भारतात आज डिजिटल उद्योगांची सुरुवात होत आहे. पण प्रस्थापित उद्योगांनी व लहान उद्योजकांनी केवळ आश्चर्याने पाहत न राहता आपल्याला या क्रांतीचा कसा फायदा मिळेल याकडे तात्काळ पाहणे हे उद्योगांच्या व भारताच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही फायद्याचे ठरेल.
आजच्या जगातील माहिती तंत्रज्ञान, संगणक व त्यावर आधारित तंत्रज्ञान हे केवळ २ आकडय़ांवर म्हणजेच २ डिजिट्सवर आधारित आहे. १ आणि ०! यातील शून्याची ओळख जगाला झाली ती भारतातील कोण्या अज्ञात वैज्ञानिकामुळे. या शून्याच्या ज्ञानातून आज जे विज्ञान उभे राहिले आहे ते पाहता ‘आधी बीज एकले- ब्रह्म एकले’ या उक्तीची आठवण होते. शून्यातून विश्व उभे राहते या म्हणीचे अक्षरश: प्रत्यंतर या डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज पदोपदी जाणवत आहे. या एकल्या ब्रह्माने जसे संपूर्ण जग नव्हे विश्व व्यापून टाकले आहे ही केवळ आध्यात्मिक कल्पना न राहता या १ व शून्याने अक्षरश: जग व्यापण्याचा जो झपाटा लावला आहे तो मंत्रमुग्ध करणारा आहे. सकाळच्या चहापासून रात्रीच्या दूरदर्शनच्या कार्यक्रमांपर्यंत या डिजिटल तंत्रज्ञानाने समस्त मानव जातीवर जो दूरगामी परिणाम केला आहे तो केवळ थरारक आहे. या सर्वव्यापी तंत्रज्ञानामुळे अगदी वैद्यकशास्त्रापासून ते वित्त सेवांपर्यंत सर्वच क्षेत्रांत झपाटय़ाने बदल घडवून आणले. शेती व उत्पादन उद्योग क्षेत्रे त्यांनी सोडली नाहीत. सेवा उद्योग क्षेत्रावर तर या तंत्रज्ञानाचे अधिराज्य सुरू आहे. दोन दशकांपूर्वीचे उद्योग व आजचे व पुढच्या काळात येणाऱ्या नव्या-जुन्या उद्योगांचे स्वरूप पूर्णपणे बदलत आहे. आज घरी पूजा किंवा वास्तुशांत करायची असेल तर मी ‘ओ पंडित’वर जाऊन त्याची पूर्ण व्यवस्था करू शकतो. बस-विमानाच्या तिकिटांपासून ते पैसे हस्तांतरणापर्यंत मला घराच्या बाहेर पडायचीही गरज नाही. ज्या तऱ्हेने आजचे व उद्याचे जुने नवोद्योग चालणार आहेत याची एक झलकच पाहा. आज जगातील सर्वात मोठी टॅक्सी कंपनी उबर हिच्या स्वत:कडे एकही टॅक्सी नाही. आज या कंपनीचे बाजारमूल्य तीन लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. उबर कंपनी अस्तित्वात आली २०१० साली. अमेरिकेतील १९७१ साली अस्तित्वात आलेली फेडेक्स कंपनी ही पण वाहतूक क्षेत्रातीलच, जगभरात पसरलेली, स्वत:च्या नावावर १,२०,००० कोटी रुपयांची मालमत्ता, त्यात थेट मोठय़ा व्यापारी विमानांचाही समावेश! फेडेक्सचे उत्पन्न २,७०,००० कोटी रुपयांचे, पण बाजारमूल्य उबरपेक्षा कमी म्हणजे २,८०,००० कोटी रुपयांचे. हा फरक का? तर केवळ उबर हा डिजिटल क्रांतीतून जन्मलेला उद्योग आहे. दुसरे उदाहरण फेसबुकचे. मीडिया क्षेत्रातील ही अग्रेसर कंपनी. मीडिया क्षेत्रातील उद्योगांचे मूल्य हे त्याकडे दाखवण्या-प्रसिद्ध करण्यासारखी स्वत:ची किती सामग्री आहे यावरून ठरवले जायचे. पण १६.५ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असणाऱ्या या उद्योगाकडे स्वत:च्या मालकीची काहीच सामग्री नाही. पण डिजिटल क्रांतीत जन्मलेल्या या उद्योगाला जुन्याजाणत्या जनरल इलेक्ट्रिकपेक्षा जास्त बाजारमूल्य मिळत आहे. तिसरे उदाहरण अलीबाबा या चिनी कंपनीचे. किरकोळ व्यापारात सर्वात जास्त खर्च असतो तो गोदामातील मालाचा. ज्याला या गोदामातील मालाचे व्यवस्थापन जमले तोच किरकोळ व्यापारात नफा कमावू शकतो, हे प्रस्थापित तत्त्व. पण अलीबाबाचे गोदामच नाही आणि त्यामुळे त्याच्याकडे एका रुपयाचाही माल नाही. पण बाजारमूल्य १५ लाख कोटींच्या वरती. किरकोळ व्यापारातील जगातील अग्रेसर वॉल मार्ट या कंपनीपेक्षाही अलीबाबाचे मूल्य जास्त आहे! हॉटेलच्या खोल्या आज जगात सर्वात जास्त कोण भाडय़ाने देत असेल तर त्याचे उत्तर हिल्टन किंवा मेरीयट अशी जुनी नावे सहज तोंडावर येतील. पण नाही! आज ‘एअर बनब’ नावाची निव्वळ संकेतस्थळावर असलेली कंपनी आहे. तिच्या मालकीचे एकही हॉटेल नाही. २००८ साली कॅलिफोर्नियात स्थापन झालेल्या या कंपनीत १५ लाख हॉटेल्सची सूची आहे. १९० देशांतील ३४,००० शहरांमध्ये कोठेही तुम्हाला हॉटेलची खोली भाडय़ाने घेता येते. सुरुवातीची गुंतवणूक २,७०० कोटी रुपयांची. आजचे बाजारमूल्य १,२०,००० कोटी! अशी कित्येक उदाहरणे आज प्रत्यक्षात घडत आहेत. हा केवळ या डिजिटल क्रांतीचा उद्योगांवरील परिणाम आहे.
डिजिटल क्रांती वेगाने झेपावत आहे. हिचा अंगीकार केला नाही तर ते उद्योग संपुष्टात येतील हे नक्की. पण हे अंगीकारताना लहानमोठय़ा उद्योगांना आणि उद्योजकांना बऱ्याच अडचणी येतात. यातील पहिली अडचण म्हणजे त्यांना होणाऱ्या बदलांची व येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहितीच नसते. डिजिटल क्रांती सर्वच दिशांनी पसरत असल्यामुळे तिचे आपल्याला उपयोगी असणाऱ्या भागाचे नक्की आकलन होणे महत्त्वाचे आहे. याकरिता त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची मदत घेणे हे जास्त महत्त्वाचे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती व त्या आधारे घेतले गेलेले निर्णय हे कदाचित उद्योगाला घातक ठरू शकतात. या प्रक्रियेतील दुसरी अडचण म्हणजे या बदलांनुरूप ठरवायची उद्योगाची नवीन ध्येये. म्हणजे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तुम्ही एखादी सेवा किंवा उत्पादन बाजारात आणणार असाल तर ते बाजारात कोणापुढे सादर करायचे याचा निर्णय महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे योग्य तंत्रज्ञान व योग्य उत्पादन असूनही त्याचे बाजारातील ध्येय चुकले तर अपयश येऊ शकते आणि चुकीची दुरुस्ती करेपर्यंत बाजारातील स्पर्धक आपल्या पुढे गेलेले असतात. उदाहरणार्थ- हॉटेलच्या खोल्या भाडय़ाने देणाऱ्या त्या संकेतस्थळाचे ध्येय हे उद्योग-व्यवसायाकरिता प्रवास करणारे हेच असते. या लोकांना अचानक व वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा खोल्यांची गरज असते. हेच ध्येय जर सुट्टीवर जाणाऱ्या पर्यटकांचे ठेवले असते तर हे संकेतस्थळ कदाचित अपयशी ठरले असते. या प्रक्रियेतील तिसरी अडचण म्हणजे एकूण प्रक्रियेतील व तंत्रज्ञानातील क्लिष्टता आणि गुंतागुंत. आपला प्रस्थापित उद्योग चालवत असतानाच नवीन तंत्रज्ञान उत्पादन वा विपणन व्यवस्थेत राबवणे म्हणजे आधीच गुंतागुंतीच्या प्रक्रियेत अडचणींचा जादा पदर लावणे अशी धारणा बरेच उद्योजक करून घेतात. अशा स्थित्यंतराच्या काळात मेहनत तर जास्त करावी लागतेच, पण त्याचबरोबर ही तारेवरची कसरत सांभाळणे मोठमोठय़ा उद्योजकांना जमत नाही. वर्षांनुवर्षे किरकोळ व्यापारावर अधिराज्य गाजवणाऱ्या वॉल मार्टला अ‍ॅमेझॉनशी दोन हात करणे का जमत नाही? पहिल्यांदा आपल्याच मस्तीत चालणाऱ्या या उद्योगाने या डिजिटल उद्योगांकडे तकलादू म्हणून दुर्लक्ष केले, पण जेव्हा स्वत:च्या विक्रीवर परिणाम झाला तेव्हा स्वत:च्या जुन्या धंद्यावर हा डिजिटलचा नवीन थर द्यायचा प्रयत्न केला आणि मग या दोन्ही थरांचा खर्च व अपव्यय वाढत आहे म्हटल्यावर धरसोडीचे धोरण अवलंबले.
या बदल प्रक्रियेमधील चौथी अडचण म्हणजे तंत्रज्ञान व कुशल कामगारांची कमतरता. नवीन डिजिटल उद्योगक्रांती राबवताना कुशल व नवीन तंत्रज्ञानाची माहिती असणारे तरुण ‘कारागीर’ आपल्या जुन्या उद्योगांमध्ये आकर्षित करणे हे आज मोठे आव्हान आहे. पहिल्या तीन अडचणी पार केल्या तरी जुन्या अनुभवांच्या जोरावर नवीन उद्योगतंत्र राबवता येत नाही. उदाहरणार्थ, संकेतस्थळ हे परस्पर संवादपूर्ण करून उद्योग प्रक्रियेच्या उत्पादकतेत भर घालणारे हवे असेल तर त्याची निर्मिती करणारे हे ग्राहक कसा विचार करतील याकडे लक्ष देत या तंत्रज्ञानाचा वापर करणारे तरुण तंत्रज्ञच लागतील. हल्ली दूरदर्शनवर येणाऱ्या एका जाहिरातीत केवळ एक संगणक घेऊन फिरणारा तरुण धंद्याच्या गोष्टी फोनवर करताना दिसतो. एका कंपनीतल्या ज्येष्ठ प्रबंधकांचा चमू बाजूला असतो व या तरुणाची चेष्टा करीत असतो. नंतर कार्यालयात आल्यावर साहेब या तरुणाची ओळख नवीन ‘बॉस’ म्हणून करून देतात. त्या वेळी जुन्या, अनुभवी प्रबंधकांचे चेहरे बघण्यासारखे होतात! अशा बदलांना पचनी पाडणे जुन्या-जाणत्या उद्योगांना व उद्योजकांना जड जाते. पण नवीन क्रांतीमध्ये ही प्रक्रिया अपरिहार्य आहे. या प्रक्रियेतील पाचवा अडसर म्हणजे नवीन डिजिटल तंत्रज्ञान राबवण्यासाठी येणारा खर्च. पण आज अशा उद्योजकांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की हा खर्च नसून अपरिहार्य ठरणारी गुंतवणूक आहे. ज्या वेगाने हे डिजिटल उद्योगक्रांतीचे वारे पुढे सरकत आहेत ते पाहता ही गुंतवणूक आपापल्या उद्योगात नाही केली तर उद्योगाच्या अस्तित्वालाच धोका पोहचू शकतो. माझ्या मते सहावी आणि शेवटची अडचण म्हणजे सर्वसामान्य उद्योजकांपुढे मांडण्यात येणारे तंत्रज्ञानविषयक पर्याय. वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर मोठय़ा प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचे पर्याय समोर येतात व लहान उद्योजक अक्षरश: भांबावून जातो. वेळ कमी असतो, ज्ञान तोकडे असते, नवीन स्पर्धक बाजारात यशस्वीपणे येत असतात, पण या पर्यायांमुळे उद्योजकाच्या निर्णयक्षमतेला जणू लकवा मारल्याचे दिसते. अशा वेळी माझ्या मते सल्लागारांच्या मदतीने स्वत: अभ्यास करून व थोडीशी जोखीम घेत उद्योग व उद्योजकांनी तातडीने निर्णय घेऊन या डिजिटल उद्योगक्रांतीला अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे.
भारतात आज डिजिटल उद्योगांची सुरुवात होत आहे. पण प्रस्थापित उद्योगांनी व लहान उद्योजकांनी केवळ आश्चर्याने पाहत न राहता आपल्याला या क्रांतीचा कसा फायदा मिळेल याकडे तात्काळ पाहणे हे त्यांच्या व भारताच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही फायद्याचे ठरेल. नवीन उद्योग प्रमेयाची संकल्पना ठरवून, बाजारात ग्राहकांचा सहयोग संपादन करीत आपली उत्पादने या नवीन डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून बाजारात कशी पोहोचवता येतील, या माध्यमांना सयुक्तिक ठरणारी नवीन उत्पादने कशी बनवता येतील, तीच माध्यमे व मार्गिका वापरून आणखी ग्राहकांना कोणत्या नवीन वस्तू पुरवता येतील, या डिजिटल मार्गिकांचा पुरवठा व्यवस्थेसाठी वापर करीत आपला खर्च कसा कमी होईल हे पाहणेही गरजेचे आहे. आपल्या उद्योगासाठी लागणारे कामगार-कौशल्य हे वेगवेगळ्या उद्योग जाळ्यांमधून आपल्या उद्योगासाठी कसे वापरता येईल हे पाहणे गरजेचे आहे. आधी सांगितलेले सहाही अडथळे पार करून या मार्गाचा वापर करीत उत्पादन, पुरवठा व ग्राहक संपर्क यांच्या आधी वापरलेल्या प्रक्रियांमध्ये डिजिटल बदल केले म्हणजे आपला उद्योग हा केवळ वाचणारच नाही तर प्रथमत: भारतात व नंतर जागतिक बाजारपेठेतही चमकू शकेल. अमेरिकन-चिनी उद्योगांना जमते, मग आपल्याला का नाही जमणार?
हा लेख लिहिताना एका गोष्टीची खूप खंत वाटत आहे. माझा अगदी आधीचा लेख गोडीने वाचणारी माझी प्रिय आई हा लेख वाचायला व माझ्या पाठीवर शाबासकी द्यायला आज या जगात नाही. ही खिन्न करणारी जाणीव या लेखाचा प्रत्येक शब्द लिहिताना होते आहे. पण मी मात्र लिहीत राहणार आहे, तिला श्रद्धांजली म्हणून!

लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल
deepak.ghaisas@gencoval.com

Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
pakistan google search indian movie 1
भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
Loksatta kutuhal The journey of artificial intelligence in India
कुतूहल: भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल
Story img Loader