माणसाला शाश्वताची आणि पूर्णत्वाची ओढ असते आणि शाश्वत नेमकं काय, याबाबत तसेच खरी पूर्ती म्हणजे काय, याबाबत गफलत असल्याने माणूस जे अशाश्वत आहे आणि जे अपूर्ण आहे त्याच्याच प्राप्तीसाठी, जपणुकीसाठी धडपडत राहातो. पूर्ण जीवन निघून जातं आणि अपूर्त इच्छा, वासनांची रुखरुख चित्तात साठवतच माणूस अखेरचा श्वास घेतो. मग शाश्वत काय आहे? खरा पूर्ण कोण आहे? सर्वच धर्म सांगतात, परमात्मा हाच परमसत्य, परमपूर्ण आणि शाश्वत आहे. त्याला परब्रह्म म्हणा, ईश्वर म्हणा, परमेश्वर म्हणा, गॉड म्हणा, अल्लाह म्हणा. जो परम आहे तो एकच असला पाहिजे. त्याला नाव तुम्ही काहीही द्या. तेव्हा त्या परमात्म्याची प्राप्ती, त्या परमात्म्याशी ऐक्य साधणं हेच मानवी जन्माचं ध्येय आहे, असं कबीरांसकट सर्वच संत आणि सर्वच धर्म सांगतात. आता इथे दोन प्रश्न निर्माण होतात आणि आपल्या पुढील विवेचनाच्या प्रारंभीच त्यांचा विचार फार आवश्यक आहे. आपण या सदरातदेखील वारंवार वाचलं की परमात्मप्राप्ती, मुक्ती, मोक्ष हेच मानवी जन्माचं मुख्य ध्येय आहे. तर हा परमात्मा आहे तरी कोण आणि परमात्म्याची प्राप्ती, मुक्ती, मोक्ष याचा नेमका अर्थ काय? आता आधीच म्हटल्याप्रमाणे जो परम आहे तो एकच असला पाहिजे आणि त्याचा प्रत्यय सर्वच धर्माच्या ग्रंथातून येतो. परमात्मा हाच सर्व चराचरात भरून आहे, तोच सृष्टीचा नियंता आहे, त्याच्याच शक्तीने सृष्टीची घडामोड सुरू आहे, असं सर्वच धर्म सांगतात. ‘बायबल’मध्ये अर्थात नव्या करारात म्हंटलं आहे की, “In the beginning was the word, and the word was with the God, and the word was God. All things were made by him; and without him was not anything made that was made. In him was life; and the life was the light of men.’’(john 1 : 1-4) याचा अर्थ असा की, प्रारंभी शब्द (अर्थात नाम) होता. शब्द देवाबरोबर होता (नव्हे) देवच शब्द होता. समस्त वस्तुमात्र त्याच्यापासूनच निर्माण झाले. त्याच्याशिवाय काहीच उत्पन्न झाले नाही. (अर्थात तो जिच्यात नाही अशी वस्तूच जगात नाही) त्याच्यात जीवन (अर्थात चैतन्य) होते आणि ते जीवन मानवाकरिता प्रकाश होते (अर्थात त्या चैतन्यामुळेच समस्त जड-चेतन, दृश्य-अदृश्य, सजीव-निर्जीव सृष्टी ‘आहे’पणात अर्थात अस्तित्वात आली त्यातही मानवी जन्म हा या सृष्टीला प्रकाशवत ठरला. जिथून सर्व चराचर उत्पन्न झालं त्या प्रभूपाशी नेणारा प्रकाश! मानवी जन्म जर ज्ञानाच्या प्रकाशाने उजळला तर तोच प्रभूपर्यंत नेणारा मार्ग ठरतो!) हिंदूचे वेदही सांगतात की सृष्टीच्या आरंभी काहीच नव्हतं. केवळ ‘ते’च तत्त्व होतं. त्यापेक्षा वेगळं किंवा दुसरं काहीच नव्हतं. (तत् एकम् तस्मात् ह अन्यत् न पर: किमचन आद्य) मग ओमकार प्रकटला. ईश्वर आणि ओमकार एकच होता.
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक – २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)
माणसाला शाश्वताची आणि पूर्णत्वाची ओढ असते आणि शाश्वत नेमकं काय, याबाबत तसेच खरी पूर्ती म्हणजे काय, याबाबत गफलत असल्याने माणूस जे अशाश्वत आहे आणि जे अपूर्ण आहे त्याच्याच प्राप्तीसाठी, जपणुकीसाठी धडपडत राहातो.
आणखी वाचा
First published on: 07-11-2012 at 12:20 IST
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aroopache roop satyamargadarshak