|| गिरीश कुबेर
अंजली शाही, लावण्या जयशंकर, वर्णा भट या तिघींप्रमाणे कस्तुरी बॅनर्जी हीदेखील खरं तर गोव्याची नाही. त्या चौघींनी या गोव्याच्या भूमीतच आपापली नवनिर्मिती केली…
लहानपणी आजोळी गेलं की आजीकडनं भाकरतुकडा ओवाळून झाल्या झाल्या आजोबा अंगणात घेऊन जायचे. नवीन काय काय घडलंय ते दाखवायला. गेल्या सुट्टीत लावलेली जास्वंद खांद्याला आलेली असायची, मोगऱ्याला बहर आलेला असायचा… चंपीला पिल्लं झालेली असायची वगैरे वगैरे.
अलीकडे गोव्याला गेलेलो असताना वयानं बऱ्याच मोठ्या, पण ज्येष्ठ वगैरे न होता पुलंच्या ‘तुझे आहे’तल्या काकाजीसारखेच राहिलेल्या मित्र/मार्गदर्शकानं आजोळची आठवण करून दिली. म्हणजे भाकरतुकडा वगैरे उपचार नाही केले. पण साधारण प्रतिक्रिया तशीच. गेल्या वेळेला आला होतास त्यापेक्षा आता काय काय बदल झालाय… ते सांगण्याचा उत्साह. हे असं वयबियमध्ये न आणता नव्या पिढीशी जोडून घेता येणं किती लोभस असतं. नव्या पिढीला या जुन्यांची अडचण वाटत नाही आणि जुन्यांना हे नवे अनोळखी वाटत नाहीत. याबाबत यांचं घर तर खूपच भारी. संध्याकाळी हे वयानं झालेले आजोबा, माझ्या वयाचा त्यांचा मुलगा आणि त्याचा मुलगा आणि कधी आलेला असल्यास मुलीचा नवरा- हे सगळे एकत्र ‘बसतात’. म्हणजे तीन पिढ्यांचा रसास्वाद एकत्र. यातला जावई सोडल्यास सर्वांच्या शरीरात ज्याप्रमाणे एकाच घराण्याचं रक्त वाहतं त्याप्रमाणे त्या सर्वांच्या अंगात एकाच ‘घराण्या’ची आरक्तवर्णी वाहते. जो कोणी दिवेलागणीनंतरच्या तीर्थमुहूर्तावर आधी घरी पोहोचतो, त्याचा प्रश्न ठरलेला : आज कितें? म्हणजे आज काय? त्यावर हे काकाजी उत्तरणार- आज माका ‘रेड’ पिऊचे दिसता. म्हणजे आज रेड वाइन प्यावी म्हणतो. त्यांच्या घरी गेलो तेव्हा हाच मुहूर्त होता. तर मला पाहिल्या पाहिल्या हा काकाजींचा नातू उद्गारला : यो आयलो असा तर तुका व्हिस्कीच जाय अशें दिसता…!
आजोळ, आजी संदर्भ येतो तो इथे. हे काकाजी त्या उत्साहात म्हणाले- गेल्या वेळेला आला होतास तेंव्हा आपण ‘अमृत’वर बोललो होतो. नुकतीच तू तिची ओळख करून दिली होतीस. तेव्हा ती एकटी होती. आता इतकं काय काय नवीन आलंय…! या वाक्यानंतर शक्य असतं तर त्यांनी हे नवीन आलेलं प्रत्येक प्राषून पाहायला लावलं असतं. तेव्हा सिंगल माल्ट हा प्रकारच भारतासाठी नवा होता. हे असं काही भारतात तयार होऊ शकतं हेच कुणाला माहीत नव्हतं. त्यानंतर याच गोव्याच्या भूमीनं देशालाच काय पण जगाला ‘पॉल जॉन’ दिली. वर तिच्या परिचय, अनुभवासाठी स्कॉटलंडमध्ये होतात त्या धर्तीवर ‘पॉल जॉन’ दर्शन, मुखप्रक्षालन सोहळे आयोजित केले. आता हे अगदी दैनंदिन होतात आणि वारकऱ्यांची चांगलीच गर्दी असते. ती पाहून अगदी भरून पावल्यासारखं वाटतं. अनेकांना या मार्गानं जाताना पाहून जग सुरळीत सुरू आहे याची खात्री वाटू लागते.
पण आताची तर गोष्टच वेगळी. ‘सिंगल माल्ट’वाल्यांचा असा एक अभिजनवाद असतो. म्हणजे ‘मी धृपद धमारशिवाय काही ऐकत नाही’, असं म्हणणाऱ्यांसारखा. म्हणजे आपण गाण्यावर प्रेम असण्यापेक्षा आपण विशिष्ट गाणं ऐकतो हे मिरवण्यातच मोठेपणा. सच्चा सूरप्रेमी सर्व काही ऐकतो. तसंच सच्चा सुराप्रेमीही सर्व काही तितक्याच उत्साहानं प्राषन करतो. अशा सात्त्विक, सज्जन सुराप्रेमींसाठी हा अनुभव…
त्यात आहे ‘मॅटिनी’, ‘रहस्य’ आणि ‘माका जाय’.
यातली ‘मॅटिनी’ आहे जिन. आत्मनिर्भरतेच्या शोधात निघालेल्या भारतात बनलेली. परदेशात लंडनमधे शिकता शिकता अनेकांच्या हृदयाला घरं पडणारा प्रश्न म्हणजे : हे आपल्याकडे का नाही? त्या दोन तरुणींनाही तो पडला. फरक इतका की त्या वेळी अंजली शाही आणि लावण्या जयशंकर या जिनचा आनंद घेत होत्या. किंवा असंही असेल की जिनचा आनंद घेत होत्या म्हणूनच असा गहन प्रश्न पडला. (एकट्या लंडनमधे तब्बल ३०० इतके जिन ब्रँड आहेत. म्हणजे दिवसाला एक म्हटलं तरी दहा महिन्यांची बेगमी. असो. असतं एकेका शहराचं नशीब.)
चांगले प्रश्न पडण्यासाठीदेखील काही उत्तेजना असावी लागते. या उत्तेजनेचा आनंद घेता येत नसणाऱ्यांना प्रश्नही पडत नाहीत आणि म्हणून अशी मंडळी प्रश्नांना सामोरंही जात नाहीत. असो. तर मग या दोघींनी मनातल्या मनात निर्धार केला… आम्ही आपल्या मायभूतही अशीच उच्च दर्जाची जिन बनवू!
आणि त्यांनी ती बनवली. या अशा प्रयोगांसाठी गोव्यासारखी मनमुक्त जागा आणखी कोणती असणार? आजीच्या बटव्यात असायचं ते नागकेशर, बांगड्याच्या हुमणात गोंयकार घालतात ती तिरफळं आणि नाजूक कांतीची आणि चटकदार चवीची आंबेहळद या प्रमुख घटकांच्या बरोबरीनं, अन्य काही घटकांच्या साथीनं ही ‘मॅटिनी’ बनते. या सर्वांचं योग्य मिश्रण त्या गुलाबी चित्ताकर्षक बाटलीत भरलं जावं म्हणून त्यांनी तब्बल ४२ वेगवेगळी मिश्रणं करून पाहिली. काही महिन्यांपूर्वीच या ‘मॅटिनी’चे खेळ सुरू झालेत.
वर्णा भट आणि तिचं ‘रहस्य’ यांची कथापण अशीच. आईवडिलांची इच्छा हिनं आयएएस व्हावं अशी. नवउद्यमी म्हणून काही काही केल्यानंतर तिलाही जाणवलं आपल्या मायभूमीत ‘सिंगल माल्ट’ बनू लागलीये. जगात ती लोकप्रिय होतीये. पण ‘अॅब्सोल्यूट’, ‘स्मिर्नॉफ’सारखा एकही एतद्देशीय ‘व्होडका’ ब्रँड का नाही? या अशा प्रेरणादायींची देशाला किती गरज आहे हे तिनं यानंतर जे काही केलं त्यावरून- खरं तर ते पिऊन- कळेल. खास भारतीय चवीची व्होडका हवी या वेडानं तिला झपाटलं. पण भारतीय चवीची म्हणजे काय हाही प्रश्नच. तेव्हा एका मुद्द्यावर एकमत झालं. म्हणजे खमंग आणि मसालेदार. यातून प्रयोग करत करत तिनं स्वत: एका व्होडकाची निर्मिती केली. ‘रहस्य’ हे या व्होडकाचं नाव. आपल्या मिसळणाच्या डब्यातल्या जिऱ्यापासनं ज्येष्ठमधापर्यंत अनेक घटक अरेच्च्या… असं तिचा स्वाद घेताना म्हणायला लावतील. गंमत म्हणजे तिच्या कंपनीत ही व्होडका बनवणाऱ्या बहुतांश कर्मचारी या महिलाच आहेत. शेवटी हातगुण, हाताची चव… हे महत्त्वाचं असतंच की ! आणि ही व्होडका तयार होते तीदेखील बाकीबाब बोरकर म्हणून गेले त्या ‘माझ्या गोव्याच्या भूमीत…’
वरच्या या तिघींप्रमाणे कस्तुरी बॅनर्जी हीदेखील खरं तर गोव्याची नाही. नावावरनंच कळतं की बाबूमोशाय आणि मिष्टी दोईच्या प्रांतातली. मूळची बँकर. कर्ज देण्याघेण्याचे हिशेब करून, नोटा मोजून हाताला आणि घशाला कोरड पडली असणार. शेवटी पैशाची नशा कधी ना कधी उतरतेच या सत्यामुळेही असेल पण तिला स्वत:ची काही स्वतंत्र निर्मिती- जी नशेपेक्षा आनंद देईल अशी- असायला हवी असं वाटायला लागलं. घरातलं, परिचितातलं कोणी ‘ओल्ड मंक’चं अनुयायी असणार. तिनं ठरवलं आपण स्वतंत्र, नव्या चवीची, नव्या पिढीची रम बनवायची.
त्यासाठी उत्तम जागा अर्थातच गोवा. पलीकडच्या कोल्हापूर परिसरात, पंचगंगेवर पोसल्या गेलेल्या उसाची मळी आणि गोव्याची खारट माती यातून मग आकारास आली ‘माका जाय’ (म्हणजे शब्दश: ‘मला हवी’) या नावाची रम. ब्राउन आणि पाण्यासारखी पारदर्शी. दोन्ही प्रकारची.
हे सर्व ‘आमच्या गोंयात बर्का…’ हे सांगताना काकाजींचा चेहरा इतका फुलला होता. ‘जग कितले फुडे (गोंयकार प च्या जागी फुत्कारतात का? आणि परत ढ चा ड करतात) गेले असा नै…’ असं काकाजी म्हणाले आणि आसपास आम्ही सर्वांनी त्यांना अनुमोदन देत आपापले प्याले उंचावले.
उगाचच आठवली कधी तरी वाचलेली सरकारी दवाखान्याच्या भिंतीवरची ओळ. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’.
बरं झालं बाईला केवळ पाळण्याशी जखडून टाकणारी ती दोरी गेली आणि…
girish.kuber@expressindia.com
@girishkuber