ब्रिटनमधील बुद्धिजीवी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा नेहमीच आदर करतो. त्यावर कोणताही काच असता कामा नये, असं हा समाज मानतो. नुसतंच मानतो असं नाही तर या तत्त्वाचं तो पालन करतो. पण आता आपली ही मतं बदलावी लागतायत की काय, असा प्रश्न या समाजाला पडलाय..
‘‘शिक्षणाचा उपयोग काय? आपण कशासाठी शिकायचे? या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर लक्षात घ्या, खरे शिक्षण सुखकारक नसते. आपल्याला अमान्य असणाऱ्या, आव्हान देणाऱ्या विचारांना सामोरे जायला शिकवते ते खरे शिक्षण. हे विचार आपल्याला का मान्य नाहीत, याची तर्कशुद्ध मांडणी आणि कारणमीमांसा करायला शिकवते ते शिक्षण. अशा तर्कशुद्ध युक्तिवादातून आपल्या विचाराच्या विरोधात विचार असलेल्याचे मतपरिवर्तन करायला शिकवते ते शिक्षण आणि या प्रक्रियेत समोरच्याचे विचार पटले तर स्वत:चे मत बदलण्याइतका मनाचा मोठेपणा दाखवायला शिकवते ते शिक्षण.. ही प्रक्रिया क्लेशकारक असते. पण नक्कीच खरे काही तरी शिकवणारी असते..
लुईस रिचर्डसन या बाईंचे हे मत आहे. त्या राज्यशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक आहेत. पण हे मत त्यांनी मांडलं ते काही त्यांच्या विषयाच्या अनुषंगाने नाही. तर दोन आठवडय़ांपूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या हे असं म्हणाल्या. विद्यार्थ्यांना उद्देशून काही बोलावं असं त्यांना वाटलं कारण प्रख्यात ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या या विचारस्वातंत्र्याची आणि शिक्षणाची महती सांगणाऱ्या भाषणास दोन कारणांची पाश्र्वभूमी आहे. एक तात्कालिक. आणि दुसरे गेले वर्षभर धुसफुसत राहिलेले.
प्रथम तात्कालिकाविषयी. या विश्वविद्यालयाच्या ओरायल महाविद्यालयाच्या ऱ्होड्स इमारतीच्या दर्शनी भागात एक पुतळा आहे. सेसिल ऱ्होड्स यांचा. सेसिल ऱ्होड्स हे याच महाविद्यालयाचे विद्यार्थी. खाणसम्राट, व्यापारी आणि नंतर राजकारणी. पण हे शेवटचे त्यांचे तीन गुण दिसले ते दक्षिण आफ्रिकेत. तिथल्याच केप कॉलनीचे ते पंतप्रधान होते १८९० ते १८९६ या काळात. प्रचंड यशस्वी ऱ्होड्स हे ब्रिटनसाठी साम्राज्यवादाच्या तेजाचे प्रतीक आहेत तर दक्षिण आफ्रिकेसाठी ते आहेत मूíतमंत शोषक. त्यामुळे ऑक्सफर्डमधल्या दक्षिण आफ्रिकेच्या विद्यार्थ्यांनी मोहीम हाती घेतलीये. ऱ्होड्स यांचा पुतळा पाडा. खरं तर या मोहिमेचे नेतृत्व करणारा विद्यार्थी हा ऱ्होड्स शिष्यवृत्तीचा लाभार्थी आहे. ऱ्होड्स यांनी दिलेल्या देणग्यांच्या आधारे शेकडो विद्यार्थी आज जगातल्या उत्तम विद्यापीठांत उच्च शिक्षण घेतायत. हा त्यातलाच. पण आता तो ऱ्होड्स यांचा पुतळा पाडा या मोहिमेचं नेतृत्व करतोय. त्याचं म्हणणं दक्षिण आफ्रिकेतल्या हजारो जणांसाठी ऱ्होड्स हे अन्यायाचं, शोषणाचं प्रतीक आहेत. त्यांचा पुतळा पाहून आम्हाला आमच्या लुटीची आठवण होते, तेव्हा तो हटवा.
इंग्लंडमधलं शहाणं मत या वादात दुभंगलंय. एका बाजूचे म्हणतायत, या पोराचा काय संबंध.. त्रास होतो तर बघू नको पुतळा. दुसऱ्या बाजूचे..ज्यात आशियाई, आफ्रिकी यांचा जास्त भरणा आहे.. त्यांचं म्हणणं अर्थातच उलटं आहे. ते पुतळा हटवावा या मताचे आहेत. हे झालं तात्कालिक कारण.
इंग्लंडातल्या शिक्षणविश्वात दुसरा धुमसता मुद्दा आहे तो केट स्मर्टवेट या एकपात्री विनोदी कलाकारासंदर्भात. तिचा लंडन विद्यापीठातला कार्यक्रम गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अचानक रद्द केला गेला. का? तर ती मुसलमान महिलांना बुरख्यात ठेवण्याच्या प्रथेची आणि वेश्यागमनाची खिल्ली उडवते म्हणून. तिला महिला वा पुरुषांचा शरीरविक्रयाचा अधिकार मान्य आहे. परंतु पशासाठी देहविक्रय करावं लागणं तिला अमान्य आहे. त्याचप्रमाणे या व्यवसायाभोवती जे गुन्हेगारीचं वलय आहे त्याचीही ती टर उडवते.
वरवर पाहता ही कारणं काही तिचा कार्यक्रम रद्द करावा लागावा इतकी तीव्र वा नाजुक नाहीत. परंतु विद्यापीठातल्या उच्चपदस्थांना ती तशी वाटली. कारण विद्यापीठातल्या उजव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी तिच्याविषयी आक्षेप नोंदवायला सुरुवात केली म्हणून. मग विद्यापीठानं जनमत घेतलं. बहुतांश विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या बाजूनेच कौल दिला. पण मूठभर म्हणाले हा कार्यक्रम आमच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. तरीही तुम्ही तो केलात तर आम्ही तो उधळून लावू.
या छोटय़ाशा कारणावरनं वातावरण इतकं तापतंय असं लक्षात आल्यावर विद्यापीठानं तो कार्यक्रमच रद्द केला. साहजिकच त्यावर टीकेची झोड उठली. त्यावर विद्यापीठाचा खुलासा आला. ‘‘हा कार्यक्रम आम्हाला आमच्या ‘सुरक्षित पस’ धोरणाला आव्हान देणारा वाटला, म्हणून आम्ही तो रद्द केला.’’ आता सुरक्षित पस म्हणजे काय?
तर असा अवकाश की जिथे कोणीही कोणाच्या धार्मिक, सामाजिक, वांशिक, वर्णीय इतकंच काय तर राजकीय भावनादेखील दुखावणार नाही, अशी अवस्था. म्हणजे कोणीही कोणाविरुद्ध काहीच बोलणार नाही. म्हणजेच सगळेच्या सगळे गप्प बसण्यात आनंद मानतील. यावर प्रश्न असा की लोकशाहीत असा अवकाश, अशी परिस्थिती असावी का?
नेमका हाच प्रश्न ब्रिटिश बुद्धिजीवींना सध्या भेडसावतोय. वास्तविक अशा सर्वच बुद्धिजीवींना या प्रश्नाचं उत्तर माहितीये. ते म्हणजे नाही. विचारस्वातंत्र्याचा पराकोटीचा आग्रह धरणाऱ्या आणि त्यांचं रक्षण, आदर करणाऱ्या या समाजाला विचारस्वातंत्र्यावर अशी कोणतीही बंधनं नकोयत. कोणताही काच व्यक्तीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर असता नये, असं हा समाज मानतो. नुसतंच मानतो असं नाही तर या तत्त्वाचं तो पालन करतो. पण आता आपली ही मतं बदलावी लागतायत की काय, असा प्रश्न या समाजाला पडलाय. आणि या प्रश्नाची व्याप्ती फक्त काही ब्रिटनपुरतीच मर्यादित नाही. संपूर्ण युरोप ते अमेरिका या प्रदेशांतील विचारीजन जे काही होतंय त्यानं अवाक झालेत.
उजवी, धार्मिक विचारसरणी या सगळ्यामागे आहे, असं या सगळ्यांचं विचारांती, पाहणीअंती ठाम मत झालेलं आहे. अतिरेक धर्मविचार हा विचारस्वातंत्र्याच्या मुळावर अशा तऱ्हेनं आलाय असं त्यांचं निरीक्षण आहे. या सगळ्यांचं म्हणणं इतकंच की व्यक्तीनं व्यक्तिगत पातळीवर हवं तितकं धार्मिक व्हावं, धर्मसंकेत पाळावेत पण त्यामुळे इतरांच्या विचारस्वातंत्र्यावर बंधनं यायला नकोत. पण दुर्दैवानं ती येताना दिसतात. ब्रिटनमधल्या काही महत्त्वाची विद्यापीठे या उजव्यांच्या दबावाखाली येतायत.
तो झुगारून देण्यासाठी इंग्लंडातल्या २४ कुलगुरूंनी लंडनच्या टाइम्समध्ये सामूहिक आवाहन प्रसिद्ध केलं. ‘‘विद्यापीठ हे मुक्त विचारांची गंगोत्री असते. ती तशीच राहायला हवी. येथे कोणत्याही युक्तिवादाचा प्रतिवाद युक्तिवादानेच व्हायला हवा. तो करताना विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण वा सुडाची भीती असणार नाही, याची हमी आपल्याला द्यायला हवी. या अशा वैचारिक मुक्ततेस विरोध करणाऱ्यांनाही विचाराने आणि युक्तिवादानेच उघडे पाडावयास हवे. वैचारिक बंधने आम्हाला मंजूर नाहीत.’’
या सगळ्यावर ‘अ‍ॅकॅडमिक फ्रीडम इन अ‍ॅन एज ऑफ कॉन्फॉर्मिटी’ या पुस्तकाची लेखिका जोआन विल्यम्स हिनं मत नोंदवलं : ‘‘विद्यार्थ्यांना वैचारिकदृष्टय़ा धडधाकट बनवण्याऐवजी आजची व्यवस्था त्यांना शिकवते शब्द, भाषा, विचार हे स्फोटक असतात. सबब ते दाबूनच टाका.’’
ओळखीचं वाटतंय हे?
हे अशा देशात घडतंय की ज्यानं देशद्रोहाचा कायदाच घटनेतनं काढून टाकलाय. तिथे तसं असेल तर आपल्याला सुरेश भटांचा..जे कधीच नव्हते त्याची आस का धरावी.. असा प्रश्न पडत असेल तर ठीकच म्हणायचं.
girish.kuber@expressindia.com
twitter: @girishkuber

Story img Loader