आपल्याकडे शुद्ध विज्ञान कोणाला नकोच आहे.. सगळ्यांना उपयोजनांतच..म्हणजे अप्लाइडमध्येच.. रस आहे. म्हणजे विज्ञान शिकायचं नाहीये, पण अभियंते व्हायचंय. त्यामुळे आपल्याकडे वैज्ञानिकांची संख्या कमीच होताना दिसते. जगात नवीन काही करणाऱ्या देशांचा म्हणून एक निर्देशांक आहे. . त्यात तर आपण अगदी तळाच्या काही देशांत आहोत..
या महिन्यात विज्ञानाशी संबंधित दोन मोठय़ा घटना घडल्या. एक म्हणजे मराठी विज्ञान परिषदेचा सुवर्ण महोत्सव आणि दुसरी घटना इंडियन सायन्स काँग्रेसचे वार्षकि अधिवेशन. दखल घ्यायला हवं, असं दोन्हींत बरंच काही घडलं.
इंडियन सायन्स काँग्रेस वार्षकि अधिवेशनाचं उद्घाटन परंपरेप्रमाणे पंतप्रधानांच्या हस्ते झालं. पण ही सायन्स काँग्रेस गाजली ती नोबेल विजेते व्यंकटरामन रामकृष्णन यांनी केलेल्या सडकून टीकेमुळे. हे रामकृष्णन फार फटकळ आहेत. ते मूळचे चेन्नईचे. पण शिक्षण वगरे सगळं झालं इंग्लंडमध्ये. गेल्या वर्षी ते चेन्नईला आले होते. त्या वेळी त्यांच्या सत्कारप्रसंगी रामकृष्णन यांच्या भारतीय मुळाचे गोडवे गायले गेले. तेव्हा उत्तर देताना रामकृष्णन म्हणाले..हे भारतीय भारतीय पहिले बंद करा. माझा भारताशी काहीही संबंध नाही. उलट मी इथे असतो तर जे काही मी करतोय ते करू शकलो नसतो..
याही वेळी त्यांच्या परखडपणाचा प्रत्यय आला. या वेळी ते आपल्या सायन्स काँग्रेससाठी आले होते. परंतु तिथं जे काही चालतं ते पाहून रामकृष्णन म्हणाले.. ही सायन्स काँग्रेस म्हणजे शुद्ध सर्कस आहे, तिचा विज्ञानाशी काहीही संबंध नाही..पुन्हा मी इथं पाऊल टाकणार नाही.
बरोबरच आहे त्यांचं. याच सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात शंकर (म्हणजे तो भर बर्फात नाग घेऊन कैलास पर्वतावर असतो म्हणे तो ) हा पहिला पर्यावरणवादी असं एक उच्च दर्जाची निर्बुद्धता दाखवणारं विधान केलं गेलं. गेल्या वर्षी याच काँग्रेसमध्ये भारतीय ऋषीमुनींना आधीच कशी विमानविद्या माहीत होती.. वगैरे लोणकढय़ांना ऊत आला होता.
त्या पाश्र्वभूमीवर मराठी विज्ञान परिषदेचं काम खूपच गंभीर आणि महत्त्वाचं. महाराष्ट्रासारख्या राज्यात शुद्ध विज्ञान प्रसारासाठी जन्माला आलेली संस्था पुढे ५० वर्षे टिकते, हे तसं अप्रूपच. ते गेल्या आठवडय़ात साजरं झालं. भाभा अणुसंशोधन केंद्रात तीन दिवस रंगलेल्या या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात सहभागीही होता आलं. अनेक विषय चíचले गेले या अधिवेशनात. आणि ते खूप महत्त्वाचेही होते.
या निमित्तानं पुढे आलेला एक मुद्दा म्हणजे विज्ञानाविषयी समाजात असलेली उदासीनता. गाय नव्हे गोमाता, मुलगा होण्याची हमी देणारे गर्भसंस्कार, गाईचं शेण किरणोत्सर्ग रोखतं..वगैरे थोतांडं ज्या समाजात हातोहात खपून जातात त्या समाजाची वैज्ञानिक समज आणि साक्षरता बेताचीच असणार हे ओघानं आलंच. पण ही विज्ञानसाक्षरता वाढावी यासाठी काही प्रयत्न होतायत का आपल्याकडे? त्याचं हे वास्तवदर्शी उत्तर..
आपल्याकडे विज्ञान शिक्षण/प्रसार आदींसाठी अर्थसंकल्पातली फक्त १ टक्का रक्कम राखून ठेवली जाते. गेली कित्येक वर्षे आपले राजकीय पक्ष निवडणुकांआधी आपल्याला सांगतायत, ही रक्कम दोन टक्के इतकी केली जाईल. अजून काही ती झालेली नाही. आपण हे असे हात राखून विज्ञानावर खर्च करीत असताना चीनचा विज्ञानावरचा खर्च आहे १.९ टक्के आणि अमेरिकेचा तर २.७५ टक्के. हे दोन्ही देश अर्थव्यवस्थेने आपल्यापेक्षा साधारण चारपट आणि आठपट मोठे आहेत. तेव्हा त्याच्यावरून अंदाज येईल ते किती खर्च विज्ञानावर करतायत आणि आपल्याकडे किती आहेत.
याचा परिणाम संपूर्ण विज्ञान क्षेत्रावरच दिसतो. म्हणजे असं की माध्यमिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण टप्प्यांत असणाऱ्या विद्यार्थ्यांपकी तब्बल ५९ टक्के विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगशाळा म्हणजे काय, तेच माहीत नसतं. कारण त्यांच्यासाठी तशी सोयच नसते. त्यांना प्रयोगशाळा माहीत होते ती थेट दहावीच्या वर्गात गेल्यावर. आता त्यात त्यांचा काय दोष? कारण देशातल्या संपूर्ण शाळांपकी ७८ टक्के इतक्या शाळांना प्रयोगशाळा उभारण्यासाठी वेगळा वर्ग वगरे काहीही सुविधाच नाहीत. म्हणजे फक्त ३२ टक्के शाळांत प्रयोगशाळांची स्वतंत्र व्यवस्था आहे. खरा धक्का पुढेच आहे.
सध्या डिजिटल इंडियाचे वारे जोरजोरात वाहतायत. संगणक ही डिजिटायझेशनची पहिली गरज. पण ती पूर्ण होतीये फक्त ३७ टक्के इतक्याच शाळांत. कारण तेवढय़ाच शाळांत फक्त आपल्याकडे संगणक आणि त्यांची जोडणी आहे.
मागे एकदा मरहूम एपीजे अब्दुल कलाम मानखुर्दला भाभा केंद्रात गप्पा मारताना म्हणाले होते, आपल्याकडे शुद्ध विज्ञान कोणाला नकोच आहे.. सगळ्यांना उपयोजनांतच..म्हणजे अप्लाइडमध्येच.. रस आहे. म्हणजे विज्ञान शिकायचं नाहीये, पण अभियंते व्हायचंय. साहजिकच आहे ते. इंजिनीअर झालं की नोकऱ्या वगरे मिळतात..पटकन अमेरिकेला जाता येते वगरे. त्यामुळे आपल्याकडे वैज्ञानिकांची संख्या कमीच होताना दिसते. अमेरिकेत दर दहा लाखांत ७९ शास्त्रज्ञ असतात. चीनमध्ये ते १८ आहेत, ब्राझीलमध्ये १४ आणि रशियात तब्बल ५८. आपल्याकडे काय आहे हे प्रमाण? दर दहा लाखांत फक्त ४. म्हणजे एकाच हाताची बोटंसुद्धा पुरून उरतील. आता इतकं कमी प्रमाण आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रसाराचं. त्यामुळे अर्थातच पेटन्टसाठी अर्ज करणाऱ्यांचं प्रमाणही तितकंच असणार. आपल्याकडे दर दहा लाखांत पेटन्टसाठी अर्ज केले गेले फक्त १७, तर चीनमध्ये ही संख्या आहे ५४१. आता या सगळ्याचीच बोंब म्हटल्यावर वैज्ञानिक प्रकाशनं वगरेंबाबत काय परिस्थिती असेल हे सांगायलाच नको.
आपल्याकडे खऱ्याखुऱ्या विज्ञान विषयाला वाहिलेली प्रकाशनं आहेत फक्त ९०. इथं खऱ्याखुऱ्या म्हणायचं कारण म्हणजे अलीकडे वर उल्लेख केलेल्या थोतांडी विज्ञानातल्या छाछूगिरीलादेखील लोक खरं विज्ञान मानू लागली आहेत. या आणि अशा विषयांचा आणि विज्ञानाचा दूरान्वयानेदेखील संबंध नसतो. सव्वाशे कोटींच्या भारतात खऱ्याखुऱ्या करकरीत विज्ञानाला वाहिलेली प्रकाशनं आहेत फक्त ९० इतकीच. अमेरिकेची लोकसंख्या ४० कोटीही नाही, पण त्या देशात अशा विज्ञान प्रकाशनांची संख्या आहे ४५०. इंग्लंड तर लोकसंख्येत महाराष्ट्रापेक्षाही कमी आहे. पण विज्ञानविषयक प्रकाशनं आहेत १२५. आकार आणि लोकसंख्येनं आपल्यापेक्षा मोठा आहे चीन. विज्ञान प्रकाशनांतही चीन आपल्यापेक्षा किती तरी पुढे आहे. चीनमध्ये वर्षांला ३२५ इतकी वैज्ञानिक प्रकाशनं आहेत. विज्ञानाबाबतच जर इतकी अनास्था असेल तर नवनवीन संशोधनांत आनंदीआनंदच असणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. जगात नवीन काही करणाऱ्या देशांचा म्हणून एक निर्देशांक आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. त्यात आपण अगदी तळाच्या काही देशांत आहोत. आपल्या मागे आहे कझाकिस्तान वगरे.
.. आणि आता आपण एकदम हे मेक इन इंडिया वगरे सुरू करतोय. छानच आहे ते. पण आपल्याकडे प्लॅस्टिक सर्जरी आधीच होती..औषधशास्त्र होतं.. विमानं उडत होती..हे होतं..ते होतं..त्यांचं आता काय करायचं याचा विचार करायला हवा. कारण प्रश्न आहे.. या पुराणातल्या मेड इन इंडिया गोष्टी पुसल्याशिवाय नवं मेक इंडिया होणार का..?
मेड इन इंडियाचं काय?
आपल्याकडे शुद्ध विज्ञान कोणाला नकोच आहे.. सगळ्यांना उपयोजनांतच..म्हणजे अप्लाइडमध्येच..
Written by गिरीश कुबेर
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-01-2016 at 03:28 IST
मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venkatraman ramakrishnan criticism on indian science congress annual convention