आधुनिक इतिहासात याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ती काही साधीसुधी मोहीम नव्हती. साधारण एक वर्षभर त्याची तयारी सुरू  होती. इतकी तयारी करायला लागावी असं त्यात काय होतं?

इतिहास माहीत असणं तसं केव्हाही चांगलंच. उच्च पदावरच्यांना तर तो माहीत हवाच हवा. आणि इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या नाहीत. तर त्याच्या पुढचे मागचे संदर्भ, त्याचा अर्थ आणि मुख्य म्हणजे त्या इतिहासाचा धडा असं सगळंच माहीत असावं लागतं. मग त्याची उदात्तता लक्षात येते आणि आपण तिच्यात कशी भर घालू शकतो, हेदेखील लक्षात येतं.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

विसाव्या शतकातील एका अशा देदीप्यमान इतिहासाला या आठवडय़ात उजाळा मिळाला. इतिहासाच्या या सोनेरी पानावर किती चित्रपट निघाले असतील, किती लेखकांनी या इतिहासाची भव्यता आपल्या प्रतिभेच्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला असेल याची गणतीच नाही. आज ७५ वर्षांनतरही हा इतिहास अनेकांना खुणावत असतो.

इतिहासाचे हे झळाळते पान म्हणजे नॉर्मंडी लँडिंग. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या जर्मन सैन्याच्या पराभवाची सुरुवात ज्या क्षणापासून झाली, तो क्षण. ६ जून १९४४ या दिवशी युरोपातील या नॉर्मंडी इथं दोस्त राष्ट्रांच्या सैन्यानं अनेक अंगांनी हिटलरच्या सैन्यावर हल्लाबोल केला.

या ऐतिहासिक युद्धाचा ७५वा वर्धापन दिन गुरुवारी युरोपात मोठय़ा धीरगांभीर्याने साजरा झाला. इंग्लंडच्या राणी, पंतप्रधान थेरेसा मे, फ्रान्सचे अध्यक्ष  इम्यानुएल मॅक्रॉन, अन्य १५ देशांचे प्रमुख आणि मुख्य म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या समारंभास हजर होते. या युद्धात भाग घेतलेले आणि अजून हयात असलेल्या काही सैनिकांना त्यासाठी मानानं बोलावण्यात आलेलं होतं. ते साहजिकच हा दिवस पाहू शकल्याबद्दल गहिवरलेले होते. त्यात ब्रिटिश पंतप्रधान मे यांनी एका लष्करी अधिकाऱ्यानं आपल्या पत्नीला लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं. हा अधिकारी त्या युद्धात होता आणि पत्नीला लिहिलेलं पत्र तिच्या हाती पडायच्या आत मारला गेला. हजारोंनी या युद्धात जीव गमावले.

आधुनिक इतिहासात या युद्धाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते काही साधंसुधं युद्ध नव्हतं. साधारण एक वर्षभर त्याची तयारी सुरू होती. इतकी तयारी करायला लागावी असं त्यात काय होतं? या युद्धाचं एक वैशिष्टय़ म्हणजे हवा, पाणी आणि जमीन अशा तीनही आघाडय़ांवर ते लढलं गेलं. अशा पद्धतीनं लढलं गेलेलं ते पहिलंच युद्ध.

ऑपरेशन ओव्हरलॉर्ड हे त्याचं सांकेतिक नाव. ते ज्या बेटांवर लढलं जाणार होतं त्या बेटांनाही सांकेतिक नावं दिली गेली होती. ऊता, ओमाहा, गोल्ड, जुनो आणि स्वोर्ड ही त्या बेटांची नावं. पण हे पण या युद्धाचं वेगळेपण नाही.

तर ते आहे त्याच्या योजनेत आणि अंमलबजावणीत. म्हणजे त्याच्या व्यापकतेत आणि त्याच्या जागतिक परिमाणात. युद्ध होणार होतं युरोपियन भूमीवर, युरोपला प्रामुख्याने हिटलरच्या तावडीतून सोडवण्यासाठी. पण ते लादलं अमेरिका कॅनडा आणि फ्रान्स यांनी. प्रामुख्याने या तीन देशांच्या फौजा या युद्धात फ्रान्सच्या भूमीवर लढल्या. ६ जूनला सकाळी साडेसहा वाजता जवळपास २४ हजार पॅराट्रपर्स पहिल्यांदा शत्रुरेषेपल्याड उतरले. मग जर्मन फौजांचं लक्ष विचलित करण्यासठी नॉर्मंडी बेटांवर समोरून हल्ला केला गेला. दुसरीकडे त्याच वेळी जर्मन फौजांवर तब्बल १३ हजार इतके प्रचंड संख्येने बाँब फेकले गेले. आठच्या सुमारास कॅनडाच्या २१ हजार फौजा युद्धात उतरल्या. आणि पाचव्या बेटावर इंग्लंडने आपले २९ हजार सैनिक उतरवले. मध्यरात्रीपर्यंत सर्व फौजांनी आपापल्या आघाडय़ा सुरक्षित केल्या. पण अर्थातच हे वाटतं तितकं सहज झालं नाही. प्रचंड मनुष्यहानी झाली. जवळपास ७ हजार बोटींचा सहभाग होता या कारवाईत.

यातला धक्कादायक भाग म्हणजे सर्वाधिक नुकसान झाले ते अमेरिकी फौजांचे. अमेरिकी फौजा ओमाह बेटावर उतरणार होत्या. पण तिथे बेटावर पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की अमेरिकी फौजांना घेऊन येणाऱ्या बोटी किनाऱ्यावर लागूच शकत नव्हत्या. खूप झगडावे लागत होते त्यांना. त्यामुळे अमेरिकी जवान टिपणे जर्मन सैनिकांना सहज शक्य झाले. मोठय़ा प्रमाणावर अमेरिकी जवान मारले गेले.

नेमका याचाच दाखला फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी आपल्या भाषणात दिला. या इतिहासाची जाणीव का हवी हा मुद्दा इथून पुढे सुरू होतो. सुरुवातीला मॅक्रॉन यांनी अमेरिकेचे आभार मानले. ते मानताना अमेरिकेमुळे युरोप कसा वाचला, अमेरिका नसती तर हे संकट झेलणे युरोपला कसे अवघड गेले असते वगैरे वगैरे मुद्दे मॅक्रॉन यांनी मांडले. आणि मग शांतपणे मान मागे करून, व्यासपीठावर असलेल्या ट्रम्प यांच्याकडे पाहून त्यांनी विचारलं : प्रिय डोनाल्ड ट्रम्प.. अमेरिका नावाचा देश महान कधी होतो?

असा प्रश्न विचारून मॅक्रॉन यांनीच त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली : तर तो देश जेव्हा इतरांच्या स्वातंत्र्य या एका मूल्यासाठी उभा राहतो. त्याचं रक्षण करण्यासाठी त्यांना तो मदत करतो. जेव्हा स्वातंत्र्य या मूल्यासाठी अमेरिका उभी राहते, तेव्हा त्या देशाइतका सुंदर देश नसेल. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी फ्रान्स या स्वातंत्र्यरक्षणासाठी अमेरिकेच्या मदतीस गेला. त्यानंतर नॉर्मंडीच्या युद्धात अमेरिका फ्रान्सच्या मदतीसाठी धावला. फ्रान्स अमेरिकेचा ऋणी राहील. त्या वेळी आमच्यात जे मूल्य केवळ अमेरिकेमुळे रुजले, त्याच्या रक्षणासाठी आता आपण सगळ्यांनी उभे राहण्याची गरज आहे. ते मूल्य म्हणजे अर्थातच स्वातंत्र्य.

याचा संदर्भ काय?

तर ट्रम्प यांची अलीकडची संकुचित भूमिका. त्याचा कोणताही उल्लेख मॅक्रॉन यांनी केला नाही. पण ते फक्त इतकंच म्हणाले : अमेरिकेने घालून दिलेल्या मार्गावर पुढे युरोपची वाटचाल होत राहिली. त्यातूनच युरो आणि युरोपीय समुदाय यांचा जन्म झाला. स्वातंत्र्य आणि लोकशाही या मूल्यांच्या रक्षणासाठी युरोपीय समुदाय अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून उभा असेल. मिस्टर ट्रम्प, तुम्ही फक्त इतकंच करायचं. नॉर्मंडी युद्धातील मूल्यांची ज्योत पेटती ठेवायची..

विजेचा धक्का बसावा अशी प्रतिक्रिया होती अनेकांची. ट्रम्प यांच्यासमोर, १७ हजार उपस्थित आणि १५ देशांचे प्रमुख यांच्या समोर ट्रम्प यांना असं  कोणी सुनावेल अशी शक्यताही कोणी वर्तवली नसती.

तेदेखील ट्रम्प चीन, इराण आणि मेक्सिको अशा देशांना नवनव्या धमक्या देत असताना. त्यांच्या या वर्तनामुळे नव्या व्यापारयुद्धाचा धोका निर्माण झाला असून ते जागतिक अर्थव्यवस्थेवरील संकट मानले जाते. हे सारे केवळ ट्रम्प यांच्या संरक्षणवादी, संकुचित भूमिकेमुळे.

ज्या अमेरिकेमुळे जगाला जागतिकीकरण कळलं, ज्या अमेरिकेमुळे देशोदेशांत मुक्त आर्थिक वारे वाहू लागले, ज्या अमेरिकेमुळे देशोदेशांतील भिंती कोसळायला सुरुवात झाली त्या अमेरिकेला या मूल्यांची आठवण फ्रान्ससारख्या देशानं करून द्यावी यापरतं दुर्दैव ते काय?

कार्यक्रम संपला.. आणि ट्रम्प यांनी आपल्याच देशातले डेमोकॅट्र्स किती नालायक आहेत वगैरे सांगणारा ट्वीट केला आणि मेक्सिको देशावर लादायच्या नव्या र्निबधांचं सूतोवाच केलं.

हाच तो क्षण कालाय तस्मै नम: .. असं म्हणायचा..

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

Story img Loader