‘विचार करण्याची कला’ अशीही एक कला असते. प्रत्येकाकडे काहीशी असतेच, पण फक्त माहिती व ज्ञान नव्हे, तर मर्मदृष्टीसाठी ती आवर्जून जोपासायला हवी. ती जोपासण्यासाठी अमुक एका विषयातच अडकून पडून चालत नाही. विचारकलेतील साधने खरे तर अगदी परिचयातील असतात. सर्जनशीलतेसाठी त्यांच्याशी मनमुराद खेळताही आले पाहिजे आणि चिकित्सकतेसाठी कडक शिस्तही पाळली पाहिजे. या साऱ्यात अंगभूत आनंदही असतो!
आज विवेचन न येता प्रात्यक्षिके असणार आहेत आणि कोणत्या प्रात्यक्षिकातून कोण काय धडे घेईल हेही खुले असणार आहे. आज मी म्हणणे मांडणार नाहीये तर ‘रियाज़ाचे नमुने’ दाखवणार आहे.  फरक स्पष्ट करा, विरुद्ध अर्थाचे शब्द सांगा, असे प्रश्न सोडवणे लहानपणापासून चालूच असते. आधीच ठरलेली ‘बरोबर’ उत्तरे देणे हे आत्ता बाजूला ठेवू. शिकतानासुद्धा आपण कसा विचार करायचा याच्या नाडय़ा ‘परीक्षका’च्या हातात जाऊच द्यायच्या नसतात (परीक्षेपुरत्या जाऊ द्यायच्या, ‘शिकताना’ मात्र अजिबात नाही.) अशा प्रश्नांना अनपेक्षित उत्तरेही असतात व ती लक्षात घेता प्रश्नच बदलावे लागतात हे कळणे, या कलेसाठी जास्त फायद्याचे असते. आपण ‘विरुद्ध अर्थाचे शब्द’पासून सुरुवात करू. इंग्लिश-मराठी काहीही चालेल.
‘गेस्ट’च्या विरुद्ध अर्थाचा शब्द ‘होस्ट’ एका अंगाने बरोबर आहे, पण ‘पाहुणा विरुद्ध आगंतुक’ हेसुद्धा बरोबरच आहे. म्हणून इन्टड्रर हे आणखी एक उत्तर आले. घरातलाच किंवा निमंत्रक संस्थेतलाच या अर्थाने रेग्युलर-मेम्बर हेही उत्तर बरोबर आहे. असे एकदा पाहू लागलोच की मग, ‘लव्ह’ विरुद्ध [‘हेट’, ‘लस्ट’, ‘डय़ुटी’, अ‍ॅपथी], संशयच्या विरुद्ध [बेसावधपणा, पडताळा, खात्री, विश्वास, श्रद्धा]. तसेच शिक्षाच्या विरुद्ध [बक्षीस, क्षमा, सूड, भरपाई] इ. सापडत जातात. यात आपण फक्त विरुद्ध अर्थाचे शब्द शोधून थांबलो नाही, तर ‘विरुद्ध’ या शब्दाचेच वेगवेगळे अर्थ लावले! एका अर्थाने मूळ प्रश्नच उलटवला. अशी उलथापालथ करीत राहिले पाहिजे. आता एक विचित्र वाटणारा प्रश्न! ‘गुरुत्वाकर्षण’च्या विरुद्ध काय? यालाही उत्तर आहे! गतिशील-जडत्व-बल (डायनॅमिक-इनíशया-फोर्स) गुरुत्वाकर्षणाचे बल विरुद्ध हे ‘ग.ज.ब.’ यांच्या संतुलनाने, केप्लरच्या गणिताने येणारी इलिप्टिकल ऑर्बट्सि टिकतात. (कशालाही प्रतियोगी असतोच!)
समानार्थी शब्द जर ‘परिपूर्णपणे समानार्थी’ असतील तर ते बिनकामाचे (रिडंडंट) असतील. फरक स्पष्ट करण्याचे महत्त्व, शब्द जितके जवळचे तितके जास्त! प्रिसिजन आणि अ‍ॅक्युरसी हे समानार्थी वाटतात, पण प्रिसिजन म्हणजे चालवून घेण्याच्या फरकाचा वाव कमीत कमी मापाचा, अ‍ॅक्युरसी म्हणजे हे माप ओलांडले जाण्याच्या घटना कमीत कमी घडणे. म्हणजे या दोहोंत चक्क अंतरविरोध आहे! विवेक या शब्दाचा मूळ अर्थ ‘फरक स्पष्ट करा’ असाच आहे. एरर आणि मिस्टेक? एरर टाळता येत नाही. मिस्टेक टाळता येते. उत्तर हे शक्य तितक्या कमी शब्दात आले पाहिजे. संधी आणि समास यात काय फरक असतो हे आपल्याला कळत असते, पण तेच कमीत कमी शब्दात सांगता आले की त्या फरकालाही धार येते. संधी= उच्चारसंयोगाचे नियम, समास= अर्थसंयोगाचे नियम, असे टाचीवपणे सांगता आले पाहिजे.  
शब्दांमध्ये एकेक ‘धातू’ही सापडतात. सर्प, सरडा, सरिता, निसरडे यात सर्, तर वर्तन, वर्तुळ, आवर्तन, वर्तमान यात वर्त हा धातू सापडेल. असेच इंग्लिशमध्ये व्हर्ट, ग्न, जेक्ट, स्पेक्ट, व्हेंट चालवता येतात. ज्यात ‘स्थ’ असतो असे शब्द इंग्लिशमध्ये ‘स्ट’ने युक्त मिळतात. अवस्था (स्टेट), स्थानक (स्टेशन) इ. शब्द हे एकक धरून काही प्रयोग करून पाहिले. दोन एककांमधील संबंध ही पुढची पायरी आहे. द्राक्ष:बेदाणा::आलं:सुंठ, काळ:क्षण::अवकाश:बिंदू  अशी संबंध त्रराशिके सोडवता व बनवताही आली पाहिजेत. त्यातून गुण-गुणी, अवयव-अवयवी, व्याप्य-व्यापक, गम्य-गमक असे अमूर्त संबंध-प्रकार अवगत होतील.  
लक्षणे करणे व त्यातील सारलक्षण पकडणे   
गोष्टीची लक्षणे बरीच आणि बऱ्याच प्रकारची असतात. लोकशाहीची लक्षणे निवडणुका, उच्चारस्वातंत्र्य, बहुपक्षीयता ही सांगितली जातात, पण ‘सन्य राजकारणापासून अलिप्त असते’ आणि ‘विरोध हा द्रोह ठरत नाही’ ही अति-महत्त्वाची विसरली जातात!
जिग-सॉ-पझल हे कोडे-खेळणे बनविताना सुरुवातीला अरुंद पात्याची व खोल फ्रेमची जिग-सॉ नावाची करवत लागत असे. आता पुठ्ठा प्रेस करून तुकडे तोडतात. तेव्हा ‘जिग-सॉ’ अप्रस्तुत झाली. कोडय़ाचे सार काय आहे? ‘वेडय़ावाकडय़ा सीमांचे विभिन्न तुकडे, त्यांच्या अनन्यस्थानी बसले तरच, एकमेकांशी सम-सीमावान बनून प्रतल भरून टाकतात.’ ही स्थाने शोधणे हे आव्हान असते. (चित्रसुद्धा गौण, ते क्ल्यू देण्यासाठी आहे.) या उदाहरणाने, ‘सार शोधणे’ या क्रियेचे प्रात्यक्षिक केले इतकेच.
ऑब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका याला विरुद्ध अर्थी सब्जेक्टिव्ह किंवा डिस्क्रिप्टिव्ह असे ढिसाळ शब्द वापरले जातात. आता या ठिकाणी ‘ऑब्जेक्टिव्ह’ या शब्दाचे नेमके सार काय आहे? उत्तरांचे मूल्यमापन अगोदरच तयार असणे व तपासणाऱ्याला निवाडे द्यावे न लागणे, फक्त पडताळणी करून मार्क देता येणे हा मुद्दा आहे. ‘प्री-जज्ड’ हे सार आहे. अन्यथा तपासणाऱ्याला मूल्यनिवाडे द्यावे लागतील आणि ‘टु बी जज्ड’ हे सार असेल. तपासणाऱ्याच्या नि:पक्षपातीपणावर संशय, याचा ‘वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाशी’ काय संबंध?  
सब्जेक्ट या इंग्लिश शब्दाने बव्हर्थीपणाचा धुमाकूळ घातलेला आहे. भूगोल वगरे विषयांना सब्जेक्ट्स म्हणतात. मानसशास्त्राच्या प्रयोगात निरीक्षिले जाणाऱ्यांना सब्जेक्ट म्हणतात. आत्मगत-वस्तुगत या जोडीला सब्जेक्टिव्ह-ऑब्जेक्टिव्ह म्हणतात. सार्वकि (युनिव्हर्सल) विरुद्ध ‘व्यक्तिसापेक्ष’ म्हणजे ‘ज्याच्या त्याच्या पुरते’ याला सब्जेक्टिव्ह (जसे की रुची) म्हणतात. उद्देश्यपद-विधेयपद या ताíकक रचनेलाही सब्जेक्ट-प्रेडिकेट म्हणतात. राजा-प्रजा या जोडीला किंग अ‍ॅण्ड हिज सब्जेक्ट्स म्हणतात. हा नुसता शब्दांचा प्रश्न नाही. आत्मगत पण सार्वकि अशी सत्ये पटू शकतात (जसे की आशेला भयाची किनार असतेच) याकडे डोळेझाक करायला जडवाद्यांना उगीचच संधी मिळते. म्हणजे सुरुवातीला आत्मगत म्हणून सब्जेक्टिव्ह आहे म्हणायचे, मग हळूच व्यक्तिसापेक्ष म्हणजे ‘तुला वाटते इतकेच’ असे झटकून टाकायचे. तसेच उलटपक्षी ‘व्यक्तिसापेक्ष पण वस्तुगत’ सत्येही आहेत, जसे की जनुकीय िपडधर्म!
कधीही दोन भेदांचा गुणाकार झाला की चाराचे मॅट्रिक्स मिळतेच. उत्पादक/अनुत्पादक आणि बलवान/बलहीन यातून निवडकपणे दोनच जुळण्या मानल्या गेल्या; शोषक आणि शोषित, पण उरलेल्या दोन शक्यता प्रत्यक्षातही उपलब्ध आहेत. उद्योजक आणि वंचित!  द्विवर्गीय विभागणीमुळे, वंचितांना अगोदर उत्पादकांत म्हणजे शोषितात आणणे या गोष्टीचे (विकासाचे) महत्त्वही डावलले गेले आणि योगदान करणाऱ्या उद्योजकांना विनाकारण शत्रू गणले गेले.
आकार जाई आशयांतरा
केमिस्ट्रीत जन्मलेले पीरियॉडिक टेबल हे दोन अक्षांवर वर्गीकरण करण्याचे पहिले यशस्वी मॅट्रिक्स होते आणि त्याच्यातील मोकळे कप्पे हे ‘सद्धांतिक शक्यता पण अद्याप आढळलेल्या नाहीत’ या मोठय़ा गोष्टीचे मूíतमंत उदाहरण बनले.  ‘फॅमिली ट्री’ वंशावळी करताना सापडला, पण संच-उपसंच अशा सर्वच वर्गीकरणांत उपयोगी पडला. ‘सर्किट’ हे मूळचे इलेक्ट्रिकल, पण ते रेटा-प्रवाह-मार्ग-अडथळा-स्रोत-शोष हे घटक असणाऱ्या कोणत्याही व्यवस्थेचे, प्रतिनिधित्व करू शकते. सूर्यमालेचे मॉडेल हे अणूचा उलगडा करताना एका टप्प्यावर नक्कीच उपयोगी पडले. अमूर्त साधम्य्रे (अ‍ॅबस्ट्रॅक्ट अनॉलॉजिज) ही गोष्ट विद्याशाखांकरिता, ‘एकमेका प्रारूपे पुरवू, अवघ्या बनू श्रीमंत’ अशी ठरते.    
वर्णपट (स्पेक्ट्रम) हे सलगतेने बदलत जाणाऱ्या पण गुणात्मक बदलाचे फार छान उदाहरण आहे. पिवळ्यातून हिरव्यात जाताना ‘दी पोपटी’ असा बिंदू कोठे मानणार? सलग-तुटक (कन्टिन्युअस-डिस्क्रीट) हे एक न टाळता येणारे द्वंद्व आहे.
डिजिट या शब्दाचा मूळ अर्थ बोटे असा आहे. किती जणांना माहिती असेल की आपली दशमान पद्धत ही अपरिहार्य नाही? किती अंक-चिन्हे मानायची आणि ती कितीदा रीपिट करायची हा केवळ संकेत आहे. आपल्याला दहा बोटे असतात म्हणून दशमान रुळली इतकेच. संकेत बदलते असतात, पण सत्ये तीच राहतात. उदा. पत्त्यातला ३०४ हा खेळ खेळण्यासाठी गोटू, नश्शी, एक्का, दश्शी हा क्रम अनिवार्य नाही. नेहमीचा एक्का, राजा, राणी, गोटू हा क्रम वापरूनही तो तसाच खेळता येईल.  शरीरशास्त्रातील रचना आणि कार्य ही जोडी समाजशास्त्रात सुरुवातीला उपयोगी पडली. फ्रॉइडने त्याचे मानसशास्त्र चक्क राज्यसंस्थेचा (दमनाचा) दृष्टान्त घेऊन मांडले.
मीच केलेले एक उदाहरण पाहू. एका फर्मचे आíथक संतुलन कसे टिकते? याचे चित्र, विविध ‘क्वान्टिटीज’ना लांबी आणि ‘रेशोज’ना कोन मानून, ‘व्हेक्टर डायग्रॅम’ म्हणून काढता येते. मालाला मागणी, दर एकक श्रमखर्च, वेतनदर, मनुष्यबळ, श्रमाची तीव्रता, उत्पादकता, भांडवलसघनता, नफ्याचा दर हे सर्व कसकसे बदलतात हे चक्क डोळ्यांसमोर घडवून प्रत्ययकारी बनवता येते.
असे उसने घेतलेले ताíकक आकार म्हणजे थेट सिद्धता नव्हेत, पण सिद्धांतन सुचण्याला एक मचाण म्हणून ते नक्कीच उपयोगी पडतात. कधी ते दृष्टान्तापुरतेच राहतात जसे की ‘‘वर्क एक्स्पांड्स टु ऑक्युपाय ऑल द अव्हेलेबल टाइम.’’  
* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.  त्यांचा ई-मेल rajeevsane@gmail.com

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल