प्रत्येक व्यक्तीची इच्छा, आकांक्षा तसेच आवड आदींचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर आणि एकंदर जीवनावर होत असतो. त्यामुळे अनेकदा चांगल्या-वाईटाचा विचार न करता आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी माणूस चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो आणि त्याची परिणती अखेर वाईटात होते. हाच धागा पकडून अजित कुलकर्णी यांनी ‘हीट ऑफ द नाइट’ या कादंबरीचा गोफ विणला आहे. एखाद्या मसाला चित्रपटाला शोभेल असे कथानक लेखकाने उभे केले आहे. एका कंपनीचा वरिष्ठ अधिकारी असणारा विल्यम बेकर ऊर्फ विली, त्याची सेक्रेटरी कॅरल यांचे बेकायदेशीर मार्गाने पैसे कमावण्याचे कारस्थान आणि या कटकारस्थानाला सुरुंग लावून स्वत:चा फायदा बघणारा कंपनीच्या अकाऊंट विभागातील डेमियन रॉबिन्स ही या कादंबरीतील तीन प्रमुख पात्रे.
ऑटोमोबाइल क्षेत्रातील अग्रणी कंपनी असलेली शिकागोतील मर्सिअर एन बाऊम (एमएनबी) आर्थिक मंदीच्या फेऱ्यात अडकते. परदेशी कंपन्यांच्या आक्रमणाने पुरत्या कोलमडलेल्या एमएनबीमधील कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळते. या पाश्र्वभूमीवर कंपनीचे व्यवस्थापन आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धोक्याची सूचना देते आणि बाजारात तगून राहायचे असेल तर एखादे मोठे कंत्राट मिळवावेच लागेल, असे सांगते. कंपनीच्या सेल्स विभागाची जबाबदारी असणाऱ्या विल्यम बेकर ऊर्फ विलीवर साहजिकच त्याची जबाबदारी येते.
अधिकाधिक पैसे कमावण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या विलीला या कामात मदत करते ती त्याची सेक्रेटरी कॅरल. कोणत्याही परिस्थितीत समोर आलेले बॉश या कंपनीचे कंत्राट मिळवायचेच असा निर्धार केलेला विली त्यासाठी कॅरल आणि बॉश कंपनीचा अधिकारी जेरम कर्टिस याच्याबरोबरच संधान बांधतो. या कंत्राटासाठी इतर कंपन्यांनी भरलेली रक्कम माहीत करून आपली निविदा भरण्याचा विलीचा डाव असतो. मात्र कंत्राटच मिळवायचे नाही तर त्यातून आपलाही फायदा होईल, असा विचार करून विली, कॅरल आणि बॉश कंपनीचा अधिकारी जेरम गैरव्यवहार करून १२ दशलक्ष डॉलर आपल्या पदरात पाडून घेतात. भली मोठी रक्कम हातात पडल्याचा आनंद साजरा करत असतानाच त्यांच्या आनंदावर विरजण पडते. कंपनीच्या अकाऊंट विभागात काम करणारा डेमियन रॉबिन्स हा विलीला त्यांच्या गैरकृत्याची माहिती असल्याचे सांगतो, तसेच त्याबाबतचा पुरावादेखील आपल्याजवळ असल्याचे स्पष्ट करून पैशाची मागणी करतो. विशेष म्हणजे ही बाब डेमियनला जेरमने सांगितल्याचेही विलीला समजते. प्रकरण वरिष्ठांपर्यंत न्यायचे नसेल तर आपल्यालाही हिस्सा हवा, अशी मागणी केल्यामुळे विली आणि कॅरल त्याला पैसे देण्याचे मान्य करतात. मात्र पैसे घेतल्यानंतरही डेमियन गप्प बसणार नाही, याची खात्री पटल्यामुळे विली त्याचा काटा काढण्याचे ठरवतो आणि त्याच्या घरी जाऊन थेट गोळी मारतो. त्याच वेळी डेमियनच्या घरात उपस्थित असलेली कॅरल विलीचे कृत्य मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करते आणि मग कथानक अनपेक्षित वळण घेते.
अनैतिक मार्गाने पैसे कमावण्यासाठी विलीला मदत करणारी कॅरल ही एमएनबीमध्ये आधीपासूनच गैरव्यवहार करीत होती. कंपनीत झालेल्या एका दुर्घटनेनंतर कामगारांच्या विम्याच्या रकमेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर येते. या गैरप्रकाराचा छडा लावण्याची जबाबदारी विलीवर सोपवण्यात येते. मात्र अतिशय हुशार आणि रूपगर्विता असलेली कॅरल हुशारीने विलीलाच आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढते आणि पुढील सारे नाटय़ घडते.
आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची चिंता करणारा विली गैरप्रकार करण्यास धजावतो. तर लहानपणापासून हलाखीत वाढलेली आणि ऐन तारुण्यात संसाराची स्वप्ने पाहत असतानाच पतीच्या अपघाती मृत्यूने खचलेली आणि नंतर परिस्थितीने कणखर बनलेली कॅरल केवळ पैसेच कमावण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवते. त्यासाठी विली आणि डेमियनलाही आपल्या जाळ्यात ओढते. या तीन मुख्य पात्रांव्यतिरिक्त कथेला कलाटणी देणारा जेरम कर्टिस हे पात्र आहे. बॉश कंपनीचे कंत्राट विलीला मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या जेरमला जेव्हा आपल्या पत्नीचे डेमियनशी अनैतिक संबंध असल्याचे कळते, तेव्हा तो डेमियनचा काटा काढण्याचा निर्धार करतो. याशिवाय विलीची मुलगी अँजेलिना ऊर्फ अंजी आणि तिचे फसलेले प्रेमप्रकरण, विलीची पत्नी जेनी, जेरमचा निष्ठावान सहकारी अल्फी आणि त्याची प्रेयसी, डेमियनची पाश्र्वभूमी, आंतरराष्ट्रीय माफिया, डेमियनचा खून नेमका कोणी केला, पोलिसी तपास, विलीची अपराधीपणाची भावना, गैरमार्गाने मिळवलेल्या पैशाचे काय होते, कॅरलचे काय होते आदी बारीकसारीक घटना आणि पात्रांचा मागोवा घेत कादंबरीला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखक पेशाने वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहेत. पॅथोलॉजिस्ट म्हणून त्यांनी नाव कमावले आहे. मात्र आपल्या अंगी असलेल्या इतर कलागुणांची जोपासना करीत साहित्य, गाणे, अभिनय आदी क्षेत्रांतही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. कुलकर्णी यांनी या कादंबरीतील प्रसंग वाचकांसमोर उभे करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
हीट ऑफ द नाइट : डॉ. अजित कुलकर्णी,
पद्मगंधा प्रकाशन, पुणे,
पाने : १५२, किंमत : २०० रुपये.
स्वार्थासाठी वाट्टेल ते
रत्येक व्यक्तीची इच्छा, आकांक्षा तसेच आवड आदींचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर आणि एकंदर जीवनावर होत असतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-04-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anything for greediness hit of the night dr ajit kulkarni