‘सत्यम’चा बुडबुडा शेअर बाजारात तयार झाला आणि भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे फुटला. पण मोबाइल कंपन्यांनी स्वस्तात स्वस्त कॉलदर देऊन ग्राहकसंख्येचा बुडबुडा फुगवला, ती संख्या तशीच राहिल्या आणि कंपन्या मात्र पिचून-फुटून रक्तबंबाळ! तसाच हा नवा आर्थिक बुडबुडा..
बऱ्याच वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वीचा. एका वित्तविषयक बडय़ा वर्तमानपत्रात बातमी होती. सत्यम नावाच्या त्या वेळच्या कंपनीबाबत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा नुकताच उदोउदो सुरू झाला होता. जगात कोणाचं काही भलं होणार असेल तर ते याच क्षेत्रामुळे, अशीच समजूत करून दिली जात होती. अन्नवस्त्रनिवारा.. कोणत्याही क्षेत्रातली कोणतीही लहानमोठी समस्या असो.. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र संगणक.. त्या चुटकीसरशी सेडवणार.. असाच तो माहोल होता! त्या काळातली ही बातमी.
ती अशी होती की सत्यम या टीचभर कंपनीची मार्केट कॅप ही टाटा स्टील, एलअ‍ॅण्डटी, टाटा मोटर्स अशा कंपन्यांपेक्षाही जास्त वाढली आहे. भांडवली बाजारात नोंदले गेलेले एखाद्या कंपनीचे सर्व समभाग समजा एकत्र केले आणि त्याला त्या दिवशीच्या दराने गुणले तर जी रक्कम होईल ती म्हणजे मार्केट कॅप. त्या बातमीचा अर्थ असा की टिकलीएवढय़ा सत्यमची मार्केट कॅप ही जगड्व्याळ आणि प्रचंड भांडवल असणाऱ्या कंपन्यांपेक्षाही जास्त होती. हे म्हणजे नवजात अर्भकाची ताकद ही िहदकेसरीपेक्षा अधिक आहे, असं म्हणण्यासारखंच. म्हणजे थोडक्यात वेडपटपणाचं. पुढे त्या सत्यमचं आणि तिचे प्रवर्तक रामलिंग राजू याचं काय झालं ते आपण जाणतोच.
पण तरीही त्या वेळी तो वेडपटपणा सर्रास केला गेला. कारण एकच. नवीन, कोवळ्या अशा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची हवा करायची. हे असं हवा वगरे करणं माध्यमांतल्या काही घटकांना मनापासून आवडतं. या काळात मग लोकांना या हवावाल्यांविषयी चांगलीच ओढ तयार होते. आणि ही हवा काही फक्त उत्पादनांविषयीच होते, असं नाही. ती व्यक्तीबाबतचीही असू शकते. उदाहरणार्थ..
ही नावं कोणीही आपापल्या राजकीय सोयीनं भरू शकेल. ती भरणं हा काही या लेखामागचा उद्देश नाही. तर तो आहे अशा नव्या हवाभरू क्षेत्राची माहिती देणं.
हे नवं क्षेत्र म्हणजे ई-कॉमर्स.
आता पारंपरिक व्यापार जणू गेलाच काळाच्या उदरात, अशा पद्धतीनं सध्या ही हवा केली जातीये. त्यामुळे वाणसामान ते जेवण ते अंतर्वस्त्र ते औषधं ते गर्भनिरोधकं किंवा नियोजकं.. असं सगळंच कसं ऑनलाइन खरेदी व्हायला लागलंय असं आपल्याला प्रसार माध्यमं सांगू लागलीयेत. ही अशी इतकी प्रगती भरून डोळेच विस्फारतायत. लग्न ऑनलाइन जमू लागली त्यालाही आता जमाना झाला. त्या ऑनलाइन लग्नकर्त्यांची पुढची पिढीसुद्धा आता वाढू लागली असेल. अर्थात खरीखरी. ऑनलाइन नव्हे. पण आता हे ‘ई’चं भूत त्याच्याहीपेक्षा मोठं झालंय.
त्याला सुरुवात झाली अ‍ॅमेझॉन या कंपनीमुळं. अमेरिकेतल्या सिएटल शहरातल्या एका गॅरेजमध्ये जेफ बेझोसनं ही कंपनी सुरू केली. आज जगातल्या काही बलाढय़ कंपन्यांत तिची गणना होते. अमेरिकेत तर या कंपनीनं इतका पसा केला की बेझोस यानं त्यातून वॉिशग्टन पोस्ट हे बलाढय़ दैनिकच विकत घेतलं. अमेरिकेत ती इतकी यशस्वी झाली.
पण अमेरिकेतच. काही वर्षांपूर्वी ती आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करू लागली. तशी आलीदेखील. पण मध्यंतरी तिचाच भारतीय प्रतिस्पर्धी तयार झाला फ्लिपकार्ट नावानं. मग स्नॅपडील. अलीकडे पेटीएम. मग आणखी काही. अशा अनेक विक्रेत्या वेबसाइट्स तयार झाल्या. मध्येच लोकल बनिया, घरेलू बनिया.. किंवा तत्सम काही साइट्स आल्या. हॉटेलांची माहिती देणारी झोमॅटो आली. आणि बरंच काय काय.
दूरसंचार क्षेत्राचा जसजसा विस्तार होत गेला तसतसं या अशा विक्रेत्या वेबसाइट्सचं पेवच फुटलं. त्यातून खरेदीविक्री करणं सगळ्यांसाठीच सोयीचं. अन्य दुकानांसारखं ऑनलाइन दुकानांना प्रत्यक्ष जमिनीवर जागा घेऊन आपल्या वस्तू हारीनं मांडून ठेवाव्या लागत नाहीत. त्या दाखवण्यासाठी विक्रेते ठेवावे लागत नाहीत. त्यामुळे त्यांना पगार देण्याचा प्रश्नच नाही. नगरपालिकेचं भाडं, जागा भाडं, वीज बिल वगरे काहीच नाही. त्यामुळे या साइट्सद्वारे खरेदी-विक्री करणं चांगलंच किफायतशीर वाटू लागलं.
आणि ते आहेही. त्यात सोयदेखील आहे. उदाहरणार्थ रेल्वे आरक्षण. किती सोयीचं होऊन गेलंय ऑनलाइन आरक्षण. खरं तर ऑनलाइन आरक्षण करणं आणि प्रत्यक्ष जाऊन तिकीट काढणं यात दुसरा पर्याय स्वस्त आहे. पण पहिला सोयीचा आहे. म्हणून चार पसे जास्त द्यावे लागले तरी आपल्याला काही वाटत नाही. आपण ऑनलाइन तिकीट काढणंच पसंत करतो. अर्थातच त्यामुळे ऑनलाइन खरेदी-विक्रीची देशातली सर्वाधिक नफा मिळवणारी वेबसाइट म्हणजे रेल्वे. यातली लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे प्रत्यक्ष तिकिटापेक्षा ऑनलाइन तिकीट महाग असूनही रेल्वेची वेबसाइट ही सर्वाधिक नफा मिळवणारी साइट आहे.
नेमकी हीच बाब खासगी ऑनलाइन विक्रेत्यांनी लक्षात घेतली नाही. त्यामुळे झालं असं की ऑनलाइन विकायचं म्हणजे स्वस्तच विकायला हवं असा सोयीचा विचार या वेबसाइट्सनी केला आणि परिणामी एकमेकांचे गुडघे फोडून घ्यायला सुरुवात केली. अ‍ॅमेझॉनला मागे टाकायचंय म्हणून फ्लिपकार्टनं आपले दर कमी केले. फ्लिपकार्टला मागे टाकायचं म्हणून आणखी कोणी आपले दर कमी केले.. या स्वस्त दराचा एक फायदा झाला.
या सेवा चांगल्याच लोकप्रिय झाल्या. त्यामुळे त्यांना प्रचंड मोठे गुंतवणूकदार मिळाले. इतके मोठे की यंदाच्या पहिल्या तीन महिन्यांतच यातल्या काही कंपन्यांनी तब्बल ५० कोटी डॉलरची गुंतवणूक मिळवली. म्हणजे जवळपास ३५०० कोटी रु. इतकी प्रचंड रक्कम. सन २०२० पर्यंत भारतातली ही ऑनलाइन बाजारपेठ जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ ठरेल, असं भाकीत आंतरराष्ट्रीय बँकर्सनी केल्यानंतर तर हा गुंतवणुकीचा ओघ आणखीनच वाढत गेला. गुंतवणूक वाढतीये म्हटल्यावर वेबसाइटवालेही चेकाळले. त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणखी दर कपात केली. स्वस्त दर म्हणजे अधिक ग्राहक हे आपल्याकडचं साधं गणित आहेच. त्यामुळे प्रत्येकाला वाटू लागलं आपले दर सगळ्यात कमी हवेत. म्हणजे आपल्याकडे जास्तीतजास्त ग्राहक येतील.
खरं तर काही वर्षांपूर्वी याच मार्गानं ग्राहक आकर्षून घेण्याच्या खेळात आपल्या दूरसंचार कंपन्यांनी स्वत:ला किती जायबंदी करून घेतलंय, याचं उदाहरण समोर आहेच. तुझ्यापेक्षा मी स्वस्त असं सांगत ग्राहकांना खेचून घेणाऱ्या कंपन्यांचं कंबरडं इतकं मोडलं की ते अजूनही सरळ झालेलं नाही. या कंपन्यांनी ग्राहक शोषून घेतले. पण मधल्या खेळात त्यांचा खर्च इतका वाढला की ती स्वस्ताई त्यांना परवडेना. पण दर वाढवायची पंचाईत. कारण दर वाढले की ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे जाणार हे नक्की. परिणामी या भीतीनं हे सगळेच दूरसंचारवाले तसेच रक्तबंबाळ राहिले. त्यांनी आपल्या जखमांवर काही इलाजच केले नाहीत.
आता या ऑनलाइन कंपन्या याच खेळात अडकू लागल्यात.
आणि आता या कंपन्यांमधले गुंतवणूकदार अस्वस्थ होऊ लागलेत. गेल्या काही आठवडय़ांत या ऑनलाइन कंपन्यांचे आर्थिक निकाल जाहीर झाले. हजार कोटी रु., दीड हजार कोटी रु. अशा एकापेक्षा एक नुकसानीत या ई-कॉमर्स कंपन्या आघाडीवर आहेत आता. त्यात त्यांची डोकेदुखी वाढवणारी आणखी एक गोष्ट घडलीये. ती म्हणजे उत्तराखंड, बिहार, आसाम वगरे राज्यांनी या ऑनलाइन खरेदीवर प्रवेश कर लावायला सुरुवात केलीये. परिणामी या कंपन्यांचं उत्पन्न अधिकच ढासळणार.
पण हे सगळं आताच सांगायचं कारण?
कालच एक बातमी आलीये.
ती सांगते की देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढत असली तरी त्यातले फक्त सहा टक्के इतकेच ऑनलाइन खरेदी-विक्री करतात. म्हणजे ई-कॉमर्स, ई-कॉमर्स असा गजर आपल्या कानावर येत असला तरी इंटरनेट वापरणाऱ्यांतले ९४ टक्के या फंदात पडत नाहीत. ते आपले ‘गडय़ा आपले दुकान बरे’ असाच विचार करतात.
त्यामुळेच मुद्दा असा की हे ऑनलाइन व्यापार, ई-कॉमर्स म्हणजे नव्या युगाचा नवीन बुडबुडा आहे की काय?

 

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
twitter: @girishkuber