चेचेन्याचा नि:पात करताना रशियन फौजांनी केलेली बेजबाबदार कृत्यं, मानवाधिकारांचं होणारं सर्रास उल्लंघन, महिलांवरचे अत्याचार हे विषय पत्रकार असलेल्या अ‍ॅनाकडून साद्यंत मांडले जाऊ लागले.   तिच्या लिखाणामुळे पुतिन यांचा अभद्र, खुनशी चेहरा जगापुढे आला होता. यामुळे मग अ‍ॅनाला जरा सबुरीनं घ्या, असे निरोप जायला लागले.  नंतर धमक्या, अपहरण , मानसिक अत्याचार.. मात्र तिची धारदार लेखणी चालूच राहिली आणि  २००६ मधील पुतिन यांचा वाढदिवस आला..
परवाच जेम्स फोले गेला. म्हणजे मारलाच त्याला. इस्लामी अतिरेक्यांनी. जेम्सला पश्चिम आशियाच्या आखातानं वेड लावलं होतं. त्याची सगळी पत्रकारितेची कारकीर्दच त्या परिसरात गेली. त्या देशात धर्म आणि राजकारण यांच्या संगनमतानं जो काही धुमाकूळ घातला जातोय, त्याचं वार्ताकन करायचा जेम्स. तर त्याला या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलं होतं. आतापर्यंत असं ओलिस राहण्याची वेळ त्या परिसरात बातमीदारी करणाऱ्या अनेकांवर आली आहे. त्यातले बरेचसे सुटले. या पत्रकारांच्या सरकारांनी संबंधित दहशतवाद्यांना हवी ती रक्कम देऊन या बंदीवान पत्रकारांची सुटका करून घेतल्याची बरीच उदाहरणं आहेत. पण जेम्स हा अशा भाग्यवानांतला नाही. काही वर्षांपूर्वी डॅनियल पर्ल हा पत्रकारदेखील असाच कमनशिबी ठरला होता. त्यालाही असंच ओलिस ठेवलं गेलं. अखेर अतिरेक्यांनी त्याची हत्या केली. कॅमेऱ्यासमोर. नंतर तर त्याची चित्रफीत वृत्तवाहिन्यांना पाठवून दिली. जेम्सलादेखील अतिरेक्यांनी तसंच मारलं. कॅमेऱ्यासमोर त्याचं शिर धडापासून वेगळं केलं. त्याच्या हत्येची चित्रफीत दोन दिवस झालीये सगळय़ा माध्यमांतून फिरतीये. नारिंगी रंगाच्या झग्यात जेम्स बसलाय.. स्तब्ध.. पण केविलवाणा नाही आणि मागे नखशिखान्त काळय़ा रंगातला बुरखाधारी.. त्याच्या उजव्या हातात भलामोठा सुरा.. जेम्सच्या मानेचा वेध घेऊ पाहणारा..
ती दृश्यं पाहिली आणि एकदम अ‍ॅनाची आठवण आली. अ‍ॅना पोलितोव्हस्काया. कधी भेटायची संधी मिळाली नाही तिला. पण तिच्याबरोबर काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांशी तुर्कस्तानात, इस्तंबूलमध्ये भेट झाली होती. तिथल्या माझ्या यजमानानं एका प्रचंड देहधारी, गोलमटोल गुब्या व्यक्तीची ओळख करून दिली होती. त्या अख्ख्या भेटीत ही व्यक्ती काही बोलली नव्हती. नंतर कळलं ती व्यक्ती म्हणजे कोणी बडा तालेवार चेचेन बंडखोर होता. पुढे त्याची हत्या झाली तेव्हा एक ‘अन्यथा’ त्यावर लिहिलं होतं. तर त्याच भेटीत अ‍ॅनाशी संबंधित काही जण भेटले होते. ते पत्रकार होते. अर्थात अ‍ॅनाही याच कळपातली. पत्रकारच.
पण ती रशियातली. जन्म झाला अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये. अ‍ॅना माझेपा. आई-वडील मूळचे युक्रेनी. राजनैतिक सेवेत होते, त्यामुळे त्यांच्या बदल्या व्हायच्या. अशाच एका बदलीत अ‍ॅना रशियात.. त्यातही मॉस्कोत.. येऊन पडली. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण तिकडेच झालं तिचं. मग पत्रकारितेतली रीतसर पदवी घेऊन ती या व्यवसायात आली. ही काही फार जुनी गोष्ट नाही. १९८० सालची. म्हणजे रशियन फौजा अफगाणिस्तानात नुकत्याच घुसल्या होत्या. इराणात अयातोल्ला खोमेनी यांची सत्ता आली होती आणि अमेरिकेने चीनबरोबर नुकतेच अधिकृत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. पण मुख्य म्हणजे शीतयुद्धाची अखेर किमान नऊ र्वष दूर होती आणि सोविएत रशियावरचा कम्युनिझमचा पोलादी पडदा वर जायलाही बराच काळ होता. त्या वेळच्या रशियात एकमेव वृत्तसंस्था होती. इझवेस्तिया. तीदेखील अर्थातच सरकारी मालकीची. अ‍ॅना त्याच वृत्तसंस्थेत दाखल झाली. अशा प्रकारच्या व्यवस्थेत पत्रकारितेत फार काही तलवारबाजी करता येत नाही. किंबहुना काहीच करता येत नाही. सरकारी खाते सांगेल त्याच आणि तितक्याच काय ते बातम्या. खऱ्या बातमीदारासाठी काय कंटाळवाणं असेल हे असं जगणं! या कंटाळवाण्या काळामुळे असेल कदाचित. अ‍ॅनाची अलेक्झांडरशी ओळख झाली. तोही पत्रकार. पण दूरचित्रवाणीवरचा. त्याच्याशी मग अ‍ॅनाचं लग्न झालं. म्हणून ती बनली अ‍ॅना पोलितोव्हस्काया.    
नंतरचा पुढचा काळ रशियातल्या खऱ्या धामधुमीचा. राजकीय क्षितिजावर मिखाइल गोर्बाचोव यांचं आगमन झालं आणि त्यांच्या पेरिस्त्रोईका आणि ग्लासनोस्तच्या रेटय़ात फक्त रशियाच नाही, तर सारं जगच बदललं. १९८९ साली बर्लिनची भिंत कोसळली, कम्युनिझमच्या अंताचा आरंभ झाला आणि पाठोपाठ रशिया राजकीय अस्थिरतेच्या खाईत लोटला गेला. गोर्बाचोव यांच्यानंतर बोरीस येल्तसिन आले. रशियाच्या विघटनाला सुरुवात झाली. सोविएत साम्राज्याच्या मगरमिठीतून मुक्त होत अनेक नवनवे देश तयार झाले. त्यानंतर रशियाच्या राजकीय क्षितिजावर उगवला एक नवा तारा. व्लादिमीर पुतिन. हा नवा अध्यक्ष रशियाच्या अत्यंत क्रूरपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या केजीबी या गुप्तहेर संघटनेचा प्रमुख होता. त्यामुळे पुतिन आपला केजीबीतला सगळा करालपणा घेऊनच राजकारणात उतरले. हा त्यांचा करालपणा दाखवण्यासाठी योग्य संधी लवकरच मिळणार होती.    
ती म्हणजे चेचेन्या. कॉकेशस पर्वताच्या कुशीत वसलेला हा देश म्हणजे रशियासाठी कायमस्वरूपी ठसठसती जखम बनलाय. या मुस्लिमबहुल देशाला रशियाची मालकी मान्य नाही. आसपासच्या अन्य देशांप्रमाणे त्यालाही स्वतंत्र व्हायचंय. पण आसपासच्या देशांत आणि चेचेन्यामध्ये फरक आहे. तो म्हणजे कॉकेशसच्या या पर्वतरांगीय प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर खनिजसंपत्ती दडलेली आहे. तेव्हा ही अशी समृद्ध भूमी काही हातातून जाऊ द्यायला पुतिन तयार नाहीत. त्याचमुळे चेचेन आणि पुतिननियंत्रित रशिया यांच्यात सतत रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. आपली सर्व ताकद पणाला लावून पुतिन यांनी चेचेन्याला ठेचूनच काढलंय. त्यासाठी काय काय केलं नाही पुतिन यांनी. रशियाच्या लष्करी ताकदीसमोर चेचेन्या अगदीच लिंबूटिंबू. पण तरीही चेचेन बंडखोरांनी पुतिन यांच्या नाकीनऊ आणले. त्यामुळे पुतिन आणखीनच रागावले. एवढासा  चेचेन्या आपल्याला आव्हान देतोय हे काही त्यांना सहन होईना. त्यांनी चेचेनच्या अमानुष हिंसाचाराला आपल्या अतिअमानुष हिंसाचारानं तोंड द्यायचं ठरवलं. मिळेल तो चेचेन चेचावा.. हे त्यांचं धोरण बनलं. त्यांनी मग लहानथोर, महिला काही म्हणजे काही पाहिलं नाही आणि चेचेन्याचा नि:पात केला. रशियाचं विघटन होत असताना वेगळा झालेला चेचेन्या त्यांनी पुन्हा रशियन साम्राज्यात आणून बसवला. पण हे सगळं करताना अतोनात, अनन्वित अत्याचार केले.    
..ते सगळे अ‍ॅनाच्या बातम्यांचे विषय बनले. त्यासाठी अ‍ॅना जमेल तेव्हा चेचेन्यात जात राहिली. तिथल्या महिला, शालेय विद्यार्थी यांच्याशी बोलत राहिली. जमेल तितकी माहिती घेत राहिली. काही वेळा तर रशियन फौजांची बेजबाबदार कृत्यं तिनं जातीनं टिपली. मानवाधिकारांचं होणारं सर्रास उल्लंघन, महिलांवरचे लैंगिक अत्याचार तिच्याकडून साद्यंत मांडले जाऊ लागले. पाश्चात्त्य जग तिच्या वार्ताकनावर फिदा होतं. रशियात राहूनही अशी बातमीदारी करणारं फारसं कोणी नव्हतंच. त्यामुळे अ‍ॅना काय लिहितेय याकडे सगळय़ा समंजस जगाचं लक्ष असायचं. पण हे इतकं स्वातंत्र्य कोणाला.. आणि त्यातही पत्रकाराला देणं.. हे पुतिन यांना परवडणारं नव्हतं. अ‍ॅनाला वेगवेगळय़ा मार्गानी जरा सबुरीनं घ्या.. असे निरोप जायला लागले. कोणत्याही चांगल्या पत्रकाराप्रमाणे अ‍ॅनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. ती आपली काम करीत राहिली. मग धमक्यांची तीव्रता वाढू लागली. एकदा तर पोलिसांनीच तिचं अपहरण केलं. आठ तास तिच्यावर मानसिक अत्याचार सुरू होते. तिच्या दोन मुलांची नावं घेऊन, ती मुलं कोणत्या वेळेला कुठे जातात, शाळांचं वेळापत्रक वगैरे तपशील सांगत त्यांचे कसे हाल करता येतील याची चर्चा तिच्यादेखत केली गेली. हेतू हा की ती मोडून पडावी. मग अंधार पडल्यावर तिथला स्थानिक पोलीसप्रमुख तिला भेटायला आला. म्हणाला चल.. अ‍ॅनानं विचारलं कुठे? तर हा सहज म्हणाला.. म्हणजे काय तुला माहीत नाही अजून.. कमाल आहे.. मला तुझा खून नाही का करायचाय..
असं म्हणून तो तिला घेऊन गेला. बाहेर किर्र अंधार. आवाज येत होता तो पिस्तुलात काडतुसं भरल्याचा. ती भरली गेल्यावर त्या पोलीसप्रमुखानं तिला सांगितलं.. तू आता तयार असशील किंवा नसशील मी गोळी मारणार.. त्यानं गोळी झाडली. अ‍ॅना अर्थातच हादरली. पण तिच्या लक्षात आलं गोळी आपल्याला लागलेली नाही. हे कळतंय तोच पोलीसप्रमुख खदाखदा हसत म्हणाला.. जा.. जा घरी जा आणि परत या फंदात पडू नकोस.
अ‍ॅनानं पहिलं तेवढं ऐकलं. जे काही करीत होती तेच ती करीत राहिली. मध्ये एकदा व्हिएन्नात आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलनासाठी तिला बोलावलं गेलं. तिथं धडाक्यात भाषण केलं तिनं.. माहितीची किंमत जिवाच्या रूपात द्यायला आपण कसं तयार असायला हवं वगैरे.. मुक्त, लोकशाहीवादी समाजासाठी हे कसं आवश्यक आहे हे ती सांगत होती.
तिकडून परत मायदेशात आली तर तिला अलेक्झांडर लिटविनेन्को भेटला. तो रशियाचा गुप्त पोलीस अधिकारी. तिला म्हणाला, तुझ्या हत्येचे आदेश निघालेत. लवकरात लवकर रशिया सोड. दरम्यान तिचं पुतिन यांच्यावरचं बरंच लिखाण प्रसिद्ध झालं होतं. तिच्या लिखाणामुळे पुतिन यांचा अभद्र, खुनशी चेहरा जगापुढे आला होता. पण म्हणून देश सोडावं असं काही तिला वाटलं नाही. अमेरिकेचा पासपोर्ट होता तिच्याकडे. पण ती काही गेली नाही. काही दिवसांतच अलेक्झांडर लिटविनेन्को याच्या परागंदा होण्याची बातमी आली. त्यानं देशत्याग करून ब्रिटनमध्ये स्थलांतर केलं होतं. ब्रिटनमध्ये राहून तो पुतिन यांची अनेक गुपितं फोडणार होता. पण लवकरच बातमी आली. अलेक्झांडरला विषबाधा झाल्याची. तीदेखील साधीसुधी नाही. तर किरणोत्सारी घटकाची. अलेक्झांडर झिजून झिजून, सगळय़ांच्या डोळय़ादेखत रुग्णालयात मरणार हे नक्की झालं. अशा मरणासन्न अवस्थेत त्याला आणखी एक मरण सहन करावं लागणार होतं.    
अ‍ॅनाचं. ७ ऑक्टोबर २००६ ला.. पुतिन यांच्या वाढदिवशी.. राहत्या इमारतीच्या उद्वाहनात अ‍ॅना मेलेल्या अवस्थेत आढळली. गोळय़ा घालून मारलं होतं तिला. चार काडतुसं आणि ते पिस्तूल तिथंच शेजारी होतं. सुपारी देऊन तिची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. ँपुढच्याच महिन्यात २३ नोव्हेंबरला अलेक्झांडर गेला. आजतागायत कळलेलं नाही अ‍ॅनाची आणि अलेक्झांडर लिटविनेन्को याचीही हत्या कोणी घडवली ते.
गेल्या आठवडय़ात ब्रिटिश सरकारनं लिटविनेन्को याच्या हत्येची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिलेत.
अ‍ॅनाच्या बाबतीत तसंदेखील काही घडलेलं नाही.    
जिवंत असती तर पुढच्या आठवडय़ात, ३० ऑगस्टला आपला ५६वा वाढदिवस तिनं साजरा केला असता.
@girishkuber

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा