गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांची अमेरिकी प्रतिनिधी सदनात झालेली तपासणी मोठी पाहण्यासारखी होती. हे सर्च इंजिन नक्की कोणत्या शास्त्रावर चालतं, त्याचा वेग कसा इतका प्रचंड आहे, त्यामागे कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं..
अशा एक ना अनेक गोष्टी यातून कळत गेल्या..
जर्मनीतली गोष्ट आहे ही. पहिल्या महायुद्धाच्या काळातली. सत्यकथा. विख्यात वैज्ञानिक तत्त्ववेत्ते जॉन वॉन न्यूमन यांची आवडती.
पहिल्या महायुद्धाच्या काळात बर्लिनमध्ये भररस्त्यात एक माणूस हातात फलक घेऊन उभा असतो. त्यावर लिहिलेलं असतं ‘‘कैसर मूर्ख आहे.’’
हा कैसर म्हणजे तत्कालीन जर्मनी आणि प्रशियाचा सम्राट. बिस्मार्क याला पदच्युत करून सत्तेवर आलेला. तो आचरट घोषणांसाठी प्रसिद्ध होता. संबंधित मंत्र्यांना वगैरे काहीही न विचारता हा धाडकन घोषणा करून टाकायचा आणि नंतर मग संकटात पडायचा. त्यामुळे या नागरिकाच्या हातातल्या फलकावरच्या मजकुराला काही अर्थ होता. पण म्हणून देशाच्या सर्वोच्च सत्ताधीशाला मूर्ख म्हणणं म्हणजे फारच झालं. साहजिकच त्याच्या या कृतीनं खळबळ माजली. पोलीस आले त्याला पकडायला. तर त्यांना हा पठ्ठय़ा म्हणाला.. तुम्हाला राग यायचं कारणच काय? मी ऑस्ट्रियाच्या कैसरला मूर्ख म्हणतोय. तांत्रिकदृष्टय़ा त्याचं म्हणणं खरं होतं. त्या वेळी ऑस्ट्रिया आणि हंगेरी या देशांच्या सम्राटालाही कैसर म्हणायचे. पण त्याचा हा बचाव काही पोलिसांना पटला नाही. ते त्याला म्हणाले..
उगाच लबाडी करू नकोस, आम्हाला माहितीये तुझ्या मते कोण मूर्ख आहे ते.
ठो ठो करून हसावं असा हा किस्सा. तो आता आठवायचं कारण अगदी तसाच्या तसा घडलेला प्रसंग. यात स्थळ फक्त वेगळं. पात्रंही वेगळी.
स्थळ अमेरिकी काँग्रेस. पात्र १ सुंदर पिचाई, गुगल या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी. पात्र २ झो लॉफग्रेन या अमेरिकी काँग्रेस सदस्या. प्रसंग असा की गुगल काही विशिष्ट राजकीय विचारसरणीला धार्जिणं आहे या आरोपावर सुंदर पिचाई यांची अमेरिकी प्रतिनिधी सदनात तपासणी सुरू आहे. गुगल नक्की काम कसं करतं, तंत्रज्ञान काय आहे त्यामागे वगैरे प्रश्न. ते विचारता विचारता एका प्रश्नानं संपूर्ण सदन सर्द झालं. हा प्रश्न विचारला या लॉफग्रेन बाईंनी. कल्पनाही त्याची करता येणार नाही, इतका धक्कादायक. या बाईंनी गुगलच्या प्रमुखाला विचारलं..
मी जेव्हा जेव्हा गुगल सर्च इंजिनमध्ये इडियट हा शब्द टाइप करते तेव्हा तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचीच अनेक छायाचित्रं का पडद्यावर येतात?
या बाई एवढं म्हणून थांबल्या नाहीत. त्यांनी आपल्या लॅपटॉपवर गुगल सुरू करून हे प्रत्यक्ष होताना दाखवलं. त्यांनी सर्च इंजिनच्या खिडकीत इडियट असे शब्द टाइप करायचा अवकाश.. पडद्यावर वेगवेगळ्या आविर्भावातल्या ट्रम्प यांच्या छबी छळकल्या. आसपासच्या लोकप्रतिनिधींत हे पाहून चांगलाच हास्यस्फोट झाला. हे असं हसणाऱ्यांत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी होते. विरोधी डेमोक्रॅट्स पक्षाचे जसे या समितीत लोकप्रतिनिधी होते तसेच सत्ताधारी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचेही खासदार होते. आपल्या पक्षाच्या नेत्याचं हे असं रूप पाहून तेही हसण्यात सामील झाले. म्हणजे गुगलला कोणी राष्ट्रद्रोही म्हणालं नाही किंवा सुंदर पिचाई यांच्या मूळच्या भारतीयत्वाशीदेखील कोणी या तंत्राचा संबंध जोडला नाही. विषय गंभीर होता. सगळ्यांनी तो त्याच गंभीरतेने घेतला.
गुगलच्या प्रमुखाची ही सुनावणी मोठी पाहण्यासारखी होती. अनेक अमेरिकी वृत्तवाहिन्यांनी गेल्या आठवडय़ात तिचं थेट प्रक्षेपण केलं. यात अमेरिकी खासदार गुगलचं तंत्र समजून घेताना दिसले. हे सर्च इंजिन नक्की कोणत्या शास्त्रावर चालतं, त्याचा वेग कसा इतका प्रचंड आहे, त्यामागे कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं.. असे एक ना दोन अनेक प्रश्न अमेरिकी खासदारांनी विचारले. त्यातले बरेचसे चांगले होते. म्हणजे त्यातनं त्यांची काही शिकण्याची आस दिसून येत होती. पण काही खासदार फारच विद्वान होते. त्यांच्या अज्ञानाला मर्यादाच नव्हत्या. गंमत म्हणजे हे अज्ञानी खासदार नेमके ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचेच निघाले. त्यांच्या पक्षाच्या स्टीव्ह किंग यांनी सुंदर पिचाई यांना विचारलं : माझ्या मुलीचा आयफोन मध्येच वेडय़ासारखा का वागतो?
गुगल नाही बनवत आयफोन.. असं त्यावर पिचाई यांचं उत्तर. त्या उत्तरानं या किंगमहाराजांना आश्चर्य वाटलं. (मागे आपल्या एका खासदारानं मध्य प्रदेश राज्याला सागरी बंदर खात्याच्या योजनांचा लाभ होत नसल्याबद्दल संसदेत प्रश्न विचारला होता, त्याची आठवण झाली. असो.) तर असा एखादा सन्माननीय अपवाद वगळला तर सुंदर पिचाई यांची ही तपासणी उद्बोधक होती. त्यातून गुगलचा आवाका समजून येत गेला. पण इडियट या शब्दाच्या शोधाचं उत्तर डोनाल्ड ट्रम्प का?
पिचाई म्हणाले, आपण जेव्हा या सर्च इंजिनमध्ये एखादा शब्द टाइप करतो त्याच वेळेस ही संगणक प्रणाली किमान १०० कोटी वा कमाल कितीही अशा शब्दांच्या समूहांना २०० निकषांची चाळणी लावतो. हे दोनशे घटक असतात संदर्भ, लोकप्रियता, कालसापेक्षता, सदर शब्द आधी कोणाकोणाच्या संदर्भात वापरला गेलाय.. वगैरे अनेक. त्यांतनं चाळण लागून मग काही पर्याय समोर येतात. ते जवळपास अचूक असतात. कारण इतके शब्द आणि त्यांच्या छाननीचे निकष याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं.
पण एखाद्या विशिष्ट सर्चला, विशेष उत्तरच समोर यावं यासाठी काही ठरवून करता येतं का?
इथंच तर खरं समाजमाध्यमी मर्म आहे आणि इडियट म्हटलं की ट्रम्पच का येतात याचं उत्तर आहे. एखाद्या विशिष्ट सर्चला विशिष्ट उत्तरच येईल अशी व्यवस्था करता येते. ती कशी? त्यासाठी हवी थोडीशी कल्पनाशक्ती आणि बऱ्यापैकी या तंत्रज्ञानाची माहिती.
पाश्चात्त्य संगीतात रस असणाऱ्यांना माहीत असेल ‘ग्रीन डे’ नावाचा एक लोकप्रिय बँड आहे. अमेरिकन रॉक. आर्मस्ट्राँग नावाच्या गायक आणि गिटारिस्टनं तो तयार केला. बाकीचेही अनेक लोकप्रिय कलाकार आहेत त्यात. त्या बँडचं अलीकडे एक गाजलेलं गाणं आहे. अमेरिकन इडियट.. असं.
डोंट वॉन्नाबी अॅन अमेरिकन इडियट,
डोंट वाँट अ नेशन अंडर द न्यू मीडिया,
अँड कॅन यु हिअर द साउंड ऑफ हिस्टेरिया..
असं हे गाणं. झालं असं की यंदाच्या जुलै महिन्यात ट्रम्प ब्रिटनच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्याला स्थानिक पातळीवर प्रचंड विरोध होता. ट्रम्प यांची धोरणं, एककल्ली वागणं वगैरे तीच नेहमीची कारणं. तेव्हा त्यांच्या या ब्रिटन दौऱ्यात ट्रम्प यांना विरोध करणाऱ्या नागरिकांनी एक मोहीम हाती घेतली. हे सर्व एकत्र आले आणि लोकप्रियतेच्या तक्त्यात हे गाणं नेमकं त्याच काळात सर्वात वरच्या पायरीवर राहील यासाठी ते ऐकण्याचा, त्याची मागणी नोंदवण्याचा सपाटाच लावला. ही सगळी तरुण पोरं. त्यांनी या गाण्याच्या लोकप्रियतेचा एकांक असा काही वाढवला की ट्रम्प यायच्या आधीच्या, ते होते त्या आणि नंतरच्या अशा तीन आठवडय़ांत हे गाणं लोकप्रियतेच्या सर्व याद्यांत अव्वल राहिलं. झालं. ट्रम्प यांचं आगमन आणि हे अमेरिकन इडियट या गाण्याची युती झाली ती झालीच.
पाठोपाठ रेड्डीट नावाच्या लोकप्रिय वेबसाइटनं अशीच मोहीम हाती घेतली. ट्रम्प यांच्या संदर्भात जे काही लेख, बातम्या वगैरे वेबसाइटवर असतील अशा प्रत्येक लेख/बातमीत कोणत्या ना कोणत्या संदर्भात इडियट हा शब्द असेल याची त्यांनी खबरदारी घेतली. त्यामुळे झालं असं की रेड्डीट या वेबसाइटवर ज्यांनी ज्यांनी ट्रम्प यांच्या संदर्भात काही वाचलं त्याचा आपोआप इडियट या शब्दाशी संबंध जोडला गेला.
याचा परिणाम : काय तो वरती दिलाच आहे.
आपलं हे असं गुगलीकरण झालंय.
आपल्याला ते कळतंय का.. इतकाच प्रश्न.
girish.kuber@expressindia.com
@girishkuber