कबीरांनी जिथे मठ, मंदिर, मशिदीतील भगवंताच्या कथित भक्तांवर कोरडे ओढले तिथे आपल्यासारख्यांची काय कथा? ज्यांचे संपूर्ण जीवन भगवंतासाठी आहे, अशांच्या भक्तीतलाही बेगडीपणा कबीरजी उघड करतात मग आपल्या मोडक्यातोडक्या साधनांबद्दल काय म्हणावं? पण भगवंतसमर्पित जीवनाची संधी लाभूनही जे भगवंताची बेगडी भक्ती करतात त्यांच्यावर कोरडे ओढण्यामागे कबीरांचा उद्देश एकच आहे आपल्यासारख्यांनी सावध व्हावं. भक्तीचा खरा अर्थ जाणून खऱ्या वाटेने खरी वाटचाल करावी. कबीरजी सांगतात, ‘‘मनुष जनम दुर्लभ अहै, होय न बारम्बार। तरवर से पत्ता झरै, बहुरि न लागै डार।।’’ माणसाचा जन्म मोठा दुर्लभ आहे. तो वारंवार मिळत नाही. एकदा झाडावरून पान गळून पडलं की ते पुन्हा कितीही वेळा फांदीला चिकटवा, ते चिकटत नाही! मग हा जन्म माणूस कसा वृथा घालवतो, हे दाखवणारे आणि माणसाला सावध करीत या जन्मात काय साधा, हे सांगणारे कबीरांचे दोन प्रसिद्ध दोहे आहेत. ते असे-
माटी कहै कुम्हार को, तूँ क्या रूँदै मोहिं।
इक दिन ऐसा होयगा, मैं रूँदूँगी तोहिं।।
आये हैं सो जायेंगे, राजा रंक फकीर।
एक सिंघासन चढिम् चले, इक बाँधे जात जँजीर।।
माटी कहै कुम्हार को.. या पहिल्या दोह्य़ात दोन शब्द महत्त्वाचे आहेत माती आणि कुंभार. ही रूपकं आहेत. ‘माती’ हे पंचमहाभूतांचं रूपक आहे तर ‘कुंभार’ म्हणजे जीव. ही दोन्ही रूपकं अतिशय चपखल आहेत. मातीचं भांडं जे बनतं त्यात पृथ्वी(माती), आप (पाणी), तेज (अग्नि), आकाश आणि वायु या पंचमहाभूतांचा वाटा असतोच. मडक्यासाठी माती मुख्य घटक आहे. ती पाण्यात भिजवून मळावी लागते, रगडावी लागते. मग तिचं मडकं बनतं त्यात अवकाश असतंच. वाऱ्यानं ते मडकं सुकवावं लागतं. मग ते भाजून पक्कं करावं लागतं. तर मडकं आहे पंचमहाभूतांचं आणि ते घडविणारा कुंभारही तर पंचमहाभूतांनीच तर बनला आहे! पंचमहाभूतांनी बनलेला जीव जन्माला येतो आणि त्या पंचमहाभूतांनी बनलेल्या सृष्टीवरच सत्ता गाजवू पाहातो! आपल्या ‘मी’पणाने जगू पाहातो! हा भ्रामक ‘मी’पणा प्रस्थापित करू पाहातो. क्षणभंगूर जीवनातील त्याच्या या धडपडीला ही पंचमहाभूते हसतात आणि म्हणतात, बाबारे आज मिळालेल्या जीवनाचा कसाही वापर कर. पंचमहाभूतांनी घडलेल्या सृष्टीचा कसाही वापर कर, पंचमहाभूतांनीच बनलेल्या तुझ्या या शरीरातील क्षमतांचा आधारदेखील ही पंचमहाभूतेच तर आहेत, तेव्हा त्या क्षमतांचाही कितीही गैरवापर कर पण एक दिवस तुला हे जग सोडायचं आहे, या पंचमहाभूतांतच तू मिसळून जाणार आहेस. मग असे असताना हा क्षुद्र वेगळेपणा कशासाठी? तो टिकविण्याची, जोपासण्याची धडपड कशासाठी?
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २५१. माटी कहै कुम्हार से
कबीरांनी जिथे मठ, मंदिर, मशिदीतील भगवंताच्या कथित भक्तांवर कोरडे ओढले तिथे आपल्यासारख्यांची काय कथा? ज्यांचे संपूर्ण जीवन भगवंतासाठी आहे, अशांच्या भक्तीतलाही बेगडीपणा कबीरजी उघड करतात मग आपल्या मोडक्यातोडक्या साधनांबद्दल काय म्हणावं?
First published on: 14-11-2012 at 04:35 IST
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aroopache roop satyamargadarshak