एखाद्या मैफलीचं रसग्रहण करणं आणि एकूणच संगीताचा पसारा नव्यानं समजावून सांगणं अशा दोन्ही स्तरावर मराठीमध्ये हे लेखन झालेलं आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे भारतीय अभिजात संगीताबद्दल मराठीत जेवढं विपुल आणि महत्त्वपूर्ण लेखन झालं, तेवढं इतर भाषांमध्ये क्वचित वाचायला मिळतं.
संगीत म्हणजे पाण्यावरची अक्षरं. ऐकत असताना येणारी अनुभूती आणि त्यानंतरची मनाची रिक्त अवस्था शब्दात पकडणं नेहमीच अवघड. गाण्याचं वर्णन ‘सुंदर, अतिशय सुंदर, फारच सुंदर’ या विशेषणांनी केलं तरी हे शब्द वाचणाऱ्यांना संगीताच्या श्रवणाचा आनंद मिळवून देत नाहीत. तरीही आपण सगळे एकमेकांना भेटल्यानंतर संगीतावर गप्पा मारतच असतो. अमुक गाणं ऐकल्यानं कसं छान वाटलं, असं एकमेकांना सांगत असतो. आपल्या अल्प शब्दसंपदेचा आधार घेत आपण अनुभवलेल्या त्या अपूर्वाईचा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. बहुतेकवेळा आपण श्रवणाचा हा आनंद व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरत असतो, ते नेहमीच्या वापरातले असतात. त्यात उपमा, उत्प्रेक्षा यांसारख्या अलंकारांचा उपयोगही नसतो. तरीही आपल्याला जे वाटलं, ते दुसऱ्याला शक्यतो तसंच वाटावं, असा मात्र आपला प्रयत्न असतो. ते तसंच वाटतं किंवा वाटलं की नाही, हेही आपल्याला कळू शकत नाही. पण संगीताच्या श्रवणानं झालेला चिद्विलासी आनंद ही एक अपूर्व अशी गोष्ट असते, याचं भान मात्र आपल्याला फार लहानपणापासूनच आलेलं असतं. संगीतानं काही सांगायलाच हवं, असं नाही. त्यानं काही स्वत:चं जे त्यात मुळातच असेल, असं काही व्यक्त करायलाच हवं, असंही नाही. संगीत ही कलावंत आणि रसिक या दोघांसाठीही एक भावावस्था असते. ती मेंदूत तयार होते. तिथेच विरते आणि नंतर तिचे फक्त काही अवशेष उरतात. ऐकलेलं गाणं पुन्हा जसंच्या तसं मनातल्या मनात ऐकण्याची सोय मानवी मेंदूत नाही. ध्वनिमुद्रण ऐकल्याप्रमाणे आपण एखादी संपूर्ण मैफल पुन्हा ऐकू शकलो नाही, तरी त्या वेळी निर्माण झालेल्या अवस्थेचे जे उरलेसुरले तुकडे असतात, ते गोळा करून त्याची पुन्हा संगती लावण्याचा प्रयत्न मात्र आपण जरूर करत असतो. ध्वनिमुद्रणाचं तंत्र निर्माण होऊन अवघं शतक पूर्ण झालं आहे. मग त्या आधीच्या काळात काय होत होतं किंवा होत असेल?
भारतीय अभिजात संगीताच्या निर्मितीमध्ये समोर बसलेल्या गुणिजनांच्या प्रतिसादाचं महत्त्व फारच मोठं असतं. कलावंत आपली कला सादर करत असताना समोरून येणारा हा प्रतिसाद त्याला आणखी नवं सुचण्यास मदत करत असतो. नुसतं एवढंच नाही, त्या क्षणी त्या कलावंताच्या भावनिक अवस्थेत नवंच काही व्यक्त होऊन जात असतं. ऐकणाऱ्याच्या त्या क्षणीच्या मानसिक अवस्थेशीही त्याचा काही संबंध प्रस्थापित होत असतो. प्रत्यक्ष संगीत ऐकताना येणारा अपूर्वतेचा अनुभव मुठीत पकडून ठेवता येत नाही. ती भावनिक अवस्थाही साठवून ठेवता येत नाही. कित्येकदा असं घडतं की मैफलीत ऐकत असताना आलेला अनुभव नंतर ध्वनिमुद्रण ऐकताना जसाच्या तसा येतोच असं घडत नाही. नंतर ऐकताना कधी असं वाटून जातं, की मैफलीत आपल्याला जे वाटलं, ते पुन्हा तसंच वाटत नाहीये किंवा उलटेही. नंतर ऐकताना, तेव्हा ते का आवडलं नाही, असंही वाटण्यासारखं. पण त्या वेळी आपण आपल्या मानसिकतेमध्ये गुंतून गेलेलो असतो. कलावंत जेव्हा स्वत: असा सर्जनाचा आनंद घेत असतो आणि आपले सारं काही सर्वागानं ओतत असतो, तेव्हा जे संगीत तयार होतं, ते नंतर पुन्हा ऐकतानाही तसेच भाव निर्माण होतात. ते भाव सार्वकालिक म्हणजे पुन:पुन्हा आणखी नवे अर्थ सांगणारेही असतात. अर्थ एवढाच की आपण सारे श्रवणभक्ती करणारे सतत त्या अवस्थेपर्यंत जाता यावं, यासाठी प्रयत्नशील असतो.
कलावंत हे स्वरांचं सारं विश्व उभारण्यासाठी आपलं सारं आयुष्य पणाला लावत असतो. संगीताचं शास्त्र ग्रंथबद्ध करण्याचा प्रयत्न वेदकालापासून झाला परंतु संगीताचं रसग्रहणात्मक लेखन होण्यास मात्र बराच अवधी लागला. आधी संगीत निर्माण झालं आणि नंतर त्याच्या सर्जनाच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठीचा आटापिटा सुरू झाला. गेल्या काही दशकांत संगीतावरील लेखन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि ते एक सुचिन्ह आहे. कलावंतांना कला सादर करण्यात अधिक रस असतो. त्या कलेचं विश्लेषण करण्यात वेळ घालवणं ते पसंत करत नाहीत. आपल्या निर्मितीची प्रक्रिया दुसऱ्याला समजावून सांगणं अनेकदा अवघडही बनतं. अशा वेळी संगीत समजावून घेऊन त्याबद्दल विश्लेषणात्मक लेखन करणं अधिक उपयोगी आणि महत्त्वाचं ठरतं. हे लेखन संगीताबद्दल चर्चा घडवून आणतं. रसिकांना संगीत ऐकण्यात मदत करतं आणि कलावंतांना त्यांच्या कलेकडे पाहण्याची वेगळी दृष्टीही मिळवून देते. संगीत शब्दबद्ध करत असताना, त्यातील व्याकरणापेक्षा त्यातील सौंदर्यस्थळं समजावून घेणं अधिक आनंददायी असतं. संगीतावरील आजवरचं लेखन हे या सौंदर्याची नव्यानं अनुभूती देणारं आहे. काही लेखकांनी संगीताचं मर्मग्राही रसग्रहण केलं, तर काहींनी त्यांची निरीक्षणं नोंदवली. गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, वामनराव देशपांडे, कृ. द. दीक्षित, डॉ. अशोक दामोदर रानडे यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी संगीतावरील अशा लेखनानं हे क्षेत्र समृद्ध केलं आहे. त्यात संगीताबद्दलच्या मूलभूत चिंतनापासून ते निव्वळ गाणं समजावून घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत अनेक प्रकार समाविष्ट झाले. पाण्यावरच्या या अक्षरांना ‘अक्षर’ करणारं हे लेखन म्हणजे मराठी साहित्याच्या दरबारातील एक अतिशय देखणं असं दालन आहे. संगीतावर लेखन करणाऱ्यांपैकी अनेक जण संगीत शिकले. पण त्यातील टेंबे यांचा अपवाद वगळता क्वचितच कुणी श्रेष्ठ दर्जाचे मैफली कलावंत होते. तरीही त्या सगळ्यांचं हे योगदान संगीताला पुढे जाण्यासाठी फारच मोलाचं ठरलं आहे. याचं कारण संगीताबद्दल तटस्थतेनं विचार करून स्पष्टता व्यक्त करणं हे फार वरच्या दर्जाचं काम असतं. या सगळ्या महान लेखकांनी ते केलं आहे, यात शंकाच नाही. भिजलेल्या वातीप्रमाणे संगीतात सतत डुंबत राहिल्याशिवाय, त्याबद्दल चिंतन करणं अशक्य असतं.
संगीत समजणं आणि समजावून सांगणं या दोन अगदी भिन्न गोष्टी असतात. म्हणूनच रसिक म्हणून गाणं ऐकणाऱ्याला या लेखनानं किती मदत होते, हे महत्त्वाचं असतं. संगीतातील कूट प्रश्न असोत, की कालानुरूप त्यात होणारे बदल असोत. त्याबद्दल प्रत्यक्ष मैफली न घडवणाऱ्यांना अधिक चिंतन करणं शक्य होतं. त्यांच्या निराग्रही आणि शुद्ध वैचारिक बैठकीमुळे केवळ संगीताचंच विश्लेषण होत राहतं. त्यामध्ये व्यक्तिसापेक्षतेला फार कमी वाव राहतो. त्यामुळे संगीतामध्ये विचारांचीही भर पडते आणि ते प्रवाहीही राहते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात संगीताबद्दलच्या लेखनानं अनेक प्रकारचे फायदे झाले. संगीतातील बदल ज्या वेगानं घडू लागले, ते समजावून सांगण्याचं काम या लेखनानं केलं. त्यातही अधिक महत्त्वाचं म्हणजे या लेखनात पूर्वसुरींच्या संगीताचा धागा कुठेही ढळला नाही. जे ऐकलं होतं, त्याचा संदर्भ देत नवं संगीत समजावून घेण्याचा हा प्रयत्न होता. त्यामध्ये कलावंताच्या सृजनाचं पृथक्करण होतं आणि सर्जनाची चिकित्सा होती. तरीही आपल्या संगीताच्या क्षेत्रात कलेची समीक्षा करणाऱ्यांना त्या मानानं फारसं महत्त्व मात्र मिळालं नाही. हे खरंच की मैफलीचा बादशहा होण्याचं भाग्य कलावंतांनाच मिळणार आणि मिळायलाच हवं. कारण ते काही नवं घडवण्याचा प्रयत्न करत असतात. नवा विचार रुजवण्यासाठी कलेचं माध्यम उपयोगात आणत असतात. परंतु हा विचार सामान्य रसिकांना समजावून सांगणं हेही अतिशय महत्त्वाचं असतं. आजवरच्या मर्मग्राही संगीत समीक्षेनं नेमकंहेच काम केलं आणि त्यामुळे संगीताच्या प्रसारालाही गती प्राप्त झाली. कलावंत समजावून घेणं आणि त्याचा विचार व्यक्त होतानाच्या प्रक्रियेबद्दल विचार करणं हे नवसर्जनाएवढं नसलं, तरी कमी महत्त्वाचं निश्चितच नाही. एखाद्या मैफलीचं रसग्रहण करणं आणि एकूणच संगीताचा पसारा नव्यानं समजावून सांगणं अशा दोन्ही स्तरांवर मराठीमध्ये हे लेखन झालेलं आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे भारतीय अभिजात संगीताबद्दल मराठीत जेवढं विपुल आणि महत्त्वपूर्ण लेखन झालं, तेवढं इतर भाषांमध्ये क्वचित वाचायला मिळतं. ज्या महाराष्ट्राला अभिजात संगीताची कोणतीही दीर्घ परंपरा नाही, त्याच महाराष्ट्रात या संगीताची सर्वात अधिक मशागत केवळ रसिकांच्या मदतीनं होते आहे. त्यामुळे मराठीतून होणारं लेखन खरं तर अन्य भाषांत पोहोचलं, तर त्याही भाषक प्रांतांमध्ये संगीताच्या जाणिवा रुंदावण्याचं काम होऊ शकेल.

Diwali and Books, Book list, Diwali, Books,
पाहू, निवडू आणि वाचू आनंदे…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Badalta Bharat Paratantryatun mahasattekade
वैचारिक साहित्यात मोलाची भर
people with personality disorder
स्वभाव, विभाव : खुदी से इश्क किया रे…
Loksatta article Justice Dhananjay Chandrachud out of court statement
न्याय की देवाचा कौल?
Paaru
Video : पारू अन् आदित्यचा मराठमोळा अंदाज! दोघांचं प्रेम खुलणार, मालिकेचं नवीन गाणं पाहिलंत का?
History of Ajrak
History of Ajrakh: इजिप्तपासून ते मोहेंजोदारोपर्यंत आधुनिक अजरकचा इतिहास आहे तरी किती जुना?
Marathi Actor Ajinkya Deo presented a poem in memory of his father Ramesh Deo watch Video
Video: “बाबांच्या मनात…”, अजिंक्य देव यांनी वडील रमेश देव यांच्या आठवणीत सादर केली सुंदर कविता, पाहा व्हिडीओ