चित्रातील प्रतिमा या मूर्त असतात व त्यामागील आशय हा ‘अमूर्त’ असतो. त्यामुळे एका अर्थी सर्व चित्रं ही अमूर्त आशय मांडण्यासाठी रंगवलेली असतात. मग त्यातील प्रतिमा या मानवाकृती, वस्तू, निसर्गदृश्य अशा असल्या तरीही..
आजपासून आपण अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, ज्याला मराठीत पर्यायी शब्द म्हणून अमूर्त किंवा केवलाकार चित्र वगैरे म्हणतात ती समजून घेण्यास प्रयत्न करू. त्यासाठी आत्तापर्यंत पाहिलेल्या संकल्पना-चित्र म्हणजे संवेदनापट, याचा उपयोग करणार आहोत, पण ते असो..
जी चित्रं पाहून सर्वसाधारणपणे कसलाच बोध होत नाही, ज्या चित्रातील प्रतिमेमध्ये आपल्याला ‘ओळखीचं’ काहीच दिसत नाही, अशा चित्रांना चित्रकलेच्या क्षेत्रात ‘अॅबस्ट्रॅक्ट’ असं संबोधतात. असं कळलं की अशा ‘न बोध’ चित्रांना ‘अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग’ अशी ओळख मिळते. म्हणजे जसं व्यक्तिचित्राला ‘पोट्र्रेट पेंटिंग’, निसर्गचित्राला ‘लॅण्डस्केप पेंटिंग’ किंवा वस्तूंच्या सुंदर रचनेला ‘स्टील लाइफ पेंटिंग’ अशी ओळख मिळते त्याप्रमाणे.
पण चित्रांचं वर्गीकरण त्यांच्या प्रतिमांच्या अंगाने विचार करून करणे हे धोकादायक आहे. असं करणं म्हणजे चित्रकलेचा गाभा, आत्मा न समजणं आहे.
जसं फळं-फुलं यांचे गुण ठरवताना केवळ त्यांचं बाह्य़ शारीरिक गुण आकार, रंग, पोत फक्त यांना महत्त्व देत नाही तर त्यांचा आत्मा असलेले गुण चव-रस-गंध यांनाही महत्त्व देतो. तसंच चित्रातील प्रतिमा, ती प्रतिमा रंगवण्याचं कसब, तिचा हुबेहूबपणा इत्यादी हे चित्राचं शरीरगुण आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन चित्र ‘विषयातील’, न दिसणारा- पण जाणवणारा, संवेदनानुभवांद्वारे साररूपात कळणारा, ‘आशय’ मांडण्यासाठीच रंगवलं जात असतं. तो आशय चित्राचा आत्मा असतो. त्याकरताच चित्रकार चित्रातील प्रतिमेत ठरावीक दृश्यपरिणाम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो.
मूर्त-अमूर्ताची रूपकं वापरून सांगायचं तर चित्रातील प्रतिमा या मूर्त असतात व त्यामागील आशय हा ‘अमूर्त’ असतो. त्यामुळे एका अर्थी सर्व चित्रं ही अमूर्त, अमूर्त आशय मांडण्यासाठी रंगवलेली असतात. मग त्यातील प्रतिमा या मानवाकृती, वस्तू, निसर्गदृश्य अशा असल्या तरीही.
पण सर्वसाधारणपणे चित्रात ‘जे दिसतंय’ त्यालाच चित्राचा ‘विषय’ म्हणून समजलं जातं. पण चित्राचा खरा विषय हा ‘आशय’ असतो. पॉल क्ली या जर्मन-स्विस चित्रकाराने या संदर्भात एक सुंदर विधान केलंय. तो म्हणतो- चित्रकला आपल्याला जे डोळ्यांना दिसतं (जगाचं बाह्य़रूप) त्याची प्रतिकृती करत नाही. जे दिसतं त्याला (जगाच्या अंतरूपाला, आशयाला) दृश्यमान करतं, उलगडून दाखवतं.
त्यामुळे साडी, बॅगा, चपला आदी वस्तूंप्रमाणे केवळ बाह्य़ शरीररूपाच्या लक्षणांवरून, विशिष्ट प्रकारे, कुठच्याही ‘न बोध’ प्रतिमा दर्शवणाऱ्या चित्रांना केवलाकारी, अमूर्त चित्र असं नाव देणं, त्यांचा गट बनवणं ही फार मोठी वैचारिक चूक आहे.
आतापर्यंतच्या चर्चेमधून हे कळलं असेल की, चित्रकार जगाच्या व चित्राच्या दृश्यरूपाद्वारे अमूर्त आशयाचा वेध घेत असतो. हे समजून घेण्यासाठी या वेळी आपण दोन चित्रं पाहणार आहोत. पहिलं चित्र आहे ते ब्रिटिश चित्रकार जे. एम्. डब्ल्यू टर्नर यांचं ‘द ब्ल्यू रिगी’ हे व दुसरं स्विस-जर्मन चित्रकार पॉल क्ली यांचं चित्र ‘द एन्शंट साऊंड’.
मग तुम्हाला लक्षात येईल की, टर्नरने उत्तर-मध्य स्वित्र्झलडमधील व्युक्रीन, झुग व लॉरेझ या तलावांमधील एक विशिष्ट पर्वत रंगवला आहे. तो पहाटेच्या नुकत्याच सूर्योदयाच्या वेळी, धुक्याची चादर पांघरलेला, विशिष्ट वेळच्या वातावरणामुळे फिक्कट निळा-जांभळा दिसणारा. आपण हे चित्र पाहू लागलो की, त्या धुक्यात आपण काहीसे हरवून जातो व त्या थंड, शांत-नि:शब्द वातावरणात, नुकत्याच उगवणाऱ्या सूर्यप्रकाशाची ऊब आपल्याला जाणवू लागते. चेहरा व शरीराला थंड वारा स्पर्शतोय असं वाटतं. जसं जसं हळूहळू तलावाकडे नजर येते तसं पाण्यावर तरंगणारे पक्षी, पाण्यातून आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालीचा आवाज किंवा एखादं आर्त कूजन ऐकू येतं. आपल्याला त्या स्थळाच्या वातावरणाने केव्हा वेढून टाकलंय व आपण कधी त्यात हरवलो ते कळतच नाही. आपली नि:शब्दता आपल्यालाच जाणवते.
टर्नरने संपूर्ण आयुष्य लॅण्डस्केप रंगविलं. तरुणपणी भरपूर इमारती, स्थापत्यरचना दर्शविणारे, भरपूर तपशील असलेले. उत्तरार्धात वारा, प्रकाश, जमीन, अग्नी, पाणी अशा पंचमहाभूतांचं नाटय़ ज्या दृश्यात अभ्यासता येतं, दर्शविता येतं, अशा निसर्गदृश्याचं!
परिणामी टर्नरचं चित्र सामान्य निसर्गचित्रं जिथे पूर्ण होतात म्हणजे- झाडं, पर्वत, नद्या, घरं, आदींचं चित्रण करून पूर्ण होत नाही. तो त्यामागील पंचमहाभूतांच्या अनुभवाकडे जातो. वास्तविक त्याला हे कळलंय की निसर्गचित्र म्हणजे एका ठिकाणाचं, स्थळाचं केलेलं चित्र नव्हे. तर पंचमहाभूतं, त्यातील एकमेकांशी असलेलं नातं, त्यातील नाटय़ं व या पंचमहाभूतांच्या नात्याची रचना असलेला ‘निसर्ग’ याचा वेध घेणारं चित्र म्हणजे ‘निसर्गचित्र’. असा वेध घेणं ज्या ठिकाणी, ज्या स्थळी, ज्या वेळी शक्य होतं त्याचं तो चित्र रंगवतो. अशा अर्थी टर्नर मूर्ताकडून (झाडं, डोंगर, तलाव आदी) अमूर्ताकडे (पंचमहाभूतांचा अनुभव) जातो. अमूर्ताचा मूर्तामधून वेध घेतो.
पॉल क्ली यांच्या चित्राचं नाव आहे ‘द एन्शण्ट साऊण्ड’. चित्राचं नाव हे स्पष्ट करतं की, चित्र हे अदृश्य अशा ध्वनी अनुभवावर आधारित आहे.
गंमत ही आहे की, क्लीने तो ध्वनी ज्या वस्तू, वाद्य यातून निर्माण झाला त्यांचं चित्रण केलं नाहीये. वास्तविक ध्वनीचा स्रोत- उगम याचं तो चित्रण करतच नाही. चित्रात दिसतात ते फक्त गडद पाश्र्वभूमीवर विविध रंगांच्या छटा असलेले चौकोन.
एखाद्या जागी- खोली, दऱ्या, गुहा, बोगदा, आवाजाचा प्रतिध्वनी आपण ऐकतो. प्रतिध्वनी ऐकताना आपल्याला ध्वनिकंपनं जाणवत असतात. एखाद्या ठिकाणी जिथे प्राचीन वास्तू आहेत, अशा वास्तूतही फिरताना आपल्या मनात आपण ध्वनींची कंपनं, प्रतिध्वनींची कल्पना करीत असतो. क्ली विचार करतो की या अनुभवाला चित्रातून कसं व्यक्त करता येईल? येथे हे लक्षात घेऊ या की टर्नर मूर्ताकडून अमूर्ताकडे जातोय; तर क्लीच्या चित्राची सुरुवात, चित्रविचाराचं अमूर्तातून- अदृश्य अशा ध्वनी अनुभवातून होतेय. अमूर्ताकडून चित्राकडे क्ली प्रवास करतो.
क्लीची चित्र-प्रगल्भता ही की ध्वनीची कंपनं व रंगछटांची मांडणी यातील साम्य संबंध त्यांना जाणवू लागते व त्यातून त्याचं चित्रं घडत जातं.
नि:शब्द अवकाशाप्रमाणे गडद पाश्र्वभूमी व त्यामध्ये अचानक निर्माण झालेला ध्वनी, ध्वनीची कंपनं, त्याद्वारे जाणवणारा ध्वनीचा अवकाशातील प्रवास सुचविण्यासाठी क्ली चौकोनांची मांडणी करतात व त्यामधील रंग व त्यांच्या छटांची विशिष्ट अशी रचना करतात. परिणामी चित्राचं नाव ‘द एन्शण्ट साऊंड’ हे वाचून चित्रं पाहू लागलो की, त्या रंगछटांमुळे चित्रात आपली नजर वर-खाली, डावी- उजवीकडे फिरू लागते. दृष्टिक्षेपातील या हालचालींची जाणीव झाली की (तलावातील पाण्याच्या तरंगाप्रमाणे) त्यातील व ध्वनीच्या लहरींचा, कंपनांचा, तरंगाचा अवकाशातील प्रवास यातील नातं- साम्य कळतं. ते कळलं की क्लींचा चित्रविचार समजतो. चित्रातील ‘अमूर्तता’ दृश्यमान होते. उमगते. चेहऱ्यावर स्मित उमटतं कारण अमूर्ताचा अनुभव, ज्ञान हे नेहमीच आपल्याला आनंद देतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा