यू. आर. अनंतमूर्ती हे कन्नडमधील क्रियाशील साहित्यिक होते. त्यांनी कन्नड भाषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. अनंतमूर्ती व्यवसायाने इंग्रजीचे प्राध्यापक होते, पण नीती आणि भारतीय भाषांबद्दल त्यांना अतिशय प्रेम होते. प्रादेशिक भाषांचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. सर्वच कन्नड साहित्यिक आपल्या मातृभाषेचे कट्टर पुरस्कर्ते असतात. अनंतमूर्ती, एस. एल. भैरप्पा, गिरीश कार्नाड, चंद्रशेखर कंबार ही त्यांपैकी काही नावे. शालेय शिक्षण मातृभाषेतूनच द्यायला हवे, असा त्यांचा आग्रह असतो आणि आहे. त्यासाठी ते आपल्यापरीने प्रयत्नही करतात. शासन व्यवस्थेशी पंगा घेण्याची तयारी दाखवतात. त्याचबरोबर त्यांचा हिंदीला विरोध असतो. अनंतमूर्तीही याला अजिबात अपवाद नव्हते. सर्वच भारतीय भाषा या ‘राष्ट्रभाषे’च्या योग्यतेच्या आहेत असे अनंतमूर्ती यांचे मत होते.
अनंतमूर्ती यांचे संपूर्ण आयुष्य हे वादळी राहिले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमुळे किंवा जाहीर विधानांमुळे कन्नडमध्ये सतत काही ना काही वाद होते. अनंतमूर्ती जातीने माध्व ब्राह्मण. ब्राह्मण समाजातील ही पोटजात अतिशय पारंपरिक. मात्र आपल्या या जातीच्या विरोधात अनंतमूर्ती यांनी बंडाचा झेडा फडकवत सत्तरच्या दशकात ख्रिश्चन मुलीशी लग्न केले. त्या काळात या घटनेने कर्नाटकात मोठी खळबळ माजवली होती. पण जे मनात आले ते करून दाखवण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे ते कोणत्याही गोष्टीची पर्वा करत नसत.
‘संस्कार’ ही अनंतमूर्तीची पहिली कादंबरी. त्यात त्यांनी भारतातील जातिव्यवस्थेवर घणाघाती टीका केली आहे. ब्राह्मण्य, शास्त्र, उपनिषदे ही मानवतेच्या विरोधात कसे काम करतात याचे परखड चित्रण त्यांनी या कादंबरीत केले. या कादंबरीमुळे त्यांनी कर्नाटकातील ब्राह्मण समाजाचा रोष ओढवून घेतला. ब्राह्मण समाजाने त्यांना आपल्या जातीतून बहिष्कृत केले, तेव्हा अनंतमूर्ती त्यांना म्हणाले, ‘तुम्ही काय मला बहिष्कृत करता? मीच तुमच्या जातीला बहिष्कृत करतो.’ (या कादंबरीवर गिरीश कार्नाड यांनी कन्नडमध्ये चित्रपट केला. आणि त्यात अभिनयही. हा कन्नडमधील पहिला राष्ट्रपती पदक विजेता चित्रपट ठरला.)
‘भारतीपूर’ या दुसऱ्या कादंबरीत अनंतमूर्ती यांनी दलित आणि ब्राह्मण यांतील संघर्ष मांडला आहे. या कादंबरीत १९७०च्या दशकाच्या काळातील भारतीय समाजाचे चित्रण येते.  मंदिरप्रवेशापासून सुरू झालेली दलित चळवळ त्यांच्या स्वतंत्र माणूस म्हणून असलेल्या हक्कापर्यंत कशी जाते याचे मांडणी या कादंबरीत अनंतमूर्ती यांनी केली आहे. ब्राह्मण पुजाऱ्याच्या मुलालाच दलितांवरील अन्याय खटकतो. तो ज्या मंदिरामुळे दलित-ब्राह्मण यांच्यामध्ये संघर्ष सुरू होतो, त्यातील मूर्तीलाच जलसमाधी देऊन टाकतो. दलितांकडे केवळ सहानुभूती म्हणून नव्हे तर माणूस म्हणून पाहणारा हा पुरोगामी नायक बदलत्या भारतीय जनमानसाचे प्रतिनिधित्व करणारा मानला गेला.
अनंतमूर्ती विचाराने लोहियावादी. त्यांचे जन्मगाव शिमोघा. कर्नाटकातील हे गाव पक्के लोहियावादी. जे. एच. पटेल, गोपालकृष्ण अडिग, बंगारप्पा (माजी मुख्यमंत्री) ही सर्व साहित्य व राजकारणातली लोहियावादी मंडळी शिमोघ्याचीच. गौपालगौडा हे लोहियांचे शिष्य. त्यांची आणि अनंतमूर्ती यांची घनिष्ठ मैत्री होती. त्यांच्यावर त्यांनी ‘अवस्थे’ ही कादंबरीही लिहिली. ती वादग्रस्त ठरली. गौडा यांच्या पत्नीने त्याविरोधात अनंतमूर्ती यांच्यावर खटला भरला.
अनंतमूर्ती यांनी सुरुवातीला कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर चार-पाच कवितासंग्रहही आहेत. १०-१२ वर्षांपूर्वी त्यांचा ‘मिथून’ हा शेवटचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. काही इंग्रजी कवितांचेही त्यांनी कन्नडमध्ये अनुवाद केले आहेत. पण कविता ही त्यांची प्रकृती नव्हती, कथा-कादंबरीकार हीच त्यांची प्रकृती वा स्वभावधर्म. ते स्वत:ही तसे बोलून दाखवत.
अनंतमूर्ती प्रखर म्हणावे इतके पुरोगामी विचाराचे होते. उजव्या विचारसरणीला ते कडाडून विरोध करत असत. मग ते एस. एल. भैरप्पा असोत की नरेंद्र मोदी. आपल्या विधानांवरून काय प्रतिक्रिया उमटतील, आपल्याला काही त्रास होईल का याची ते कधीही तमा बाळगत नसत. कर्नाटकात त्यांनी कुठेही भाषण केले तरी त्यावर वाद ठरलेलेच. पण ते कधी आपल्या मतावरून मागे हटत नसत वा तडजोडीची भूमिका घेत नसत.
अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला, पण साहित्य अकादमीचा पुरस्कार मात्र मिळाला नाही. याची त्यांना खंत वाटत असे. गमतीचा भाग म्हणजे ते साहित्य अकादमीचे काही काळ अध्यक्षही होते. नॅशनल बुक ट्रस्टचेही अध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले.
अनंतमूर्ती यांची तत्त्वनिष्ठाही वादातीत होती. कर्नाटकात हेगडू म्हणून एक छोटेसे गाव आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते के. व्ही. सुब्बण्णा यांचे हे गाव. तिथे दरवर्षी १० दिवस संस्कार शिबीर होते. त्याला अनंतमूर्ती सुरुवातीपासून हजेरी लावत. या शिबिराला भारतभरातून लोक येतात. एके वर्षी केंद्र सरकारचे सांस्कृतिक शिष्टमंडळ चीनला चालले होते. आणि त्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी अनंतमूर्ती यांच्यावर सोपवण्यात आली होती. पण हेगडूच्या शिबिराच्या तारखा आणि या दौऱ्याच्या तारखा एकच आल्यामुळे अनंतमूर्ती यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. शेवटी तत्कालीन सांस्कृतिक मंत्र्यांनी त्यांच्यासाठी दौऱ्याच्याच तारखा बदलून घेतल्या.
अनंतमूर्ती हे कन्नडमधील तरुण लेखकांचे हिरो होते. कर्नाटकातील नवसाहित्य चळवळीचे ते अध्वर्यु होते. त्यांचे गुरु गोपालकृष्ण अडिग हे नवसाहित्यातले कवितेसंदर्भातील सर्वात मोठे नाव तर अनंतमूर्ती हे कथा-कादंबरीतील. ‘अतिनव्य’ या नवसाहित्यानंतर सुरू झालेल्या आणि कामू, काफ्का यांच्या प्रभाव असलेल्या साहित्य चळवळीचेही नेतृत्व त्यांनी केले. ‘प्रगतीशील साहित्य’, ‘बंडाय साहित्य’ या साहित्य चळवळीशींही त्यांचा निकटचा संबंध होता. कर्नाटकातील दलित साहित्य चळवळीत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. पण त्यांचे समर्थक आणि चाहते असलेले सर्वच्या सर्व तरुण साहित्यिक या चळवळीत सहभागी होते. आघाडीचे दलित साहित्यिक ज्यांना म्हटले जाते, ती तर अनंतमूर्ती यांचीच देण आहे.
अनंतमूर्ती कट्टर पर्यावरणवादी होते. कर्नाटकात अणुऊर्जेच्या विरोधात त्यांनी चळवळी, उपोषणे केली होती. अवैध खाणींच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्या सदंर्भात न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. अशा अनेक चळवळी, आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असे.
मराठीतील विजय तेंडुलकर आणि दिलीप पुरुपषोत्तम चित्रे यांच्याबद्दल त्यांना विलक्षण आदर होता. चित्रे यांच्याशी तर त्यांची घनिष्ठ मैत्री होती. त्यांच्या कवितांचा कन्नडमध्ये अनुवाद करण्यासाठी त्यांनी मला अनेक वेळा गळही घातली होती.
आता त्यांचे वय ८२ होते. पण ते म्हणत मी फक्त शरीराने म्हातारा झालो आहे, माझे मन, बुद्धी मात्र अजून तरुण आहे.
देखणी ती जीवने जी तृप्तीची तीथरेदके
चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे
या बा. भ. बोरकरांच्या एका कवितेतील ओळींचे मूर्तीमंत रूप म्हणजे अनंतमूर्ती.
(लेखक कन्नडमधील पत्रकार व नामवंत साहित्यिक आहेत.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा