गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com
@girishkuber
पीटर स्मिथ यांना २००१ मध्ये, कन्या व्हेरोनिका हिच्यामुळे ‘पिनोशिओ पॅराडॉक्स’ ही कल्पना सुचली. हल्लीच ‘द वॉशिंग्टन पोस्ट’नं या संकल्पनेचं थोडय़ा वेगळ्या स्वरूपात पुनरुज्जीवन केलं. ‘तळशून्य पिनोशिओ निर्देशांका’ची आकडेवारी त्यांनी जाहीर केली..
इटालियन लेखक कार्लो कोलोदी याची लहान मुलांसाठीची एक कादंबरी पाश्चात्त्य जगात चांगलीच लोकप्रिय आहे. अॅडव्हेंचर्स ऑफ पिनोशिओ. म्हणजे पिनोशिओच्या उचापती. आपल्या मराठीत भा रा भागवत यांचा फास्टर फेणे किंवा ताम्हनकरांची चिंगी कसे पिढय़ान्पिढय़ा लोकप्रिय आहेत, तसा हा पिनोशिओ. आपला फास्टर फेणे शूर आहे, कल्पक आहे आणि सकारात्मक खोडकर आहे. आता अलीकडे मुलांच्या आईबापांनीच तो वाचलेला नसतो त्यामुळे आताच्या मराठी मुलांना डोरेमॉन, शिनचॅन वगैरेच माहिती असतात हा भाग सोडा. हे आपलं कर्मदारिद्रय़. पण पिनोशिओ मात्र आपली लोकप्रियता टिकवून आहे. आपल्या फास्टर फेणे, चिंगीपेक्षा तसा भाग्यवान म्हणायचा तो. कारण तिकडे त्याचं आता मोठय़ांनी पुनरुज्जीवन केलंय. त्याचा एक गुण अलीकडे समाजात भरभरून दिसतो, असं अनेकांचं मत आहे.
थापा मारणं हा तो गुण. पिनोशिओ थापाडय़ा आहे. उठताबसता तो थापा मारतो. त्यामुळे त्याला शिक्षा झालीये. ती अशी की प्रत्येक थापेसाठी त्याचं नाक लांब होत जाणार. ते किती लांब होणार याला.. म्हणजे त्याच्या लांबीला.. काहीही मर्यादा नाही. असलीच तर पिनोशिओलाच ती ठरवायला हवी. थापा जरा कमी मारायच्या हा त्यावर उपाय. म्हणजे नाक लांब होणं थांबणार. पण ते काही त्याला जमत नाही. थापा मारण्याचा मोह काही आवरत नाही आणि नाक लांब लांब होत राहाणं काही टळत नाही. ते शेवटी इतकं लांब होतं की पिनोशिओ एकदा म्हणतो- मला दरवाजातून आतच शिरता येत नाहीये..
या शतकाच्या सुरुवातीला व्हेरोनिक स्मिथ हिनं ‘पिनोशिओ पॅराडॉक्स’ या संकल्पनेला जन्म दिला. तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान यातले अभ्यासक, लेखक पीटर स्मिथ यांची ती अवघ्या ११ वर्षांची मुलगी. त्या वयातल्या लहान मुलांना बाबा गोष्ट सांगतात तसं पीटर यांनी तिलाही पिनोशिओची गोष्ट सांगितली. त्यानंतर घरात गमतीनं तिनं कसलीही थाप मारली की बाबांना येऊन म्हणायची.. नाक तपासून बघा माझं.. लांब झालंय का ते. त्यातनं स्मिथ यांना कल्पना सुचली. पिनोशिओ निर्देशांकाची. बोलघेवडय़ांच्या थापांची लांबीरुंदी मोजण्यासाठी त्यांनी हा निर्देशांक जन्माला घातला.
आणि अलीकडे अमेरिकेतल्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकानं त्याचं अधिकृतपणे पुनरुज्जीवन केलं. फक्त त्यात कालानुरूप बदल तेवढे त्यांनी केले. त्यांनी त्याला नाव दिलं बॉटमलेस पिनोशिओ इंडेक्स. तळशून्य पिनोशिओ निर्देशांक. म्हणजे ज्यांच्या थापांचं मोजमापच करता येत नाही अशा लोणकढय़ा मोजायच्या, सत्यापासनं त्या किती लांब आहेत ते पाहायचं, किती वेळा या थापांची पुनरुक्ती संबंधित व्यक्तीकडनं केली जातीये त्याची गणना ठेवायची आणि शास्त्रशुद्ध, सांख्यिकी पद्धतीनं हा सर्व तपशील वाचकांना सादर करायचा. या अशा पद्धतीचा फायदा असा की त्यात एखाद्यावर नुसता किती खोटं बोलतोय.. असा आरोप होऊ शकत नाही. ती व्यक्ती किती वेळा, कोणत्या ठिकाणी नक्की काय बोललीये याचा सारा तपशीलच त्यात देता येतो. म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ.. असं करता येतं. पण तसं करतानाही त्यांनी एक निकष आखलाय. तो असा की या निर्देशांकात पात्र ठरण्यासाठी काही एक किमान पात्रता हवी. पोस्टचा अनुभव असा की सर्वसाधारण राजकारणी सत्यापलाप करताना पकडला गेला की जास्तीत जास्त तीन वेळा तो ती चूक करतो. मूळची एक थाप आणि नंतर तीन वेळा तिचा पुनरुच्चार. म्हणजे चार वेळा एक थाप सरासरी मारली जाते. नंतर तो थांबतो.
पण तळशून्य पिनोशिओ निर्देशांकाचं वेगळेपण असं की चारपेक्षा जास्त वेळा थाप मारणाऱ्यांचाच या निर्देशांकानं मोजमाप करण्यासाठी विचार होईल. जे कोणी एकच थाप चारपेक्षा अधिक आणि किमान २० वेळा मारतील त्यांचीच तेवढी गणना या निर्देशांकानं केली जाईल. या निर्देशांकानं मोजमाप केलेल्यांचा तपशील वॉिशग्टन पोस्टनं अलीकडे जाहीर केला.
यात एकमुखानं, निर्विवादपणे विजेते ठरले अमेरिकेचे अध्यक्ष माननीय डोनाल्ड ट्रम्प. काय काय थापा मारल्या त्यांनी ते वाचणं उद्बोधकच. उदाहरणार्थ..
या निर्देशांकानुसार अध्यक्ष ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेवरील भिंतीची थाप.. म्हणजे ही भिंत बांधायला सुरुवात झाल्याची.. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ८६ वेळा मारली असं हा निर्देशांक दाखवून देतो. २०१६ सालच्या त्यांच्या निवडणूकपूर्व घोषणेनुसार ट्रम्प या भिंतीचा खर्च मेक्सिको देशाकडून वसूल करणार होते. ते त्यांना जमलेलं नाही. मेक्सिको कशाला या फंदात पडेल असा प्रश्नही त्यांना पडला नाही. ते सोडा. पण त्यानंतर अमेरिकी तिजोरीतनं त्यासाठी पसा खर्च केला जाईल असं त्यांनी सांगितलं. त्यांचा हा प्रयत्न डेमोक्रॅटिक पक्षानं हाणून पाडला. त्यामुळे या भिंतीवर डोकं आपटण्याखेरीज दुसऱ्या कशात ट्रम्प यांना काही यश आलेलं नाही. आणीबाणीच्या अधिकारातनं ट्रम्प यांनी काही रक्कम त्या कामासाठी वळवली. पण ती काही ते भिंतीसाठी खर्च करू शकले नाहीत.
पण तरीही ट्रम्प यांनी आपल्या लोणकढय़ा काही थांबवल्या नाहीत. या भिंतीचं काम सुरू झालंय, असंच ते सांगत असतात. या निर्देशांकाच्या कचाटय़ात ट्रम्प यांची अशी किमान १४ विधानं/ घोषणा सापडल्यात. पोस्टनं त्याची तीन गटांत वर्गवारी केलीय. एक म्हणजे निवडणुकीआधी आश्वासन दिलं होतं पण ते त्यांना पूर्ण करता आलेलं नाही आणि तरीही त्याच्या पूर्ततेचं श्रेय ते घेतायत, दुसरा वर्ग आपल्या धोरणांच्या पाठपुराव्यासाठी रचलेल्या थापा आणि तिसरी वर्गवारी म्हणजे आपल्या विरोधकांच्या संभावनेसाठी ठरवून घेतलेला असत्याचा आधार. या सगळ्याचे अनेक मासले या निर्देशांक संकलनात पोस्टनं दिलेत.
ट्रम्प यांनी अमेरिकेचं पश्चिम आशियाचं धोरण बदललं. त्याची कारणमीमांसा करताना त्यांनी सांगितलं, त्या आखाती प्रदेशात अमेरिकेचा खर्च सात लाख कोटी डॉलर्स इतका प्रचंड आहे. हे विधान त्यांनी १४ वेळा केलंय आणि प्रत्येक वेळी ते हीच रक्कम सांगतात, असं पोस्ट दाखवून देतो. पण सत्य हे आहे की अमेरिका जेवढा खर्च करते त्यापेक्षा ३६ पटींनी अधिक रक्कम ट्रम्प फुगवून सांगतायत. आपल्या धोरणाच्या समर्थनार्थ हा त्यांचा उद्योग. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, म्हणजे नाटो, ही युरो-अमेरिकी देशांची जागतिक संघटना. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून या संघटनेचं आणि अमेरिकेचं फाटलंय. तिच्यातनं बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. ही बाब धोकादायक मानली जाते. पण ट्रम्प यांना पर्वा नाही. नाटो संघटनेसाठी सर्वात जास्त खर्च अमेरिकाच करते, हे त्यांचं यासाठी समर्थन. पण ही थाप आहे आणि ती त्यांनी तब्बल ८७ वेळा मारलीये. अध्यक्षीय निवडणुकांच्या काळात डेमोक्रॅटिक पक्षानंच रशियन यंत्रणांशी हातमिळवणी केली, ही त्यांची आणखी एक लोणकढी. प्रत्यक्षात ट्रम्प यांचीच या उद्योगासाठी चौकशी सुरू आहे. पण डेमोक्रॅटिक पक्षाची बदनामी करणारं हे विधान त्यांनी ४८ वेळा केलंय. ट्रम्प यांची चौकशी करणारे रॉबर्ट म्युलर यांच्यावर व्यावसायिक हितसंबंधांचा असत्य आरोप ट्रम्प यांनी ३० वेळा केलाय. पण हा काही विक्रम नाही.
तो आहे त्यांच्या करकपातीच्या घोषणेत. माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी केली होती त्यापेक्षाही विक्रमी करकपात आपण केली, असं ट्रम्प मोठेपणा घेण्यासाठी सांगतात. मुळात रेगन यांची कपात विक्रमी नव्हती. पण तरीही ट्रम्प त्याचा दाखला देतात. आजतागायत त्यांनी हे विधान तब्बल १२३ वेळा केलंय.
असे अनेक दाखले. एखादं वर्तमानपत्र सत्याच्या पाठपुराव्यासाठी काय करू शकतं.. आणि मुख्य म्हणजे त्याला सरकार, समाज ते करू देतो.. हे पाहणं देखील आनंददायीच.