‘ते मार्क्सवादी अभ्यासक होते’ ही ऐजाझ अहमद यांची फारच अपुरी ओळख. तरीही, त्यांचे निधन ९ मार्च रोजी अमेरिकेत झाल्याची बातमी भारतीय व परदेशी वृत्तपत्रांनी दिली, तेव्हा ही थोडक्यात ओळख होतीच. ही ओळख जरा तरी समर्पक करायची तर असे म्हणावे लागेल की, मार्क्सवादी अभ्यासकाने जसे असायला हवे तसे ते होते! पण म्हणजे कसे होते? मुळात ऐजाझ यांनाच ‘अमुक असे असायला हवे’ अशा अपेक्षेबद्दल ठोस बुद्धिनिष्ठ संशय. त्यामुळेच तर प्रत्येक संकल्पनेच्या, प्रत्येक विधानाच्या मुळापासून तपासणीचा व्यासंग हा त्यांच्या व्यक्तित्वाचाच भाग म्हणून शोभे. तेव्हा ऐजाझ यांची ओळख सांगायचीच, तर त्यांच्या पुस्तकांकडे पाहाणे बरे. इंग्रजीसह उर्दूतही ते लिहीत, त्यांचे पहिले पुस्तक गालिबच्या गझलांवर होते आणि तेही वैचारिकच असल्याचे त्यांचे म्हणणे असेलही.. पण रूढार्थाने वैचारिक म्हटली जाणारी त्यांची पुस्तके अधिक लोकांपर्यंत पोहोचली, अगदी चिनी वा कोरियन भाषांतही गेली. ‘इन थिअरी’ हे पुस्तक परिवर्तनवादी साहित्याच्या सैद्धान्तिक संदर्भाना- म्हणजे मार्क्सवाद, वसाहतोत्तरवाद यांना तपासणारे, आजच्या अभिव्यक्तीच्या नजरेने त्या संदर्भाकडे पाहणारे. ते गाजलेच, पण नंतरची पुस्तकेदेखील नवे प्रश्न उपस्थित करणारी ठरली. या पुस्तकांबाहेरची त्यांची ओळख म्हणजे, भारतात फाळणीपूर्वी जन्मले आणि कळू लागण्याच्या आत कुटुंबीय त्यांच्यासह पाकिस्तानात गेले. त्या देशातून ऐजाझ अमेरिका व कॅनडात शिकण्यासाठी गेले आणि तेथील विद्यापीठांत शिकवूही लागले, परंतु संधी मिळेल तेव्हा ते भारतात येत. भारतातील प्रत्येक निमंत्रण स्वीकारत आणि साठीनंतर तर जमेल तितका वेळ भारतातच राहात. परंतु गेल्या काही वर्षांत व्हिसावाढ न मिळाल्याने त्यांना अमेरिकेत परतावे लागले होते.
राज्यशास्त्र, साहित्य, समीक्षा-सिद्धान्त आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांची जाण त्यांना होती. कार्ल मार्क्सला अभ्यासक म्हणून ते पाहात, त्यामुळे पोथीनिष्ठ मार्क्सवादापासून अर्थातच ते दूर होते आणि मार्क्स-भारत संबंधांचा डोळस अभ्यासही करू शकत होते. मार्क्स वसाहतवादाच्या काळातला. पण त्याचा अभ्यास जागतिकीकरण समजून घेण्यासाठी उपयोगी पडतो असे म्हणणे मांडताना ऐजाझ, जागतिकीकरणाचा धांडोळा मुळापासून म्हणजे अगदी बांडुंग परिषदेपासून घेतात. त्या परिषदेचा संबंध ‘तिसरे जग’ या संकल्पनेशी होता, जागतिकीकरणाशी नव्हे. पण तिथपासून जागतिकीकरणापर्यंत आपण कसे काय आलो, हा प्रश्न ते उपस्थित करतात आणि नाहीतर कुठे जायला हवे होते, याचे उत्तर आजच्या वास्तवात ‘त्रिखंडवाद’ (ट्रायकॉन्टिनेन्टल) वा नववसाहतवाद- विरोधी देशांतील लोकांचीही एकजूट यात असू शकते असा कौलही देतात. ग्रामचीचा अभ्यास का महत्त्वाचा, हे ऐजाझ अहमद सांगतात आणि ‘उत्तर’आधुनिकता, वसाहतोत्तर वादातला ‘उत्तर’ यांची कसून तपासणी करतात. हा वैचारिक वारसा आपल्या सोबतच राहाणार आहे. हा वैचारिक वारसा आपल्या सोबतच राहाणार आहे.