आपल्या देशातील वैज्ञानिकांच्या बुद्धिमत्तेचे चीज परदेशात गेल्यानंतरच होते, असा आजवरचा अनुभव आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय वैज्ञानिक आरोग्यस्वामी जोसेफ पॉलराज यांचीही कथा याच दिशेने जाणारी आहे. त्यांना अलीकडेच तंत्रज्ञानातील नोबेल मानले जाणारे एक लाख डॉलरचे मार्कोनी पारितोषिक मिळाले आहे. रेडिओचा शोध लावणारे इटलीचे वैज्ञानिक गुलिमो मार्कोनी यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या मार्कोनी सोसायटीतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार यंदा या संस्थेच्या पन्नाशीत एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाला मिळावा, ही अभिमानास्पद बाब आहे. आरोग्यस्वामी पॉलराज हे सध्या स्टॅनफर्ड विद्यापीठात प्राध्यापक असून, त्यांनी अतिशय वेगवान अशी बिनतारी वाय-फाय सेवा तसेच फोर जी मोबाइल सेवा यात मोलाचे संशोधन केले आहे. त्यांनी शोधून काढलेल्या एमआयएमओ म्हणजे मल्टिपल इनपुट व मल्टिपल आऊटपुट या तंत्रज्ञानामुळे वायरलेस ब्रॉडबॅण्ड सेवा अधिक वेगवान बनली असून, त्यामुळे मल्टिमीडिया म्हणजे बहुमाध्यम सेवा अधिक जलद झाली आहे. आज आपण जे वाय-फाय रूटर व फोर जी सेवेवर आधारित फोन वापरतो त्यात एमआयएमओ हे पॉलराज यांनी विकसित केलेले तंत्र वापरले आहे. आता सर्व बिनतारी यंत्रांमध्ये त्याचा वापर सुरू होईल तेव्हा जग आणखी लाइटनिंग फास्ट होईल यात शंका नाही. पॉलराज यांचा जन्म तामिळनाडूतील कोईमतूर येथे झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी ते खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीत आले व नंतर तीस वर्षे नौदलात सेवा केली. १९७१ मधील पाकिस्तान युद्धात आपल्या नौदलाकडे असलेल्या सोनार यंत्रात अनेक त्रुटी असल्याचे दिसून येताच पॉलराज यांनी नौदलास अपसोह (अ‍ॅडव्हान्सड पॅनोरामिक सोनार हल माऊंटेड) ही यंत्रे तयार करून दिली. त्यांना भारताने पद्मभूषण, अतिविशिष्ट सेवापदक असे काही मानसन्मान दिले. भारतीय नौदलाने त्यांना दिल्लीतील आयआयटीत पाठवले, त्यासाठी त्यांचे विद्युत अभियांत्रिकीचे प्राध्यापक पी. व्ही. इंदिरेशन यांनी आग्रह धरला होता, कारण त्यांना आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता माहीत होत्या. १९७०च्या सुमारास मूळचे पुण्याचे असलेले स्टॅनफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक थॉमस कैलथ हे दिल्लीच्या आयआयटीत व्याख्यानासाठी आले होते. त्यांनी तेथे जे भाषण केले त्यामुळे आरोग्यस्वामी पॉलराज भारावून गेले व दूरसंचार तंत्रज्ञानाकडे वळले. त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भारतीय नौदलासाठी बरेच काम केले. कालांतराने ते स्टॅनफर्डला गेले. तेथे प्राध्यापक झाले, पण नंतर दोन वर्षांची अभ्यास रजा घेऊन भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय नौदलात रुजू करून घेण्याची संधी होती, पण नोकरशाहीच्या लालफितीच्या कारभाराला वैतागून ते स्टॅनफर्डला परत गेले. भारतात बुद्धिमान व्यक्तींच्या कामाचे चीज होत नाही ते असे!

Story img Loader