्या-दहाव्या वर्षीच त्याला आपल्या या हुशारीचा अंदाज आला. म्हणजे एकदा सांगितलं की लक्षात राहणं, गणिताकडे नुसतं पाहून त्याचं उत्तर सांगणं, गुंतागुंतीच्या समीकरणांची सहज उकल वगैरे. एखादी गोष्ट जमायला लागली की ती करण्यातला आनंद वाढतो. आपल्या शाळेत नेमकं हेच होत नाही. त्यामुळे अभ्यासाची गोडी वगैरे फारच लांबची बात. शाळेविषयी घृणाच निर्माण होते. पण आंद्रेचं असं झालं नाही. भाग्यवान म्हणायचा. एकतर शाळेशी संपर्क आला नाही आणि वडील घरच्या घरी शिकवणारे. यातून त्याच्या विचारांचा आवाका असा काही तयार झाला की अवघ्या १३ व्या वर्षी या पठ्ठय़ानं जाहीर करून टाकलं: आजपासून मी नास्तिक. याची तुलना अगदी पौंगडावस्थीय वयात आपल्या मातृभूमीचं, म्हणजे जर्मनीचं, नागरिकत्व सोडून देणाऱ्या आईनस्टाईनशी होईल. आपले सत्ताधीश अतिरेकी राष्ट्रवादी- म्हणजे फॅसिस्ट- आहेत याची जाणीव आईनस्टाईनला त्या वयात झाली होती. असो. तर तरुण आंद्रेचं पुढे महाविद्यालयात भौतिकशास्त्र शिकणं वगैरे ओघानं आलंच. मग प्रवास संशोधनाकडे. सोव्हिएत रशियन सरकारच्या प्रमुख प्रयोगशाळेत प्रवेश. हा काळ दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं तो. हिरोशिमा-नागासाकीवर अमेरिकी अणुबॉम्ब पडून गेले होते. साखाराव्ह यांचा हाच संशोधनाचा विषय. त्यांनी नवनव्या पध्दतीनं अणुबॉम्बचं तंत्र विकसित केलं. अणु दुभागून (फिशन) आणि दोघांना एकत्र आणून (फ्यूजन) अशा दोन्ही पध्दतीनं आणि मग पुढे मिश्र पध्दतीनं त्यांनी अणुबॉम्ब बनवण्याचा मार्ग दाखवला. रशियानं हैड्रोजन बॉम्बही बनवला. त्याचं जनकत्व साखारॉव्ह यांच्याकडे जातं.

एका बाजूला हे संशोधन सुरू होतं तरी त्यांना अमेरिकेशी सुरू असलेलं सोव्हिएत रशियाचं शीतयुद्ध काही मंजूर नव्हतं. स्टालिनचा काळ रशियानं अनुभवला होता. लाखो रशियनांचं शिरकाण, त्याच्या आठवणी अजूनही ताज्या होत्या. ख्रुश्चेव्ह यांच्या काळात परिस्थिती बदलेल अशी आशा होती. अशी परिस्थिती बदलणं म्हणजे मोकळेपणा येणं. वातावरणात मोकळेपणा असल्याखेरीज कोणत्याही देशाची प्रगती होऊ शकत नाही, असं साखारॉव्ह मानत. त्यामुळे त्यांना अमेरिकेशी आपल्या देशाचं घर्षण आवडत नसे. त्यात अशाच मताचा त्यांचा एक शास्त्रज्ञ मित्र अचानक ‘गायब’ झाला. तेव्हाच्या सोव्हिएत रशियात असा एखादा गायब झाला की त्याचे कुटुंबीय त्याची तसबीर भिंतीवर डकवून द्यायचे. कारण हा पुन्हा कधीही दिसणार नाही, याची सर्वानाच खात्री होती. आपल्या मित्राचं त्यामुळे काय झालं असेल हे साखारॉव्ह यांना लगेच लक्षात आलं. सरकारविरोधात त्यांची भूमिका ताठर होऊ लागली. साहजिकच सरकारही साखारॉव्ह यांच्याकडे संशयिन नजरेनं पाहू लागलं. त्यांच्या मागे गुप्त पोलीस लावले गेले. त्यांच्यावर हेरगिरी होऊ लागली. साखारॉव्ह बधले नाहीत. त्यांनी शीतयुद्धाला विरोध करण्याबरोबर मानवाधिकार, लोकशाही हक्क वगैरे मुद्दे उपस्थित करायला सुरुवात केली. त्यांच्या घराचे दरवाजे रशियातल्या पाश्चात्त्य पत्रकारांसाठी नेहमीच उघडे असायचे. साखारॉव्ह पत्रकार परिषदा घेऊन आपल्याच सरकारवर टीका करायचे. अर्थातच पाश्त्त्त्य देशांत, विशेषत: अमेरिकेत, त्याला भरपूर प्रसिद्धी मिळायची. कल्पना करा – शीतयुद्ध ऐन भरात असताना रशियात वास्तव्याला असणारा एक मोठा शास्त्रज्ञ मायभूविरोधात एकापेक्षा एक बॉम्बगोळे टाकतोय ! रशियन राज्यकत्र्यांना हे सहन होणं अशक्य होतं. ही टीका इतकी जिव्हारी लागायची की युरी आंद्रेपॉव्ह (नंतर ते ‘अध्यक्ष’ही झाले) हे जेव्हा ‘केजीबी’चे प्रमुख होते तेव्हा त्यांनी जाहीरपणे साखारॉव्ह यांचं वर्णन केलं: हा सोव्हिएत  रशियाचा सर्वात मोठा, धोकादायक देशांतर्गत शत्रू!

म्हणजे अर्बन नक्षल !

तर साखारॉव्ह यांना असं शहरी नक्षल ठरवून त्यांची गठडी वळली गेली. त्यांना विजनवासात पाठवलं गेलं. त्यांनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ला लेख लिहून आपली भूमिका मांडली. मग तर काय सरकार पिसाळलंच. त्यांना स्थानबद्ध केलं गेलं आणि दूर, गॉर्की नावाच्या गावात, जिथे सुरक्षा यंत्रणा सोडल्या तर कोणालाही प्रवेश नव्हता, अशा गावात डांबून ठेवलं गेलं. अर्थातच त्यांच्याकडनं वैज्ञानिक संशोधनासंदर्भातली सगळी कामं काढून घेतली गेली. साखारॉव्ह यांचा आंतरखंडीय क्षेपणास्त्रांना विरोध होता. या मुद्दय़ावर रशियानं अमेरिकेशी सहकार्य करायला हवं असं त्याचं म्हणणं. हे म्हणजे अब्रह्मण्यमच की! वैज्ञानिक म्हणून साखारॉव्ह इतके द्रष्टे होते की सत्तरीच्या दशकात अगदी सुरुवातीलाच त्यांनी संगणकांचं जाळं कसं विकसित होईल, यावर भाष्य केलं होतं. (पुढे १९८९ साली इंटरनेटच्या रूपानं ते खरं ठरलं) पण रशियन सरकारला त्याची काहीही चाड नव्हती. त्यांच्या वैज्ञानिक महत्तेकडे रशियानं दुर्लक्षच केलं. का? तर भिन्न राजकीय विचार!

 त्यात त्यांना ७५ साली शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं. शांततेचं अशासाठी की साम्यवादी रशियात मानवाधिकाराचा मुद्दा मांडणं, त्यासाठी लढणं म्हणजे फारच शौर्य झालं. पण तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी काही त्यांना सरकारनं जाऊ दिलं नाही. त्यांची पत्नी गेली. तिनं साखारॉव्ह यांचं भाषण वाचून दाखवलं. एका उच्च दर्जाच्या विज्ञानचिंतकांचे हे विचार आजही वाचले जातात. नंतर बायको आजारी पडली. तिच्यावर अमेरिकेत शस्त्रक्रिया करायची होती. पण तिलाही जाऊ दिलं नाही. पण साखारॉव्ह ठाम. त्यांनी सरकारविरोधात उघड बंडच सुरू केलं. रशियाच्या अफगाणिस्तानातल्या घुसखोरीविरोधात ते उभे राहिले. त्यांच्या संघर्षांला जवळपास १५ वर्ष झाली. पुष्किनप्रेमी साखारॉव्ह यांनी त्याच्या एका स्वातंर्त्य हुंकाराच्या कवितेचं जाहीर वाचन करून आपली भूमिका आणि ती जगण्याचा मार्ग निश्चित केला होता. त्यावरून ते जराही ढळले नाहीत. अखेर साम्यवादाचा अंत झाला, रशियात मिखाईल गोर्बाचोव यांच्या ‘पेरिस्त्रोयका’ आणि ‘ग्लासनोस्त’नं परिवर्तन झालं आणि अखेर खुद्द गोर्बाचोव यांनी या विज्ञानपंडितास फोन करून ‘‘तुम्ही सपत्नीक मॉस्कोला येऊ शकता.. तुम्ही आता स्वतंत्र आहात.. ’’ हे कळवलं.

साखारॉव्ह मॉस्कोला आले. आता त्यांना मानवाधिकार वगैरे मुद्दे सहजपणे घेता येणार होते. आपला देश खरा लोकशाहीवादी बनावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी एक प्रकल्प हाती घेतला. स्वयंसेवी संस्था स्थापन केली. ‘मेमोरियल’ नावाची. याअंतर्गत स्टालीनच्या काळात, साम्यवादी राजवटीत झालेल्या अत्याचारांचं, मारल्या गेलेल्यांचं संकलन सुरू आहे. त्या कामात गर्क असताना, एका आंतराराष्ट्रीय भाषणाच्या तयारीत असतानाच १९८९ साली साखारॉव्ह गेले.

पण ‘मेमोरियल’च्या रूपानं त्यांचं अस्तित्व होतं.  गेल्या आठवडय़ात व्लादिमीर पुतिन यांनी ‘मेमोरियल’वर बंदी घातली. तिच्यातर्फे राष्ट्रविघातक कृत्यं होत असल्याचा ठपका ठेवला गेला.

तात्पर्य: स्टालीन असो की पुतिन आणि रशिया असो की अन्य कोणी देश. राज्यकर्त्यांच्या मनातील बंदीच्या प्रेरणा समान असतात.

ता.क. : त्याच आठवडय़ात युरोपीय संसदेचं साखारॉव्ह स्मृती पारितोषिक कडवे पुतिनविरोधक अ‍ॅलेक्सी नोव्होल्नी यांना जाहीर झालं. ते स्वीकारण्यासाठी तुरुंगात असलेल्या नोव्होल्नी यांना पुतिन सरकारनं परवानगी नाकारली. त्यांच्या मुलीनं हे पारितोषिक स्वीकारताना, रशियात तुरुंगात असलेल्या वडिलांच्या वतीनं प्रतिक्रिया व्यक्त केली. नोव्होल्नी त्या भाषणात म्हणाले : आज ना उद्या साखारॉव्ह यांच्या स्वप्नातला रशिया खरोखरच अस्तित्वात येईल. आपण प्रयत्न सुरू ठेवायला हवेत.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

Story img Loader