संधी न दवडणे हा नवीन तंत्रज्ञान व संगणकीय युगाचा गुणधर्म प्रत्येक उद्योगाने व उद्योजकाने अंगीकारणे अटळ ठरत आहे. त्याचप्रमाणे उद्योगांच्या सतत बदलणाऱ्या प्रमेयांचे भान सदोदित राखणे अपरिहार्य आहे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उद्योग उभा करून चालवणे हे सहजसोपे काम असते तर स्वत:हून कोणीही नोकरीच्या फंदात पडले नसते. उद्योगामध्ये घालावा लागणारा पैसा, कष्ट व जोखीम हे तीनही इतके जास्त असतात की भले भले, आपण मराठीत म्हणतो त्याप्रमाणे उद्योगात ‘पडतात’, आपटतात व इतर त्यांच्याकडे पाहत नोकरीची वाट धरतात. पण तरीही उद्योजक बनण्याचे आकर्षण काही लोकांना असतेच. उद्योग यशस्वी होणे हा केवळ नशिबाचा भाग नाही किंवा केवळ अपार कष्टांचेच फळ नाही. उद्योग सुरू करताना व तो चालवताना आपले कान व डोळे सतत उघडे असणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. चिनी देवळांमध्ये मला एकदा एका खांबावर मासा कोरलेला दिसला. माझ्याबरोबरच्या दुभाष्या मुलीला मी त्याबद्दल विचारले असता तिने सांगितले की, चिनी लोक माशाचे अनुकरण करायला उत्सुक असतात. मासा कधीही आपले डोळे मिटत नाही अगदी मेल्यावरसुद्धा! माणसाने आयुष्यात आपले डोळे सतत उघडे ठेवावेत. हा त्या माशाचा अनुकरणीय गुणधर्म! उद्योगात संधी कुठून व कशी येईल हे सांगता येत नाही. डोळे उघडे नसतील तर ही संधी कोणी दुसरा घेऊन जाईल आणि मग पुढची संधी कधी येईल हे सांगता येणार नाही.
आजच्या नवीन तंत्रज्ञान व संगणकीय युगात हा गुणधर्म प्रत्येक उद्योगाने व उद्योजकाने अंगीकारणे अधिकच निर्णायक बनले आहे. पूर्वीप्रमाणे कोणत्याही उद्योगाची प्रमेये ही दीर्घकाळ टिकणारी नाहीत. भारतात मोटारी बनवण्यात बिर्लानी पुढाकार घेऊन अॅम्बेसीडर नावाची गाडी बाजारात आणली. जगात जे कमी देश गाडय़ा बनवत होते त्यात भारताला स्थान मिळाले. उद्योगाची भरभराट झाली आणि यशस्वी उद्योगाचे प्रमेय जमले, पण हेच प्रमेय किती वर्षे यश देईल ह्याविषयी जागरूकता ह्या उद्योगाने दाखवली नाही. सरकारी नियम, परवाने, आयात धोरण- कारणे अनेक असतील पण प्रमेय न बदलल्याने हा उद्योग काही दशकांनी गुंडाळावा लागला. यशस्वी प्रमेयांचे हे दशकांचे गणित नवीन जमान्यात पूर्णपणे बदलले आहे.
नवीन उद्योग प्रमेये तयार होण्याची प्रक्रिया ही इतकी वेगाने होत आहे की तुम्ही कोणत्याही उद्योगात असलात तरी डोळे उघडे नसतील तर रातोरात तुमचा उद्योग बाराच्या भावात निघू शकेल. सीप्झमध्ये आमच्या शेजारी चित्रपट-व्हिडीओ कॅसेटवर छापणारी कंपनी होती. निर्यातीत पहिल्या क्रमांकावर पण ऐन यशाच्या शिखरावर असताना सीडी कधी आल्या हे त्यांना दिसलेच नाही. तीच गोष्ट फ्लॉपी बनवणाऱ्या उद्योगांची. तंत्रज्ञान बदलत गेले आणि ५-६ वर्षे उद्योगाची यशस्वी प्रमेये चालवणाऱ्या ह्या उद्योगांना आपले दुकान बंद करण्याची वेळ आली. कारण एकच, त्यांना उद्योगाची नवीन प्रमेये कळलीच नाहीत. आज वेगाने बदल घडत असताना उद्योगांनी सतत डोळे उघडे ठेवून तंत्रज्ञान, बाजार, ग्राहक आणि स्पर्धक ह्यांच्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ह्या सतत बदलणाऱ्या वातावरणात सर्वात लक्षणीय ठरते ती एखादी त्रासदायक नवकल्पना. अगदी ताजे उदाहरण घ्या. मुंबईची काळी-पिवळी टॅक्सी हा कित्येक वर्षे चालणारा उद्योग माझ्या आठवणीत ३-४ रुपये किमान भाडय़ापासून आता २०-२२ रुपयांपर्यंतच्या काळात हे उद्योग प्रमेय आपल्याच मस्तीत सुरू होते. आता नवीन प्रमेयाप्रमाणे उबरसारखी नवकल्पना ही जुन्या टॅक्सी उद्योगाला त्रासदायक ठरत आहे. पण नवीन पिढीच्या ग्राहकांच्या आवडीची ही सेवा बंद होणे शक्य नाही. अगदी लंडनपासून मुंबईपर्यंत ह्या टॅक्सी सेवेविरुद्ध जुन्या उद्योगातील लोकांनी संप केले, निदर्शने केली. आता म्हणे महाराष्ट्र सरकार उबरसारख्या प्रमेयांना जाचक नियम आणणार आहे, पण त्यापेक्षा जुन्या उद्योगातील चालक व मालक लोकांनी आपल्या उद्योग प्रमेयात बदल करणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आपली सेवा आणखी स्पर्धात्मक करणेच गरजेचे आहे. पेन-पेन्सिल बनवणाऱ्या उद्योजकांची गोष्ट पाहा ना. संगणकामुळे पेन-पेन्सिलचा वापर वर्षांकाठी कमी-कमी होत जाणार आहे. ह्या उद्योगांची प्रमेये बदलणेही गरजेचे आहे. प्रत्येक उद्योगात जगातील सर्व देशांत अशी उदाहरणे स्पष्ट दिसत आहेत.
ह्या सर्वाचा अर्थ म्हणजे आज प्रत्येक प्रस्थापित उद्योगाने स्वत:ची नवीन प्रमेये घडवणे व राबवणे हे त्या उद्योगाला जीवनावश्यक ठरत आहे. ‘प्रमेय बदला वा नष्ट व्हा’ हाच संदेश जगातील प्रत्येक उद्योजकाने मनावर बिंबवणे गरजेचे आहे. त्यात त्रासदायक नवकल्पना ह्या तर त्या त्या उद्योगांचे अस्तित्वच धोक्यात आणत आहेत. पूर्वी प्रत्येक घरात किमान एक कॅमेरा असायचाच, त्याची फिल्म असायची. छायाचित्र धुऊन-छापून आणायचे वगैरे कित्येक उद्योग होते. आज मला आठवत नाही मी गेली किती वर्षे कॅमेरा वापरलेलाच नाही. जगात कुठेही जा चलतदूरध्वनीमध्ये उत्तमोत्तम छायाचित्रे काढण्याच्या सोयीमुळे कॅमेरा उद्योगाचे प्रमेय पूर्ण बदलले आहे. मग ह्या नवीन प्रमेयांना कसे अंगीकारायचे हाच मोठा प्रश्न प्रत्येक जुन्या उद्योजकापुढे आ वासून उभा आहे. ह्याकरिता जुन्या उद्योगांचे जे मूळ प्रमेय आहे त्यालाच आव्हान करणे गरजेचे आहे. ज्या गोष्टी जुन्या प्रमेयात अध्याहृत म्हणून धरल्या गेल्या होत्या त्याच उलटय़ापालटय़ा करून उद्योगाची नवीन चौकट बांधणे गरजेचे आहे. सतत सतर्क राहून आपले स्पर्धक बाजारात काय नवीन आणत आहेत हे बघणे गरजेचे आहे. म्हणजे उदाहरणार्थ किरकोळ व्यापारात सवलतीच्या योजना कोण कशा आणत आहेत, ग्राहक त्याला कसा प्रतिसाद देत आहेत, कोणत्या वयोगटाचा ग्राहक हा सवलतीपेक्षा मानांकनावर भाळतो आहे, वगैरे शेकडो चलत अध्याहृतांकडे सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गेल्या दिवाळीतील खूप यशस्वी ठरलेली सवलत योजना ह्या वर्षी तेवढी विक्री खेचेल अशा विश्वासात राहणे हे उद्योगाला मारकच ठरेल. भारतीसारख्या उद्योगाने चलतदूरध्वनी क्षेत्रात येताना ग्राहक सोडले तर बाकी कशात गुंतवणूक केली नाही. तंत्रज्ञान, मनोरे, इत्यादी मोठय़ा गुंतवणुका त्यांनी भाडेतत्त्वावर घेतल्या व आपले पूर्ण लक्ष ग्राहक मिळवण्यावर केंद्रित केले. उद्योगांचे हे नवे प्रमेय त्या कंपनीला मोठे यश देऊन गेले.
हे सगळे धोरणात्मक बदल करत असताना, उद्योगांनी नवीन प्रमेये बसवताना काही गोष्टींचा विचार करणे अत्यंत जरुरी आहे. पूर्वीच्या उद्योगांत ग्राहक-निष्ठा ही सर्वात महत्त्वाची मानली जायची. निष्ठावान ग्राहक परत परत आपल्याकडेच येईल हे अध्याहृत पण आज नवीन पिढीतील ग्राहक निष्ठावान नाही. तो स्वत:च्या सक्षमीकरणाकडे जास्त लक्ष देतो. म्हणजेच नवीन प्रमेयामध्ये ग्राहक निष्ठेवर भर देण्यापेक्षा ग्राहक सक्षमीकरणावर भर देणे जरुरीचे आहे. आज संगणकीकरण व दूरसंचार ह्यामुळे ग्राहक कधीही जगभरातील बाजारपेठ फिरून येतो व त्याला किंमत, गुणवत्ता, उत्पादनांचे पर्याय इत्यादी इत्थंभूत माहिती असते. अशा ग्राहकाला जर मी माझ्याकडे आहे ते विकण्याचा अट्टहास धरला तर केवळ निष्ठेच्या बळावर आज ते शक्य नाही. त्यापेक्षा त्याला जे हवे आहे ते त्याला योग्य किमतीत उपलब्ध करून देणे म्हणजेच ग्राहक सक्षमीकरण हे आज ज्या उद्योगांना साधेल ते उद्योग प्रमेय यशस्वी करून दाखवतील. उद्योगांना दुसरी गोष्ट करणे जरुरी आहे ते म्हणजे मिळणाऱ्या प्रचंड माहितीचे सतत विश्लेषण करणे व ह्या विश्लेषणापासून धडे घेऊन उद्योग प्रमेयात सतत प्रासंगिक बदल करत राहणे. आज मला एखाद्या देशात हॉटेल खोलीची आगाऊ राखणी करायची असेल तर विश्वजालावर त्या हॉटेलमध्ये राहून गेलेल्या कित्येक लोकांचे अभिप्राय वाचायला मिळतात व हॉटेलच्या निवडीत त्या अभिप्रायांचा मोठा प्रभाव असतो. हॉटेल उद्योगाने स्वत:वरच्या ह्या अभिप्रायांची नोंद घेत ग्राहकांच्या नाराजीवर आपण कसे त्वरित उपाय केले हे संगणकीय माध्यमातून भावी ग्राहकांना सांगणेही महत्त्वाचे आहे. आजच्या संगणक युगात माहितीचा प्रचंड पुरवठा आहे, पण त्याचे विश्लेषण झाले पाहिजे व त्या विश्लेषणातून निष्पन्न होणाऱ्या बाबींची लगेच अंमलबजावणी होऊन ती माहिती सामाजिक माध्यमातून सर्वाना उपलब्ध करणे गरजेचे आहे. नवीन उद्योग प्रमेयांची ही गरज आहे. तिसरा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे मालमत्ता मालकीचा पूर्वीच्या उद्योग प्रमेयांप्रमाणे ज्या उद्योगांकडे जास्त मालमत्ता तो उद्योग मोठा पण आजच्या काळात तशी परिस्थिती नाही. मालकीपेक्षाही किती मालमत्ता तुम्ही उद्योगासाठी वापरू शकता ह्यावर तुम्ही किती मोठे आहात हे समजते. उदाहरणार्थ, युरोपमध्ये जहाज व्यवसायात खासगी बंदरे/ धक्के जहाज कंपन्यांना दीर्घ मुदतीच्या भाडय़ाने देतात. ह्या बंदरात त्या कंपनीचे जहाज आले की तो धक्का त्या जहाजाला लगेच मिळतो. त्यामुळे जहाज मालाची लवकर चढ-उतार करून मार्गाला लागते व कंपनीच्या नफ्यात खूप वाढ होते. उरलेल्या वेळी ही जहाज कंपनी धक्के भाडय़ाने देऊन इतर जहाजांना मालाची चढ-उतार करून देते. वाहतूक व्यवसायात आता हे उद्योग प्रमेय खूपच लाडके होत चालले आहे. म्हणजेच नवीन स्पर्धा नसतानाही नफ्यावरच्या आत्यंतिक ताणामुळे उद्योगांना नवीन कल्पना व नवीन प्रमेये मांडण्याची गरज पडत आहेत. आजच्या नवीन उद्योगांमध्ये म्हणजे दूरदर्शन वाहिन्या किंवा चलतदूरध्वनी कंपन्या ह्यांना दररोज नवीन योजना बाजारात आणून पूर्वीच्या अध्याहृतांना सतत आव्हान देण्याची गरज भासत आहे. नवीन योजनांच्या आकर्षक जाहिराती, ग्राहकांचे सक्षमीकरण करत आपल्या व्यवसायाची नवनवीन प्रमेये मांडणे गरजेचे ठरत आहे. आज जुन्या वित्तीय संस्थांचीही हीच अवस्था होत आहे. पूर्वीच्या प्रमेयात हमखास नफा मिळवून देणारी वित्तीय उत्पादनांना नवोद्योगांकडून स्पर्धा निर्माण होत आहे. विश्वजालाचा उपयोग करत देयक दरवाजातून आता किती तरी छोटय़ा खासगी कंपन्या जगात ग्राहकांना त्यांच्या पैशाची देवाणघेवाण करण्याच्या सोयीच्या उत्पादनांची खरात करत आहेत. आज कमी खर्चात होणारे हे व्यवहार ग्राहकाला आकर्षक वाटत आहेत. वित्तीय संस्थांना म्हणूनच आपल्या अशा सोयींच्या किमती लक्षणीयरीत्या कमी करायला लागतील वा ह्या सेवा उत्पादनांचे वितरणच बंद करायची वेळ त्यांच्यावर येईल.
‘भारतात बनवा’ ही घोषणा राबवताना उद्योगांची ही नवी प्रमेये लक्षात घेणे जरुरीचे आहे. जुन्या उद्योगांच्या जगभरातील वाढीमुळे मागणीपेक्षा जगभरात पुरवठा अधिक आहे. त्यामुळे अजून ३० लाख टन पोलाद निर्माण करायचे कारखाने आता भारतात नकोत तर ह्या नवीन प्रमेयांची सांगड घालत, नवीन कल्पना राबवत, ग्राहकाला सक्षम करणारे उद्योग भारतात कसे सुरू होतील हे पाहणे गरजेचे आहे. हे जर झाले तर ‘भारतात बनवा’ ही योजना यशस्वी होईल. केवळ चीनचा कित्ता गिरवून यश मिळाार नाही.
* लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल deepak.ghaisas@gencoval.com