इन द बिगिनिंग व्हॉज द वर्ड! ओमकार प्रकटला आणि तोच ईश्वर होता. ईश्वरच सर्व काही झाला. ‘ओमित्येतदक्षरमिदं सर्वम्’ ‘सर्वमोङ् कार एव’ (कठोपनिषद). Word was God. All things were made by him; and without him was not anything made! गंमत म्हणजे फादर स्टीफन्स यांनी लिहिलेल्या ‘ख्रिस्तपुराणा’तही बायबलमधील संत जॉन यांच्या शुभवर्तमानातील प्रारंभाचा भावानुवाद असा आहे- ‘‘ओम नमो विश्वभरिता। देवा बापा सर्वसमर्था। परमेश्वरा सत्यवंता। स्वर्ग पृथ्वीचा रचणारा।।’’ (संदर्भ- फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे ‘सुबोध बायबल’, प्रकाशक- राजहंस, पृ. ७३५). ‘कुराण’ या मुस्लिमांच्या धर्मग्रंथात तर परमेश्वर अर्थात अल्लाच सर्व चराचराचा आधार असल्याचा उल्लेख वारंवार आहे. ‘अल फतिहा’त म्हंटले आहे की सर्व स्तुतीचा अधिकारी अल्लाह हाच आहे जो सर्व जगाचा विधाता आहे (अल् हम्दुलिल्लाहि रब्बि(अ)ल् अमलमीन) ‘अल् बकराह’मध्ये म्हंटले आहे की, ‘(अल्ला) हा तोच आहे ज्याने या सृष्टीमध्ये असलेले सर्व काही (तुमच्यासाठी) निर्माण केले आहे.’ ‘अन् नम्ल’ (सुरा २७. आयत ६० ते ६४) यात तर आकाश, भूमी, पाणी, वृक्ष (सृष्टी) कोणी निर्माण केले, अशी प्रश्नांची मालिकाच असून त्याचं उत्तर अल्लाह हेच आहे. ‘अल् मुल्क’मध्ये (६७.२) म्हंटलं आहे, ‘त्याच्या हाती अधिराज्य आहे आणि प्रत्येक वस्तुमात्रावर त्याची सत्ता आहे.’ (संदर्भ- क़ुरआन-ए-हकीम, मूळ अरबीसह मराठी अनुवाद/ प्रकाशक- इस्लाम इंटरनॅशनल पब्लिकेशन, इंग्लंड). याचाच अर्थ ही सर्व सृष्टी त्या एकाच परमात्म्याने निर्माण केली आणि तोच चराचराचा नियंता आहे, हे सर्वच धर्मानी स्पष्टपणे सांगितलं आहे. आता त्या परमात्म्यापर्यंत जायचा मार्गही सर्वच धर्मानी सांगितला आहे तो एकच आहे. बाह्य़रूपाने या मार्गात भिन्नता भासली तरी त्याचे आंतरिक स्वरूप एकच आहे ते म्हणजे परमात्म्याचे स्मरण, त्याची शरणागती, त्यालाच पूर्ण समर्पण. ‘अल्लाहचं स्मरण हीच सर्वात महान गोष्ट आहे,’ असं कुराण उच्चरवानं घोषित करतं. ‘बायबल’मध्येही म्हंटलं आहे, ‘remembrance of God is the greatest (thing in life) without doubt’ (29: 45) हे स्मरण साधण्याचा मार्गही एकच आहे तो म्हणजे नाम! आता नामच का? कारण वर्ड व्हॉज गॉड! सर्वमोङ्कार एव! सृष्टीच्या प्रारंभी शब्द होता. शब्द देवाबरोबर होता. देवच शब्द होता, हे जर खरं असेल तर आज मला देवाला प्रत्यक्ष पाहाणं साधत नाही पण त्याचं नाम अर्थात शब्द घेणं साधतं. माझ्या कोणत्याही शारीरिक, मानसिक, बौद्धिक मर्यादा त्या नामाच्या आड येत नाहीत. सृष्टीच्या आरंभी जे नामच होतं त्या नामाचं बोट धरून नामरूप ‘परमात्म्या’कडे मला जाता येईल, त्याची प्राप्ती मला साधेल. आता नामोपासनाही सर्वच धर्मात आहे आणि भगवंताच्या स्मरणाचा इतका सहज आणि प्रभावी उपाय दुसरा नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा