गिरीश कुबेर
पक्ष्यांत पेंग्विनची म्हणून एक गंमत आहे. लहान मुली भातुकली खेळताना आजीचा चष्मा वगैरे लावून, हात मागे कमरेवर ठेवून चालताना जशा मोहक दिसतील तसे पेंग्विन दिसतात.. त्यापैकी सगळ्यात छोटे पेंग्विन हे ऑस्ट्रेलियाच्या त्या एका बेटावर राहतात..
फक्त काळ्या पांढऱ्याचीच सवय लागली की पंचाईत होते. सगळी विभागणी द्वंद्वातच. चांगला विरुद्ध वाईट. दुष्ट विरुद्ध सुष्ट. नायक वि. खलनायक. देव वि. दानव. विकास वि. पर्यावरण वगैरे वगैरे. बाकी ठीक. पण यातल्या शेवटच्या द्वंद्वाने आपलं खूप नुकसान केलंय. ताजा संदर्भ म्हणजे मुंबईतला आरे वाद. मेट्रो आणि झाडं हे काही एकमेकांचा पर्याय असू शकत नाहीत. म्हणजे ज्यांना मेट्रो हवी त्यांना झाडं नकोशी आहेत असं काही नाही आणि झाडावर प्रेम करणारे मेट्रोचे विरोधक आहेत, असं नाही. पण असा समज पसरलेला दिसतो, हे खरं. एका अर्थी हे समाजाच्या अप्रौढतेचंच लक्षण.
विकासवादी न्यूयॉर्क, लंडन, बर्लिनची उदाहरणे देतात. ती योग्यच. पण आज जगातलं उत्तम शहरी जंगल हे न्यूयॉर्कमध्ये आहे. जगातलं सगळ्यात घनदाट शहरी जंगल बर्लिनमधे आहे. पिंजऱ्याविना पक्ष्यांना सांभाळणारे उत्तम उद्यान लंडनमध्ये.. अगदी लॉर्ड्स स्टेडियमच्या जवळ आहे. (लॉर्ड स्वराज पॉल यांच्या देणगीतनं ते साकार झालंय. या उद्योगपतींना भारतातल्या अभयारण्य, बागा यासाठी देणग्या द्याव्याशा का वाटत नाहीत, हा प्रश्नच आहे). आणि या सगळ्यात लाजिरवाणी बाब म्हणजे न्यूयॉर्कपेक्षा चारपट मोठं जंगल हे आपल्या एका शहरात आहे.. की होतं?
मुंबई हे त्या शहराचं नाव. कोणत्याही मेट्रो वगैरे प्रकल्पाशिवाय आपण उत्तमपणे त्या जंगलाची वाट लावत आणली आहे. त्या बोरिवली राष्ट्रीय उद्यानातल्या झाडाप्राण्यांसाठी पर्यावरणवाद्यांच्या पोटात फार काही वेदना झाल्याचं ऐकिवात नाही. ठाण्याच्या कोणा मॉलमधे किंवा रस्त्यावर, ताडोबा परिसरातल्या रस्त्यांवर भांबावलेले, वाट चुकलेले बिबटे, हताश हरणं दिसली की खरं तर आपल्या माणूसपणाचीच लाज वाटते.
अशा वेळी उत्तम विकसित देशातलं हे उदाहरण मनात हिरवळ फुलवतं.
घटना आहे ऑस्ट्रेलिया या देशातली. दक्षिण ऑस्ट्रेलियातल्या फिलिप आयलंडमधली. मेलबर्नच्या दक्षिणेवर साधारण ८० किमीवर हे बेट आहे. तिथं ही घटना घडली. अगदी अलीकडे जागतिक स्तरावर त्याची वाच्यता झाली आणि त्या सरकारवर कौतुकाचा वर्षांव सुरू झाला.
त्या बेटाचं वैशिष्टय़ म्हणजे जगातलं सगळ्यात इवलेसे पेंग्विन त्या बेटावर राहतात. इवलेसे म्हणजे किती तर जास्तीत जास्त फूटभर इतकीच त्यांची उंची असू शकते. मुळात पेंग्विन हा पक्षी जात्याच निरागस. तसे सगळेच पक्षीप्राणी कमालीचे गोडच असतात. पण पक्ष्यांत पेंग्विनची म्हणून एक गंमत आहे. लहान मुली भातुकली खेळताना आजीचा चष्मा वगैरे लावून, हात मागे कमरेवर ठेवून चालताना जशा मोहक दिसतील तसे पेंग्विन दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर कायम आपला ‘मला कळलंय सगळं, विचार करतोय मी आता’ असा भाव असतो. ते पाण्याच्या दिशेला सरळ चालत जातात आणि पाणी पायाला लागलं की त्यांचा सारा मोठेपणा गळून पडतो. मग बदकन ते पाण्यात झोकून देतात स्वत:ला. असे हे पेंग्विन.
त्यातले सगळ्यात छोटे त्या बेटावर राहतात. त्या परिसरातल्या लहानग्यांना घेऊन पिढय़ानपिढय़ा आईवडिलांचा संध्याकाळचा एकच कार्यक्रम. आपल्या मुलाबाळांना, नातवांना वगैरे घेऊन दिवेलागणीच्या वेळेस या बेटावर जायचं. समोरच्याच समुद्रात सूर्य बुडला की त्याच समुद्रात डुंबणाऱ्या पेंग्विन्सना कळतं. आपली घरी जायची वेळ आली. त्यांचे आईबाबा म्हणजे श्री व सौ पेंग्विन ‘दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर.. या पेंग्विननो परत फिरा रे..’ असं गाणं वगैरे काही म्हणत नाहीत. कारण तेही पाण्यातच असतात चि. पेंग्विनांबरोबर. पण संध्याकाळ झाली की हे सर्व पाण्याबाहेर येतात आणि आपल्या जमिनीवरच्या घराकडे मोठय़ा शिस्तीने जातात. ही त्यांची पेंग्विनधुळीची परतणी पाहत पाहत ऑस्ट्रेलियातल्या त्या बेटाच्या परिसरातल्या कित्येक पिढय़ा मोठय़ा झाल्या.
पाहता पाहता या पेंग्विनपरतणीचा लौकिक ऑस्ट्रेलिया देशभरात आणि नंतर जगभरात पोहोचला. पर्यटकांचे जथेच्या जथे हे दृश्य आधी डोळ्यात आणि मग कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी त्या बेटावर थडकू लागले. त्या परिसराची अर्थव्यवस्था सुधारली. अनेकांना बेस्ट पेंग्विन वू पॉइंट्स वगैरे विकसित केले. काहीही न करता पेंग्विनच्या जिवावर या सगळ्यांचं धंदापाणी सुधारलं. आणि मग अशा वेळी जे नेहमी आपल्याकडेही होतं ते तिथंही व्हायला लागलं. म्हणजे कास पठारावर इतके पर्यटक यायला लागतात, ते कसेही कुठेही मोटारी चालवतात.. आणि मग फुलांना उमलण्याचा उत्साहच राहात नाही. हे असं होतं याचं कारण ती फुलं काही इतके पर्यटक येतात म्हणून उमलत नाहीत. तसंच पेंग्विनचंही. लोक पाहायला आले.. चला पाण्याबाहेर येऊया असा काही विचार ते करत नाहीत. तेव्हा आपण त्यांना अनुभवणं ही जीवसृष्टीच्या चक्रातली अत्यंत दुय्यम घटना आहे हे माणूस विसरतो आणि मग समस्या सुरू होतात.
ऑस्ट्रेलियातल्या त्या बेटावरही तसंच व्हायला लागलं. बघता बघता पेंग्विन्सची संख्या रोडावली. त्यांच्या प्रजननाचा वेगही मंदावला. सरकारच्या संबंधित खात्यानं त्यावर संशोधन सुरू केलं. त्यांच्या कृत्रिम प्रजननाची व्यवस्था केली. पर्यटकांच्या वेळेवर मर्यादा आणल्या. या सगळ्यांचा परिणाम झाला. पण तात्पुरता.
पेंग्विन्सचा जगण्यातला उत्साह काही वाढायला तयार नव्हता. परिस्थिती इतकी गंभीर झाली की सरकारला ही पेंग्विन्सची प्रजाती (युडिप्टय़ुला मायनर) नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं जाहीर करायला लागलं. काय केल्याने यांच्या आयुष्यात पुन्हा वसंत फुलेल असा प्रश्न सरकारसमोर उभा ठाकला. त्यावर संशोधन करण्यासाठी समित्या नेमल्या गेल्या. तज्ज्ञ त्यावर उपाय शोधू लागले. मुद्दा ऑस्ट्रेलियाच्या केंद्रीय सरकारसमोर गेला. छोटय़ा पेंग्विनांनी सरकारची झोप उडवली.
मग कोणंतही सरकार करू धजणार नाही, असा मार्ग ऑस्ट्रेलियन सरकारनं निवडला. त्या गावातलं प्रत्येक घर सरकारनं स्वत:च्या पैशातनं घ्यायला सुरुवात केली. म्हणजे जमीन हस्तांतरण कायदा वगैरे काही जाहीर केला नाही. पण त्या गावातली सर्व जमीन बाजारभाव देऊन विकत घ्यायला लागलं सरकार. कोणावरही कोणतीही जबरदस्ती केली नाही सरकारनं. पण त्या गावची सर्व मालमत्ता मात्र हळूहळू कब्जात घेतली. मग ती ताब्यात आल्यावर पेंग्विन दर्शनावर नियंत्रण आणलं. त्यासाठी पर्यटकांचा किनाऱ्यावर थेट जाण्याचा मार्गच बंद केला. काचेची एक भली मोठी खोली सरकारनं उभारली. प्रकाश नियंत्रित. कारण त्या प्रकाशाने पेंग्विन बिचकण्याचा धोका होता. परत ती खोली ध्वनिप्रतिबंधक. आतला आवाज अजिबात जात नाही.
ही सर्व प्रक्रिया अलीकडे पूर्ण झाली. आणि मगच तिचं लोकार्पण झालं. या काळात त्या छोटय़ाशा गावात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखानं वाढली. पण ते महत्त्वाचं नाही. आनंदाची बाब ही की..
पेंग्विनच्या संख्येत कित्येक पटींनी वाढ झाली. जे पेंग्विन शेकडय़ांनी उरले होते त्यांची प्रजा आता ३१ हजार इतकी झालीये. त्यांच्या जिवावरचं संकट आता टळलंय. ऑस्ट्रेलिया सरकारनं हे पेंग्विन वाचावेत म्हणून संपूर्ण गावच्या गाव हलवलं म्हणून त्या सरकारचं कौतुक होतंय.
ऑस्ट्रेलियात ‘पक्षीही सुस्वरे आळविती.. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ असं लिहिणारा तुकाराम निपजला नाही.. हे त्या पेंग्विनांचं नशीब म्हणायचं का?
girish.kuber@expressindia.com
@girishkuber