समाजमान्य कलावंत आणि इतिहासमान्य कलावंत हे निरनिराळे असू शकतात. कलेचा इतिहास काय, हे ठरतं कलासमाजात. त्याबाहेरच्या मोठय़ा समाजाला हा इतिहास मान्य असेलच, असं नाही.. मुक्त अभिव्यक्तीबद्दल विचार करताना हा भेद लक्षात घ्यायला हवाच असं मोठय़ा समाजाचा इतिहास सांगतो आहे..
‘द्रोह’ हा शब्द फार कडक आहे आणि सोवळाही. सोवळा एवढय़ाचसाठी की, काय म्हणजे द्रोह नाही, याच्या कल्पना बऱ्याच जणांच्या मनांमध्ये कदाचित पिढय़ान्पिढय़ा घट्ट झालेल्या असल्या, तरच एखादी कृती ‘द्रोह’ ठरते. काय म्हणजे द्रोह नाही, याच्या कल्पनांना कलावंताच्या कल्पनाशक्तीचा ‘विटाळ’ सोसत नाही अजिबात. ‘भारतमातेला विवस्त्र दाखवणं, सीतामाईचा पदर ढळलेला दाखवणं यात कसली आल्येय कल्पनाशक्ती?’ हा प्रश्न अखिल भारतीय स्तरावर बावनकशी सोन्यासारखा खणखणीत वाजला आणि एका वयस्कर भारतीय चित्रकाराचं प्रेतसुद्धा मायदेशात आणणं मुश्कील झालं, हा आपला सर्वाचा अगदी एकविसाव्या शतकातलाच इतिहास असल्यामुळे ‘कल्पनाशक्तीचा विटाळ’ हा शब्द गैर वाटू नये. चित्रकलेतलं ज्यांना समजतं किंवा चित्रकलेशी ज्यांचा या ना त्या प्रकारे संबंध आहे अशा भारतीय ‘कलासमाजा’पेक्षा किती तरी मोठा समाज भारतात आहे. या मोठय़ा समाजाचं कलासमाजानं ऐकलंच पाहिजे, असे प्रसंग एकदा नव्हे तर अनेकदा आलेले आहेत.
इथे लक्षात घ्या की, आपण मघाशी द्रोहाबद्दल बोलत होतो. बंडखोरीबद्दल नव्हे. बंडखोरी वगैरे करणाऱ्या चित्रकारांचं कवतिक दृश्यकलेच्या इतिहासाला असतं. छानपैकी चित्रंबित्रं काढून, लोकांची दाद मिळवून साताठ पुस्तकांचे लेखक झालेला आणि वर विचारवंतसुद्धा ठरू घातलेला एखादा मराठी चित्रकार असतो, पण त्याला कलेचा जागतिक इतिहास मोजतच नाही. हा कलेचा इतिहास ‘कलासमाजा’तले कोणी ना कोणी लिहितात, तो इतिहास ज्यांना मान्य असतो किंवा ‘हा कलेचा इतिहास म्हणजे आपला इतिहास आहे’ असं जे मानतात, ते ‘कलासमाजा’चा भागच बनतात अनेकदा, असं भारतात तरी आहे. बाकीच्या ‘मोठय़ा समाजा’ला जागतिक कलेतिहास वगैरे माहीत नसला तरी चालतो, असं मानण्याची जनरीत भारतात गेल्या २०० वर्षांत (म्हणजे पाश्चात्त्य आधुनिक कला आपल्याकडे शिकवली जाऊ लागली, त्याच्या आधीच्या थोडय़ा आणि नंतरच्या सर्व काळात) दिसून येते. त्यामुळे उदाहरणार्थ, दिवंगत मकबूल फिदा हुसेन यांनी कलेच्या इतिहासाच्या मते कसलीच बंडखोरी केली नसेल आणि त्यांनी नुसतीच त्यांच्यापरीनं त्यांची कल्पनाशक्ती लढवून पाहिली असेल, तरी ‘यात कसली आल्येय डोंबलाची कल्पनाशक्ती?’ अशी- किंवा यापेक्षा काही तरी जहाल प्रतिक्रिया देणारा मोठा समाज तयार होता. या मोठय़ा समाजाचा अर्थ फक्त ‘(धार्मिकदृष्टय़ा) बहुसंख्याक समाज’ इतका संकुचित अजिबात नाही. या मोठय़ा समाजात एका धर्माशी बांधलं जाऊच न शकणारं (मग ते खऱ्या धर्मनिरपेक्ष नेत्यांचं असो की स्यूडो सेक्युलर मुखंडांचं) सरकारही येतं. ‘कलासमाजाची बाजू घ्यायची की मोठय़ा समाजाची,’ असा अटीतटीचा प्रश्न कोणतंही सरकार/ कोणतीही सरकारी यंत्रणा एकतर येऊच देत नाही, किंवा आला तरी तो अस्फुटच ठेवून, सरकारी यंत्रणा मोठय़ा समाजाचीच बाजू अप्रत्यक्षपणे मान्य करतात.
हे इतकं सगळं ठरलंच असेल, तर मोठय़ा समाजाला आवडेल असाच इतिहास रचला जायला हवा होता. पण तसं तर दिसत नाही. कलासमाज (कलाबाजार, कलाव्यवहार आणि कलासंकल्पनांचा प्रदेश) जागतिक स्तरावर व्यवस्थित वाढत गेलेला असल्यानं दृश्यकलांचा इतिहास हा दृश्यकलासमाजानं ठरवलेला असतो. चित्रपटाच्या किंवा नाटय़लेखनाच्या इतिहासातही हे आहेच. उदाहरणार्थ आपल्याकडे, कालिदासापेक्षा शूद्रक मोठा, हे नाटय़लेखकांनी ठरवलेलं आहे. कालिदास म्हटल्यावर किमान दोन काव्यं अनेकांना आठवतील, शूद्रक म्हणजे मृच्छकटिकाच्या लेखकाचं टोपणनाव, याची आठवण द्यावी लागेल.. अशी त्यांची आजच्या ‘मोठय़ा समाजा’तली किंमत असली, तरी कलेतिहास रचणारे लोक ‘मोठय़ा समाजा’पेक्षा निराळे राहिल्यामुळेच मोठय़ा समाजातल्या अनेकांना ‘बोअरिंग’ वाटू शकणारे काही शब्दप्रयोग आजही आपापलं सत्त्व टिकवून आहेत : अभिव्यक्ती, सर्जनशीलता, कलासंकल्पनेला पुढे नेणं, प्रायोगिकता, कालसापेक्षता, बंडखोरी ही अशा शब्दप्रयोगांची काही उदाहरणं.
त्या शब्दांच्या जंजाळात शिरण्यापेक्षा, आत्ता- आजकालच्या काळात कलेतिहासात शिरू पाहणाऱ्या दोन कलाकृतींची उदाहरणं आपण पाहू. या दोन कलाकृती अद्याप तरी कलेच्या इतिहासाचा भाग झालेल्या नाहीत. त्या ‘मोठय़ा समाजा’च्या कलाविषयक आडाख्यांना धक्का देणाऱ्या आहेत. पण तेवढय़ासाठी नव्हे तर कलाकृतीची कालसापेक्षता आणि प्रायोगिकता या मुद्दय़ांवर या कलाकृती कलेतिहासात स्थान मिळवू शकतात. सोबतचं चित्रं त्यापैकी एका कलाकृतीचं आहे. ब्राझीलच्या गिल व्हिसेन्ते या चित्रकाराची ‘एनिमीज’ ही ती कलाकृती, सुमारे डझनभर चित्रं मिळून बनलेली. हा चित्रसमूह ‘साओ पावलो बिएनाले’ नावाच्या द्वैवार्षिक महा-प्रदर्शनात मांडण्यात आला होता. म्हणजे मानाचं स्थान. साओ पावलो बिएनाले महत्त्वाची आहेच, कारण ही कलेच्या युरोपीय इतिहासाला आव्हान द्यायचं म्हणून सुरू झालेली, भांडवलशाहीला शरण न जाता कलेची अभिव्यक्ती होऊ शकते यावर विश्वास ठेवणारी आणि तो विश्वास गेल्या अनेक वर्षांत सार्थ ठरवणारी अशी एक संस्थाच (‘व्यक्ती नव्हे संस्था’वाल्या अमूर्त अर्थानं) बनली आहे. साओ पावलो बिएनालेचा हा संस्था-पणा गेल्या ५० वर्षांतल्या कलेतिहासानं (म्हणजेच तो इतिहास लिहिणाऱ्या कलासमाजानं) मान्य केला आहे. दुसरी कलाकृती तितकी महत्त्वाची नसेल, पण उदाहरणादाखल तिचा उल्लेख भारतीय संदर्भात अत्यावश्यक आहे. शायना आनंद, अशोक सुकुमारन् यांच्या ‘कॅम्प’ आणि ‘पद(डॉट) मा’ या कलासंघटनांची ही निर्मिती (किंवा ‘न-निर्मिती’ म्हणूया.. कारण इथं नव्यानं काहीसुद्धा निर्माण झालेलं नाही..) ‘राडिया टेप्स’ म्हणून जी दूरध्वनी-संभाषणं इंटरनेटमुळे ‘पब्लिक डोमेन’मध्ये आली, तीच संभाषणं आर्ट गॅलरीत मांडून ‘प्रेक्षकां’ना ती वाचायला आणि ऐकायला उपलब्ध करून देणं, हे या कलाकृतीचं ढोबळ वर्णन (पण कलाकृती कशी ही? केवळ आर्ट गॅलरीत आली म्हणून?). आपण दोन्हींना सध्या तरी कलाकृतीच म्हणू.
या दोन्ही कलाकृतींचा संबंध ‘मोठय़ा समाजाला माहीत असणाऱ्या माणसां’शी आहे. ही माणसं राजकारणाशी संबंधित आहेत (किंवा तथाकथित ‘राडिया टेप्स’मध्ये चर्चेचा विषय राजकारण हाच आहे). एरवीच्या ज्या ‘राजकीय जाणिवेच्या कलाकृती’ असतात, त्यापेक्षा या दोन्ही कलाकृती फार वेगळय़ा आहेत. पाहाताय ना? सोबतच्या चित्रात एक माणूस ब्रिटनच्या राणीसाहेबांवर पिस्तूल रोखतोय. त्याच माणसानं त्याचं पिस्तूल अन्य एका चित्रात जॉर्ज डब्ल्यू. बुशच्या अगदी डोक्याला टेकवलंय. व्हॅटिकनचे राष्ट्रप्रमुख आणि ख्रिस्ती धर्मातील रोमन कॅथलिक पंथाचे सर्वोच्च अधिपती पोप (२०१० साली सोळावे बेनेडिक्ट हे या पदावर होते), इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदीनेजाद यांच्याहीसोबत या पिस्तूलखोर चित्रकाराची चित्रं आहेत. चित्रातला पिस्तूलधारी जो आहे, तो स्वत चित्रकार गिल व्हिसेन्ते.
‘कलेतून हा माणूस हिंसाचाराला प्रोत्साहनच देतोय’ अशी चर्चा इंटरनेटवरल्या समाजमाध्यमांतून सुरू झाली. समाजमाध्यमं हे छोटय़ा गटांचंही हत्यार असू शकतं पण ‘मोठय़ा समाजा’ची मान्यता मिळाली तर मात्र ‘गँग्नम’, ‘कोलावेरी’च्या लाटा जगभर कुठेही येऊ शकतात. आपल्या भारतस्थ महाराष्ट्रीय मराठीभाषक समाजापर्यंत गिल व्हिसेन्तेवरली चर्चा पुरेशी पोहोचली नाही, पण इंटरनेटवर ही चित्रं पाहाताना ती चर्चादेखील सापडेलच कुणालाही.
याउलट, ‘यात कसली आल्येय कला?’ असा प्रश्न जिच्याबद्दल निर्माण होतो, ती ‘(तथाकथित) राडिया टेप्स’वर आधारित ‘पल.. पल.. पल.. पल..’ ही नावाची कलाकृती! आधी कोलकात्याच्या ‘एक्स्पेरिमेंटर’ या नवमाध्यम-कलेला प्राधान्य देणाऱ्या गॅलरीत, मग ‘स्कोडा प्राइझ’ नावाच्या दहा लाख रुपयांच्या पारितोषिकाच्या निवड-प्रक्रियेचा भाग म्हणून भारतभरच्या अव्वल चार प्रदर्शनांतल्या निवडक कलाकृतींचं जे प्रदर्शन भरतं, त्यात या ‘पल.. पल.. पल.. पल..’चा समावेश होता. आत्ता मुंबईच्या केमोल्ड प्रिस्कॉट रोड गॅलरीच्या सुवर्ण-महोत्सवी प्रदर्शनातही हीच कलाकृती आहे. हे तपशील मुद्दाम अशासाठी की, ‘आर्ट गॅलऱ्यांत लागणं’ ही पायरी ‘पल.. पल.. पल.. पल..’नं बऱ्याचदा गाठली आहे. तिचं कौतुकही याच पायरीवर झालेलं आहे. ‘पल.. पल.. पल.. पल..’ हा नीरा राडिया यांचा कॉलर-टोन होता. तसा तो (गॅलरीतल्या या कलाकृतीच्या श्राव्य भागातून) ऐकूही येतो. भिंतीवरल्या फ्रेमांमध्ये ‘ए-४ साइझ’च्या कागदांवर या राडिया-संभाषणाचा काही भाग उतरवून घेऊन टाइप केलेल्या स्वरूपात पाहायचा, फोन उचलून टेपमधले आवाज ऐकायचे, अशी या कलाकृतीची रचना आहे आणि ‘साउंड आर्ट’च्या व्याख्येत ती चपखल बसते आहे.
पण.. पण.. पण.. पण.. मोठय़ा समाजाला या कलाकृती ‘कलाकृती’ म्हणून पटणार आहेत का? या कलाकृतींनी अगदी निक्षून, मोठय़ा समाजात चर्चेचा विषय ठरलेल्या राजकारणाची याद जागवली आहे. गिल व्हिसेन्तेची कलाकृती पाहिल्यावर आपल्याकडे विजय तेंडुलकरांचं ‘.. तर मोदींना गोळी घालेन’ हे जे विधान तेंडुलकरांची छीथू करण्यासाठी पुरेसं असल्याचा जो माहौल खडम झाला होता, त्याचीही आठवण देणारं ठरू शकतं.
नाही झाली आठवण, तर मोठा समाज जिंकला. तो तसाही जिंकत असतो नेहमीच. पण म्हणून ‘कलासमाज हरला’ असं होत नसतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा