बऱ्याच वेळा आपण अॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं. त्यात अमूर्ताचं, अॅबस्ट्रॅक्टचं काही ज्ञान होण्याचा संबंध नसतो..
आपला असा समज आहे की, जे दिसत नाही ते अदृश्य! अदृश्य या शब्दरचनेतच हा अर्थ दडलाय की जे दिसत नाही, दिसू शकत नाही ते अदृश्य. आपण अदृश्याचा ज्या पद्धतीने विचार करतो त्यात अशीही एक छटा आहे की, अदृश्य हे कधी तरी दृश्य होतं. दिसू शकत होतं. दृश्य-अदृश्य हा लपाछपीसारखा एक खेळ आहे. जसं ढगांनी चंद्र, सूर्य आदी काही काळ झाकले जातात आणि पुन्हा दिसू लागतात; धुक्याच्या ढगांनी डोंगर नाहीसे होऊन पुन्हा अवतरतात, मुसळधार पाऊसधारांच्या पडद्यात सभोवताल विरघळून जातं आणि अचानक स्वच्छ न्हाऊन पुन्हा दिसू लागतं. तसा दृश्य-अदृश्याचाही एक खेळ आहे. जे दृश्य असतं ते कधी तरी अदृश्य होतं व अदृश्य पुन्हा फिरून दृश्य होतं. यामुळे होतं काय, की आपण दृश्याच्या आधारावर अदृश्याचा व अदृश्याच्या आधारावर दृश्याचा विचार करतो. म्हणजे देवाची कल्पना देवाच्या मूर्तीवरून करतो व आपणच केलेली कल्पना देवाच्या मूर्तीमध्ये पाहतो.
ही चर्चा करायचं कारण हे की, आपल्या दृश्य-अदृश्याविषयीच्या या समजावर आधारित आपण मूर्त-अमूर्ताची कल्पना करतो. दृश्य-अदृश्य व मूर्त-अमूर्त अशी सांगड घातली जाते. परिणामी आपल्या अशा प्रकारच्या विचाराने ‘अमूर्त’ खऱ्या अर्थी कळू शकतं का? ते आपल्याला माहीत असतं का? असा प्रश्नच आपल्याला पडत नाही. मूर्त-अमूर्ताबाबतच्या आपल्या वैचारिक सवयीतला विरोधाभास आपल्याला कळत नाही.
या मुद्दय़ाकडे अगदी नीट पाहायला हवं. त्याला समजून घ्यायला हवं! कारण नैसर्गिक घटनांमुळे दृश्य-अदृश्यांचा अनुभव घेणं ही एक गोष्ट झाली. पण बऱ्याच वेळेला आपल्याला अनेक गोष्टी दिसत नसतात, नाहीत. कारण आपण त्यांना पाहत नसतो. (जसं चंद्राकडे बोट दर्शवणाऱ्या, हाताकडे-बोटाकडे आपण पाहतो. चंद्राकडे नाही त्या प्रमाणे.) आपण भलत्याच गोष्टींकडे पाहत असल्याने, पाहायची सवय असल्याने आपल्याला, डोळे असूनही, अगदी भरदिवसा- जागेपणीही गोष्टी दिसत नाहीत. आपली रोजच्या वापरातली वस्तू, कंगवा, चष्मा, पैशाचं पाकीट, पेन, आता मोबाइल अचानक मिळत नाहीसा झाला की आपल्याला अस्वस्थता येते. या वस्तूंच्या ठरावीक ठिकाणीही त्या सापडत नाहीयेत, दिसत नाहीयेत म्हणून. आणि सापडल्या की सुटकेच्या नि:श्वासासकट, एका सूक्ष्म तीव्रतेने आपण अचंबित झालेले असतो. ‘कमाल आहे! ही वस्तू इकडे होती. अगदी आपण तिच्यासमोरून २/३ वेळा गेलो तरी आपल्याला ती दिसली नाही’ असा विचार आपल्या मनात येतो.
त्यामुळे आपण आपल्या वस्तू न पाहण्याच्या, न दिसण्याच्या सवयीतून, अनुभवातून दृश्य-अदृश्य व त्यातून पुढे मूर्त-अमूर्त यांची कल्पना केली नाहीये ना हे पाहायला हवे. कारण त्यामुळे मूर्त-अमूर्ताचा, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगचा अर्थ बदलेल. अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगमध्ये नक्की अॅबस्ट्रॅक्ट काय आहे, अमूर्त काय आहे, याचा अर्थ बदलेल. बऱ्याच वेळा आपण अॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं. त्यात अमूर्ताचं, अॅबस्ट्रॅक्टचं काही ज्ञान होण्याचा संबंध नसतो.
छायाचित्र कलेत या वृत्तीचं प्रतिबिंब अनेक वेळेला दिसत असतं. जे छायाचित्रकलेत नवखे आहेत किंवा ज्यांनी अगदी सूक्ष्म तपशील टिपता येईल अशी कॅमेऱ्याची लेन्स नवीन घेतली आहे, त्यांच्याकडे- त्यांच्या छायाचित्रांकडे पाहा. ते आपल्या सभोवतालच्या जगाच्या सूक्ष्म अवलोकनाने, निरीक्षणाने चकित झालेले असतात. आनंदित झालेले असतात. ‘विस्मय’ अनुभवत असतात. त्यांच्या छायाचित्रात कुठच्या वस्तूचे सूक्ष्म तपशील पाहिलेत हे कदाचित कळणार नाही, पण त्या सूक्ष्मतम पातळीवर पाहिलेल्या जगातील पोत, रंगसंगती, आकार, त्यांची मोहकता, त्यांचं सौंदर्य नक्कीच दिसत असतं. अशा विस्मयचकित होण्याने आनंद होतोच. आत्तापर्यंत न पाहिलेल्या, माहीत नसलेल्या दृश्याला पाहणं व त्यामुळे काही तरी गवसल्याचा आनंद होणं ही प्रक्रिया येथे घडते आहे. त्याचा अमूर्ताच्या ज्ञानाशी काही संबंध नाही. याचा अर्थ मी या छायाचित्रकारांना, त्यांच्या छायाचित्रांना कमी लेखतो आहे असं नव्हे. पण वैचारिक स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न आपण करतोय.
चित्रकलेतही असंच घडतं. साधारणपणे चित्रकार वस्तू, सभोवतालच्या जगाचा दृश्यानुभव पाहून रंगवत असतात. असं न करता जर का ते केवळ भौमितिक आकार, हातांच्या हालचाली किंवा ब्रश, रोलर, पेंटिंग नाइफसारखी साधनं, रंगांचं-माध्यमांचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या लेपनातून मिळणारे अनपेक्षित दृश्यानुभव मिळत असतात. असे दृश्यानुभव कुठच्याही वस्तूचं, दृश्याचं चित्रण करत नाहीत. हळूहळू असा दृश्यानुभव दर्शवणाऱ्या चित्रांना अॅबस्ट्रॅक्ट म्हटलं जातं. अशा चित्रांविषयी धीरगंभीर प्रकारे आध्यात्मिक भाषेत बोललं जातं.
अर्थातच जाणीवपूर्वक न पाहिलेल्या, न माहीत असलेल्या, अपरिचित अशा दृश्यानुभवांचा शोध घेणं, त्याकरिता (भटकणं-पाहणं फोटोग्राफीसंबंधी) चित्र घडवत राहणं, रंगवत राहणं या भूमिकेला महत्त्व आहे. पण तिचा खरंच आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेशी किती व कसा संबंध असू शकतो ते तपासून पाहायला पाहिजे.
चित्रकला ही भौतिक जगाच्या दृश्यरूपाला चित्रित करते. त्यासोबत जगाविषयीच्या मूल्य संकल्पनाही चित्रातील प्रतिमेशी संबंधित होतात, जोडल्या जातात. चित्रातील दृश्यानुभवातून शांत-ध्यानमग्नता, अश्लीलता, लोलुपता, क्रूरता, कारुण्य अशा अनेक मूल्यांचं दर्शन घडतंय असं वाटू लागतं.
परिणामी व्यक्तिगत पातळीवर किंवा सामाजिक पातळीवर, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक कारणांमुळे मूल्य व्यवस्थेबाबत व्यक्तीला, समूहाला असमाधान जाणवायला लागलं की त्यातून मूल्यं, त्यांची व्याख्या, त्यांचा अर्थ- त्याआधारित आचार-विचार यांविषयी प्रश्न उपस्थित केले जातात. त्यातून वैचारिक मंथन सुरू होतं. त्यातून आंदोलनं, उठाव, चर्चा आदी सुरू होतात. चित्रकाराला अशी अस्वस्थता जाणवू लागली की भौतिक जगाच्या दृश्यरूपाचं चित्रण करून त्याला समाधान लाभत नाही. प्रस्थापित तत्कालीन, सर्व वास्तववादी चित्रणाचे प्रकार त्यास उपयोगी वाटत नाहीत. कारण या वास्तववादी चित्रशैलींचा आणि त्याच्या वैचारिक अस्वस्थतेचा, मंथनाचा संबंध लागत नाही. अशातूनच तो अपरिचित दृश्यानुभवाकडे, त्यांना शोधण्याकडे वळतो. यातून रंगलेपनातून सापडणारे अनपेक्षित दृश्यानुभव व आपली वैचारिक भूमिका यात संबंध शोधू लागतो.
अमेरिकेत, दुसऱ्या महायुद्धानंतर काही चित्रकारांनी अशाच प्रकारे, स्वत:ची सांस्कृतिक मुळं-नाळं शोधण्यासाठी प्रयत्न केले. अशा चित्रकारांपैकी एक म्हणजे जॅकसन पोलॉक. त्याने रूढ अर्थाने प्रस्थापित चित्र संकल्पना, चित्ररूपं, माध्यमं, चित्राचा आकार, चित्रं रंगवण्याची पद्धत या सर्व गोष्टी नाकारल्या. या नाकारण्यातून त्याला एक नवीन दिशा प्राप्त झाली. त्यातून पुढे अॅक्शन पेंटिंग व अमेरिकन अॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम अस्तित्वात आला. स्वातंत्र्योत्तर भारतीय अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगचा एक स्रोत हा अमेरिकन अॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम आहे.
पोलॉकने जी वैचारिक दिशा स्वीकारली त्यातून त्याने अगदी वेगळ्या प्रकारे चित्रं घडवली. भल्या मोठय़ा आकाराचं कॅनव्हास कापड जमिनीवर पसरवून इनॅमल रंगांना पातळ करून, ब्रशऐवजी काडय़ांनी पातळ रंगाचे शिंतोडे उडवून त्याने चित्रं रंगवली. ही चित्रं रंगवताना त्याला चित्रावरही फिरावं लागे. उडय़ा मारून इकडून तिकडे जावं लागे. चित्रं रंगवण्याचा अनुभव अगदी झपाटल्यागत असे. त्यातून तयार झालेलं चित्ररूप इतकं अनपेक्षित होतं की सर्व जणांना ते स्तंभित करून गेलं.
महेंद्र दामले
* लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल- mahendradamle@gmail.com
अदृश्य = अमूर्त (?)
बऱ्याच वेळा आपण अॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं.
आणखी वाचा
First published on: 29-08-2015 at 06:12 IST
मराठीतील सर्व कळण्याची दृश्यं वळणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about painting art