चंदा कोचर-  आयसीआयसीआय, राणा कपूर- यस बँक, शिखा शर्मा- अ‍ॅक्सिस बँक वैगेरे गाजतंय आपल्याकडे. सगळ्यात ग्राहक, गुंतवणूकदार नाडला गेलाय. अमेरिकेत मात्र सरकारी यंत्रणांनी बातम्यांची दखल घेण्याची प्रथा जिवंत आहे अजून ..

टेस्ला आणि एलॉन मस्क ही दोन नावं सध्या जगभर गाजताहेत. विजेऱ्यांवर चालणाऱ्या मोटारी बनवण्याची कल्पना घाऊक प्रमाणावर प्रत्यक्षात आणली टेस्ला या कंपनीनं. अमेरिकेत या कंपनीच्या मोटारी धावू लागल्यात. टेस्ला कंपनीचं यश आहे ते या विजेऱ्यांवर चालणाऱ्या मोटारींत. त्यांना इतकी मागणी आहे की कंपनीचे कारखाने चोवीस तास सुरू ठेवूनसुद्धा ती पूर्ण करणं कंपनीला जड जातं.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

या अभूतपूर्व यशामुळे टेस्ला कंपनीचा भाव चांगलाच वधारला. अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन वैगेरे कंपन्यांच्या जोडीनं आता टेस्ला या कंपनीचं नाव घेतलं जातं इतकी ही कंपनी मोठी झालीये. ते पाहून एलॉन मस्क यानं ही कंपनी भांडवली बाजारात उतरवली. मस्क हा या कंपनीचा प्रवर्तक. तसा लहानच म्हणायचा वयानं तो. स्टिव्ह जॉब्स किंवा बिल गेट्स किंवा जेफ बेझोस यांच्या पंगतीत आता त्याचं ताट मांडलं जातं, इतका तो लोकप्रिय झालाय. एखाद्या चित्रपट कलावंताला कसे चाहते घेरून टाकतात तसे मस्कला पाहायला, भेटायला वैगेरे गर्दी असते. उद्योगपतींना एखाद्या कलाकारासारखं प्रतिभावंत मानतात तिकडे. त्यामुळे कलाकाराप्रमाणेच त्यांचे चाहते असतात. रॉकस्टारला असावी अशी चाहत्यांची मांदियाळी आहे एलॉन मस्क याच्यामागे.

तर तीनेक महिन्यांपूर्वी या मस्कनं एक ट्वीट केला. एका ओळीचा. ‘‘टेस्ला कंपनीला मी आता खासगी करतोय’’. भांडवली बाजारात आल्यामुळे ही कंपनी एका अर्थानं गुंतवणूकदारांच्या मालकीची झाली. अमेरिकेतल्या लाखो गुंतवणूकदारांनी या कंपनीचे समभाग विकत घेतले. कंपनीच्या झपाटय़ानं होणाऱ्या प्रगतीमुळे त्यांना बाजारात मागणीही चांगली आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना टेस्लाच्या समभागातनं चांगला परतावाही मिळतोय. बाजारात रोजच्या रोज झुंबड असते या कंपनीच्या समभाग खरेदीदारांची.

आणि आता हा बाबा म्हणतोय की मी कंपनी खासगी करणार. याचा अर्थ गुंतवणूकदारांकडचे, वित्त संस्थांकडचे सर्वच्या सर्व समभाग मस्क परत घेणार. अर्थातच त्याचे दाम मोजून. म्हणजे गुंतवणूकदारांची पुन्हा चांदी. या कंपनीच्या समभागांना इतकी मागणी असल्यामुळे त्यांचे भाव नेहमीच चढे असतात. ते सर्वानी परत आपल्याला विकावेत म्हणून मस्क याला त्यापेक्षा अधिक भाव द्यावा लागणार. म्हणजे पुन्हा या समभागांचा भाव वाढणार.

याचा दुसरा अर्थ असा की हे सर्व समभाग पुन्हा विकत घेण्यासाठी मस्क याला हजारो, लाखो कोटी डॉलरची- अब्जावधी रुपयांची व्यवस्था करावी लागणार. कोणतीही व्यक्ती कितीही धनाढय़ असली तरी इतका रोख पसा काही कोणाकडे असू शकत नाही. म्हणजे कोणी तरी तितकाच धनाढय़ सोबती त्याला हवा. या सगळ्या प्रश्नांची चर्चा सुरू असताना मस्क यानं काही दिवसांनी दुसरा ट्वीट केला :  मी देऊ इच्छितोय प्रति समभाग ४२० डॉलर्स.

झालं. गुंतवणूकदारांत पुन्हा आनंदाची लाट. ज्या समभागांची बाजारात किंमत तीनशे सव्वातीनशे डॉलर्सच्या आसपास आहे, त्या समभागांना मस्क एकदम ४२० डॉलर्स देणार. म्हणजे चंगळच तशी गुतंवणूकदारांची. अनेक जणांनी हे समभाग विकल्यावर आपल्याला किती मिळतील याचे हिशेब सुरू केले. त्याच वेळी बँकर्स वर्गात मात्र चर्चा सुरू झाली मस्क याचा धनको कोण याची. याला इतका पसा देणार कोण, हा मुद्दा बँकर्ससाठी भलताच महत्त्वाचा. कारण ही मोठी व्यवसाय संधी बँकर्ससाठी. अनेक जण मस्क याला आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न करू लागले. आमच्याकडून कर्ज घ्या म्हणून. या वातावरणात मस्क याचा तिसरा ट्वीट :  माझी पैशाची व्यवस्था झाली.

पुन्हा खळबळ. कोणी केला याला भांडवलपुरवठा? अमेरिकेत तर ते कोणालाच माहीत नव्हतं. गोल्डमन सॅक, सिटी बँक, जेपी मॉर्गन वैगेरे नेहमीची नावंही एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहात होती. यातल्या कोणालाच मस्क याने पसे मागितले नव्हते. म्हणजे इतकी मोठी व्यवसायसंधी या सगळ्यांनीच गमावली होती. पण तरी प्रश्न कायमच होता  याचा पतपुरवठादार कोण?

नंतर वॉल स्ट्रीट जर्नल वगरेंनी बातमी फोडली. मस्क याचा गुंतवणूकदार म्हणून सौदी राजपुत्र सलमान याचं नाव पुढे येऊ लागलं. याला पैशाची कमतरता असण्याची शक्यताच नाही. जगातली सगळ्यात मोठी अराम्को ही तेल कंपनी त्याच्या मालकीची. त्यामुळे शब्दश याच्या श्वासात पसा. पण यातला विरोधाभास असा की टेस्ला ही तंत्रज्ञान म्हणून पेट्रोल कंपन्यांच्या मुळावर आलेली. कारण विजेच्या गाडय़ा जर प्रचलित झाल्या तर पेट्रोलची मागणी घटणार. आणि राजपुत्र सलमान तर पेट्रोलच्या जगाचा सम्राट. तेव्हा आपल्याच पोटावर पाय आणणाऱ्यात तो कसा काय गुंतवणूक करणार? पुन्हा प्रश्नच.

गुंतवणूकदारांत चलबिचल. मस्क याच्याकडून समभागांची खरेदी कधी सुरू होणार याबद्दल हुरहुर. मग पुन्हा बातमी : मस्कला हवेत तितके पसे द्यायला काही राजपुत्र सलमान तयार नाही. मग हा काय करणार?

त्यात एका वृत्तवाहिनीनं एलॉन मस्कचं वस्त्रहरणच केलं. (अमेरिकेत अजूनही पत्रकारितेची प्रथा जिवंत आहे आणि सत्ताधीशांना, उच्चपदस्थांना.. मग खासगी असोत अथवा सरकारी- उघडं पाडणं हे आपलं कर्तव्य आहे असं अजूनही ते मानतात.) या मुलाखतीच्या आधी अणि नंतर मस्क निवांत गांजा ओढताना दिसला. डोळे तारवटलेले. केस विस्कटलेले. एकूण अवतार त्याच्याविषयी संशय निर्माण करणारा.

तसा तो झालाच. कारण माध्यमांनी लिहायला सुरुवात केली- मस्क फेकू आहे. त्याची पतपुरवठय़ाची सोय वैगेरे काहीही झालेली नाही. तो नुसता गुंतवणूकदारांना गंडवतोय.

हा आवाज इतका वाढला की तिथल्या सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन- म्हणजे आपल्या सेबीसारखी तिथली यंत्रणा- यांनी या बातम्यांची दखल घेतली. (अमेरिकेत सरकारी यंत्रणांनी बातम्यांची दखल घेण्याची प्रथाही जिवंत आहे अजून.) पुढे जाऊन त्याला नोटीस पाठवली : खरं काय ते सांग.

तिकडे ते सांगावं लागतं. शपथेवर खोटं बोलणं हा तर गुन्हाच. (बिल क्लिंटन यांना त्या वेळी शिक्षा होणार होती ती त्यांनी मोनिका लेविस्कीबरोबर काय केलं यासाठी नाही तर काहीही केलं नाही असं ते शपथेवर खोटं बोलले म्हणून.) आणि तेदेखील कोणी सत्यवचनी, एकवचनी देव नसताना. तर तो गुन्हा आपल्याकडून होऊ नये म्हणून मस्क याला खरं सांगावं लागलं.

‘‘ते समभाग वैगेरे खरेदी करण्याचा माझा कोणताही प्रयत्न नाही. मी ते असंच बोललो’’.

या त्याच्या खुलाशानं एकदम खळबळ उडाली. टेस्लाचा समभाग गडगडला. म्हणजे गुंतवणूकदारांचं नुकसान झालं.

झालं. तिथल्या सेबीला हे इतकंच कारण पुरलं. खरं तर अशा कोणत्याही यंत्रणेला तितकंच कारण पुरायला हवं. गुंतवणूकदारांचं हित हेच या यंत्रणांसाठी महत्त्वाचं असायला हवं. मस्क याच्याकडून त्या हितालाच तडा गेला.

तिथल्या सेबीनं आदेश काढला. मस्क यानं टेस्ला कंपनी सोडून द्यावी.

भयानकच. ही कंपनी त्यानंच तर स्थापन केलेली. प्रवर्तकालाच ती सोडायला सांगणं म्हणजे फारच झालं. या आदेशानं मस्क भानावर आला. हादरलाच तो. आपल्या मूर्खपणाचं गांभीर्य लक्षात आलं त्याला. त्यानं तोडग्यासाठी प्रयत्न सुरू केले. तिथली सेबी काही ऐकायला तयार नव्हती. पण मस्क पूर्ण जमिनीवर आल्याची खात्री पटल्यावर तिथल्या सेबीनं पर्याय दिला : दोन कोटी डॉलर्सचा दंड आणि तीन वर्षांसाठी टेस्लाचं अध्यक्षपद सोडायचं.

तो अमान्य व्हायचा प्रश्नच नव्हता. कंपनी कायमची सोडावी लागण्यापेक्षा हे बरं. त्यानं हा तोडगा स्वीकारला. स्वतच स्थापन केलेल्या कंपनीतल्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याची ही शिक्षा. ती न्यायालयात जाऊन टाळण्याचा प्रयत्न केला त्यानं. पण न्यायालयानं तो धुडकावून लावला. वर बजावलं- ही शिक्षा किमान आहे, असं.

ही अगदी ताजी घटना. चंदा कोचर-  आयसीआयसीआय, राणा कपूर- यस बँक, शिखा शर्मा- अ‍ॅक्सिस बँक वैगेरे गाजतंय आपल्याकडे. सगळ्यात ग्राहक, गुंतवणूकदार नाडला गेलाय.

आणि ग्राहकाला देव, राजा वैगेरे मानतो आपण. छान असतं अशी सोय असली की!!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

Story img Loader