परमात्म्याचा जो शोध घ्यायचा, त्यात वेळ वृथा दवडू नका, असं कबीर सांगतात. अनेकानेक दोह्यातून वारंवार सांगतात. पण झोपी गेलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जागं करणार? आपण त्या दोह्यांचा मुख्य उद्देश नजरेआड करून त्याच दोह्यांचा वापर व्यावहारिक जगासाठी करून घेतो. विश्वास बसत नाही? हा प्रसिद्ध दोहाच पहा- परमात्म्याचा शोध घ्यायला वेळ दवडू नकोस म्हणजे किती लवकर तो सुरू कर, हे सांगताना कबीरजी म्हणतात,
काल्ह करै सो आज करू, आज करैं सो अब।
पल में परलै होयगी, बहुरि करेगा कब्ब।।
उद्या करायचं ते आजच कर, आज करायचं ते आत्ताच कर. क्षणार्धात प्रलय होऊन होत्याचं नव्हतं होऊ शकतं, मग काय उपयोग? म्हणून करायचं तर वेळ दवडू नकोस. कबीरांनी अतिशय कळकळीनं परमार्थासाठी हे सांगितलं. माणूस मोठा चतुर. त्यानं या दोह्याचं पहिलं वाक्य आपल्या व्यवहारातील कामांसाठी चिकटवून टाकलं. ‘भौतिकाचं काम उद्या करायचं ते आजच करा, आज करायचं ते आत्ताच करा’! कबीर मात्र सांगतात,
काल्ह करै सो आज करू, सबहि साज तेरे साथ।
काल्ह काल्ह तू क्या करै, काल्ह काल के हाथ।।
बाबारे, जे उद्या करायचं ते आजच कार कारण आज तुझ्यात सर्व क्षमता आहेत, प्रयत्नांसाठी अवधी आहे. उद्याचं कोणी पाहिलं आहे? ‘उद्या’ तर काळाच्या हातात आहे! माणूसही अगदी काहीच करीत नाही, असे नव्हे. तोही जमेल तशी भक्तीबिक्ती करतो. तो स्वतला परमात्म्यापासून अभिन्न मानत नसला तरी आपल्या जीवनात परमात्म्याची कृपा त्याला हवी असते. त्याचं एकमेव कारण आपलं भौतिक जीवन परमात्म्याच्या कृपेनं निर्वेध आणि दुखरहित पार पडावं, अशी त्याची सुप्त इच्छा असते. त्याला तुरुंगातून सुटका नको असते, तुरुंगातलं राहाणं सोयीचं, सुखाचं व्हावं, अशी त्याला आस असते! त्यासाठीच तो भक्तीचं अवडंबरही मांडतो. पण ज्याचा शोध घ्यायचा त्याला या अवडंबराशी काही देणंघेणं नाही, ज्याला आळवायचं तो अंतरंगात आहे. त्यासाठी हृदयात खोलवर हाक मार बाहेर हाकाटी करू नकोस. कबीर कोणाचाही मुलाहिजा न बाळगता सांगतात, ‘‘ना जाने तेरा साहेब कैसा है। मस्जिद भीतर मुल्ला पुकारै, क्या साहेब तेरा बहिरा है। चिउँटी के पग नेवर बाजै, सो भी साहेब सुनता है।। पंडित होय के आसन मारै, लम्बी माला जपता है। अंतर तेरे कपट कतरनी, सो भी साहेब लखता है।।’’ तो परमात्मा कसा आहे तू जाणतोस का? मशिदीत मुल्ला मोठ्ठय़ा आवाजात बांग देतो, पण मुंगीच्या पायात घुंगरू बांधले तरीही जो त्यांचा ध्वनी ऐकेल तो परमात्मा काय बहिरा आहे? पंडित आसन ठोकून माळा जपतो पण त्याच्या अंतरंगातला दुनियादारीचा कपटी जपही परमात्मा ऐकतोच!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा